“मला रोज रु. १५० मजुरी मिळायची, आठवड्यातले सहा दिवस. आणि आता बायांसाठी काहीच काम नाहीये,” थुल्लुर मंडलातल्या उद्दंडरायुनिपालेम गावच्या वेमुरी सुजाता सांगतात. ३८ वर्षांच्या सुजाता दलित माला समाजाच्या आहेत आणि जानेवारी २०१५ पासून शेतमजूर म्हणून काम करतायत.
मात्र जागतिक दर्जाची अमरावती ही राजधानी उभी करण्यासाठी आंध्र प्रदेश शासनाने भू संपादन करायला सुरुवात केली आणि गुंटुरमध्ये कामं मिळणं अवघड व्हायला लागलं. २०१४ साली राज्याचं द्विभाजन होऊन तेलंगण आणि आंध्र प्रदेश अशी दोन राज्यं झाली. पुढची दहा वर्षं हैद्राबाद ही दोन्ही राज्यांची राजधानी असणार आहे – अमरावती तयार होईपर्यंत.
सुजाताचे पती २००८ साली मरण पावले. त्यानंतर शेतमजूर म्हणून मिळणाऱ्या तुटपुंज्या कमाईतून सुजातांनी त्यांच्या दोन मुलांना मोठं केलं. आता ते दोघंही आपापला चरितार्थ चालवण्यासाठी धडपडत आहेत. त्यांचा थोरला मुलगा वेमुरी प्रसाद, वय १९, याने २०१५ साली थुल्लुरच्या जिल्हा परिषद शाळेतून दहावी पूर्ण झाल्यानंतर शिक्षण सोडलं. एक वर्षानंतर त्याचा धाकटा भाऊ वेमुरी राजा, वय १७ याने देखील त्याच शाळेतून शिक्षण सोडलं. सध्या दोघंही कृष्णा नदीच्या किनारी रेतीच्या उत्खननावर रोजंदारीवर काम करतायत. फारसं काही काम उपलब्ध नाही त्यामुळे आठवड्यातले तीन दिवस दोघं आलटून पालटून काम करतात, २०० ते २५० असा रोज मिळतो.
“हे हाडं खिळखिळी करणारं काम आहे आणि भरपूर शक्ती लागते. आम्ही सकाळी ६ वाजता जातो आणि संध्याकाळी ६ वाजता परततो,” राजा सांगतो. रेतीच्या कामावर बायांना घेत नाहीत आणि आता शेतातलं कामही मिळत नसल्यामुळे सुजातांसारख्या अनेक जणी आता घरीच असतात.










