अनोपाराम सुतार यांनी आजवर एकही वाद्य वाजवलेलं नाही. पण कुठल्या लाकडापासून सुरेल वाद्य बनेल हे मात्र त्यांना अगदी पक्कं माहीत आहे. “मला लाकडाचा कुठलाही तुकडा द्या. त्याचं वाद्य चांगलं वाजणार का नाही ते लगेच सांगतो मी,” खरताल बवनणारे अनोपाराम सांगतात.

राजस्थानात लोकसंगीतात आणि भजनांसोबत वाजणारं खरताल हे एक तालवाद्य आहे. याचे चार भाग असतात. एका हातात दोन आणि दुसऱ्या हातात दोन. एक भाग अंगठ्याने पकडला जातो आणि दुसरा इतर चार बोटांनी. दोन्ही भाग एकमेकांवर आपटले की टाळी वाजवल्यासारखा आवाज येतो. या वाद्याचे दोनच बोल आहेत – ता आणि का. “कलाकार बनवाते है,” अनोपाराम सांगतात. खरताल बनवणाऱ्यांची त्यांची ही आठवी पिढी आहे.

राजस्थानी खरतालांमध्ये खंजिरीसारख्या घुंगरं नसतात. मंजीरा किंवा करतालांना मात्र घुंगरं जोडलेली असतात.

अनोपाराम त्यांच्या कामात अगदी तरबेज आहेत. ते दोन तासात एक खरताल बनवू शकतात. “पूर्वी मला एक अख्खा दिवस लागायचा,” ते सांगतात. अनोपाराम यांचं सुतार घराणं किमान २०० वर्षांपासून खरताल बनवण्याचं काम करतायत. “बचपन से यही काम है हमारा.”

ते सांगतात की त्यांचे वडील उसलाराम फार शांतपणे आणि न चिडता ही कला शिकवायचे. “मी किती तरी चुका केल्या असतील, लेकिन वो कभी चिल्लाते नही थे. प्यार से समझाचे थे.” सुतार समाजात खरताल तयार करण्याचं काम केवळ पुरुष मंडळी करतात.

Left: Anoparam Sutar says selecting the right wood is crucial in handmaking a khartal .
PHOTO • Sanket Jain
Right: Traditional equipments at Anoparam’s workshop. From left to right - pechkas (two) , naiya (four), a chorsi , binda (two), two more pechka s, a file and a marfa
PHOTO • Sanket Jain

डावीकडेः खरताल बनवण्याची सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे योग्य लाकडाची निवड. उजवीकडेः अनोपाराम यांच्या कार्यशाळेतली विविध हत्यारं आणि उपकरणं. डावीकडून उजवीकडेः पेचकस, नइया, चोरसी, बिंडा, आणखी दोन पेचकस, लाकूड तासण्याची कानस आणि मर्फा

Anoparam also handmakes kamaicha and sarangi (left), popular musical instruments of Jaisalmer. He also makes doors on which he carves flowers (right). Anoparam takes almost a week to make one such door
PHOTO • Sanket Jain
Anoparam also handmakes kamaicha and sarangi (left), popular musical instruments of Jaisalmer. He also makes doors on which he carves flowers (right). Anoparam takes almost a week to make one such door
PHOTO • Sanket Jain

अनोपाराम कमइचा आणि सारंगी ही वाद्यं देखील बनवतात. जैसलमेर प्रांतात ही दोन्ही वाद्यं अतिशय लोकप्रिय आहेत. ते घरांचे सुबक दरवाजे आणि त्यावरचं नक्षीकामही करतात (उजवीकडे). एक दरवाजा तयार करायचा तर एक अख्खा आठवडा लागतो

बारमेरच्या हरसोनी जिल्ह्यातून १९८१ साली कामाच्या शोधात अनोपाराम जैसलमेर इथे स्थलांतर करून आले. “गावात सुतारकाम नसायचंच फारसं,” ते सांगतात. अनोपाराम आता संवादिनी, कमाइचा, सारंगी आणि वीणा अशी इतर वाद्यं देखील बनवतात. “पण या वाद्यांना फारशी मागणीच नसते,” ते सांगतात. कमाइचा किंवा सारंगी तयार करायला एक आठवडाभर वेळ लागतो आणि या वाद्यांची किंमत अनुक्रमे ८,००० आणि ४,००० रुपये इतकी असते.

वाद्यांसोबतच ते अगदी बारीक नक्षीकाम असलेले लाकडी दरवाजे देखील तयार करतात. जैसलमेरच्या वास्तुकलेचं प्रतीक असलेली फुलांची नाजूक नक्षी ही त्यांची खासियत. लाकडी खुर्च्या, कपाटं आणि इतर वस्तू बनवण्यातही त्यांचा हातखंडा आहे.

जैसलमेरमध्ये शिसम किंवा सफेदा या लाकडांपासून खरताल बनवले जातात. लाकडाची निवड या वाद्यनिर्मितीतली अगदी सुरुवातीची आणि महत्त्वाची पायरी आहे. “देख के लेना पडता,” ते सांगतात. “नव्या पिढीला खरताल तयार करण्यासाठी योग्य लाकूड कोणतं हेही ओळखता येत नाही.”

अनोपाराम जैसलमेरमधून लाकूड विकत घेतात पण चांगलं लाकूड मिळणं दिवसेंदिवस अवघड होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

चार खरताल तयार करायचे असतील २.५ फुटी ओंडक्याने सुरुवात होते. त्याची किंमत असते १५० रुपये. त्यातून सव्वासात इंच लांब, सव्वादोन इंच रुंद आणि ६ मिमी जाडी अशा खुणा करून घेऊन करवतीने तुकडे कापून घेतात.

“बुरादा उडता है और नाक, आँख में चला जाता है,” ते सांगतात. या भुश्शामुळे त्यांना सारखा खोकला येत राहतो. तोंडाला मास्क किंवा काही बांधणं शक्य नाही. दिवसातले आठ तास तोंडाला काही बांधलं तर श्वास कोंडतो. “जैसलमेरच्या गरमीत तर फारच वाईट हालत होते,” ते सांगतात. उन्हाळ्यात इथला पारा ४५ अंशावर जातो.

Anoparam marks out the dimensions (left) of the khartal: 7.25 inches long and 2.25 inches wide. Then, using a saw, he cuts the wood (right) into four parts
PHOTO • Sanket Jain
Anoparam marks out the dimensions (left) of the khartal: 7.25 inches long and 2.25 inches wide. Then, using a saw, he cuts the wood (right) into four parts
PHOTO • Sanket Jain

खरतालच्या मापाच्या खुणा (डावीकडे) – सव्वासात लांब, सव्वादोन इंच रुंद. त्यानंतर करवतीच्या मदतीने लाकडातून चार भाग कापून काढतात

Using a randa , he smoothens (left) the surface of the wood, then rounds the corners of the khartals (right) using a coping saw
PHOTO • Sanket Jain
Using a randa , he smoothens (left) the surface of the wood, then rounds the corners of the khartals (right) using a coping saw
PHOTO • Sanket Jain

रंधा वापरून (डावीकडे) लाकूड तासून गुळगुळीत करून घेतात, आणि कानस वापरून कडा गोल करून घेतात

लाकडाचे तुकडे करून घेतले की रंधा मारून ते लाकूड गुळगुळीत करून घेतात. “हे काम फार काळजीपूर्वक करावं लागतं. जरा जरी चूक झाली तर पुन्हा नवा तुकडा घेऊन काम सुरू करावं लागतं,” ते सांगतात. खरताल वाजवताना एकमेकांवर सतत आपटले जातात. लाकूड नीट तासलं किंवा घासलं नसेल तर त्यातून येणारा नाद बदलतो.

अनेकदा कानस किंवा करवत लागून त्यांना बोटांना इजा होते. हातोड्याचा करताना वेदना होतात. पण हा आपल्या कामाचा भाग असल्याचं ते सांगतात. आपले वडील उसलाराम यांनाही सतत काही ना काही इजा, दुखापती होत असल्याचं ते सांगतात.

लाकूड चांगलं गुळगुळीत करून घेण्यासाठी तासभर लागतो. त्यानंतर कानस घेऊन ते लाकडाचे चारही कोपरे गोल करून घेतात. सगळे कोपरे नीट तपासून घेतल्यानंतर सँड पेपरच्या मदतीने अगदी आरशासारखी चमक येईपर्यंत ते लाकूड घासून घेतात.

खरताल विकत घेतल्यानंतर संगीतकार त्याचा स्वर सुधारण्यासाठी सँड पेपरचाच वापर करतात. मोहरीच्या तेलाची मालिश केल्यामुळे त्याला सोनेरी तपकिरी रंग येतो.

सफेदा लाकडाच्या चार खरतालांचा संच ३५० रुपयांना आणि शिसम असेल तर ४५० रुपयांना विकला जातो. “शिसम लाकडाच्या खरतालचा आवाज जास्त मधुर आणि सुरेल असतो,” ते सांगतात.

Left: Although the demand for khartal s has increased, the number of craftspersons handmaking them has been declining in Jaisalmer, says Anoparam.
PHOTO • Sanket Jain
Right: Khartals made from sheesham wood produce better notes
PHOTO • Sanket Jain

डावीकडेः खरतालची मागणी वाढली असली तरी जैसलमेरमध्ये हे वाद्य तयार करणाऱ्या कारागिरांची संख्या मात्र घटली असल्याचं अनोपाराम सांगतात. उजवीकडेः शिसम लाकडाच्या खरतालचा आवाज जास्त मधुर आणि सुरेल असतो

Left: To make the doors, Anoparam uses electrical tools and machines.
PHOTO • Sanket Jain
Right: Anoparam cutting a wooden block which will be used to decorate the door
PHOTO • Sanket Jain

डावीकडेः दरवाजे तयार करताना अनोपाराम विजेवरची हत्यारं आणि यंत्रं वापरतात. उजवीकडेः दरवाजाचं नक्षीकाम करण्यासाठी वापरला जाणारा लाकडाचा तुकडा कापताना

अनोपाराम यांना दर महिन्याला ५-१० जोडी खरतालांची ऑर्डर येते. त्यांनी सुरुवात केली तेव्हा मोजक्या दोन-तीन खरतालांचं काम असायचं. राजस्थानात बरेच परदेशी पर्यटक येतात आणि त्यांना हे वाद्य आवडलं असल्यामुळे त्याची मागणी वाढलीये. मात्र ते बनवणाऱ्यांची संख्या मात्र घटली आहे. वीसेक वर्षांपूर्वी किमान १५ सुतार हे वाद्य बनवत होते. पण आता मात्र जैसलमेरमध्ये या वाद्याच्या मोजक्या कारागिरांमध्ये अनोपाराम यांचं नाव आघाडीवर आहे. तरुण पिढी लाकडी फर्निचरच्या कामासाठी मोठ्या शहरात चाललीये. त्या कामात रोजगारही जास्त मिळतो.

परदेशी पर्यटकांना खरताल विकणारे काही कारागीर त्यांच्यासाठी ऑनलाइन सत्रंही घेतात. विविध भाषांच्या गुंत्यातूनही ते संवाद साधतात.

“ही कला फार जुनी आहे पण नव्या पिढीला मात्र ती शिकण्यात फारसा रस नाही,” ते म्हणतात. गेल्या ३० वर्षांमध्ये अनोपाराम यांनी किमान सात जणांना हे वाद्य तयार करायला शिकवलं आहे. “ते जिथे कुठे असतील, खरताल बनवत असावेत म्हणजे झालं,” ते म्हणतात.

त्यांची मुलं, प्रकाश, वय २८ आणि कैलाश, वय २४ खरताल बनवायला शिकलेच नाहीत. ते वेगवेगळ्या राज्यांत घरासाठी आणि ऑफिससाठी लागणारं फर्निचर बनवण्याचं काम करतात. पंचविशीची मुलगी संतोष हिचं लग्न झालंय. मुलं ही कला शिकतील का असं विचारल्यावर त्यांचं उत्तर असतं, “कोई भरोसा नही है.”

आमचं हे बोलणं ऐकत असलेला एक गिऱ्हाईक त्यांना विचारतो, “आप बडे शहर क्यूं नही गये ज्यादा पैसे कमाने?” अनोपाराम उत्तरतात, “हम इस में खुश है.”

ग्रामीण कारागिरांवरील या लेखमालेला मृणालिनी मुखर्जी फौंडेशनचे अर्थसहाय्य मिळाले आहे.

Sanket Jain

Sanket Jain is a journalist based in Kolhapur, Maharashtra. He is a 2022 PARI Senior Fellow and a 2019 PARI Fellow.

Other stories by Sanket Jain
Editor : Sanviti Iyer

Sanviti Iyer is Assistant Editor at the People's Archive of Rural India. She also works with students to help them document and report issues on rural India.

Other stories by Sanviti Iyer
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Marathi Translations Editor at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale