“या सगळ्या याचिका घेऊन जा आणि फाडून टाका,” चामरुने आदेश दिला. “या ग्राह्य नाहीत. आणि म्हणून हे कोर्ट त्यांची दखल घेणार नाही.”
मॅजिस्ट्रेटचं काम चामरुला आवडू लागलं होतं.
ऑगस्ट १९४२. सगळा देश धुमसत होता. संबलपूरचं न्यायालय तर नक्कीच. चामरु परिदा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी नुकताच कोर्टावर कब्जा केला होता. चामरू स्वतः ‘जज’ झाला होता. आणि त्याचा ‘ऑर्डर्ली’ होता जितेंद्र प्रधान. पूर्णचंद्र प्रधानने पेशकाराची जबाबदारी स्वीकारली होती.
कोर्टाचा ताबा म्हणजे चले जाव चळवळीतलं त्यांचं मोलाचं योगदान.
“या सगळ्या याचिका इंग्रज सरकारच्या नावे लिहिल्या आहेत”, आधीच बुचकळ्यात पडलेल्या कोर्टातल्या गर्दीला उद्देशून चामरु म्हणाला. “आपण स्वतंत्र भारतात राहतो. तुम्हाला तुमच्या याचिका दाखल व्हाव्या असं वाटत असेल तर त्या परत घेऊन जा. महात्मा गांधींच्या नावाने त्या नव्याने लिहा. मगच मी त्यांची योग्य ती दखल घेईन.”
या घटनेला साठ वर्षं उलटून गेली, पण चामरु आजही मोठ्या खुशीत त्या दिवसाची गोष्ट कथन करत होते. ते आज ९१ वर्षांचे आहेत आणि त्यांच्या मागे बसलेले जितेंद्र प्रधान ८१ वर्षांचे. पूर्णचंद्र आता नाहीत. ओडिसाच्या बारगड जिल्ह्यातल्या पाणिमारा गावात चामरु राहतात. स्वातंत्र्य चळवळ भरात असताना या गावच्या मातीतले कित्येत जण या लढाईत सामील झाले होते. केवळ १९४२ मध्ये या गावचे ३२ जण तुरुंगात गेल्याची नोंद आहे. त्यातले चामरू आणि जितेंद्र धरून सात जण आजही जिवंत आहेत.
एक काळ असा होता, जेव्हा या गावचा जवळजवळ घरटी एक जण सत्याग्रह चळवळीत सामील झाला होता. या गावाला इंग्रज राजवट सहन होत नव्हती. त्यांची एकी अतूट होती. आणि त्यांचा निर्धार सर्वदूर ख्यात होता. आणि इंग्रजांचा सामना करणारे हे सत्याग्रही मोठे कुणी नाही तर गरीब आणि निरक्षर शेतकरी होते. दोन घासासाठी खस्ता खाणारे छोटे कास्तकार. स्वातंत्र्यानंतर आजही त्यांची दशा मात्र तशीच आहे.
इतिहासाच्या पुस्तकांमध्ये त्यांचा साधा उल्लेखही सापडणार नाही. इतकंच काय ओडिशालाही त्यांचा तसा विसरच पडलाय. पण बारगडमध्ये मात्र पाणिमारा आजही स्वातंत्र्याचं गाव म्हणून ओळखलं जातं. गावातल्या फारसा कुणाला याचा वैयक्तिक कसलाच फायदा झालेला नाही. पारितोषकं, पदं किंवा नोकऱ्यांसाठी तर नक्कीच नाही. तरीही त्यांनी जोखीम पत्करली. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी ते लढले.
या लढ्याचं हे पायदळ होतं म्हणा ना. अनवाणी. एरवीही पायताणाचा पत्ता नसणारं स्वातंत्र्य संग्रामाचं हे पायदळ.





