दयानिता सिंग यांनी २०२२ मध्ये पारीच्या सहकार्याने दयानिता सिंग-पारी डॉक्युमेंटरी फोटोग्राफी पुरस्काराची सुरुवात केली. पहिला पुरस्कार पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडियाचे एम. पळणी कुमार यांना देण्यात आला.
या वर्षी त्यांनी पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडियामधील प्रतिभावान तरुण छायाचित्रकार आयना हिची दोन लाख रुपयांच्या या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
आयनाचा फोटोग्राफीशी असलेला संबंध खास वैयक्तिक म्हणावा असा! विस्मृतीत जावीत अशी सत्य लक्षात ठेवण्याचा फोटोग्राफी हा तिच्यासाठी एक मार्ग बनला. हळूहळू तिला जाणवत गेलं की कॅमेरा हे काही केवळ आपली आत्मीय सहनशीलता वाढवण्याचं माध्यम नाहीये. स्व पलीकडे जात इतर अनेकांच्या कधीच न सांगितल्या गेलेल्या गोष्टी उलगडणारं ते एक राजकीय साधनदेखील बनू शकतं. हे तिला जाणवलं ते सेबॅस्टियन साल्गादो, विवियन मेयर, शंकर सरकार, पळणी कुमार यांसारख्या छायाचित्रकारांच्या कामातून! कोविड-१९ महामारीच्या काळात पारीसोबत काम करताना हा तिचा विचार आणखी पक्का झाला.
कामाठीपुऱ्यातल्या धंदा करणाऱ्या बाया आणि कोविड-१९ महामारीच्या काळात कोणत्याही आरोग्यसेवेशिवाय फूटपाथवर राहणाऱ्या स्थलांतरित कामगारांचे मार्मिक फोटो आयनाने काढले आहेत. तिच्या जवळपास २३ फोटो स्टोरीज महानगरात उपेक्षित जीवन जगणाऱ्या पात्रांची झलक देतात - मुंबई लोकलमध्ये सारंगी वाजवणारा राजस्थानी स्थलांतरित संगीतकार, शहरातले टॅक्सी ड्रायव्हर्स, गेटवे ऑफ इंडियावरचे छायाचित्रकार, गाढवीचं दूध विकणारी मंडळी, मुंबईच्या रस्त्यावर स्वतःला चाबकाने मारत नाचणारा कर्नाटकातला एक स्थलांतरित पोतराज. शहरातलं ग्रामीणपण ज्या संवेदनशीलतेने आणि सहवेदनेने तिने टिपलंय; ते क्वचितच कुणाला जमेल!















