तपन मोंडल यांना बरेच जण अण्णा अशी हाक मारतात कारण त्यांच्या आणि रजनीकांतच्या चेहऱ्यात साम्य आहे (आणि रजनीकांतला दक्षिणेकडे अण्णा म्हटलं जातं). पण मोंडल यांची ख्याती वडोदऱ्यात वेगळ्याच कारणासाठी आहे – कदाचित या शहरातला ते एकटेच असे मूर्तीकार असतील जे ५ ते ९ फुटी मूर्ती घडवतात तेही मातीच्या, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या नाही.

आणि गणपती आणि इतर देवी देवतांच्या मूर्ती घडवत असताना ते पश्चिम बंगालच्या मूर्तीकलेचं तंत्र वापरतात. “या मातीच्या मूर्तींचे साचे कुमारतुलीचे आहेत जे मी इथे घेऊन आलोय – २००० किमी दूर बंगालहून,” ते म्हणतात.

तपन यांचा कारखाना – शहरातल्या सुमारे ३० पैकी एक – ज्याचं नाव आहे कृष्णा प्रतिमालय, वडोदऱ्याच्या मध्यभागात असलेल्या पंचवटी इथे आहे. इथे एका सिमेंटच्या पत्र्याखाली साचे, रंग, माती आणि इतर अवजारं ठेवलेली आहेत. हंगाम जोरावर असतो तेव्हा रस्त्याच्या पलिकडच्या बाजूला बांबू आणि वर प्लास्टिकचा कागद टाकून शेड बांधली जाते, जिथे गणपतीच्या उंच मूर्ती घडवल्या जातात.

इथे वर्षभर लगबग सुरू असते – गणपती, दुर्गा, विश्वकर्मा, सरस्वती आणि इतरही देवतांच्या मूर्ती सण आणि मागणीप्रमाणे तयार केल्या जातात. दर वर्षी तपन आणि त्याचे साथीदार गणपतीच्या ५-९ फुटी उंच १० तरी मूर्ती तयार करतात – अर्थात आगाऊ ऑर्डर असली तर. या एकेका मूर्तीची किंमत रु. २०,००० ते रु. १ लाख इतकी असू शकते, ते सांगतात. गणपतीच्या तीन फुटी २०-३० आणि छोट्या आकाराच्या ४०-५० मूर्तीदेखील ते घडवतात ज्यांची किंमत रु. २,००० ते रु. १०,००० इतकी असते.

'The clay idols are imprints of Kumartuli, which I have brought here from Bengal', says Tapan Mondal
PHOTO • Aditya Tripathi

‘या मातीच्या मूर्तींचे साचे कुमारतुलीचे आहेत, मी ते बंगालहून इथे घेऊन आलोय,’ तपन मोंडल सांगतात

सध्या ४६ वर्षांचे असणारे तपन लहानपणीच आपले वडील अधीर मोंडल यांच्याकडून मूर्ती तयार करायला शिकले. तेव्हा हे कुटुंब कुमारतुलीहून ४८ किमी उलुबेरिया तहसिलातल्या गौरीपूर गावी आणि कोलकात्याच्या जुन्या कुंभारवाड्यात राहत होतं. “१९८४ साली आमचे एक स्नेही आहेत त्यांनी पिताजी आणि मला [मूर्तीकामाच्या कारखान्यात काम करण्यासाठी] इथे आणलं. दर वर्षी एक महिना आम्ही इथे यायचो,” तपन सांगतात. पश्चिम बंगालमध्ये काम नसायचं त्या काळात ते इथे यायचे आणि मग दुर्गा पूजेचं काम संपवण्यासाठी वेळेत परत जायचे.

१९९२ मध्ये, त्यांचे वडील गावी परतले, पण तपन एका बांधकामावर काम करण्यासाठी काही महिने वडोदऱ्यात राहिले. “मला काही हे अवजड काम आवडायचं नाही, पण दुर्गा पूजा सोडून एरवी काम तरी काय करायचं? रिकाम्या पोटाचा सवाल होता...” एक दिवस, ते सांगतात, “मी [बांधकामाच्या ठिकाणी] कामगारांसाठी असणाऱ्या खोलीत देवांची चित्रं काढत असताना एका गुजराती साहेबानी मला पाहिलं. त्यांनी मला विचारलं की मी गणपतीचं चित्र काढू शकतो का.” त्यानंतर त्यांनी मला वडोदऱ्याच्या मध्यभागात असणाऱ्या मांडवीतल्या एका मूर्तीकाराकडे नेलं. त्या मूर्तीकाराने तरुण तपन यांना कामावर घेतलं जिथे इतर १०-१२ जणही कामाला होते. “त्या काळी मला [बांधकामावर] दिवसाचे रु. २५ मिळायचे म्हणून मी त्यांना दिवसाची ३५ रुपये मजुरी मागितली. त्यांनी मान्य केलं. अजून काय पाहिजे? मला माझं आवडतं काम [मूर्तीकाम] करता येणार होतं आणि कमाई पण होणार होती.”

The process of Ganapati making
PHOTO • Aditya Tripathi

मनोरंजन कर्माकार (वर डावीकडे) यांचा कुलगाचिया गावात मूर्ती बनवण्याचा कारखाना आहे, अर्जुन रुईदास रोजंदारीवर आणि कमला चाकमध्ये लग्नाच्या वरातीतल्या बॅण्डमध्ये काम करतात. दोघंही गणेशोत्सवाआधी वडोदऱ्यात काही महिने मोंडल यांच्या खास मातीच्या मूर्ती बनवण्याचं काम करतायत

मूर्तीकार गोविंद अजमेरी यांनी कालीमातेची मूर्ती तयार करण्याविषयी तपन यांना विचारलं. तपन यांनी मूर्ती केली पण प्लास्टरची. त्यांचं कौशल्य पाहून खूश झालेल्या अजमेरींनी त्यांना मागणीप्रमाणे काम करण्याचं कंत्राट दिलं – म्हणजेच अधिक उत्पन्न. “मी १९९६ पर्यंत तिथे काम केलं. तोपर्यंत गणेशोत्सवांचं आयोजन करणाऱ्या अनेक तरुण मंडळांशी माझी ओळख झाली होती. एका गणपती मंडळाने मला एक ऑफर दिली. त्यांनी मला माती, पेंढा, बांबू आणि रंग दिले. मांडवीच्या दांडिया बाजार मध्ये त्यांनी मला जागा दिली, तिथे मी त्यांच्यासाठी मूर्ती तयार करून दिली,” तपन सांगतात. “१९९६ साली, वडोदऱ्यातली सर्वात उंच मूर्ती – आठ फुटी – मीच पौवा वाला गल्लीतल्या एका मंडळासाठी तयार केली होती. त्याचे मला १,००० रुपये मिळाले होते.”

२००० सालापर्यंत तपन यांचा काम आणि कमाईसाठीचा संघर्ष चालूच होता. “मी माती वापरतोय अशी चर्चा होऊ लागली आणि मग काही स्थानिक कलाकारांनी अशा अफवा पसरवायला सुरुवात केली की मातीच्या [उंच] मूर्ती सहज फुटू शकतात,” तपन सांगतात. पण बांग्ला मूर्ती टिकाऊ असतात – आतल्या मूळ ढाच्यात भाताचा पेंढा असतो आणि तो सुतळीने घट्ट बांधलेला असतो. त्यामुळे आणि माती एकदम चांगली मळून आकार दिलेला असल्यामुळे तडे जात नाहीत. “आम्ही बंगालमध्ये दुर्गेच्या मूर्ती अशा प्रकारेच बनवतो, मी वेगळं काहीच करत नव्हतो,” ते सांगतात.

material of painting
PHOTO • Aditya Tripathi

तपन मोंडल यांच्या कामामध्ये बंगाली मूर्तीकला आणि पश्चिम भारतातल्या रंगांचा आणि वैशिष्ट्यांचा मिलाप दिसतो

तपन यांनी हळू हळू त्यांचा एक चमू तयार केला आणि २००२ मध्ये त्यांनी एका युवक मंडळासाठी एक नऊ फुटी मूर्ती तयार केली आणि इतर गिऱ्हाइकांसाठी छोट्या मूर्ती तयार केल्या. हळू हळू गिऱ्हाइकांची संख्या वाढायला लागली आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे पाण्याचं प्रदूषण वाढत असल्याची भीतीदेखील. तपन आणि त्यांचे सहकारी सांगतात की ते केवळ कोलकात्यातल्या गंगेच्या किनाऱ्याची माती वापरतात. “दर वर्षी दिवाळी संपली की मी हावड्याला जातो आणि ट्रकमधून माती इथे आणतो. कधी कधी माती संपली तर आम्ही भावनगरमधून माती आणतो. पण गंगेची माती सर्वात मऊ आणि बारीक आहे त्यामुळे मूर्तीला अगदी मऊ लेप देता येतो. आणि ती पवित्रदेखील मानली जाते.”

तपन यांचं काम म्हणजे आता बांग्ला शिल्पशास्त्र आणि पश्चिम भारतातल्या मूर्तीकलेचा मिलाप मानायला हवा. बांग्ला परंपरेशी फारकत घेऊन इथे गणपतीचे डोळे बारीक ठेवले जातात. इथले रंग ॲक्रिलिक प्रकारचे आणि पाण्यात विरघळणारे असतात, बंगालमध्ये मात्र अनेक मूर्तीकार नैसर्गिक रंगांचा वापर करतात. तपन त्यांच्या कारखान्यात तयार करत असलेल्या मूर्तींवरचे दागदागिने पेशवाईतल्या अलंकारांसारखे असतात.

An artist decorating an idol
PHOTO • Aditya Tripathi
An artist decorating an idol
PHOTO • Aditya Tripathi

मोंडल यांच्या कारखान्यात काम करणारे सतीश परमार मूर्ती सजवतायतः बंगाली कलाकार बहुतेक वेळा दागिन्यांची ठेवण पेशवाईतल्या अलंकारांसारखी ठेवतात

तपन यांचा भाऊ स्वपन, वय ३८, त्याच्या वडलांनी आणि भावाने कारखाना सुरू केल्यानंतर बऱ्याच अवधीनंतर २००२ साली वडोदऱ्यात आला. “मी आठवीत असताना गावाकडे शाळा सोडली कारण मला या कामात रस होता. आणि कलेची साधना करण्यासाठी तुम्हाला पदवीची आवश्यकता नसते,” तो सांगतो. काम जोरावर असतं तेव्हा उलुबेरिया तहसिलातले किमान १५ कलाकार मोंडल बंधूंसोबत काम करत असतात. ते महिन्याला रु. ९,००० तरी कमवतात, तसंच गणशोत्सवाच्या आधी दोन वेळचं जेवण. त्यानंतर ते परतून शेतमजुरी, घरांचं रंगकाम, थोडी फार शेती किंवा इतर कामांकडे वळतात.

काही जणांनी तपन यांच्याकडून मूर्तीकामातले बारकावे शिकून घेतले आहेत तर काही जण स्वतःच काही कौशल्यं घेऊन आले आहेत. त्यांच्यातलेच एक आहेत साठीचे मनोरंजन कर्माकार आणि त्यांचा चाळिशीतला भाचा, श्यामल कर्माकार. दोघंही कुलगाचिया गावातले आहेत आणि तिथे त्यांची मूर्तीकामाची कार्यशाळा देखील आहे. १३ सप्टेंबर रोजी माझी त्यांच्याशी भेट झाली तेव्हा ते दोघंही गणशोत्सवानंतर घरी परतण्याच्या तयारीत होते. “आम्ही गणपतीच्या दोन महिने आधी इथे आलो कारण बंगालमध्ये आम्हाला तेव्हा काहीच काम नसतं,” मनोरंजन म्हणतात. “यातूनच बरी कमाई होते. नुसतं पीकपाण्यावर अवलंबून कसं राहणार?”

Swapan Mondal, Tapan's brother, who coordinates the workshop, says, 'To practice art, no one needs a degree'
PHOTO • Aditya Tripathi
sculpture of rat
PHOTO • Aditya Tripathi

तपन मोंडल यांचा भाऊ स्वपन मोंडल कारखान्याचं काम पाहतो ते म्हणतात, ‘कलेची साधना करण्यासाठी कुणाला पदवीची गरज नसते’

कमला चाक गावातला ३५ वर्षीय गणेश दास, मातीच्या पाकळ्या आणि इतर सजावटीवर भर देतो. “मी घरी कशीदाकारी करायचो. पण कलेच्या या क्षेत्रात काम आहे हे ऐकल्यानंतर मी २०१५ साली इथे आलो. तपनदादांकडून मी बरंच शिकलोय.”

मोंडल यांच्या कारखान्यात काम करणारे कमला चाकचे काही जण रुइदास या अनुसूचित जातीचे आहेत. रविराम रुइदास पन्नाशीत आहेत आणि त्यांच्या गावी मिळेल तेव्हा रोजंदारीवर काम करतात, आपल्या पाच जणांच्या कुटुंबाचं पोट भरतात. “इथे माझी कमाई चांगली होते,” ते म्हणतात. अरुण रुइदास, वय ४० हेही रोजंदारीवर काम करतात किंवा कामाच्या शोधात दिल्लीला जातात. ते वरातीत बॅण्डमध्ये कीबोर्ड वाजवतात. त्यांचं म्हणणं आहे, “एखादा सण समारंभ असेल तर ढोलक वाजवणं हे आमचं पारंपरिक काम आहे. पण नेहमीसाठी पैसा मिळवण्याचं काही हे काम नाही. आमच्यासारख्या छोट्या गावात काही सारखीच किती लग्नं होणार... आणि इतर गावातल्या बॅण्डमध्ये बाहेरच्यांना कुणी घेत नाही.”

praparing pandal and making ganpati idol
PHOTO • Aditya Tripathi

अरुण रुइदास (वर डावीकडे) पूर्ण झालेली मूर्ती घेऊन जातायत, रविराम रुइदास (वर उजवीकडे) यांनी क्षणभर विश्रांती घेतलीये. खालच्या ओळीतः अजित रुइदास (डावीकडे) आणि नबो रुइदास (उजवीकडे, मागच्या बाजूस) गणपतीच्या काळात उभारलेल्या शेडचे बांबू आणि सांगाडा उतरवतायत

रस्त्यापलिकडच्या शेडमधल्या सगळ्या मोठ्या मूर्ती विकल्या गेल्यानंतर तिथले बांबू उतरवण्याचं काम नबो रुइदास करतायत. ते कारागिरांना रंग आणून देतात, मूर्तींची हलवाहलव करतात, माती मळतात. ते म्हणतात, “रुइदास समाजाचे आम्ही लोक वेगवेगळी वाद्यं वाजवतो. मी बासरी वाजवतो. पण आता बासरी वाजवायची सोडून मी बांस म्हणजेच बांबूला लटकतोय.”

मोंडल यांचे संघर्षाचे दिवस आता संपलेत, कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली आहे. तपन, त्यांच्या पत्नी मामोनी आणि त्यांच्या तीन मुली वडोदऱ्यात स्थायिक झाले आहेत. सोबत त्यांचा भाऊ स्वपन यांचं कुटुंबही. तपन यांची थोरली मुलगी तनिमा, वय १७ बारावीत शिकतीये आणि तिला शल्यविशारद व्हायचंय, अनिमा सहावीत शिकतीये आणि धाकटी बालवाडीत जाते. तपन यांच्या मनात कायम विचार येतो की त्यांचं काम कुणी पुढे चालू ठेवेल का. “या कलेत मेहनत लागते,” आपल्या कारखान्यासमोर उभं राहिलेले तपन म्हणतात. “कुणी तरी ती जिवंत ठेवली पाहिजे.”

शेवटी कसंय, २०१५ पासून त्यांच्याकडून मूर्ती विकत घेणाऱ्या एका मंडळाचे चिंतन गांधी म्हणतात त्यानुसार, “अण्णांच्या मूर्तींचा आता एक ब्रॅडच झालाय.”

People welcoming ganpati
PHOTO • Aditya Tripathi

आदित्य त्रिपाठी वडोदरा स्थित छायाचित्रकार आहे. गेट्टी इमेजेस आणि शटरस्टॉकसाठी तो छायाचित्रं पाठवतो तसंच गूगल मॅप्स साठी स्थानिक माहितगार छायाचित्रकार म्हणून काम करतो. बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठात तो पदार्थविज्ञान विषयात पदवीचं शिक्षण घेत आहे.

अनुवादः मेधा काळे

Ujjawal Krishnam

Ujjawal Krishnam was a researcher in 2018, in the Department of Physics at Maharaja Sayajirao University of Baroda. He was an editor at Academia.edu and Wikiprojects, who contributed to Getty Images and wrote on Indian polity and jurisprudence.

Other stories by Ujjawal Krishnam
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Marathi Translations Editor at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale