“त्यांना इथे शाळेत आणायचं हेसुद्धा मोठं आव्हानच आहे.”
मुख्याध्यापक सिवजी सिंग यादव यांचे शब्द पोकळ नाहीत. गेल्या ३४ वर्षांच्या अनुभवाचं वजन आहे त्यांना. ‘मास्टरजी’ डाबली चापोरी बेटावरची एकमेव प्राथमिक शाळा चालवतात. आसामच्या माजुली जिल्ह्यातल्या, ब्रह्मपुत्रा नदीमधल्या या बेटावर ६३ कुटुंबं राहतात. आणि या घरांमधली जवळपास सगळीच मुलं याच शाळेत जातात.
धोनेखाना मझदूर लोअर प्रायमरी स्कूल या शाळेतल्या एकमेव वर्गखोलीत सिवजी आपल्या टेबलापाशी बसले होते. हसऱ्या चेहऱ्याने आपल्या विद्यार्थ्यांकडे पाहत होते. आणि ६ ते १२ वर्षांचे, पहिली ते पाचवी इयत्तेत शिकणारी ही सगळी मुलं त्यांच्याकडे टक लावून पाहत होती. “या लहानग्यांना शिकवायचं, शिक्षण द्यायचं हे खरं तर मोठं आव्हान आहे,” ते म्हणतात. “ते तर पळ काढायलाच बसलेत ना!”
बोलत बोलत ते भारतीय शिक्षण पद्धतीचा मागोवा घेतात पण त्या आधी क्षणभर थांबून ते मोठ्या विद्यार्थ्यांपैकी एकाला हाक मारतात. राज्य शासनाकडून आसामी आणि इंग्रजी भाषेतली पुस्तकांचं एक खोकं आलंय ते त्याला उघडायला सांगतात. नवी पुस्तकं पाहून पोरं त्यात रमणार आणि आमच्याशी बोलायला आपल्याला उसंत मिळणार याची त्यांना पुरेपूर कल्पना होती.
“महाविद्यालयातल्या प्राध्यापकाला सरकार जितका पगार देतं ना, तितका प्राथमिक शाळेतल्या शिक्षकाला द्यायला पाहिजे. पाया भरणीचं काम आम्हीच करतो की नाही,” ते म्हणतात. अगदी सुरुवातीच्या शिक्षणाचं महत्त्वच ते विषद करतात. पण, त्यांच्या मते पालकांना मात्र प्राथमिक शिक्षणाचं महत्त्व नाहीये. त्यांच्यासाठी माध्यमिक शाळा तेवढी महत्त्वाची आहे. आणि हा गैरसमज दूर करण्याचा ते अथक प्रयत्न करत असतात.
डाबली चापोरी एनसी हे वाळूने तयार झालेलं बेट असून इथे सुमारे ३५० लोक राहतात. सिवजी यांच्या मते या बेटाचं क्षेत्रफळ सुमारे ४०० चौरस किलोमीटर आहे. चापोरी बेटाचा समावेश ‘नॉन-कडास्ट्रल’ क्षेत्रात होतो. म्हणजेच आजवर या क्षेत्राचं कोणतंही सर्वेक्षण करण्यात आलेलं नाही. आधी हा भाग जोरहाट जिल्ह्यात होता. २०१६ साली जोरहाटच्या उत्तरेचा भागाचा माजुली जिल्हा तयार करण्यात आला.
जर या बेटावर शाळा नसती तर इथल्या ६-१२ वयोगटातल्या मुलांना एक तासाहून जास्त प्रवास करून शिवसागर शहराजवळ दिसांगमुख इथे जावं लागलं असतं. २० मिनिटं सायकल चालवत बेटावरच्या धक्क्यावर पोचायचं, तिथून बोटीने नदी पार करायला ५० मिनिटं तरी लागतात.
या चार बेटावरची सगळी घरं शाळेपासून २-३ किलोमीटरच्या अंतरावर आहेत. २०२०-२१ मध्ये कोविड-१९ महासाथीमुळे जेव्हा शाळा बंद करण्यात आली तेव्हा याचा फार फायदा झाला. सिवजींच्या शाळेतल्या मुलांच्या शिक्षणात काही खंड पडला नाही. कारण ते घरोघरी जाऊ शकले, मुलांना भेटू शकले आणि त्यांचं काय चाललंय, काय नाही हे स्वतः बघू शकले. या शाळेत नेमणूक झालेले दुसरे शिक्षक सिवसागर जिल्ह्यातल्या गौरीसागर इथे राहतात. पलिकडच्या तीरापासून ३० किलोमीटरच्या अंतरावर. “मी प्रत्येक मुलाला आठवड्यातून दोनदा भेटायचो, त्यांना घरचा अभ्यास द्यायचो आणि त्यांचा अभ्यास तपासायचो,” सिवजी सांगतात.
तरीही, टाळेबंदी लावल्यामुळे मुलांच्या शिक्षणावर विपरित परिणाम झाल्याचं त्यांचं मत आहे. मुलांचं शिक्षण झालेलं नसलं तरीही त्यांना वरच्या वर्गात पाठवायचं धोरण त्यांना अजिबात पसंत नाही. आणि म्हणूनच त्यांनी शिक्षण संचलनालयाच्या अधिकाऱ्यांना त्यांचं मत लिहून कळवलं. “मी त्यांना सांगितलं की हे एक वर्षं विसरून जा. मुलं याच वर्गात राहिली तर ते त्यांच्याच फायद्याचं ठरणार आहे.”
*****
धोनेखाना मझदूर लोअर प्रायमरी स्कूलच्या बाहेरच्या भिंतीवर आसामचा एक रंगीबेरंगी नकाशा आहे. आमचं त्या नकाशाकडे लक्ष वेधत मास्टरजी ब्रह्मपुत्रा नदीतल्या एका बेटावर बोट ठेवतात. “या नकाशात आमचं चापोरी कुठे दाखवलंय बघा. आणि प्रत्यक्षात ते कुठे आहे?” असं म्हणत ते हसायला लागतात. “काहीच संबंध नाही.”
नकाशावरची ही चूक सिवजींना जास्तच खटकते कारण त्यांचं पदवीचं शिक्षण भूगोल या विषयात झालं आहे.
सिवजींचा जन्म याच चापोरी आणि चार म्हणजेच वाळूच्या किनाऱ्यांवर आणि बेटांवर झालाय आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांनी इथेच काढलंय. राहतो ती जमीनच सरकत असल्यामुळे राहता पत्ताही सारखाच बदलावा लागतो हे त्यांना पक्कं माहित आहे.
“जेव्हा जास्त पाऊस असतो तेव्हा मोठ्या लाटांसह पूर येणार याचा आम्ही आधीच अंदाज बांधतो. लोक आपल्या मौल्यवान वस्तू आणि जनावरं उंचावरच्या, पाणी पोचणार नाही अशा ठिकाणी हलवतात,” सिवजी सांगतात. हा प्रकार नित्याचाच असल्याचं त्यांच्या बोलण्यातून लक्षात येतं. “पाणी ओसरेपर्यंत शाळा वगैरे शक्यच नसतं काही,” ते सांगतात.
नकाशा तयार करण्याचं कामही अवघड होतं. कारण ब्रह्मपुत्रेच्या १,९४,४१३ चौरस किलोमीटरच्या खोऱ्यात वाळूची, रेतीची अनेक बेटं तयार होतात, वाहून जातात आणि परत तयार होतात.
डाबलीमधली सगळी घरं उंच जोत्यावर बांधलेली आहेत कारण ब्रह्मपुत्रेत पूर नित्याचाच असतो. खास करून उन्हाळा आणि पावसाळ्यात. ब्रह्मपुत्रा नदी आणि उपनद्यांनी बनलेली ही जगातली सगळ्यात मोठी नदी प्रणाली किंवा रचना आहे. उन्हाळ्यात हिमालयातलं बर्फ वितळतं आणि या नदीच्या खोऱ्यात येणाऱ्या नद्यांमध्ये प्रवाहित होतं. माजुलीच्या आसपासच्या परिसरात दर वर्षी सरासरी १,८७० सेंमी पाऊस पडतो. आणि यातला जवळपास ६४ टक्के नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या हंगामात म्हणजेच जून-सप्टेंबर या काळात पावसाळ्यात पडतो.
या चापोरीवर स्थायिक झालेली कुटुंबं उत्तर प्रदेशातल्या यादव समाजाची आहेत. मूळची गाझीपूरची असलेली ही मंडळी ब्रह्मपुत्रेतल्या या बेटांवर १९३२ साली आली असावीत. सुपीक आणि वस्ती नसलेल्या जमिनींच्या शोधात हे लोक हजारो किलोमीटर पूर्वेकडे, ब्रह्मपुत्रेच्या वाळूच्या बेटांवर येऊन पोचले. “आमचा परंपरागत व्यवसाय म्हणजे गोधन पालन. आमचे पूर्वज गायरानाच्या शोधात इथे पोचले,” सिवजी सांगतात.
“माझ्या वडलांचे आजी-आजोबा सगळ्यात पहिल्यांदा १५-२० कुटुंबांसह इथे लाखी चापोरीत आले,” सिवजी सांगतात. त्यांचा जन्म धनु खाना चापोरीवरचा. १९६० साली यादव कुटुंबं या चापोरीवर रहायला आली होती. “ते बेट अजूनही आहे,” ते सांगतात, “पण आता धनु खानावर कुणी राहत नाही.” पूर आला की घरं आणि सगळा संसार कसा पाण्याखाली जायचा त्याच्या आठवणी सिवजी सांगतात.
यादव समाजाची ही कुटुंबं ९० वर्षांपूर्वी आसाममध्ये आली. तेव्हापासून आतापर्यंत ब्रह्मपुत्रेच्या पात्रात तगून राहण्यासाठी किमान चार वेळा त्यांनी आपला ठिकाणा हलवला आहे. त्यातलं शेवटचं स्थलांतर होतं १९८८ मध्ये जेव्हा ते डाबली चापोरीवर आले. आजवर ते ज्या चार चापोरींवर राहिले ती एकमेकांपासून जास्त दूर नाहीत, जास्तीत जास्त २-३ किलोमीटर.
डाबलीवर राहणाऱ्या सगळ्या कुटुंबांची स्वतःची जमीन आहे. त्यात ते प्रामुख्याने भात, गहू आणि भाजीपाला पिकवतात. आणि आपल्या पूर्वजांच्या पावलावर पाऊल टाकत, ते गाई-गुरंही पाळतात. इथे सगळे जण आसामी बोलतात. पण आपापसात किंवा घरी मात्र यादव कुटुंबं हिंदीत बोलतात. “आमचं खानपान बदललेलं नाही,” सिवजी सांगतात. “हां, आता उत्तर प्रदेशात राहणाऱ्या आमच्या नातेवाइकांपेक्षा आम्ही भात थोडा जास्त खातो, इतकंच.”
नव्या कोऱ्या पुस्तकांमध्ये अगदी गुंगून गेलेले सिवजींचे विद्यार्थ्यांची काहीच हालचालही नाहीये. “मला आसामी पुस्तकं सगळ्यात जास्त आवडतात,” राजीव यादव सांगतो. तो फक्त ११ वर्षांचा आहे. त्याचे आई-वडील शेती करतात आणि गुरं पाळतात. त्या दोघांनीही सातवीतच शाळा सोडली. “मी त्यांच्यापेक्षा जास्त शिकणार आहे,” असं म्हणून तो विख्यात आसामी संगीतकार भूपेन हजारिका यांचं एक आसामी गीत गायला लागतो. ‘आहोम आमार रुपही देह’... आपले मास्टरजी कौतुकाने पाहतायत म्हटल्यावर त्याच्या आवाजाला चांगलाच जोर चढतो.
*****
सतत पात्र बदलणाऱ्या नदीच्या मधोमध वाळूच्या, तेही सतत आपली जागा बदलणाऱ्या बेटावर राहणं काही सरळसाधं नाही. इथल्या प्रत्येक कुटुंबाकडे स्वतःची बोट आहे. बेटावर दोन मोटरबोट देखील आहेत आणि अचानक काही परिस्थिती उद्भवली तर त्या वापरल्या जातात. घरांजवळ हातपंप आहेत, त्याचं पाणी घरगुती वापरासाठी वापरलं जातं. पूर येतो तेव्हा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सामाजिक संस्थांकडून पाण्याचा पुरवठा केला जातो. प्रत्येक घराला राज्य शासनाकडून सौर पॅनेल देण्यात आले आहेत. त्याद्वारे वीज निर्मिती होते. रेशनचं दुकान शेजारच्या माजुली बेटावरच्या गेझेरा गावात आहे. तिथे जायलाच चार तास लागतात – आधी बोटीने दिसांगमुख गावी, तिथून मोटरबोटीने माजुलीला आणि मग आत गावात.
इथलं सगळ्यात जवळचं प्राथमिक आरोग्य केंद्र ३-४ तासांच्या अंतरावर आहे, माजुली बेटावरच्या रतनपूर मिरी गावामध्ये. “आरोग्याची काही समस्या असली तर पंचाईत होते,” सिवजी सांगतात. “कुणी आजारी पडलं तर आम्ही त्यांना मोटरबोटीतून हॉस्पिटलला नेऊ शकतोय पण पावसाळ्यात नदीच्या पात्रातून वाट काढत जाणं महाकठीण असतं.” रुग्णवाहिकेचं काम करणाऱ्या बोटी डाबलीपर्यंत येत नाहीत. कधी कधी जिथे पाणी उथळ आहे तिथे ट्रॅक्टरवरून नदी पार केली जाते.
“आम्हाला माध्यमिक शाळा हवी आहे [सातवीपर्यंत] कारण लहानग्या मुलांना दिसांगमुखच्या मोठ्या शाळेत जायला नदी पार करून जावं लागतं,” सिवजी सांगतात. “पूर नसतो तेव्हा ठीक आहे. पण पुराच्या काळात [जुलै-सप्टेंबर] त्यांची शाळाच बंद होऊन जाते,” ते म्हणतात. त्यांच्या शाळेत शिक्षकांची सतत बदली होत असते. “या शाळेत नेमणूक झालेल्या शिक्षकांना इथे बिलकुल काम करायचं नसतं. ते काही दिवस येतात [आणि मग तोंडच दाखवत नाहीत]. त्यामुळेच आमच्या मुलांची प्रगती होत नाहीये.”
रामवचन यादव, वय ४० यांची तीन मुलं आहेत. ४ ते ११ वयोगटातली. ते म्हणतात, “मी माझ्या लेकरांना [नदीच्या पल्याडच्या] शाळेत पाठवणार आहे. शिकले तरच त्यांना काम मिळेल.” रामवचन यांची एक एकराहून थोडी जास्त जमीन आहे. ते दुधी भोपळा, मुळा, वांगी, मिरच्या आणि पुदिना लावतात आणि विकतात. त्यांच्या २० गायी आहेत. दुधाचा धंदा होतो. त्यांची बायको, ३५ वर्षांची कुसुम याच बेटावर लहानाची मोठी झाली आहे. चौथीनंतर त्यांना शाळा सोडावी लागली कारण त्या काळी पुढच्या शिक्षणासाठी एखाद्या तरण्या मुलीनी बेटाबाहेर कुठे जाण्याचा सवालच नव्हता.
रणजीत यादवांचा सहा वर्षांचा मुलगा एका खाजगी शाळेत जातो. त्यासाठी त्याला दिवसातून दोनदा नदी पार करावी लागते. “मी माझ्या मुलाला मोटरसायकलवरून घेऊन जातो आणि घरी घेऊन येतो. कधी कधी माझा भाऊ सिवसागरला कॉलेजला जाताना त्याला सोबत घेऊन जातो,” ते सांगतात.
त्यांची भावजय, पार्वती यादव कधीही शाळेची पायरी चढली नाही. मात्र आपली मुलगी, १६ वर्षांची चिंतामणी दिसांगमुखच्या हायस्कूलमध्ये शिकतीये याचा तिला फार आनंद होतो. शाळेत पोचायला तिला दोन तासांची पायपीट करावी लागते. काही अंतर नदीच्या पात्रातून चालत जावं लागतं. “आजूबाजूला हत्तींचा वावर असल्याने मला काळजीच वाटते,” पार्वती सांगते. आता चिंतामणीचे धाकटी भावंडं, समुन, वय १२ आणि राजीव, वय ११ गावातल्या शाळेत जायला लागतील.
असं असूनही जिल्हाधिकाऱ्यांनी डाबली चापोरीच्या रहिवाशांना सिवसागर गावी रहायला जाणार का असं विचारलं तेव्हा कुणीही तयार झालं नाही. “हे आमचं घर आहे. आम्ही ते नाही सोडणार,” सिवजी सांगतात.
मास्टरजी आणि त्यांच्या पत्नी फूलमती आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर खूश आहेत. त्यांचा थोरला मुलगा सीमा सुरक्षा दलात काम करतो. मुलगी, २६ वर्षीय रिटा पदवीधर आहे आणि २५ वर्षीय गीताने पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. सर्वात धाकटा २३ वर्षीय राजेश वाराणसीत आयआयटी (बीएचयू) इथे शिक्षण घेतोय.
शाळेची घंटा वाजते. सगळी मुलं रांगेत उभी राहून राष्ट्रगीत म्हणू लागतात. त्यानंतर मास्टरजी शाळेचं फाटक उघडतात आणि आधी सावकाश रांगेने आणि नंतर धूम ठोकत मुलं पसार होतात. शाळा सुटलीये. आता सगळी आवराआवर करून मुख्याध्यापक शाळा बंद करून घरी जाणार. गोष्टींची नवीकोरी पुस्तकं गठ्ठ्यात नीट लावून ठेवता ठेवता ते म्हणतात, “इतरांची कमाई जास्त असेल, मी शाळेत शिकवून कमी कमावत असेन. पण मी माझं कुटुंब पोसतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, मला हे काम आवडतं. ही सेवाही... माझं गाव, माझा जिल्हा...सगळ्यांची भरभराट होईल. आसामचाही विकास होईल.”
अयांग ट्रस्टच्या बिपिन धाने आणि क्रिश्न कांत पेगो यांची या वार्तांकनासाठी मदत झाली. त्यांचे मनापासून आभार.
अनुवादः मेधा काळे