“आई गायची त्यातले दोन-तीन शब्द आजही लक्षात आहेत,” हौसाबाई दिघे सांगत होत्या. वर्ष होतं १९९५ आणि त्यांचा संवाद सुरू होता हेमा राईरकर आणि गी प्वातवाँ यांच्याशी. पुण्याचे या दोघा समाज शास्त्रज्ञांनी ८०च्या दशकात जात्यावरच्या ओव्यांचा संग्रह करायला सुरुवात केली होती. दोघं पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातल्या भांबर्डे या गावी आले होते. ओव्या गाणाऱ्या बायांशी त्यांना आणि त्यांच्या चमूला बोलायचं होतं.
हौसाबाई पुढे सांगतात, “दिवसभर रानात राबून घरी यायचं आणि भाकरीला पीठ नसायचं. मग जात्यावर दळणं करत गाणी गायची. त्याशिवाय दिवस पुराच व्हायचा नाही. एखादा शब्द जरी आठवला तरी पुढचं गाणं आपसूक येतं. माझ्यासोबतच ही गाणी संपणार. तोपर्यंत माझ्या ध्यानात असतील.”
हौसाबाईंचे शब्द त्यांचे एकटीचे नाहीत. शेती, शेतमजुरी करणाऱ्या, मासेमारी, कुंभारकाम किंवा माळीकाम करणाऱ्या अनेकानेक समुदायांच्या बायांचं अगदी हे असंच म्हणणं आहे. तांबडं फुटण्याआधी उठून, घरची सगळी कामं उरकून दिवसभर रानात राबणाऱ्या या बाया आहेत.
आणि कामाच्या या रगाड्याची सुरुवात बहुतेक वेळा जात्यावरच्या दळणांनी व्हायची. जातं फिरू लागलं की त्या गाऊ लागायच्या. चुलीपाशी एका कोपऱ्यात किंवा घराच्या पडवीवर, ओसरीतला एखादा कोपरा म्हणजे त्यांची हक्काची, स्वतःची अशी जागा होती. आपल्या आयुष्यातले संघर्ष, आनंद आणि दुःखही एकमेकींना सांगून मन मोकळं करता येईल अशी एक खास जागा.
आणि फक्त आपली-तुपली गाऱ्हाणी नाहीत तर जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, गावातलं, घरातलं आणि कुटुंबातलं त्यांचं जगणं, धर्म, जत्रा-यात्रा-पंढरीची वारी, जातीच्या आणि पुरुषप्रधानतेच्या उतरंडी इतकंच नाही बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आणि अशी अनेक विषयांवर त्यांचं म्हणणं त्या सांगत होत्या. या फिल्ममध्ये मुळशीच्या खडकवाडीच्या ताराबाई उभे याविषयी बोलतात.





