मदुमलाई व्याघ्र प्रकल्पक्षेत्रात एकवेळ डोळे क्षणभर विश्रांती घेऊ शकतील; पण कान नाही. इथे आपल्यासाठी अनाकलनीय अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये पशू-पक्षी संवाद साधत असतात. यातच असतात तामिळनाडूच्या निलगिरी पर्वतरांगांमध्ये राहणाऱ्या विविध जमातींच्या भाषा!
“नालायवोदुथु’’ [तुम्ही कसे आहात]? बेट्टाकुरुंब विचारतात. इरुलर म्हणतात, “संधाकिथैया?’’
प्रश्न एकच, विचारण्याची पद्धत निरनिराळी.
विरोधाभासी ठरावं असं पश्चिम घाटाच्या या दक्षिणेकडच्या प्रदेशातल्या पशू-पक्ष्यांचं आणि लोकांचं हे संगीत! हे माझ्या घरचे आवाज!
मदुमलाई व्याघ्र प्रकल्पक्षेत्रातल्या पोक्कापुरम (अधिकृत बोक्कापुरम) गावात कुरुंबर पाडी नावाच्या लहानशा रस्त्यावर मी राहतो.
फेब्रुवारीचा उत्तरार्ध आणि मार्चची सुरुवात या दरम्यानच्या दिवसात हे शांत ठिकाण अक्षरश: गजबजलेलं शहर अर्थात थुंगा नगरम् [कधीही न झोपणारं शहर] होऊन जातं. मदुराई हे भलंमोठं शहरही या नावाने ओळखलं जातं.
हा बदल होतो तो पोक्कापुरम मरियम्मन देवीच्या मंदिरातल्या उत्सवामुळे! सहा दिवस नुसते उत्सवाने, गर्दीने आणि संगीताने भारलेले असतात. तरीही, जेव्हा मी माझ्या ऊर [गाव] जीवनाबद्दल विचार करू लागतो, तेव्हा लक्षात येतं की त्या कहाणीतला हा निव्वळ एक भाग आहे.
ही कहाणी ना व्याघ्र प्रकल्पाची आहे; ना माझ्या गावाची. माझ्या जीवनात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या एका व्यक्तीची ही कहाणी आहे. पतीने सोडून दिल्यानंतर एकटीने आपल्या पाच लेकरांना वाढवणाऱ्या एका स्त्रीची आहे.
ही माझ्या आईची कहाणी आहे.
*****
My official name is K. Ravikumar, but among my people, I am known as Maaran. Our community refers to itself as Pettakurumbar, although officially we are listed as Bettakurumba.
कागदोपत्री माझं नाव आहे के. रविकुमार; पण माझी माणसं मला मारन म्हणून ओळखतात. आमचा समुदाय स्वतःला पेट्टाकुरुम्बर म्हणवतो. अधिकृतपणे बेट्टाकुरुंबा म्हणून आम्ही सूचीबद्ध आहोत. The heroine of this story, my amma [mother], is called ‘Methi’, both officially and by our people.
या कथेची नायिका, माझी अम्मा [आई]. हिचं नाव - मेती.
My appa [father] is Krishnan, known by our community as Kethan. I am one of five siblings:
माझे अप्पा [वडील] म्हणजे कृष्णन. आमच्या समुदायात ते केथन म्हणून ओळखले जातात. मी पाच भावंडांतला एक
माझी सगळ्यात मोठी बहीण - चित्रा (आमच्या समाजात - किरकाली), मोठा भाऊ - रविचंद्रन (माधन), माझी दुसरी मोठी बहीण शशिकला (केठ्ठी) आणि माझी धाकटी बहीण कुमारी (किन्मारी).
माझा मोठा भाऊ आणि बहीण विवाहित आहेत. तामिळनाडूच्या कुड्डलोर जिल्ह्यातल्या पालवाडी गावात ते त्यांच्या कुटुंबियांसमवेत राहतात.
माझ्या सर्वात जुन्या आठवणी अंगणवाडीशी जोडलेल्या आहेत. अम्मा किंवा अप्पा मला अंगणवाडीत (सरकारी बालसंगोपन केंद्र) घेऊन जातात… अंगणवाडीतल्या मित्रांसोबत मी आनंद, राग आणि दुःख अशा सर्व प्रकारच्या भावभावना अनुभवल्या.
दुपारी ३ वाजता माझे पालक मला न्यायला यायचे आणि आम्ही घरी जायचो.
दारूने आयुष्याचा ताबा घेण्यापूर्वी माझे आप्पा म्हणजे एक खूप प्रेमळ माणूस होते. एकदा दारू प्यायला सुरुवात केल्यानंतर मात्र ते बेजबाबदार आणि हिंसक झाले. “वाईट संगतच त्यांच्या तशा वागण्याला कारणीभूत ठरली!’’ माझी आई म्हणायची.
घरातली माझी पहिली त्रासदायक आठवण म्हणजे अप्पा एके दिवशी दारूच्या नशेत घरी आले आणि अम्मावर ओरडू लागले. त्यांनी तिच्यावर हल्ला केला आणि त्यावेळी आमच्यासोबत राहात असलेल्या तिच्या आई-वडिलांना आणि भावंडांना अत्यंत आक्षेपार्ह भाषेत अपमानित केलं. आप्पांचं ऐकून घेणं भाग होतं तरी त्यांनी आप्पांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला. हे उद्रेकाचे प्रसंग मग रोजचेच होऊन गेले.
मी दुसरीत होतो तेव्हाचा एक प्रसंग मला अगदी स्पष्ट आठवतो. नेहमीप्रमाणे आप्पा नशेत आणि रागाच्या भरात घरी आले, त्यांनी अम्माला मारलं, मग माझ्या भावंडांना आणि मला. त्यांनी आमचे कपडे, सामान असं सगळं रस्त्यावर फेकून दिलं आणि ‘घरातून निघून जा’ असं ते मोठमोठ्याने ओरडून सांगू लागले. जसे चिमुकले पशुपक्षी हिवाळ्यात त्यांच्या आईच्या कुशीत ऊब शोधतात; तशी ती रात्र आम्ही रस्त्यावर आमच्या आईला बिलगून काढली.
आम्ही ज्या आदिवासी सरकारी संस्थेत होतो तिचं नाव ‘जीटीआर मिडल स्कूल’. तिथे बोर्डिंग आणि जेवणाची सोय असल्याने माझ्या मोठ्या भावाने आणि बहिणीने तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. त्या दिवसांत असं वाटायचं की एकच गोष्ट आपल्यापाशी पुरून उरेल इतकी आहे - आपलं रडणं, आपले अश्रू. आम्ही आमच्याच घरी राहिलो, अप्पा बाहेर पडले.
आम्ही नेहमी अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर असायचो. कधी काय होईल, अशी धाकधूक वाटायची. एका रात्री अप्पांचा मद्यधुंद राग अम्माच्या भावाशी मारामारी होण्यापर्यंत वाढला. अप्पांनी चाकू उगारून माझ्या काकांचे हात कापायचा प्रयत्न केला.
बरं तर बरं; चाकू बराच बोथट होता, त्यामुळे गंभीर इजा झाली नाही. कुटुंबातल्या इतरांनी हस्तक्षेप करत अप्पांवर हल्ला केला. या गदारोळात आईच्या कडेवर असलेली माझी धाकटी बहीण पडली आणि तिच्या डोक्याला दुखापत झाली. काय घडतंय हे कळत नव्हतं मला. मी तिथे उभा होतो… स्तब्ध आणि असहाय्य.
दुसऱ्या दिवशी घरासमोरचं अंगण काका आणि अप्पांच्या रक्ताच्या लाल-काळ्या डागांनी माखलं होतं. कधीतरी मध्यरात्री माझे वडील झोकांडे खात घरी आले. त्यांनी मला आणि बहिणीला माझ्या आजोबांच्या घरातून ओढत शेतातल्या त्यांच्या छोट्याशा खोलीत नेलं. काही महिन्यांनी माझे पालक वेगळे झाले ते कायमचे.
गुडलूरच्या कुटुंब न्यायालयात मी आणि माझ्या भावंडांनी अम्मासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही आमच्या आजी आजोबांसोबत काही दिवस अगदी आनंदाने राहिलो. त्यांचं घर आमच्या पालकांच्या घराच्या रस्त्यावरच होतं.
आमचा हा आनंद अल्पकाळच टिकला. अडचणी सुरू झाल्या. खायचं काय? भूक भागवायचा प्रश्न आ वासू लागला.
माझ्या आजोबांच्या नावावर ४० किलो रेशन मिळायचं. पण ते आमच्या सगळ्यांसाठी अपुरं पडायचं. अनेकदा तर माझे आजोबा रिकाम्या पोटीच झोपून जायचे; आमच्या पोटात काहीतरी पडावं म्हणून! काहीच नसायचं तेव्हा हताशेतून ते देवळांतला प्रसाद घरी घेऊन यायचे आमच्यासाठी! असं व्हायला लागलं तेव्हा मग अम्माने मजुरीच्या कामाला जायचं ठरवलं.
*****
अम्माला शिकवणं तिच्या कुटुंबाला जड जाऊ लागलं त्यामुळे तिसरीत असताना अम्माची शाळा सुटली. अम्माचं अख्खं बालपण लहान भावंडांची काळजी घेण्यात गेलं आणि १८व्या वर्षी तिचं माझ्या वडिलांशी लग्न लावून दिलं गेलं.
आप्पा एका भल्यामोठ्या कॉफी इस्टेटच्या कॅन्टीनसाठी सरपण गोळा करायचे. पोक्कापुरमपासून १० किलोमीटर अंतरावर निलगिरीच्या गुडालूर तालुक्यातल्या सिंगारा गावात ती इस्टेट होती.
आमच्या भागातले जवळपास सगळेच तिथे कामाला जायचे. लग्नाचं नातं होतं तोवर माझी आई आम्हा मुलांचं हवं-नको पाहायला घरी असायची. वेगळं झाल्यानंतर ती सिंगारा कॉफी इस्टेटमध्ये दिवसाकाठी १५० रुपये रोजंदारीवर मजुरीला जाऊ लागली.
ऊन-पावसाची तमा न बाळगता राबणारी अम्मा रोज सकाळी ७ वाजता कामावर जायची. “ती कधी जेवणाच्या सुट्टीतही विश्रांती घेत नाही’’ असं तिच्यासोबत काम करणाऱ्यांकडून मी ऐकलं होतं. या कमाईतून तब्बल आठ वर्षं तिने घर चालवलं. कच्च भिजलेल्या साडीत थरथर कापणाऱ्या, दिवसभर राबून संध्याकाळी ७.३० ला कामावरून परत येणाऱ्या अम्माला मी पाहिलंय. अशा पावसाळ्याच्या दिवसात आमच्या घराच्या छताला गळती लागायची आणि घरभर भांडी ठेवण्यात तिची दमछाक व्हायची.
चूल पेटवायला मी बऱ्याचदा तिला मदत करायचो आणि मग आमचं अख्खं कुटुंब तिच्या अवतीभवती बसून दररोज रात्री ११ पर्यंत गप्पा मारायचं.
कधीतरी रात्री अंथरुणावर टेकल्यावर ती आमच्यापाशी मन मोकळं करायची. अशावेळी कधी कष्टाचे, दु:खाचे दिवस आठवले की तिला अश्रूही अनावर व्हायचे. तिचं बोलणं ऐकता ऐकता कधी आम्ही रडू लागलो तर मात्र ती लगेच आमचं मन दुसरीकडे वळवण्यासाठी हास्यविनोद करू लागायची. कुठल्या आईला आपलं लेकरू रडताना बघवेल?
दरम्यान आई जिथे कामाला जायची तिथल्या मालकांनी सुरू केलेल्या मसिनागुडीतल्या श्री शांती विजिया हायस्कूलमध्ये मी प्रवेश घेतला. कामगारांच्या मुलांसाठी सुरू केलेली ती शाळा! तिथे गेल्यावर तुरुंगात गेल्यासारखं वाटायचं. मी खूप गयावया केली तरीदेखील अम्मांनी स्वत:चा आग्रह रेटला.हट्टी होतो, मार खात होतो तरी मी शाळेत हजेरी लावू लागलो. मध्यंतरीच्या काळात आम्ही आमच्या आजी-आजोबांच्या घरातून बाहेर पडलो आणि चित्रा या माझ्या मोठ्या बहिणीच्या सासरी दोन खोल्यांच्या लहानशा झोपडीत राहायला गेलो. कुमारी ही माझी धाकटी बहीण जीटीआर मिडल स्कूलमध्येच राहिली.
दहावीच्या परीक्षेचा प्रचंड ताण शशिकला या माझ्या बहिणीने अनुभवला. आईला घरकामात मदत करण्यासाठी तिने शाळा सोडली. वर्षभरानंतर शशिकलाला तिरुपूर टेक्सटाईल कंपनीत नोकरी मिळाली. वर्षातून एक-दोनदा ती आम्हाला भेटायला येऊ शकायची. तिला दरमहा मिळणारा ६००० रुपये पगार आमच्यासाठी पाच वर्षं मोठा आधार ठरला. अम्मा आणि मी दर तीन महिन्यांनी तिला भेटायला जायचो. ती दरवेळी तिची बचत आम्हाला देऊ करायची. माझी बहिण नोकरीला लागल्यावर वर्षभराने माझ्या आईने कॉफी इस्टेटमध्ये काम करणं थांबवलं. घर सांभाळण्यात आणि माझी मोठी बहीण- चित्राच्या बाळाची काळजी घेण्यात तिचा बराच वेळ जाऊ लागला.
श्री शांती विजिया हायस्कूलमधून मी कसातरी १० वी पूर्ण करून बाहेर पडलो. नंतर उच्च माध्यमिकसाठी कोटागिरी सरकारी बोर्डिंग स्कूलमध्ये दाखल झालो. मला चांगल्या संधी मिळाव्या असं आईच्या फार मनात होतं. तिने माझ्या शिक्षणाला पैसा कमी पडू नये म्हणून शेणाच्या गवऱ्या विकल्या.
अप्पा निघून गेले तेव्हा त्यांनी आमचं घर पार उद्ध्वस्त करून टाकलं आणि वीजही तोडली. वीज नसताना आम्ही दारूच्या बाटल्यांपासून बनवलेले रॉकेलचे दिवे वापरायचो. नंतर त्यांच्या जागी दोन सेंबू [तांबं] दिवे आले. या दिव्यांनी आमचं आयुष्य दहा वर्षं उजळवलं. मी १२वीत असताना आमच्या घराला परत वीज मिळाली. ती मिळवण्यासाठी माझ्या आईने खूप खस्ता खाल्ल्या. एकीकडे नोकरशाहीशी संघर्ष केला आणि दुसरीकडे विजेबद्दल स्वत:च्या मनात जी भीती होती त्यावरही मात केली. एकटी असताना ती विजेवरचे दिवे बंद करायची आणि फक्त तिचे दिवे लावायची. तिला मी विचारलं, “तुला विजेची इतकी भीती का वाटते?’’ सिंगारा इथे एका महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचं तिने ऐकलं होतं. त्या प्रसंगाची आठवण त्यावेळी तिने मला सांगितली होती.
उच्च शिक्षणासाठी मी जिल्हा मुख्यालय असलेल्या उधगमंडलम् (उटी) इथल्या कला महाविद्यालयात प्रवेश घेतला. माझी फी भरण्यासाठी आईने कर्ज उचललं. त्यातून मला पुस्तकं आणि कपडे विकत घेतले. हे कर्ज फेडण्यासाठी तिने भाजीच्या मळ्यात काम केलं आणि शेणाच्या गवऱ्या गोळा केल्या. सुरुवातीला ती मला पैसे पाठवायची. मग थोड्याच दिवसात एका केटरिंग सेवा देणाऱ्यांसाठी मी अर्धवेळ काम करू लागलो. स्वत:च्या खर्चासाठी आणि घरी पैसे पाठवण्यासाठी! माझ्या आईने आता पन्नाशी ओलांडलीय. तिने कधीही कुणाकडे आर्थिक मदत मागितली नाही. नोकरीची पर्वा ती करत नाही; मात्र कधीही कुठलंही काम करायला तयार असते.
माझ्या मोठ्या बहिणीची मुलं थोडी मोठी झाल्यावर माझी आई त्यांना अंगणवाडीत सोडून मग रानातून शेण गोळा करायला जायची. आठवडाभर शेण गोळा करून बादलीभर ८० रुपयाला या दराने विकायची. सकाळी ९ वाजता तिच्या कामाला सुरुवात व्हायची आणि ते चालायचं थेट दुपारी ४ पर्यंत. दुपारच्या जेवणासाठी असायची फक्त कडलीपाझम (एक प्रकारचं निवडुंग फळ) सारखी रानटी फळं.
इतकं कमी खाऊनही तू उत्साही कशी असतेस, असं मी विचारल्यावर ती म्हणाली, “लहानपणी मी जंगलातलं आणि रानातलं मांस, पालेभाज्या आणि कंद भरपूर खायचे. त्या दिवसात जे खाल्लंय तेच माझ्या आजच्या उत्साहाचं कारण आहे.’’ तिला जंगली पालेभाज्या आवडतात! मी माझ्या आईला तांदळाच्या दाण्यावर तगून राहिलेलं पाहिलंय - फक्त मीठ आणि गरम पाणी.
आश्चर्य असं की “मला भूक लागलीय’’ असं आजवर अम्मा क्वचितच कधीतरी म्हणालीय. आम्ही... तिची मुलं जेवतायत हे पाहण्यातच सामावलेलं असायचं तिचं समाधान!
आमच्या घरी तीन कुत्रे आहेत - दिया, देव, रसती. आणि शेळ्याही आहेत - प्रत्येकाचं नाव त्यांच्या रंगावरून ठेवलंय. आम्ही जितके आमच्या कुटुंबाचा भाग आहोत; तितकेच हे प्राणीदेखील. अम्मा आमची जशी काळजी घेते तशीच त्यांचीही काळजी घेते आणि तेही तिच्या असीम प्रेमाला प्रतिसाद देतात. दररोज सकाळी ती शेळ्यांना पालेभाज्या आणि भाताची पेज देते.
माझी आई खूप धार्मिक आहे. पारंपरिक देवतेपेक्षा जेदासामी आणि अय्यपनवर तिची जास्त श्रद्धा आहे. आठवड्यातून एकदा ती आमचं अख्खं घर साफ करते आणि जेदासामी मंदिरात जाऊन येते. या देवांपाशी ती तिचा आंतरिक संघर्ष व्यक्त करते.
आजवर स्वत:साठी साडी खरेदी करताना मी माझ्या आईला पाहिलेलं नाही. तिच्याकडे एकूण फक्त आठ साड्या आहेत; प्रत्येक साडी माझ्या मावशीने किंवा मोठ्या बहिणीने भेट दिलेली! कुठलीही तक्रार न करता, अपेक्षा न बाळगता त्या साड्या ती वारंवार नेसते.
माझ्या कुटुंबातली सततची भांडणं हा गावातल्या लोकांसाठी कधी काळी चर्चेचा आणि हेटाळणीचा विषय बनला होता. पण ते सगळं मागे टाकत, संघर्षाला पुरून उरत आज मी आणि माझी भावंडं इथवर येऊन पोहोचलोय याचं त्यांना आश्चर्य वाटतं. स्वत:वरच्या अघोरी ओझ्याचं दडपण लेकरांना कधी आम्हाला जाणवू दिलं नाही, यासाठी गावचे लोक आता माझ्या आईचं कौतुक करतात.
आता मागे वळून पाहताना वाटतं, बरं झालं अम्माने मला श्री शांती विजिया हायस्कूलमध्ये जायला लावलं. तिथेच मी इंग्रजी शिकलो. ती शाळा नसती आणि अम्माने आग्रह धरला नसता तर मला उच्च शिक्षणासाठी फार त्रास काढावे लागले असते. अम्माने माझ्यासाठी जे काही केलं त्याची परतफेड करू शकेन, असं मला वाटत नाही. मी आयुष्यभर तिचा ऋणी राहीन.
दिवस संपत येतो तेव्हा कुठे अम्माला फुरसत मिळते. ती तिचे पाय ताणून लांब करते आणि किंचित विसावते. तेव्हा प्रत्येक दिवशी मी तिच्या त्या पायांकडे पाहतो. वर्षानुवर्षं कष्ट घेतलेले हे पाय. कामामुळे तिला तासन् तास पाण्यात उभं राहावं लागत असेल... पण तरीही तिचे पाय आहेत कोरड्या ओसाड जमिनीसारखे… भेगाळलेले! याच त्या भेगा... ज्यांनी आम्हाला वाढवले!