‘‘कोई सरकार नही चंगी आम लोकां लायी (लोकांसाठी कोणतंच सरकार चांगलं नाही),’’ सत्तर वर्षांच्‍या गुरमित कौर म्हणतात. काही बायकांसोबत त्‍या एका शेडखाली बसलेल्‍या असतात. या सार्‍याजणी जगरावला किसान मजदूर महापंचायतीसाठी आल्‍या आहेत, लुधियानामधल्‍या बस्सियां गावातून.

‘‘मोदींनी नोकर्‍या देतो असं वचन दिलं होतं, पण त्‍यांनी कोणतंच आश्‍वासन पूर्ण केलेलं नाही. आता एहना दा कोई हक नहीं सादे एथ्‍थे आ के व्‍होटा मांगन दा (इथे येऊन मतं मागण्‍याचा त्‍यांना अधिकारच नाही),’’ त्‍या म्हणतात. गुरमित कौर भारतीय किसान युनियन (बीकेयू एकता) दाकौंदाशी जोडलेल्‍या आहेत. आपण २०१९ च्‍या निवडणुकीत मोदींना मत दिल्‍याचं त्‍या ‘पारी’ला सांगतात.

जागरावच्‍या नव्‍या धान्‍य बाजारात २१ मे रोजी ही महापंचायत झाली. संपूर्ण राज्‍यातून ५०००० लोक त्‍याला आले होते. वेगवेगळ्या शेतकरी संघटना, कामगार संघटना, अंगणवाडी कर्मचारी संघटना, वैद्यकीय व्‍यावसायिक संघटना अशा अनेक संघटना आपली ताकद दाखवण्‍यासाठी आणि भारतीय जनता पक्षा(भाजप)चा निषेध नोंदवण्‍यासाठी इथे आल्‍या होत्‍या. ‘बीजेपी हराओ, कॉर्पोरेट बजाओ, देश बचाओ’… स्‍टेजवरच्‍या बॅनरवर लिहिलं होतं.

‘‘आम्ही पंजाबमध्ये मोदींना काळे झेंडे दाखवणार आहोत,’’ महापंचायतीला आलेले हरिंदर सिंग लाखोवाल म्हणाले. बीकेयूच्‍या लाखोवाल गटाचे ते अध्यक्ष आहेत.

पंजाबमध्ये १ जून, २०२४ ला निवडणुका आहेत आणि जिथे शेतकरी आपल्‍या मागण्‍यांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करतंय म्हणून निषेध करतायत, निदर्शनं करतायत, त्‍या राज्‍यात मोदी आपला निवडणूक प्रचार सुरू करणार आहेत. काय मागण्‍या आहेत शेतकर्‍यांच्‍या? स्‍वामीनाथन आयोगाच्‍या शिफारशीनुसार हमीभाव, संपूर्ण कर्जमाफी, लखीमपूर खिरी हत्‍याकांडातील बळींना न्‍याय, शेतकरी आणि शेतमजूर यांच्‍यासाठी पेन्‍शन योजना आणि २०२०-२१च्‍या आंदोलनात हुतात्‍मा झालेल्‍या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई.

वाचा : शेतकरी आंदोलनाचं ‘पारी’चं संपूर्ण कव्‍हरेज

PHOTO • Courtesy: Sanyukt Kisan Morcha Punjab
PHOTO • Arshdeep Arshi

डावीकडे : ‘बीजेपी हराओ, कॉर्पोरेट बजाओ, देश बचाओ’… किसान-मजदूर महापंचायतीमधलं संयुक्‍त किसान मोर्चाचं पोस्‍टर. उजवीकडे : लुधियानाच्‍या सुधार तालुक्‍यातल्‍या अंगणवाडी कर्मचारी युनियनच्‍या सदस्‍य जगरावच्‍या महापंचायतीला येताना

PHOTO • Arshdeep Arshi
PHOTO • Arshdeep Arshi

डावीकडे : लुधियानामधल्‍या बस्सियां गावातून आलेल्‍या महिलांपैकी एक गुरमित कौर. मोदींनी रोजगार देण्‍याचं आश्‍वासन पाळलं नाही आणि त्‍यामुळे आता त्‍यांना मतं मागण्‍याचा अधिकारच नाही, असं त्‍या म्हणतात. उजवीकडे : तीन कृषी कायद्यांच्‍या विरोधात २०२०-२१ मध्ये झालेल्‍या निदर्शनांच्‍या दरम्‍यान ज्‍या ७५० शेतकर्‍यांचा मृत्‍यू झाला, त्‍यांना आदरांजली वाहताना शेतकरी संघटनांचे नेते. फेब्रुवारी २०२४ मध्ये शेतकरी आणि पोलिस यांच्‍यात झालेल्‍या संघर्षात डोक्‍याला मार लागल्‍यामुळे मृत्‍यू झालेल्‍या शुभकरण सिंगलाही या नेत्‍यांनी आदरांजली वाहिली

जमलेल्‍या गर्दीला संबोधित करण्‍यापूर्वी शेतकरी संघटनांच्‍या नेत्‍यांनी २०२०-२१ मध्ये झालेल्‍या शेतकरी आंदोलनादरम्‍यान ज्‍या ७५० शेतकर्‍यांचा मृत्‍यू झाला, त्‍यांना आदरांजली वाहिली. या वर्षी फेब्रुवारीत मृत्‍यू झालेल्‍या २१ वर्षांच्‍या शुभकरण सिंगचाही विशेष उल्‍लेख करण्‍यात आला. शांतपणे दिल्‍लीला निघालेले शेतकरी आणि पोलिस यांच्‍यात पटियालाच्‍या ढाबी गुजरन इथे संघर्ष झाला होता आणि त्‍यात डोक्‍याला जबर मार लागल्‍यामुळे शुभकरणचा मृत्‍यू झाला होता.

हेही वाचा : ‘स्वतःच्याच राज्‍यात सुरक्षित नाही, तर आणखी कुठे असणार?’

आपल्‍या अपुर्‍या राहिलेल्‍या मागण्‍या घेऊन दिल्‍लीला जाणार्‍या शेतकर्‍यांना, काहीच महिन्‍यांपूर्वी, फेब्रुवारी २०२४ मध्ये दिल्‍लीच्‍या सीमेवर रोखण्‍यात आलं होतं. अतिशय शांततेने आपल्‍या मागण्‍या सरकारसमोर मांडण्‍यासाठी आलेल्‍या या शेतकर्‍यांना विनाकारण बॅरिकेड्‌स, जोरात उडवलेले पाण्‍याचे फवारे आणि अश्रुधुराची नळकांडी यांच्‍याशी सामना करावा लागला होता.

आता, त्‍यांना भाजपला आपल्‍या गावात प्रचारासाठी येऊ द्यायचंच नाहीये.

बीकेयू शादीपूरचे बूटा सिंग अशाच भावना व्‍यक्‍त करतात. ‘‘मोदी आता पंजाबला कशासाठी येतायत?’’ ते सवाल करतात. ‘‘आम्ही त्‍यांना प्रचार करू देणारच नाही.’’

संयुक्‍त किसान मोर्चाने केलेल्‍या आवाहनाला प्रतिसाद देत संपूर्ण पंजाबमधल्‍या लोकांनी भाजपचे नेते आणि उमेदवार यांना गावात शिरायला आणि प्रचार करायला बंदी घातली आहे.

PHOTO • Arshdeep Arshi
PHOTO • Arshdeep Arshi

डावीकडे : क्रांतिकारी किसान संघटनेचे अध्यक्ष डॉ. दर्शन पाल संघटनेच्‍या सदस्‍यांसह. उजवीकडे : २१ मे २०२४ च्‍या महापंचायतीला जवळपास ५०,००० लोक हजर होते

जगरावमध्ये केलेल्‍या भाषणांत शेतकरी नेत्‍यांनी आपल्‍या भाषणात फरीदकोट आणि लुधियानाचे भाजप उमेदवार हंस राज हंस आणि रवनीत बिट्टू यांचा नावानिशी उल्‍लेख केला.

‘‘नेते हात जोडून मतं मागतात. मग हे लोक म्‍हणतात की तुम्‍हाला नंतर बघून घेतो. कोण आहेत हे आम्हाला बघून घेणारे?’’ लाखोवाल आपल्‍या भाषणात म्हणतात. हंस यांची एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्‍हायरल झाली आहे. त्‍यात ते म्हणतायत की, जे माझ्‍या विरोधात जातील, त्‍यांना १ जूनला मतदान झाल्‍यावर बघून घेऊ. एसकेएमने केलेल्‍या तक्रारीवरून केंद्रीय निवडणूक आयोगाने हंसना आचारसंहिता भंगाची नोटीस पाठवली आहे.

चौर्‍याहत्तर वर्षांचे चेतन सिंग चौधरी लुधियानाच्‍या संगतपुरा गावातून आलेले असतात. ‘‘पूर्वी आपले आई-वडील, आजी-आजोबा ज्‍यांना मत देत आले, त्‍यांनाच आम्‍हीही मत देत असू,’’ ते म्हणतात. ‘‘आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आता उददिष्‍ट आहे ते मोदींना घालवून देण्‍याचं.’’

चेतन सिंग बीकेयू राजेवालचे सदस्‍य आहेत. त्‍यांचे वडील बाबू सिंग स्‍वातंत्र्य सैनिक होते. आपल्‍या वडिलांना पंजाब सरकारने दिलेलं कार्ड त्‍यांनी ‘पारी’ला दाखवलं. बाबू सिंग भारतीय लष्‍करात सैनिक होते. ‘‘ते शेतकर्‍यांच्‍या भल्‍याचा विचारच करत नाहीत,’’ भाजपकडे इशारा करत चेतन म्हणतात.

PHOTO • Arshdeep Arshi
PHOTO • Arshdeep Arshi

डावीकडे : महापंचायतीच्‍या ठिकाणी, धान्‍य बाजारात येताना कीर्ती किसान संघटनेचे सभासद. उजवीकडे : नच्‍छतर सिंग ग्रेवाल (डावीकडचे) आणि चेतन सिंग चौधरी (उजवीकडचे) हे लुधियानाचे शेतकरी आहेत. ‘‘पूर्वी आपले आई-वडील, आजी-आजोबा ज्‍यांना मत देत आले, त्‍यांनाच आम्‍हीही मत देत असू. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आता उददिष्‍ट आहे ते मोदींना घालवून देण्‍याचं,’’ चौधरी म्हणतात. त्‍यांचे वडील स्‍वातंत्र्यसैनिक होते. ते भारतीय लष्करात सैनिक होते.

PHOTO • Arshdeep Arshi
PHOTO • Arshdeep Arshi

डावीकडे : २०२०-२१ च्‍या शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्‍या वैद्यकीय व्‍यावसायिक संघटनेने महापंचायतीच्‍या ठिकाणीही वैद्यकीय सुविधा पुरवल्‍या. उजवीकडे : महापंचायतीच्‍या ठिकाणी जवळजवळ डझनभर पुस्‍तकांची दुकानं होती. पंचायतीला जे लोक आले होते, त्‍यांना लोकसभा निवडणुकीची पत्रकं वाटण्‍यात आली

नेते भाषणं करत असतात, त्‍याच वेळी धान्‍य बाजारात सर्वत्र घोषणा ऐकू येत असतात. ‘किसान मजदूर एकता झिंदाबाद’, ‘नरेंद्र मोदी गो बॅक!’

किसान महापंचायत जिथे होत असते, तिच्‍या आसपास अनेक लंगर लागलेले असतात. त्‍या त्‍या शेतकरी संघटनेचे आसपासच्‍या गावांमधल्‍या विभागांनी हे लंगर लावलेले असतात. वैद्यकीय व्‍यावसायिक संघटना आरोग्‍य शिबिरं घेत असते. ही संघटना २०२०-२१ च्‍या आंदोलनात टिकरी बॉर्डरवर तब्‍बल तेरा महिने सतत शेतकर्‍यांसोबत असते. इन्‍कलाबी केंद्र आणि जम्‍हूरी अधिकार सभा, पंजाब या संघटना निवडणूक आणि सामान्‍य माणसाला रोज भेडसावणारे शिक्षण, आरोग्‍य, रोजगार, धर्म, जात, लिंगभाव यासारखे प्रश्‍न, याबद्दल चिंता व्‍यक्‍त करणारी पत्रकं वाटत असतात.

एसकेएम भाजपचा पराभव करा असं लोकांना सांगत असते, मात्र कोणत्‍याही विशिष्ट पक्षाला मत द्या, असं सांगत नसते. कीर्ती किसान युनियनचे नेते राजिंदर दीपसिंगवाला म्हणतात, ‘‘भाजपच्‍या उमेदवाराचा पराभव करेल, अशा उमेदवाराला मत द्या.’’

महापंचायत संपते, संदेश स्‍पष्‍ट असतो – प्रचारावेळी भाजपला विरोध करा, निवडणुकीत भाजपला हरवा. ‘‘कोणीही हिंसा करणार नाही. आपण शांततेने निषेध करणार आहोत,’’ निर्णय जाहीर करताना लाखोवाल म्हणतात.

Arshdeep Arshi

Arshdeep Arshi is an independent journalist and translator based in Chandigarh and has worked with News18 Punjab and Hindustan Times. She has an M Phil in English literature from Punjabi University, Patiala.

Other stories by Arshdeep Arshi
Editor : Sarbajaya Bhattacharya
sarbajaya.b@gmail.com

Sarbajaya Bhattacharya is a Senior Assistant Editor at PARI. She is an experienced Bangla translator. Based in Kolkata, she is interested in the history of the city and travel literature.

Other stories by Sarbajaya Bhattacharya
Translator : Vaishali Rode

Vaishali Rode is an independent journalist and a writer with prior experience in Marathi print media. She has penned the autobiography of a transgender, MI HIJDA MI LAXMI, which has been translated in many languages.

Other stories by Vaishali Rode