“अरे बाप रे­!” ती ओरडली. हातातला फिल्टर कॉफीचा कप खाली ठेवला. दोन्ही हातांनी फोन धरून तिने ती बातमी आपल्या नवऱ्याला मोठ्याने वाचून दाखवली. तो ऑफिसची मेल लिहीत होता. ­“महाराष्ट्राच्या औरंगाबादजवळ एका मालवाहू गाडीखाली १६ स्थलांतरित कामगारांचा चिरडून मृत्यू – तू पाहिलंस का हे? काय चाललंय काय हे सगळं?” काही क्षणांनी सगळं बधिर झालं आणि आता गार होऊन गेलेली कॉफी उरलेल्या बातमीसोबत घोटघोट पिता येत होती. “बाप रे! अरे किती माणसं आहेत ही – आणि कुठकुठनं आली होती?” तिच्या आवाजातलं आश्चर्य आता मगाइतकं राहिलं नव्हतं.

“यातले काही उमरियाचे होते, म्हणे. मनू, गेल्या डिसेंबरमध्ये आपण तिथे गेलो होतो ना?” त्या सुट्टीचा उल्लेख ऐकून त्याने क्षणभर त्या ईमेलच्या जंजाळावरून नजर हटवली आणि परत तो आपल्या कामाला लागला. “हो,” तो म्हणाला, “बांधवगड अभयारण्य. मध्य प्रदेशाच्या सगळ्यात मागास जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्यातलं. तिथून उठून हे लोक जालन्याला कामाला आले, ते बरोबरच आहे. पण रुळावर झोपायचं? इतका मूर्खपणा कुणी कसा काय करू शकतं?”

“अरे, किती सुंदर होतं ते,” ती वेगळ्याच जगात रममाण झाली होती, “आठवतो, तो शेषशैय्या? विष्णूची ती भव्य मूर्ती आणि शांत झरा, सभोवताली हिरवे कंच सालवृक्ष... एकदा हा लॉकडाउन संपला ना की आपण परत तिथे जायलाच पाहिजे...”

सुधन्वा देशपांडेंच्या आवाजात ही कविता ऐका

Paintings by Labani Jangi, a 2020 PARI Fellow and a self-taught painter doing her PhD on labour migrations at the Centre for Studies in Social Sciences, Kolkata
PHOTO • Labani Jangi

चित्रं - लाबोनी जांगी. चित्रकार लाबोनी स्वयंभू चित्रकार असून ती कोलकात्याच्या सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेस इथे कामासाठी स्थलांतर विषयात पीएचडीचे शिक्षण घेत आहे. ती २०२० वर्षीची पारी फेलो आहे

कुणी?
कुणी हाकललं त्यांना?
कुणी अशी त्यांच्या तोंडावर दार आपटून बंद केली?
कुणी आणली त्यांच्या रानोमाळ भटकण्याची वेळ?
कुणी हिरावून घेतल्या त्यांच्या उपजीविका?
रस्त्यांमध्ये या आडकाठ्या ठेवल्या तरी कुणी?
कुणी केलं त्यांना नजरकैद?
त्यांची विसरलेली स्वप्नं
कुणी केली त्यांना परत?
पोटातल्या आगीत
हे चुरचुरणारे सुस्कारे मिसळले तरी कुणी?

तहानलेल्या त्यांचा गळा
कोणत्या आठवणीने आला दाटून?
घर, अंगण, गाव
शेताचा बांध आणि
चिल्ल्यापिल्ल्यांचे गोड आवाज...
कुणी? सांगा, कुणी बांधून दिलं हे सगळं
सुक्या चपात्या
आणि जहाल मिरच्यांच्या ठेच्यासोबत?
एकेका घासात
कुणी भिनवली ही आशेची धुंदी?

शपथेवर सांगते, रेल्वेमार्गातले
सालाच्या लाकडाचे स्लीपर
त्यांचंच आहे हे काम
गावाच्या वेशीवरच्या रानाला त्यांनीच जागृत केलं असणार
नाही तर स्वप्नांनी भरलेल्या
रेशमाचे हे बिछाने त्यांना दुसरं कोण देणार?
बांधवगडच्या या सोळा बांधवांचं
शिळेत रुपांतर करण्याचा
हा शाप दिला तरी कुणी?

कोण बरं असं करेल,
एक नाही, दोन नाही
सोळा विष्णूच त्या
शेषनागाच्या फण्यावर निद्रिस्त होतील?
त्यांच्या टाचांमधून
ही आरक्त चंद्रगंगा वाहिली
कुणाच्या इशाऱ्यावर?
रुळांवर पसरलेल्या त्या चपला?
देव त्यांना चांगली शिक्षा देणार!

त्या अर्ध्या खालेल्ल्या भाकरी
रुळावरती
कुणी टाकून दिल्या?
कुणी?

मूळ गुजरातीमधून लेखिकेने इंग्रजीत अनुवादित केली आहे.

ध्वनी: सुधन्वा देशपांडे हे जन नाट्य मंचाशी निगडित अभिनेता व दिग्दर्शक आहेत आणि लेफ्टवर्ड बुक्स मध्ये संपादक आहेत.

टीपः दैनिक लोकमत मध्ये प्रसिद्ध झालेली मरण पावलेल्या कामगारांची नावं

१. धनसिंग गोंड
२. निर्वेश सिंग गोंड
३. बुद्धराज सिंग गोंड
४. अच्छेलाल सिंग
५. रबेंद्र सिंग गोंड
६. सुरेश सिंग कौल
७. राजबोहराम पारस सिंग
८. धर्मेंद्र सिंग गोंड
९. वीरेंद्र सिंग चैनसिंग
१०. प्रदीप सिंग गोंड
११. संतोष नापित
१२. ब्रिजेश भेयादिन
१३. मुनिमसिंग शिवरतन सिंग
१४. श्रीदयाल सिंग
१५. नेमशाह सिंग
१६. दीपक सिंग

अनुवादः मेधा काळे

Pratishtha Pandya

Pratishtha Pandya is a Senior Editor at PARI where she leads PARI's creative writing section. She is also a member of the PARIBhasha team and translates and edits stories in Gujarati. Pratishtha is a published poet working in Gujarati and English.

Other stories by Pratishtha Pandya
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Marathi Translations Editor at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale