तहसिल कचेरीत आजही तिरंगा ठेवलेला आहे. फक्त इथेच १८ ऑगस्टला झेंडा फडकतो. उत्तर प्रदेशातल्या गाझीपूर जिल्ह्यातल्या या गावाने १९४२ साली याच दिवशी इंग्रज राजवटीपासून स्वतंत्र झाल्याचं जाहीर केलं. मुहम्मदाबादच्या तहसिलदाराने जमावावर गोळीबार केला. त्यात शेरपूर गावचे आठ जण मरण पावले. यातले बहुतेक जण काँग्रेस नेते शिव पूजन राय यांच्यासोबत आले होते. मुहम्मदाबादच्या तहसिल कचेरीवर तिरंगा उभारताना त्यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या.
गाझीपूर जिल्हा आधीच धुमसत होता. इंग्रजांनी १० ऑगस्टला १२९ पुढाऱ्यांना अटक करण्याचं वॉरंट काढलं होतं. या घटनेनंतर सगळीकडे चकमकी सुरू झाल्या. १९ तारखेपर्यंत स्थानिकांनी जवळजवळ सगळं गाझीपूर ताब्यात घेऊन तीन दिवस तिथला कारभार हातात घेतला होता.
जिल्हा गॅझेटच्या नोंदींनुसार इंग्रजांनी प्रत्युत्तर म्हणून “प्रचंड दहशती”चा आधार घेतला. लवकरच, “एकामागोमाग एक गाव लुटलं गेलं आणि बेचिराख करण्यात आलं. सैन्य आणि सशस्त्र पोलिसांनी चले जाव चळवळीतल्या आंदोलकांना चिरडून टाकलं. पुढच्या काही दिवसात त्यांनी तब्बल १५० जणांना गोळ्या घालून ठार केलं.” सरकारी अधिकारी आणि पोलिसांनी नागरिकांकडून जवळजवळ ३५ लाखांची रक्कम लुटल्याच्या नोंदी आहेत. ७४ गावं जाळण्यात आली. गाझीपूरच्या लोकांनी एकत्रितपणे ४.५ लाख रुपये दंड म्हणून जमा केले. त्या काळात ही रक्कम फार मोठी होती.
सरकारी अधिकाऱ्यांनी जणू शिक्षा म्हणून शेरपूरची निवड केली होती. इथले सर्वात बुजुर्ग दलित, हरी शरण राम त्या काळातल्या आठवणी सांगतातः “अख्ख्या गावात माणूस सोडा, एक पक्षी पण उरला नव्हता. ज्यांना जमलं, ते पळाले. लूट चालूच होती.” फक्त शेरपूर नाही, संपूर्ण गाझीपूरलाच धडा शिकवायचा होता. या जिल्ह्यामध्ये इंग्रजांविरुद्ध अगदी १८५० पासून उठाव झाल्याच्या नोंदी आहेत. १८५० मध्ये स्थानिकांनी निळीची लागवड करणाऱ्यांवर हल्ले केल्याचा इतिहास आहे. गोळ्या आणि दंडुक्यांनी गाझीपूरला चांगलाच धडा शिकवला असावा.






