“मला नाही वाटत मी एक चित्रकार आहे. एखाद्या चित्रकारात असणारे गुण माझ्यात नाहीत. पण माझ्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत. माझ्या कुंचल्याच्या मदतीने याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करते. माझ्या कुंचल्याच्या रेषा किंवा फटकारे अगदी अचूक आहेत असं काही माझं म्हणणं नाहीये. खरं सांगायचं तर मी फक्त गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये वेगवेगळ्या चित्रकारांचं काम समजून घेण्याचा आणि अभ्यासण्याचा प्रयत्न करतीये. नाही तर मला यातलं काहीही माहीत नव्हतं. मी फक्त गोष्ट सांगण्यासाठी चित्र काढत होते. आणि ती गोष्ट चांगल्या पद्धतीने सांगता आली की मलाच छान वाटतं. एखादं कथानक पुढे सरकत जातं तसं मी चित्रात रंग भरत जाते.”
ही आहे लाबोनी. पश्चिम बंगालच्या नाडिया या अगदी ग्रामीण जिल्ह्यातल्या धुबुलिया गावातली एक कलाकार, चित्रकार. दुसऱ्या महायुद्धादरम्यान या भागात सैन्याचा आणि हवाईदलाचा एक तळ होता. इंग्रजांनी जेव्हा हे तळ बांधले तेव्हा या मुस्लिमबहुल गावाची बरीचशी जमीन त्यामध्ये गेली. त्यानंतर फाळणी झाली आणि या गावातले बरेचसे लोक सीमापार गेले. “पण आम्ही नाही गेलो,” लाबोनी सांगते. “आमच्या आज्या-पणज्यांना जायचं नव्हतं. आमचे पूर्वज याच मातीत दफन झाले आहेत. आम्हालाही इथेच रहायचंय आणि इथेच मरायचंय.” या भूमीशी असलेलं नातं, आणि त्याच मायभूमीच्या नावावर जे काही आजूबाजूला घडत असतं त्या सगळ्यातून लाबोनी लहानाची मोठी होत गेली, तिचं भावविश्व घडत गेली.
चित्रं काढण्याची प्रेरणा लाबोनीला आपल्या वडलांकडून मिळाली. लहान असताना सुरुवातीची काही वर्षं ते तिला एका शिक्षकाकडे घेऊन जायचे. दहा भावंडांमध्ये शिक्षण घेणारे ते एकटेच आणि त्यांच्या घराण्यातली शिकणारी त्यांची पहिलीच पिढी. त्यांनी गावपातळीवर वकिली करत करत शेतकरी आणि श्रमिकांसाठी सहकारी संस्था स्थापन केल्या. पण त्यातून फारसे पैसे कमावले नाहीत. “त्यांना जे काही थोडेफार पैसे मिळायचे, त्यातून ते माझ्यासाठी पुस्तक विकत आणायचे,” लाबोनी सांगते. “मॉस्को प्रेस, रादुगा पब्लिशर्सची लहान मुलांसाठीची भरपूर पुस्तकं असायची. ही पुस्तकं बंगालीतून आमच्यापर्यंत पोचायची. त्या पुस्तकांमधली चित्रं मला फार आवडायची. चित्रं काढावीत हे सगळ्यात आधी वाटलं असेल ते याच पुस्तकांमुळे.”
अगदी लहान वयात गिरवलेले चित्रकलेचे धडे दीर्घकाळ टिकले नाहीत. पण चित्रांसाठी असलेलं प्रेम २०१६ साली पुन्हा चेतवलं गेलं. पण कारण फार वेगळं होतं. हा असा काळ होता जेव्हा शब्दांनी साथ सोडली होती. याच काळात झुंडीने बळी घेण्याच्या घटना वाढत चालल्या होत्या. शासनसंस्थेची अनास्था आणि अल्पसंख्याकांचं हेतुपुरस्सर शिरकाण केलं जात होतं. पण तरीही बहुसंख्याकांनी मात्र सोयीस्कररित्या या सर्व गुन्ह्यांकडे काणाडोळा केला होता. कोलकात्याच्या जादवपूर विद्यापीठात एमफिल करत असलेल्या लाबोनीला देशातल्या या परिस्थितीने फार अस्वस्थ केलं होतं. तरीही आपल्या मनातली तगमग शब्दांत मांडता येत नव्हती.
“अस्वस्थता होती खूप,” ती सांगते. “त्या काळापर्यंत मला लिहायला खूप आवडायचं. मी बांग्लामध्ये काही लेख लिहिले होते, ते छापूनही आले होते. पण अचानक असं वाटायला लागलं की शब्द तोकडे पडतायत. सगळ्या सगळ्या गोष्टींपासून पळून जावंसं वाटत होतं. तेव्हाच मी चित्रं काढायला, रंग भरायला सुरुवात केली. मिळेल त्या चिटोऱ्यावर मी समुद्र आणि समुद्राच्या विविध भावभावना रंगवायचे. जलरंगांमध्ये. एकानंतर एक असं करत मी त्या काळात [२०१६-१७] समुद्राची इतकी सारी चित्रं काढली होती. या सगळ्या अनिश्चित दुनियेमध्ये शांतता शोधण्याचा तेवढा एकच मार्ग होता माझ्यापाशी. चित्रं.”
आणि अगदी आजही लाबोनी एक स्वयंभू कलाकार आहे.
२०१७ साली जादवपूर विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेस, कलकत्ता या संस्थेत तिने पीएचडीसाठी प्रवेश घेतला. यासाठी तिला मानाची यूजीसी-अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मौलाना आझाद राष्ट्रीय पाठ्यवृत्ती (२०१६-२०) मिळाली होती. या आधी देखील ती स्थलांतरित कामगारांच्या प्रश्नावर काम करत होती. मात्र आता तिच्या अभ्यासाचा विषय होता – ‘स्थलांतरित बंगाली कामगारांचं जीवन आणि जग’.
लाबोनीने आपल्या गावातली बरीच माणसं केरळला बांधकामावर काम करण्यासाठी किंवा मुंबईत हॉटेलमध्ये काम करण्यासाठी गाव सोडून गेलेली पाहिली होती. “माझ्या वडलांचे भाऊ आणि त्यांच्या घरातले इतर लोक आजही बंगालच्या बाहेर स्थलांतरित कामगार म्हणून काम करतायत. त्यातही बायांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त आहे,” ती सांगते. हा विषय तिच्या अगदी जवळचा असला तरी त्याचा अभ्यास करायचा तर सखोल फिल्डवर्क करणं गरजेचं होतं. “आणि तेव्हाच महामारी आली,” लाबोनी सांगते. “आणि या महासाथीचा सगळ्यात जास्त फटका कुणाला बसला असेल तर तो स्थलांतरित कामगारांना. तेव्हा मात्र संशोधन वगैरे काहीच करु नये असं मला वाटू लागलं होतं. हे लोक आपल्या घरी परतण्यासाठी धडपडत असताना मी केवळ माझ्या अभ्यासासाठी त्यांना प्रश्न कसे बरं विचारणार होते? दवाखाना किंवा अगदी दहन आणि दफनभूमीत जागा मिळवण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू होता. त्यांच्या अशा परिस्थितीत त्यांचा वेळ घेणं म्हणजे त्यांचा फायदा घेण्यासारखं मला वाटत होतं. मग काय, माढं फील्डवर्क वेळेत संपू शकलं नाही आणि माझं पीएचडी अजूनही सुरूच आहे.”
याच काळात लाबोनीने परत एकदा कुंचला हातात घेतला. यावेळी ती स्थलांतिरत कामगारांच्याच गोष्टी सांगत होती. पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया (पारी). “साईनाथ यांचे काही लेख गणशक्तीमध्ये संपादकीय पानांवर बंगालीमध्ये छापले जात होते. त्यामुळे मला त्यांचं लिखाण परिचयाचं होतं. त्याच वेळी एका लेखासाठी आणि नंतर एका कवितेसाठी चित्र काढण्याबद्दल स्मितादीने विचारलं.” (स्मिता खटोर पारीवर अनुवाद विभागाची, म्हणजेच पारीभाषाची मुख्य संपादक आहे.) मग २०२० चं वर्ष लाबोनी जांगी पारी फेलो होती आणि त्या काळात तिने तिच्या अभ्यासाचा विषय असलेल्या स्थलांतरित कामगारांविषयी चित्रं काढली. त्यासोबत टाळेबंदीत अडकलेल्या, जगू पाहणाऱ्या शेतकऱ्यांची, गावपाड्यातल्या बायांचीही अनेक चित्रं तिने रंगवली.
“पारीवरच्या माझ्या कामाचा भर व्यवस्थेने निर्माण केलेली आव्हाने आणि त्यातही टिकून, तगून राहणारं गावपाड्याचं जग अशा दोन्हीवर होता. ही सगळी कथनं माझ्या कलेमध्ये आणण्याचा मी प्रयत्न केला. त्यातून जे दृश्य स्वरुपात व्यक्त झालं ते त्यांच्या जगण्याच्या गुंतागुंतीशी मेळ खात होतं. भारतातल्या गावपाड्यांमधली अतिशय समृद्ध आणि वैविध्याने भरलेली संस्कृती आणि सामाजिक वास्तव सगळ्यांसमोर आणण्याचं आणि टिकवून ठेवण्याचं माध्यम म्हणजे माझी चित्रं.”
लाबोनी कोणत्याही राजकीय पक्षाची सदस्य नाही पण तिच्यासाठी तिची कला राजकीय आहे. “मी जादवपूर विद्यापीठात आल्यानंतर मी अनेक रंगकर्मींचं काम आणि राजकीय पोस्टर्स पाहिली. मी ज्या पद्धतीची चित्रं चितारते त्यावर या कामाचा आणि अर्थातच माझ्या जाणिवांचाही मोठा वाटा आहेच.” घृणा किंवा द्वेष जिथे चुकीचा वाटेनासा झालाय त्या समाजात एक मुस्लिम स्त्री म्हणून जगणं आणि त्यातलं वास्तव तिला नेहमी प्रेरणा देत राहतं. शासन पुरस्कृत हिंसाचार हेही आता वास्तव म्हणून मान्य करावं लागतंय.
“या दुनियेला आम्हाला बेदखल करायचंय. आमच्यातलं कौशल्य, नैपुण्य आणि आमचे कष्टसुद्धा,” लाबोनी सांगते. “आमचं अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या या प्रक्रियेमध्ये आम्ही कोण आहोत हे महत्त्वाचं ठरतं. अगदी आजही हे असंच सुरू आहे. एखाद्या मुस्लिम स्त्रीची कला अनेकांच्या खिजगणतीतही नाही.” त्यासाठी तिला कुणाचा तरी ‘राजाश्रय’ मिळायला हवा. तितकं तिचं नशीबही हवं ना. “आमच्या कलेसाठी अवकाशच नाहीये, कुणी तिची दखल घेत नाही, अगदी टीका करण्याइतकीही नाही. हे आहे मिटवून टाकणं. कला, साहित्य किंवा इतरही क्षेत्रांचा इतिहास पाहिलात तर तुम्हाला हीच प्रक्रिया घडलेली दिसेल,” लाबोनी सांगते. पण तरीही लाबोनी चित्रं काढत राहते, रंग भरत राहते. आणि फेसबुक किंवा इन्स्टाग्रामसारख्या डिजिटल मंचांवर आपली कला मांडत राहते.
फेसबुकवरचं तिचं काम पाहूनच चट्टोग्रामच्या चित्रभाषा आर्ट गॅलरीने तिंला तिला बांग्लादेशला आमंत्रित केलं. डिसेंबर २०२२ मध्ये बीबीर दर्गाज हे तिचं पहिलं वहिलं स्वतंत्र प्रदर्शन.
बीबीर दर्गा या प्रदर्शनाच्या संकल्पनेची मुळं लाबोनीच्या लहानपणात दडली आहेत. तसंच ती आता बांग्लादेशात ज्या प्रकारे कट्टरपंथी इस्लाम पुन्हा डोकं काढू लागलाय त्याच्याशीही या प्रदर्शनाचा संबंध आहे. बीबी का दर्गा म्हणजे पीर स्त्रियांच्या स्मृतीत बांधला गेलेला दर्गा. “मी लहानाची मोठी होत होते तेव्हा आमच्या गावात असे दोन दर्गे होते. मन्नत मागायची तर तिथे जाऊन धागा बांधण्याची पद्धत आमच्या इथे होती. आणि आमची मन्नत कबूल झाली तर मग एकत्र जेवण बनवून सगळ्यांना जेवू घालण्याची रीत होती. त्या दर्ग्यामध्ये बरंच काही घडत होतं जे धर्माच्या भिंतींपल्याड जाणारं होतं.”
“पण हे सगळं माझ्या डोळ्यासमोर विरत जाताना मी पाहिलंय. त्या दर्ग्याच्या ठिकाणी नंतर एक मक्ताब [वाचनालय] उभं राहिलं. कट्टरपंथी मुसलमानांचा या मझारसारख्या ठिकाणांवर विश्वास नाही. किंवा सूफी दर्गे त्यांना मान्य नाहीत. त्यामुळे अशा जागा पाडायच्या किंवा त्या जागांच्या ठिकाणी मस्जिद बांधायची, असे त्यांचे उद्योग सुरू असतात. आजही काही दर्गे आहेत पण ते सगळे पुरुष पीरांचे आहेत. आता बीबी का दर्गा कुठेच पहायला मिळत नाही. त्यांची नावं देखील आमच्या स्मरणातून गळून गेली आहेत.”
असा विध्वंस सगळीकडेच पसरलाय पण त्यासोबतच समांतर पातळीवर दुसरा एक प्रवाहही सुरू आहे. हेतूपूर्वक आणि हिंसेचा वापर करून या आठवणी आणि खुणा मिटवण्याचं काम सुरू असलं तरी त्यासमोरही पाऊल रोवून काही तरी उभं राहतंय. “बांग्लादेशातलं प्रदर्शन जवळ येत होतं. तेव्हाच मी ज्या प्रकारे मझार पाडले जात होते त्याचा विचार करत होते. पण त्याच सोबत अगदी आजही सामान्य बाया आपल्या जमिनीच्या अधिकारासाठी ज्या प्रकारे संघर्ष करत होत्या ते आणि त्यांची वज्रमूठही पाहत होते. मझार भले गाडली गेली असेल, विद्रोहाचं आणि टिकून राहण्याचं बळ म्हणजेच ती मझार आहे असं मला वाटतं. त्या माझ्या प्रदर्शनात मी हेच कॅनव्हासवर आणण्याचा प्रयत्न केला.” प्रदर्शन होऊन दोन वर्षं उलटल्यानंतरही लाबोनी याच विषयाला धरून काम करतीये.
लाबोनीच्या चित्रं मुखर नसलेल्यांचा आवाज झाली आहेत. अनेक कविता, लेख आणि पुस्तकांमध्ये प्राण फुंकलाय. “कलाकार आणि लेखक, आम्ही सगळे कुठे ना कुठे एकमेकांशी जोडलेले असतो. मला आठवतं केशवभाऊ मला सांगत होते की त्यांच्या कल्पनेत होते तसेच शाहीर आत्माराम साळवे मी कागदावर उतरवले होते. यात मला आश्चर्य वाटत नाही. कारण आमच्या कल्पना किंवा आमच्या सामूहिक स्मृती, आमच्या कथा-कहाण्या सगळं एकच आहे. आमची सामाजिक, सांस्कृतिक किंवा वैयक्तिक ओळख भले वेगवेगळी असेल,” लाबोनी सांगते.
ठळक, गहिरे रंग, ब्रशचे जोरकस फटकारे आणि मानवी आयुष्याचं अगदी जसंच्या तसं चित्रण ही लाबोनीच्या चित्रांची वैशिष्ट्यं. सांस्कृतिक एकसाचीकरणाविरोधातला विद्रोह, समूह म्हणून आपल्या सगळ्यांच्या स्मृतीच्या गोष्टी, लोकांची ओळख आणि अस्मिता तसंच लोकांमध्ये फूट पाडली जात असतानाही दुवे बांधण्याच्या प्रक्रिया या चित्रांमधून आपल्या समोर येत राहतात. “युटोपिया किंवा नंदनवन लवकरात लवकर अवतरावं, त्याची मला घाई लागली आहे. आणि तीच माझ्या चित्रांमागची प्रेरणा आहे. आपल्या सभोवताली दिसत असलेल्या हिंसेला काय उत्तर असू शकतं? एका नव्या समाजाची कल्पना, तशी दृष्टी,” लाबोनी सांगते. “आज आपण अशा जगात राहतोय जिथे राजकीय विचारधारा मोडतोडीच्या बाजूने झुकलेली आहे. माझ्या चित्रांत मात्र मी लोकांमधला विद्रोह आणि तगून राहण्याची भाषा मांडण्याचा प्रयत्न करते. आणि ती हळुवारही आहे आणि तितकीच जालीमही.”
ही भाषा लाबोनी आपल्या आजीकडून शिकली. वयाची पहिली १० वर्षं ती तिच्यापाशीच होती. “आम्हा दोघांचं – मी आणि माझा भाऊ – सगळं पाहणं आईला अवघड जायचं. आमचं घरही लहान होतं. म्हणून मग तिने मला नानीच्या घरी पाठवून दिलं. तिथे नानी आणि खाला म्हणजे मावशीने मला लहानाचं मोठं केलं. वयाची पहिली दहा वर्षं. नानीच्या घराजवळ एक तळं होतं. दररोज दुपारी आम्ही तिथे कांथा भरत बसायचो,” लाबोनी सांगते. साध्या धावदोऱ्याचा वापर करत तिची आजी रंग भरत जायची आणि त्यासोबत अतिशय गुंतागुंतीच्या गोष्टीसुद्धा. साध्या रेषांमधून अगदी अर्थगर्भ काही सांगण्याची कला लाबोनी तिच्या आजीकडून शिकली असावी. मात्र हताशा आणि उमेद यामधला तिच्याकडचा अवकाश मात्र नक्कीच तिच्या आईकडून तिच्याकडे आलाय.
“लहानपणी मला परीक्षेत फारच वाईट गुण मिळायचे. गणितात आणि कधी कधी शास्त्रातही भोपळा मिळायचा,” ती सांगते. “पण का कुणास ठाऊक माझ्या आईचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. बाबांच्या मनात शंका यायची. पण मा धीर द्यायची की पुढच्या परीक्षेत चांगले गुण मिळतील म्हणून. तिच्याशिवाय मी इथवर पोचूच शकले नसते. मांला कॉलेजला जायचं होतं. पण तिला काही ते करता आलं नाही. तिचं लग्न लावून देण्यात आलं. त्यामुळे तिचं जे जगायचं राहून गेलं ते ती माझ्या रुपाने जगते. मी कोलकात्याहून परत आले की ती माझ्या शेजारी बसते आणि तिच्या घरापल्याडच्या दुनियेच्या सगळ्या गोष्टी अगदी जीवाचा कान करून ऐकते. माझ्या डोळ्यातून ती ते जग पाहत असते.”
पण ही बाहेरची दुनिया भयानक होत चालली आहे. कलेचं क्षेत्रही दिवसेंदिवस बाजारशरण होतंय. “माझा आतला भावनिक गाभा निसटून जायची मला भीती वाटते. मोठी कलाकार होण्याच्या नादात मला माझ्या स्वतःच्या लोकांपासून दूर जायचं नाहीये. विलग व्हायचं नाहीये. ज्या तत्त्वांसाठी माझी कला काम करते ती विसरायची नाहीयेत. आजही माझा झगडा सुरू आहे. पैशासाठी, वेळासाठी. पण माझा सगळ्यात मोठा संघर्ष काय आहे सांगू? माझा आत्मा बाजारात विकायला न काढता या जगात टिकून राहणं.”
शीर्षक छायाचित्रः जयंती बुरुडा