डांबून ठेवणं, जबरदस्तीने लग्न लावून देणं, लैंगिक आणि शारीरिक अत्याचार, ‘करेक्टिव्ह/दुरुस्ती’ करणारे उपचार हे सगळं एलजीबीटीक्यूएआय+ समुदायाच्या कायम वाट्याला येतं, २०१९ साली प्रकाशित झालेला लिव्हिंग विथ डिग्निटी हा आंतरराष्ट्रीय न्यायदाते आयोगाचा अहवाल सांगतो.
विधी आणि आरुषचीच (नावं बदलली आहेत) गोष्ट पहा ना. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या या दोघांना आपापलं घर सोडून मुंबईत येऊन रहावं लागलं. विधी आणि (स्वतःची ओळख ट्रान्स पुरुष असलेला) आरुष शहरात एका भाड्याच्या खोलीत राहू लागले. “घरमालकाला आमच्या नात्याबद्दल काहीही माहित नाही. आम्हाला ते लपवून ठेवावं लागणारे. खोली नाही सोडायची,” आरुष सांगतो.
साचेबद्ध लैंगिक प्रतिमा मोडून वेगळी ओळख असणाऱ्या अनेकांना निवारा मिळत नाही, घरातून हाकलून लावलं जातं, घरचे, घरमालक, शेजारी पाजारी आणि पोलिसही त्यांचा छळ करतात असंही या अहवालात म्हटलं आहे.
समाजाने लावलेला कलंक आणि छळ यामुळे पारलिंगी व्यक्तींना खास करून ग्रामीण भागात घर सोडून सुरक्षित निवारा शोधावा लागतो. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने २०२१ साली प्रकाशित केलेल्या पश्चिम बंगालमधील पारलिंगी व्यक्तींसंबंधीच्या अभ्यासामध्ये असं आढळून येतं की “त्यांची लैंगिक ओळख लपवून ठेवण्यासाठी घरच्यांचाच त्यांच्यावर दबाव असतो.” अभ्यासातल्या निम्म्या लोकांनी घरी, शेजाऱ्यंकडून आणि समाजाकडून होणाऱ्या भेदभावामुळे घर सोडल्याचं म्हटलं आहे.
“किन्नर म्हणून जन्माला आलो म्हणजे आमची काही इज्जत नाही का?” शीतल विचारते. अनेक वर्षं सहन करावे लागलेले कडूजार अनुभव, शाळेत, कामाच्या ठिकाणी, रस्त्यावर, अगदी सगळीकडेच... “सगळे आम्हाला इतकी तुच्छतेची वागणूक का देतात?” ती विचारते. तिची गोष्ट वाचा - ‘आम्ही भूत असल्यासारखं लोक आमच्याकडे पाहतात’






