जसदीप कौरला जेंव्हा चांगला अभ्यास करण्यासाठी स्मार्टफोन विकत घ्यायचा होता, तेंव्हा तिच्या आईवडिलांनी तिला रु. १०,००० उसने दिले. ते पैसे परत देण्यासाठी या १८ वर्षीय मुलीने २०२३ मध्ये आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या भातलावणी करण्यात घालवल्या.

आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी शेतात काम करणारी ती एकटीच नसून तिच्यासारखे अनेक तरुण दलित विद्यार्थी पंजाबच्या श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यात आहेत.

“आम्ही मजेसाठी शेतात राबत नाही, घरी नाईलाज आहे म्हणून राबतो,” जसदीप म्हणते. तिचं कुटुंब पंजाबमधील मजहबी शीख या अनुसुचित जातीचं आहे; तिच्या समाजातील बहुतांश लोकांकडे स्वतःच्या मालकीची जमीन नसून ते उच्चवर्णीय शेतकऱ्यांच्या जमिनीत मजुरी करतात.

तिच्या आईवडिलांनी गाय विकत घेण्यासाठी एका सूक्ष्म वित्तीय संस्थेकडून रु. ३८,००० चं कर्ज घेतलं होतं, त्यातून काही पैसे त्यांनी तिला उधार दिले. या गायीचं दूध रु. ४० प्रति लिटर या दराने विकून त्यांच्या घरखर्चात मदत होते. श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यातील खुंडे हलाल या त्यांच्या गावात रोजगाराच्या संधी दुर्मिळच आहेत – येथील ३३ टक्के गावकरी शेतमजूर आहेत.

जसदीपला जून महिन्यात एका कॉलेजच्या परीक्षेला बसायचं होतं तेंव्हा हा स्मार्टफोन कामी आला – तिने शेतमजुरीतून दोन तासांचा वेळ काढून ही ऑनलाईन परीक्षा दिली. “मला काम सोडणं परवडणार नव्हतं. मी जर काम बुडवून कॉलेजला गेली असती तर माझी त्या दिवशीची मजुरी कापल्या गेली असती,” ती म्हणते.

Dalit student Jasdeep Kaur, a resident of Khunde Halal in Punjab, transplanting paddy during the holidays. This summer, she had to repay a loan of Rs. 10,000 to her parents which she had taken to buy a smartphone to help with college work
PHOTO • Sanskriti Talwar

खुंडे हलाल गावातील दलित विद्यार्थिनी जसदीप कौर उन्हाळ्याच्या सुट्टीत भातलावणी करताना. या उन्हाळ्यात तिला आपल्या आईवडिलांकडून घेतलेलं रु. १०,००० चं कर्ज फेडायचं होतं, ज्यातून तिने कॉलेजच्या कामासाठी एक स्मार्टफोन विकत घेतला होता

'We don’t labour in the fields out of joy, but out of the helplessness of our families ,' says Jasdeep. Her family are Mazhabi Sikhs, listed as Scheduled Caste in Punjab; most people in her community do not own land but work in the fields of upper caste farmers
PHOTO • Sanskriti Talwar
'We don’t labour in the fields out of joy, but out of the helplessness of our families ,' says Jasdeep. Her family are Mazhabi Sikhs, listed as Scheduled Caste in Punjab; most people in her community do not own land but work in the fields of upper caste farmers
PHOTO • Sanskriti Talwar

‘आम्ही मजेसाठी शेतात राबत नाही, घरी नाईलाज आहे म्हणून राबतो,’ जसदीप म्हणते. तिचं कुटुंब पंजाबमधील मजहबी शीख या अनुसुचित जातीचं आहे; तिच्या समाजातील बहुतांश लोकांकडे स्वतःच्या मालकीची जमीन नसून ते उच्चवर्णीय शेतकऱ्यांच्या जमिनीत मजुरी करतात

जसदीपला शेतमजुरी काही नवीन नाही. ती पंजाबच्या श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यातील गव्हर्नमेंट कॉलेज मुक्तसर येथे द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी आहे. ती १५ वर्षांची असल्यापासून आपल्या कुटुंबासोबत शेतात राबतेय.

“इतर विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या नानी पिंडला [आजोळी] जायचा हट्ट करतात,” ती हसून म्हणते. “मात्र आम्ही शक्य तितकी भात लावणी करण्यात जिवाचं रान करतो.”

तिच्या कुटुंबाने सूक्ष्म वित्तीय संस्थेकडून घेतलेली एक लाख रकमेची दोन कर्जं फेडण्यासाठी जसदीपने तरुण वयातच भातलावणी करण्यास सुरुवात केली. तिच्या वडिलांनी २०१९ मध्ये घेतलेल्या मोटरबाईकचे पैसे भरण्यासाठी त्यांनी ही कर्जं घेतली होती. त्यांनी एका कर्जावर रु. १७,००० तर दुसऱ्यावर रु. १२,००० व्याज भरलं होतं.

जसदीपची भावंडं, मंगल आणि जगदीप, दोन्ही वय वर्षे १७, हीसुद्धा १५ वर्षं उलटल्यावर शेतात राबायला लागली होती. त्यांची आई, ३८ वर्षीय राजवीर कौर आम्हाला म्हणाल्या की मुलं सात–आठ वर्षांची झाली की शेतमजूर त्यांना आपल्यासोबत शेतावर नेतात, “जेणेकरून पुढे त्यांना आमच्यासोबत शेतमजुरी कठीण वाटायला नको.”

Rajveer Kaur (in red) says families of farm labourers in the village start taking children to the fields when they are seven or eight years old to watch their parents at work.
PHOTO • Sanskriti Talwar
Jasdeep’s brother Mangal Singh (black turban) started working in the fields when he turned 15
PHOTO • Sanskriti Talwar

डावीकडे: राजवीर कौर (लाल कपड्यांत) म्हणतात की मुलं सात–आठ वर्षांची झाली, की शेतमजूर त्यांना आपलं काम पाहायला आपल्यासोबत शेतावर नेतात. उजवीकडे: जसदीपचा भाऊ मंगल सिंह (काळा फेटा) १५ वर्षांचा झाल्यापासून शेतात काम करू लागला

त्यांच्या शेजारच्या घरीही – नीरू, तिच्या तीन बहिणी आणि विधवा आई – हीच परिस्थिती आहे. “आईला काला पिलिया (हेपटायटिस-सी) असल्यामुळे तिला भातलावणी जमत नाही,” २२ वर्षीय नीरु सांगते, त्यामुळे त्यांना गावाबाहेर काम करायला जाता येत नाही. २०२२ मध्ये तिच्या आईला, ४० वर्षीय सुरिंदर कौर यांना हा आजार झाला असून त्यांना ताप व काविळाचा धोका असतो. त्यांना रु. १,५०० रुपये मासिक विधवा पेन्शन मिळते, पण त्यात घरखर्च भागत नाही.

त्यामुळे १५ वर्षांच्या झाल्यापासून नीरू व तिच्या बहिणी भातलावणी, तण उपटणं आणि कापूस वेचणं यासारखी कामं करू लागल्या. त्यांच्यासारख्या मजहबी शीख कुटुंबांसाठी हे कमाईचं एकमेव साधन आहे. “आम्ही सुट्ट्यांमध्ये पूर्ण वेळ शेतात राबत होतो. आम्हाला एक आठवडा आराम मिळाला, त्यात आम्ही आमचा सुट्ट्यांचा होमवर्क पूर्ण करायचो,” नीरू म्हणते.

पण खासकरून उन्हाळ्यात काम करणं त्रासदायक असतं: ऊन तापू लागलं की भाताच्या शेतातील पाणी गरम होऊ लागतं, तेंव्हा महिला व मुलींना दुपारी आडोसा घ्यावा लागतो, आणि त्या दुपारी ४ नंतरच कामावर येतात. हे कष्टाचं काम आहे, पण बिलं भरायची असल्यामुळे जसदीप व नीरूला दुसरा पर्याय नाही.

“आमची सगळी कमाई जर त्यांच्या खर्चावर घालवली, तर घर कसं चालेल?” राजवीर म्हणतात. मुलांच्या शिक्षणात दरवर्षी शाळेची फी, नवीन पुस्तकं आणि गणवेश यांवर खर्च होतो.

“या दोघांना शाळेत जायचं असतं!,” त्या आपल्या पक्क्या घराच्या अंगणात मंजीवर (बाज) बसून म्हणतात. जगदीप त्यांच्या गावाहून १३ किमी लांब, लाखेवाली येथील गव्हर्नमेंट गर्ल्स सिनियर सेकंडरी स्मार्ट स्कूलमध्ये शिकते.

Jasdeep drinking water to cool down. Working conditions in the hot summer months are hard and the labourers have to take breaks
PHOTO • Sanskriti Talwar
Rajveer drinking water to cool down. Working conditions in the hot summer months are hard and the labourers have to take breaks
PHOTO • Sanskriti Talwar

जसदीप (डावीकडे) आणि राजवीर (उजवीकडे) गार वाटायला पाणी पिताना. उन्हाळ्यात काम करणं कठीण असतं आणि मजुरांना अधूनमधून विश्रांती घ्यावी लागते

“आम्हाला तिच्या व्हॅनसाठी दरमहा १,२०० रुपये द्यावे लागतात. मग, तिच्या अभ्यासावर काही पैसे खर्च होतात,” जसदीप सांगते आणि कंटाळून म्हणते, “दरवेळी काही ना काही खर्च असतोच.”

जुलैमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या झाल्यावर मंगल आणि जगदीप यांना शाळेच्या परीक्षा द्यायच्या आहेत. घरच्यांनी त्यांना सुट्ट्यांच्या शेवटी काही दिवस सवलत दिली आहे, जेणेकरून ते आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील.

जसदीपला आपल्या धाकट्या भावंडांच्या क्षमतेवर विश्वास आहे. मात्र, गावातील इतर तरुणांची सारखीच परिस्थिती असेल, असं नाही. “त्यांना अभ्यास जमत नाही, आणि मग काळजी वाटते.” ती म्हणते. त्यासाठी ही तरुण मुलगी आपल्या परीने प्रयत्न करतेय – ती कॉलेजला जाणाऱ्या दलितांच्या एका ग्रुपचा भाग आहे. ते लोक मिळून आपल्या समाजातील मुलांच्या संध्याकाळी मोफत शिकवण्या घेतात. या शिकवण्या जून महिन्यात नियमित होत नाहीत, कारण बहुतांश लोक पहाटे ४:०० ते संध्याकाळी ५:०० पर्यंत शेतात कामाला असतात.

*****

भूमिहीन शेतमजुरांच्या कुटुंबांना हंगामात निवडक  कामच उपलब्ध असतात, पैकी भातलावणी हे एक काम आहे. प्रत्येक कुटुंबाला एकरभर जमिनीवर भातलावणीसाठी रु. ३,५०० मिळतात, आणि नर्सरी जर शेतपासून अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर असेल तर आणखी रु. ३०० मिळतात. जर एका कामासाठी दोन किंवा अधिक कुटुंबांना ठेवलं असेल, तर प्रत्येक जणाला रु. ४०० ते रु. ५०० रोजंदारी मिळते.

मात्र, हल्ली खुंडे हलालमधील अनेक कुटुंबांना खरिपात उपलब्ध कामाची उणीव भासत आहे. उदाहरणार्थ, जसदीप आणि तिच्या आईवडिलांनी या हंगामात २५ एकर जमिनीवर भातलावणी केली, जी मागील वर्षापेक्षा पाच एकर कमी होती. तिघांनी प्रत्येकी रु. १५,०००, तर धाकट्या भावंडांनी प्रत्येकी रु. १०,००० कमावले.

भूमिहीन शेतमजुरांच्या कुटुंबांना हंगामात निवडक  कामच उपलब्ध असतात, पैकी भातलावणी (उजवीकडे) हे एक काम आहे. भातलावणीसाठी ते अनवाणी पायांनी शेतात जातात, आणि आपल्या चपला कोपऱ्यात काढून ठेवतात.

Transplanting paddy is one of the few seasonal occupations available to labourers in this village. As they step barefoot into the field to transplant paddy, they leave their slippers at the boundary
PHOTO • Sanskriti Talwar
Transplanting paddy is one of the few seasonal occupations available to labourers in this village. As they step barefoot into the field to transplant paddy, they leave their slippers at the boundary
PHOTO • Sanskriti Talwar

भूमिहीन शेतमजुरांच्या कुटुंबांना हंगामात निवडक  कामच उपलब्ध असतात, पैकी भातलावणी (उजवीकडे) हे एक काम आहे. भातलावणीसाठी ते अनवाणी पायांनी शेतात जातात, आणि आपल्या चपला कोपऱ्यात काढून ठेवतात

Jasdeep’s father Jasvinder Singh loading paddy from the nurseries for transplanting.
PHOTO • Sanskriti Talwar
Each family of farm labourers is paid around Rs. 3,500 for transplanting paddy on an acre of land. They earn an additional Rs. 300 if the nursery is located at a distance of about two kilometres from the field
PHOTO • Sanskriti Talwar

डावीकडे: जसदीपचे वडील जसविंदर सिंह नर्सरीमधून भाताची रोपं लावणीसाठी नेताना. उजवीकडे: प्रत्येक शेतमजूर कुटुंबाला एकरभर जमिनीवर भातलावणीसाठी रु. ३, ५०० मिळतात, आणि नर्सरी जर शेतपासून अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर असेल तर आणखी रु. ३०० मिळतात.

दुसरा पर्याय म्हणजे हिवाळ्यात कापूस वेचणं. ते पूर्वीसारखं परवडत नाही, जसदीप म्हणते, “मागील दहा वर्षांत कीड लागून आणि जमिनीचं पाणी आटत गेल्यामुळे कापसाची लागवड कमी झालीय.”

कामाच्या संधींअभावी काही शेतमजूर इतर कामही करतात. जसदीपचे वडील वाडीकाम करायचे, पण त्यांच्या कमरेखाली दुखापत झाल्यामुळे त्यांना ते काम सोडावं लागलं. जुलै २०२३ मध्ये ४० वर्षीय जसविंदर यांनी एका खासगी बँकेतून कर्ज काढून एक महिंद्रा बोलेरो कार विकत घेतली – आणि आता ती चालवून गावात लोकांच्या सवाऱ्या करतात; जोडीला शेतमजुरी आहेच. गाडीसाठी घेतलेलं कर्ज त्यांना पाच वर्षांत फेडायचं आहे.

दोन वर्षांपूर्वी नीरूचं कुटुंब उन्हाळ्याच्या सुट्टीत किमान १५ एकर जमिनीवर भातलावणी करायचं. या वर्षी त्यांनी आपल्या गुरांसाठी चाऱ्याच्या बदल्यात केवळ दोन एकर जमिनीवर काम केलं.

२०२२ मध्ये नीरूची मोठी बहीण, २५ वर्षीय शिखाश, २६ किमी लांब असलेल्या दोडा येथे एका मेडिकल लॅबमध्ये असिस्टंट म्हणून कामाला लागली. तिचा दरमहा पगार रू. २४,००० असून त्यामुळे घरी थोडा दिलासा मिळाला. त्यांनी एक गाय व म्हैस विकत घेतली; मुलींनी जवळपास ये-जा करण्यासाठी एक सेकंडहँड गाडीही घेतली. नीरू तिच्या बहिणीसारखी लॅब असिस्टंट होण्यासाठी प्रशिक्षणसुद्धा घेतेय आणि गावातल्या एक समाजकल्याण संस्थेने तिची फी भरली.

त्यांची सर्वांत लहान बहीण, १४ वर्षीय कमल, आपल्या कुटुंबासोबत शेतमजुरी करू लागलीय. ती जगदीपच्याच शाळेत इयत्ता ११ वीत शिकत असून मजुरी आणि शाळा दोन्ही सांभाळत आहे.

Sukhvinder Kaur and her daughters Neeru and Kamal (left to right)
PHOTO • Sanskriti Talwar
After Neeru’s elder sister Shikhash began working as a medical lab assistant in 2022, the family bought a cow and a buffalo to support their household expenses by selling milk
PHOTO • Sanskriti Talwar

डावीकडे: सुखविंदर कौर आणि त्यांच्या मुली नीरू आणि कमल (डावीकडून उजवीकडे) यांनी या हंगामात एका शेतकऱ्याकडून घेतलेल्या गुरांच्या चाऱ्याच्या बदल्यात दोन एकर जमिनीवर भातलावणी केली. उजवीकडे: नीरूची मोठी बहीण शिखाश २०२२ मध्ये मेडिकल लॅब असिस्टंट म्हणून कामाला लागल्यापासून त्यांनी एक गाय व एक म्हैस विकत घेतली, व घरखर्चाला हातभार म्हणून त्यांचं दूध विकू लागले

*****

“आता गावातल्या शेतमजुरांना या हंगामात जेमतेम १५ दिवस काम मिळतं, कारण शेतकरी मोठ्या संख्येने डीएसआरचा वापर करतायत,” तरसेम सिंह म्हणतात. ते पंजाब खेत मजदूर युनियनचे सचिव आहेत. जसदीप हे मान्य करते, आणि म्हणते की पूर्वी त्यांना नुसत्या भातलावणीतून प्रत्येकी रु. २५,००० मिळायचे.

पण आता, “बरेच शेतकरी मशीन वापरून थेट पेरणी [डायरेक्ट सीडींग ऑफ राईस] करू पाहतात. या मशिनींमुळे आमची मजदूरी वाया गेली,” जसदीपची आई राजवीर म्हणाल्या.

नीरू म्हणते, “म्हणून बरेच गावकरी कामाच्या शोधात दूरवर जातात.” काही मजूर मानतात की राज्य शासनाने डीएसआर पद्धतीचा अवलंब करण्यासाठी रु. १,५०० प्रति एकर सवलतीची घोषणा केल्यापासून मशिनींचा वापर वाढला आहे.

५३ वर्षीय गुरपिंदर सिंह यांची खुंडे हलालमध्ये ४३ एकर शेतजमीन असून ते गेले दोन हंगाम डीएसआर पद्धत वापरत आहेत. “भातलावणीमध्ये मजूर वापरा नाहीतर मशीन वापरा, काही फरक नाही. डायरेक्ट सीडींगमुळे शेतकऱ्याचं केवळ पाणी वाचतं, पैसे नाही,” ते निदर्शनास आणतात.

Gurpinder Singh
PHOTO • Sanskriti Talwar
Gurpinder Singh owns 43 acres of land in Khunde Halal and has been using the DSR method for two years. But he still has to hire farm labourers for tasks such as weeding
PHOTO • Sanskriti Talwar

गुरपिंदर सिंह (डावीकडे) यांच्याकडे खुंडे हलालमध्ये ४३ एकर जमीन (उजवीकडे) असून ते गेली दोन वर्षं डीएसआर पद्धतीचा वापर करतायत. पण ते तण उपटणं यासारख्या कामांसाठी अजूनही शेतमजुरांना कामावर ठेवतात

Mangal, Jasdeep and Rajveer transplanting paddy in the fields of upper caste farmers
PHOTO • Sanskriti Talwar
Mangal, Jasdeep and Rajveer transplanting paddy in the fields of upper caste farmers
PHOTO • Sanskriti Talwar

डावीकडे: मंगल, जसदीप आणि राजवीर उच्चवर्णीय शेतकऱ्यांच्या जमिनीत भातलावणी करताना

आणि डीएसआर पद्धतीने सारख्याच कालावधीत ते दुप्पट बियाणं पेरू शकतात, असं ते म्हणतात.

पण या पद्धतीने लागवड केल्यास जमिनी रुक्ष होतात, त्यामुळे उंदरांना आत शिरून पिकाची नासधूस करायला सोपी जातं, हेही ते कबूल करतात. “डीएसआर पद्धत वापरली की जास्त तणनाशकं फवारली जातात कारण तणाचा प्रादुर्भाव वाढतो. मजुरांनी भातलावणी केली की तणाचा प्रादुर्भाव कमी होतो,” ते म्हणतात.

म्हणून त्यांच्यासारखे शेतकरी तण व्यवस्थापनासाठी पुन्हा मजूर कामावर ठेवतात.

“नवीन पद्धत वापरुन जर नफा होत नसेल, तर शेतकरी मजुरांनाच कामावर का ठेवत नाहीत?” तरसेम विचारतात. ते स्वतः मजहबी शीख आहेत. शेतकऱ्यांना कीटकनाशक कंपन्यांचे गल्ले भरणं चालतं, पण, “मजदूराँ दे ताँ कले हथ ही ने, ओ वी ए खाली कराँ चा लगे ने [मजुरांच्या हाती आधीच जेमतेम काम होतं, तेही हे नाहीसं करू पाहतायत],” ते म्हणतात.

Sanskriti Talwar

Sanskriti Talwar is an independent journalist based in New Delhi, and a PARI MMF Fellow for 2023.

Other stories by Sanskriti Talwar
Editor : Sarbajaya Bhattacharya

Sarbajaya Bhattacharya is a Senior Assistant Editor at PARI. She is an experienced Bangla translator. Based in Kolkata, she is interested in the history of the city and travel literature.

Other stories by Sarbajaya Bhattacharya
Translator : Kaushal Kaloo

Kaushal Kaloo is a graduate of chemical engineering from the Institute of Chemical Technology in Mumbai.

Other stories by Kaushal Kaloo