“आम्हाला घोर लागला होता की आमचे वडील गेल्यावरही त्यांना मानाने निरोप दिला जाणार नाही.”

पंचनाथन सुब्रमण्यम वारले त्याला दोन महिने उलटून गेल्यानंतरही त्यांचा मुलगा एस. रमेश अजूनही शोक करतोयः “आम्ही त्यांना कोविड-१९ ची लक्षणं दिसू लागल्यावर तंजावुरच्या सरकारी रुग्णालयात दाखल केलं, तेव्हा आमच्या मनातही आलं नव्हतं की इथून आम्ही त्यांचा निष्प्राण देह परत घेऊन जाऊ.”

भारतीय सैन्यदलाच्या कारकुनी नोकरीतून ६८ वर्षीय सुब्रमण्यम निवृत्त झाले त्यालाही बरीच वर्षं लोटली. त्यांना तब्येतीच्या मोठ्या काहीच तक्रारी नव्हत्या म्हणूनही कुणाच्या मनाला शंका शिवली नव्हती. सैन्याशी असलेली नाळ त्यांच्यासाठी गर्वाचा मुद्दा होती आणि “ते त्यांच्या तब्येतीची व्यवस्थित काळजी घ्यायचे. रोजचं चालणं आणि काटेकोर खाणं त्यांनी कधीच सोडलं नाही,” रमेश सांगतात. ४० वर्षीय रमेश मूळचे तमिळ नाडूच्या कुंबकोणमचे आहेत. “त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तेव्हाही आम्हाला वाटत होतं की ते बरेच होणार आहेत.”

पण मग १४ ऑगस्टला जेव्हा सुब्रमण्यम यांचा मृत्यू झाला तेव्हा या कुटंबावर आभाळ फाटलं. आणि केवळ ते गेले इतकंच त्यामागचं कारण नव्हतं. राज्यभरात कोविड-१९ मुळे मृत्यू म्हणजे कलंक बनला असल्याचं त्यांनी पाहिलं होतं. त्यामुळे पुढे काय करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. “मित्र, नातेवाइकांची काहीही मदत झाली नाही,” रमेश सांगतात. “अर्थात तेही समजून घेण्यासारखंच आहे कारण करोनामुळे मृत्यू हा मोठा चिंतेचा विषय आहे.”

आणि तेव्हाच अगदी अनपेक्षितपणे त्यांना काय करायचं याची प्रत्यक्षात सगळी मदत मिळाली. तमिळ नाडू  मुस्लिम मुन्नेत्र कळघम (तमुमुक) – या तमिळ नाडूतल्या एका सामाजिक संस्थेकडून. सुब्रमण्यम यांच्या मृत्यूनंतर थोड्याच वेळात, तमुमुकचे सहा सेवाभावी कार्यकर्ते या कुटुंबांना मदत करण्यासाठी तिकडे हजर झाले – अगदी पार्थिव ताब्यात घेण्यापासून ते त्यांच्या गावी, कंबकोणला जाऊन मानाने त्यांचा दफनविधी करेपर्यंत सगळं त्यांनी केलं (काही हिंदू जातींमध्ये पार्थिवाचं दहन न करता दफन करतात).

या कुटुंबाचं नशीब फारच चांगलं होतं. तमुमुकसाठी मात्र सुब्रमण्यम यांचे अंत्यविधी मार्च महिन्यापासून  तमिळ नाडू आणि पुडुच्चेरीमध्ये त्यांनी केलेल्या १,१०० विधींपैकी एक होते. मरण पावलेल्या व्यक्तीची जात किंवा जमात कुठलीही असो – धर्माला आणि कुटुंबियांच्या इच्छेला अनुसरून हे अंत्यविधी केले आहेत. कोविड-१९ मुळे मृत्यू झाला असल्यास स्थानिक प्रशासनाच्या नियमावलीप्रमाणे त्यांनी आठ फूट खोल खड्डा खणून दफन केलं आहे.

Top left: Two volunteers place a body in their vehicle. Top right: TMMK volunteers stand beside their ambulance vans, readying for the day’s activity. And volunteers in full PPE stand in respect after unloading a body at a burial ground
PHOTO • Courtesy: TMMK

वरती डावीकडेः दोन कार्यकर्ते एक मृतदेह त्यांच्या गाडीमध्ये ठेवतायत. वर उजवीकडेः तमुमुक कार्यकर्ते त्यांच्या रुग्णवाहिकांशेजारी उभे आहेत, दिवसभराच्या कामासाठी सज्ज. शववाहिकेतून मृतदेह स्मशानभूमीमध्ये खाली उतरवल्यानंतर पूर्ण पीपीई किट घातलेले कार्यकर्ते मृत व्यक्तीप्रती आदर व्यक्त करतायत

विषाणूची बाधा होण्याची भीती आणि टाळेबंदीमुळे लोक वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडल्यामुळे, स्मशानभूमी आणि दहन घाटांवर कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. शववाहिका सहज मिळत नाहीयेत, आणि आधीच शोकाकुल असणाऱ्या कुटुंबांना मोठा भुर्दंड पडतोय. पूर्वग्रह आणि त्रास आहेतच. या सगळ्याचं वेदनादायक उदाहरण म्हणजे ५५ वर्षीय न्यूरोसर्जन डॉ. सॅम्युएल हर्क्युलिस यांचा ९ एप्रिल रोजी झालेला मृत्यू. कोविड-१९ मुळे मृत्यूमुखी पडलेले ते तमिळ नाडूतले कदाचित पहिलेच डॉक्टर होते.

चेन्नईच्या किलपॉक भागातल्या दफनभूमीवरून तिथे जमलेल्या शंभर एक लोकांच्या जमावाने त्यांच्या कुटुंबाला माघारी लावलं. त्यानंतर त्यांचा देह सहा किलोमीटरवरच्या अण्णा नगरमधल्या वेलंगडु दफनभूमीत नेण्यात आला. तिथे जमावाने रुग्णवाहिकेवर, तिचा चालक आणि सफाई कर्मचाऱ्यावर काठ्यांनी-दगडधोंड्यांनी हल्ला केला. अखेर, डॉ. सायमन यांच्या मित्रांनी – डॉ. कुमार आणि इतर दोघांनी दुसऱ्या दिवशी पहाटे गुपचुप त्यांचा देह दफन केला – कुटुंबातली एकही व्यक्ती तिथे नसताना – आणि जीवावर धोका पत्करून.

अशा विखारी वातावरणात, तमुमुकने पुढे केलेला मदतीचा हात या १,१०० कुटुंबांसाठी फारच मोलाचा आहे.

“चेन्नईतल्या एका नातेवाइकाने मला तमुमुकचा संपर्क दिला होता. त्यांना फोन केला तेव्हा आम्हाला काहीही सुधरत नव्हतं आणि आम्ही हताश झालो होतो,” रमेश सांगतात.

“खरं तर आम्हाला फक्त एक रुग्णवाहिका हवी होती, पण त्यांनी सगळ्याच गोष्टी पार पाडल्या. मृत्यूनंतर आमच्या वडलांची अप्रतिष्ठा आम्हाला नको होती. ते फार मानी होते. तमुमुकचे आभार की त्यांनी तो मान ढळू दिला नाही.”

लक्षणीय बाब ही की त्यांनी पार पाडलेल्या या १,१०० अंत्यविधेपैकी एकही – कोविड-१९ नसताना झालेल्या १०० विधींसह – एकालाही कसलंच गालबोट लागलेलं नाही.

“तमुमुकच्या सेवाभावी कार्यकर्त्यांशी गेल्या सहा वर्षांपासून मी जोडला गेलेलो आहे. त्यामुळे खरं तर यात आश्चर्य वाटण्यासारखं फार काही नाही,” डॉ. एन. अरविंद बाबू म्हणतात. ते कर्करोग तज्ज्ञ आहेत आणि चेन्नईच्या श्री बालाजी दंत महविद्यालय आणि रुग्णालयात प्राध्यापक आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक कर्करोग शस्त्रक्रियांसाठी पैसे जमा केलेत, रक्त दिलंय, ते सांगतात. शहराच्या अदम्बक्कम भागात राहणाऱ्या डॉ. बाबूंना त्यांच्या कामाची ही बाजू समजली ती एप्रिल महिन्यात, जेव्हा “एक निराधार म्हातारी बाई मरण पावली, बहुतेक करून उपासमारीमुळे.”

“मी अस्वस्थ होतो पण मी विचार केला की किमान तिचं दफन तरी मानाने केलं पाहिजं,” डॉ. बाबू सांगतात. तमुमुकचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी तिचं शव विच्छेदन करून घेतलं, अंत्यविधीची सोय केली आणि अगदी मृत्यूचा दाखला मिळेपर्यंत सगळ्या गोष्टी पार पाडल्या. हे आणखी एका कारणासाठी महत्त्वाचं होतं “कारणहा मृत्यू बिगर कोविड कारणांमुळे झाला असल्याचं त्यांनी सिद्ध केलं आणि तसं प्रमाणपत्र स्थानिक पोलिस ठाण्यातून मिळवलं. ही फार भली गोष्ट होती.”

PHOTO • Courtesy: TMMK

दिवसाच्या कुठल्याही वेळी अंत्यविधी करावे लागले तरी ते करतात, हा प्रसंग रात्री उशीराचा आहे

याच वेळी डॉ. बाबूंना समजलं की ही संघटना गेली आठ वर्षं बेवारस, कुणीही न नेलेल्या मृतदेहांवर मानाने अंत्यसंस्कार करतीये. “हे विलक्षण होतं... एखादं माणूस मरण पावल्यानंतरही त्याची प्रतिष्ठा राखली जावी याचा ते विचार करतात. त्या व्यक्तीची पार्श्वभूमी काहीही असली तरी.”

“आम्ही सुरुवातीला कोविड-१९ च्या काही रुग्णांचं दफन केलं होतं,” माजी आमदार आणि तमुमुकचे राज्य अध्यक्ष एम. एच. जवाहिरुल्ला सांगतात. “पण आमच्या कामाला ठराविक अशी काही दिशी नव्हती आणि मग डॉ. सायमन गेले, त्यांच्या कुटुंबावर हल्ला झाला. कोविडमुळे मृत्यू झाल्यास लोकांच्या मनात भीती आणि तिरस्कार होता. आणि त्याबद्दल काही तरी करणं भाग होतं.”

त्यांनी ठरवलं की “गेलेला माणूस ज्या धर्माचा असेल त्या रितींप्रमाणे” अंत्यविधी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. “त्यांना मानाने निरोप दिला जावा ही त्यामागची संकल्पना होती. त्यांच्या श्रद्धा जपल्या नाहीत तर हे कसं काय होऊ शकलं असतं?” जवाहिरुल्ला विचारतात.

तमुमुकचे कार्यकर्ते अगदी साध्या घरांमधले, आणि सगळे २२-४० वयोगटातले आहेत. त्यांना प्रसिद्धीचा सोस नाही, किंबहुना ती त्यांना नकोच असते – कोविड-१९ रुग्ण आणि या आजाराला बळी पडलेल्यांकडे समाज कशा नजरेनं पाहतो हे लक्षात घेता हेही साहजिकच आहे. राज्यभरात असे जवळपास १,००० कार्यकर्ते आहेत. आणि यातले बहुतेक जण पथारीवाले किंवा छोटे दुकानदार आहेत, चेन्नईचे खलील रहमान सांगतात ज्यांचं स्वतःचं छोटं दुकान आहे.

“आमच्यापैकी बहुतेकांची हातावर पोटं आहेत,” रहमान सांगतात. “अगदी मोजके लोक सुस्थितीतील असतील.”

त्यांच्या कामाचं कौतुक सगळीकडूनच होतंय. “अंत्यविधीचा तो व्हिडिओ तुम्ही पाहिला का? केंद्रीय मंत्र्याचा होता बहुतेक.” इरोडे जिल्ह्याच्या गोबीचेट्टीपालयमचे जी. व्ही. आद्यमान विचारतात. “राजकारणातले ते [द्रमुकचे] विरोधक असले तरी त्यांचा मृतदेह ज्या पद्धतीने खड्ड्यात फेकला गेला आणि मग तो सरळ करण्यासाठी एकाने ज्या रितीने उडी मारली, मलाच ते पाहून दुःख झालं.” आद्यमान यांचे ८६ वर्षीय वडील, जी. पी. वेंकिटु, द्रमुकचे माजी आमदार, १९६० च्या दशकातल्या हिंदीविरोधी चळवळीत ज्यांनी भाग घेतला होता, तेही २३ सप्टेंबर रोजी कोविड-१९ ला बळी पडले.

व्हिडिओ पहाः १,१०० मृतदेह आणि पूर्वग्रहांना तिलांजली

‘गेली आठ वर्षं मी या मेडिकल टीमचा सदस्य आहे. कोविडमुळे आमच्यावरचा ताण वाढलाय. पण लोक जेव्हा कृतज्ञता व्यक्त करतात, त्यापुढे काहीच उरत नाही’

त्यांच्या कुटुंबासमोर मोठा पेच उभा राहिला कारण जिल्ह्याबाहेर मृतदेह नेण्यासाठी त्या दिवशी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचं शासकीय सुविधेतून सांगण्यात आलं होतं. “माझे वडील कोइम्बतूरच्या रुग्णालयात होते आणि आम्हाला त्यांना गोबीचेट्टीपालयमला परत न्यायचं होतं,” आद्यमान सांगतात. “तेव्हाच तमुमुकचे लोक मदतीला धावून आले, आणि घरच्यासारखं त्यांनी सगळ्या गोष्टी पार पाडल्या.”

कुठलाही अंत्यविधी म्हणजे लांबलचक प्रक्रिया असते. पण, हॉस्पिटलमध्ये कागदपत्रांची जुळणी करण्यापासून ते अंत्यविधी करण्यासाठी नातेवाइकांशी समन्वय साधण्यापर्यंत, सगळ्या गोष्टी हे कार्यकर्ते अगदी ३-४ तासात पूर्ण करतात. “आमच्या स्वतःच्या रचनेनुसार आम्ही तमिळ नाडूत ५६ जिल्हे [अधिकृतरित्या इथे ३८ जिल्हे आहेत] आहेत असं धरून चालतो. प्रत्येक जिल्ह्यात ६-८ कार्यकर्त्यांचे २-३ गट आहेत,” खलील रहमान सांगतात.

“ही मानवतेची मोठीच सेवा आहे. आणि ती करत असताना हे कार्यकर्ते दर वेळी सगळ्या नियमावलींचं अगदी काटेकोर पालन करतात,” तिरुपत्तूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, पी. विजयकुमार सांगतात. “उदाहरणार्थ, कोविडने मृत्यी झाला असेल तर ते आठ फूट खोल खड्डा घेतात – आणि अंत्यविधीच्या वेळी पीपीई किट घालतात. आमच्या जिल्ह्यात १०० हून अधिक मृत्यू झाले आहेत, आणि यातल्या ४० टक्क्यांचे शेवटचे विधी तमुमुकने केले आहेत.” एकूण १,१०० अंत्यविधींमध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आणि इतर धर्मीयांचा नक्की आकडा माहित नसला तरी सर्व धर्म-पंथाच्या लोकांचा यात नक्कीच समावेश होता.

ज्या भागामध्ये ते सक्रीय आहेत, तिथे या विषाणूबद्दल जागरुकता निर्माण करण्यामध्ये त्यांच्या सेवाभावी कार्याला यश आलं आहे – आणि त्यामुळे लोकांमधली घबराटही कमी व्हायला मदत झाली आहे.

“मृतदेहामधूनही विषाणू पसरू शकतो या कल्पनेमुळे ही घबराट निर्माण होते. पण प्रत्यक्षात तसा तो पसरत नाही,” कोलकाता स्थित मॉलेक्युलर बायॉलॉजिस्ट आणि शिक्षक डॉ. अनिर्बान मित्रा सांगतात. “मृतदेहामध्ये नवे विषाणू तयार होत नाहीत हे जैव-रासायनिक सत्य आहे. खास करून मृत्यूनंतर ४-५ तासांनी जेव्हा मृतदेह ताब्यात येतो, तेव्हा तर नाहीच. अशी शरीरं श्वास घेत नसतात त्यामुळे मृत व्यक्तीच्या नाका-तोंडातील तुषारांमधून प्रसार होण्याची शक्यताच नाहीये. एखाद्या मृतदेहात लाळ, कफ किंवा रक्तस्राव होतो तेव्हा मात्र तो विषाणूच्या प्रसाराचा स्रोत ठरू शकतो. त्यामुळे वेळ न दवडता मृतदेहावर अंत्यविधी करणं फार महत्त्वाचं ठरतं.”

The volunteers lower a body into a pit eight feet deep, cover up the pit and pour a disinfectant powder across the grave
PHOTO • Courtesy: TMMK
The volunteers lower a body into a pit eight feet deep, cover up the pit and pour a disinfectant powder across the grave
PHOTO • Courtesy: TMMK
The volunteers lower a body into a pit eight feet deep, cover up the pit and pour a disinfectant powder across the grave
PHOTO • Courtesy: TMMK

कार्यकर्ते मृतदेह खाली आठ फूट खोल खड्ड्यात सोडतायत, त्यानंतर खड्डा बुजवून दफनाच्या जागेवर निर्जंतुक पावडर टाकतायत

“जर घरी मृत्यू झाला असेल, तर घरातही विषाणूचा वास असू शकतो त्यामुळे त्या घराचं निर्जंतुकीकरण कटाक्षाने व्हायला पाहिजे,” डॉ. मित्रा इशारा देतात. “आणि अंत्यविधी अशाच अधिकाऱ्यांनी केले पाहिजेत ज्यांच्याकडे ते करण्याची कौशल्यं आणि ते हाताळण्यासाठी आवश्यक क्षमता आहेत.”

प्रचंड तणावाखाली असणारे अधिकारी आणि प्रशासनाच्या मदतीला तमुमुक धावून आल्याचंच चित्र सगळीकडे दिसतंय.

या अंत्यविधींना किती खर्च येतो? “१,००० रुपयांपासून ११,००० पर्यंत. काय विधी करायचे, खड्डा खणायला जेसीबी लागला तर त्याचं भाडं अशा सगळ्यावर आकडा ठरतो,” रहमान सांगतात. “कोविडमुळे मृत्यू झाला असेल तर ज्या कुटुंबांना खर्च परवडतो त्यांच्यासाठी आम्ही श्रमदान करून मदत करतो. आणि एखाद्या कुटुंबाला काहीच परवडण्यासारखं नसेल तर आम्ही पैसे गोळा करतो आणि सगळं पार पाडतो.” पीपीई किटचा खर्च स्थानिक प्रशासन किंवा दानशूर व्यक्ती उचलतात.

या संघटनेला माहितीये की कोविडमुळे मृत्यू झाले असल्यास जास्त काळजी घेणं आवश्यक आहे. “सगळे सदस्य पीपीई किट वापरतात आणि आळीपाळीने अंत्यविधी पार पाडतात – कोणतीच टीम सलग एकाहून जास्त विधी करत नाही. दफन पार पाडल्यानंतर हे कार्यकर्ते काही दिवस इतरांपासून विलग राहतात आणि मगच आपापल्या घरी परतातत.” त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांना औषधं दिली जातात आणि तपासण्याही सक्तीच्या आहेत. “अर्थात ज्यांना कोविड-१९ ची लागण झालीये, त्यांना काम दिलं जात नाही,” जवाहिरुल्ला सांगतात.

अडचणीत असलेल्या कुटुंबांची माहिती या गटांना मिळते ती स्थानिक आरोग्य निरीक्षक किंवा रुग्णालयांमधून. रानीपेट जिल्ह्याच्या अरक्कोणम तालुक्यातल्या बनावरम पंचायतीचे माजी अध्यक्ष, एन. मणी त्यांचं स्वतःचंच उदाहरण सांगतातः “आमच्या गावात, पुष्पा नावाची एक ख्रिश्चन बाई मरण पावली होती आणि तिच्या कुटुंबाला पुढच्या सगळ्या गोष्टी करणं अशक्य होतं. तेव्हा मला आरोग्य निरीक्षकानी तमुमुकची माहिती दिली. तासाभरातच त्यांचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी सगळ्या गोष्टी हातात घेतल्या. ते धाडसी आहेत आणि सावधही.”

शिवाय, रहमान सांगतात, “तमिळ नाडूच्या प्रत्येक पोलिस ठाण्यात आमचे नंबर असतात, त्यामुळे बेवारस मृतदेह असतील तर ते आम्हाला फोन करतात आणि बाकी गोष्टी आम्ही पाहून घेतो.”

तमुमुकप्रमाणेच सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया आणि पॉप्यलुर फ्रंट ऑफ इंडिया (दोन्हीही मुस्लिम गट आहेत) देखील कोविडमुळे मरण पावलेल्यांचे अंत्यविधी पार पाडत होते. राज्यभरात पीएफआयने ३२१ दफनविधी केले आहेत तर एसडीपीआयनी ६००.

The TMMK volunteers attend to Hindu, Muslim, and Christian funerals alike, conducting each according to the religious traditions of the family
PHOTO • Courtesy: TMMK
The TMMK volunteers attend to Hindu, Muslim, and Christian funerals alike, conducting each according to the religious traditions of the family
PHOTO • Courtesy: TMMK

तमुमुकचे सेवाभावी कार्यकर्ते हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन व्यक्तींचे अंत्यविधी त्या त्या कुटुंबांच्या रितीरिवांजाप्रमाणे कोणताही भेद न ठेवता पार पाडतात

या सगळ्या कामात जोखीमही जास्त आहे आणि खर्चही. ४१ वर्षांचे अब्दुल रहीम शेजारच्या पुडुचेरी केंद्रशासित प्रदेशातल्या कराइक्कल जिल्ह्यात कोविडमुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यविधी करणाऱ्या २५ ते २७ गटांमध्ये होते. आणि यामुळे त्यांना त्यांच्या सहा वर्षांच्या मुलाची भेटच घेता आली नाहीये. “गेली आठ वर्षं मी या मेडिकल टीमचा सदस्य आहे. कोविडमुळे आमच्यावरचा ताण वाढलाय. पण जेव्हा लोक कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात, त्यापुढे काहीच नाही. प्रत्येक अंत्यविधीनंतर किमान आठवडाभर मला माझ्या घरच्यांना भेटता येत नाही. त्यामुळे ते नाराज असतात पण मी त्यांचं आरोग्य धोक्यात टाकू शकत नाही ना.”

तमुमुकचे कार्यकर्ते हे काम का करतात?

जवाहिरुल्ला याला फर्दकिफाया (अरबीमध्ये याचा अर्थ प्रत्येकाने पार पाडायचं असतं असं कर्तव्य) म्हणतात. “इस्लाममध्ये अंत्यविधी करणं हे समाजाचं कर्तव्य मानलं जातं. एक व्यक्ती, किंवा काही लोकांचा गट जर हे करत असेल तर संपूर्ण समाजाने त्याचं कर्तव्य पार पाडलंय असं मानलं जातं. आणि जर हे करायला कुणीच पुढे आलं नाही तर प्रत्येक जण पापी ठरतो. त्यामुळे, जात-पंथ कुठलाही असो, हे अंत्यविधी पार पाडणं आम्ही आमचं कर्तव्य मानतो.”

ते सांगतात की १९९५ साली तमुमुकची स्थापना झाली, तेव्हापासून त्यांचे कार्यकर्ते अशा मानवतावादी, परोपकारी कार्यांमध्ये सहभागी होत आहेत. “ते नियमितपणे रक्तदान करतात आणि गरजू लोकांसाठी मोफत रुग्णवाहिका पुरवतात. त्सुनामी आणि चेन्नईतील पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळातही ते सक्रीय असतात.”

जवाहिरुल्ला मणितानेय मक्कल काची या छोट्या राजकीय पक्षाचे अध्यक्षही आहेत. “आम्ही हे सगळं करतो ते तमिळ लोक म्हणून करतो. संकटात असलेल्यांना मदत केली पाहिजे अशी आमची श्रद्धा आहे. तमिळ नाडूच्या लोकांनी बहुतेक वेळा आमच्या कार्याला दाद दिली आहे.” आणि मग खोल श्वास घेत, क्षणभर थांबून ते म्हणतातः “तसंही, जेव्हा तुम्ही अल्पसंख्याक असता, तेव्हा तर असं काम करणं तुम्हाला भाग असतं, तुमची जबाबदारी असते ती. आमचा हेतू मात्र गरज असणाऱ्याला मदत करणे एवढाच आहे.”

कविता मुरलीधरन सार्वजनिक आरोग्य आणि नागरी स्वातंत्र्यावर वार्तांकन करतात ज्यासाठी त्यांना ठाकूर फॅमिली फौंडेशनकडून स्वतंत्र आर्थिक सहाय्य मिळाले आहे. ठाकूर फॅमिली फौंडेशनचे या वार्तांकनातील मजकूर किंवा संपादनावर नियंत्रण नाही.

अनुवादः मेधा काळे

Kavitha Muralidharan

Kavitha Muralidharan is a Chennai-based independent journalist and translator. She was earlier the editor of 'India Today' (Tamil) and prior to that headed the reporting section of 'The Hindu' (Tamil). She is a PARI volunteer.

Other stories by Kavitha Muralidharan
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Marathi Translations Editor at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale