संसदेच्या नव्या भवनामधल्या घडामोडी पाहून भारताचे पहिले कायदा मंत्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कपाळावर आठी चढली असती. ते म्हणालेच होते, “संविधानाचा गैरवापर होतोय असं मला दिसलं तर ते जाळून टाकणाऱ्यांमध्ये मी पहिला असेन.”
२०२३ मध्ये संसदेत मंजूर झालेल्या काही विधेयक आणि कायद्यांचा आम्ही आढावा घेत आहोत. या कायद्यांनी नागरिकांचे घटनादत्त अधिकार धोक्यात आले आहेत.
वन (संवर्धन) दुरुस्ती कायदा, २०२३ बघा. देशाच्या सीमेला लागून असलेली वनं आता अजिबात संरक्षित नसतील. ईशान्य भारताचं उदाहरण घेतलं तर लक्षात येतं की बा प्रांत किती तरी देशांच्या सीमांना लागून आहे. आणि ‘वर्गीकृत न केलेली’ ईशान्येची ही वनं भारताच्या नोंद असलेल्या वनांच्या ५० टक्के इतक्या क्षेत्रावर आहेत. मात्र या दुरुस्तीनंतर आता या वनांचा वापर सैन्याच्या किंवा इतर कारवायांसाठी करण्याची मुभा देण्यात आली आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा (द्वितिय) संहिता कायद्यामुळे चौकशीदरम्यान फोन किंवा लॅपटॉपसारखी डिजिटल उपकरणं ताब्यात घेणं आता तपास यंत्रणांसाठी सुलभ करण्यात आलं आहे. याचे नागरिकांच्या खाजगीपणाच्या सर्वात मूलभूत अशा अधिकारावर विपरित परिणाम होणार आहेत. नवीन दूरसंचार कायद्यामध्ये दूरसंचार सेवादात्यांच्या अधिकृत आस्थापनेला बायोमेट्रिक पद्धती वापरून ओळख पटवण्याची तरतूद करण्यात आली आहे. अशा पद्धतीने बायोमेट्रिक विदा गोळा करून ती साठवणं हे खाजगीपणा आणि सायबर सुरक्षा अशा दोन्हींसाठी चिंताजनक ठरतं.







