या आठवड्यात वारी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. जात्यावरच्या ओव्यांच्या या मालिकेत पुणे जिल्ह्यातल्या कोळवडे गावच्या चार ओवीकार ज्ञानेश्वर आणि तुकाराम हे आपले आवडते संत आणि आळंदी आणि देहू या त्यांच्या गावांबद्दलच्या दहा ओव्या गातायत
ज्ञानेश्वर (१३ वं शतक) आणि तुकाराम (१७ वं शतक) हे महाराष्ट्राचे अग्रणी संत. दोघांच्या या पृथ्वीतलावरच्या काळात तीनशे वर्षांचं अंतर असलं तरी लोकांच्या मनात मात्र ते एकमेकांसोबतच येतात. त्यांचा प्रभाव इतका खोल आहे की इतकी शतकं लोटली तरीही आज त्यांच्या पादुका घेऊन वारकरी त्यांचे अभंग गात पायी पंढरपुराला जात आहेत.
हे दोघंही पुरोगामी भक्ती मार्गाचे संत. दोघांनीही सर्व मानव समान असल्याचा पुरस्कार केला आणि जातीभेदांवर आधारित समाजव्यवस्थेला विरोध केला. यामुळे अर्थातच अभिजन ब्राह्मण संतापले पण त्याच वेळी सामान्य लोकांचं उदंड प्रेम आणि आदर त्यांना मिळाला. या दोघांचे विचार त्यांना पटले आणि त्यांचा खोल प्रभाव जन सामान्यांवर आपल्याला पहायला मिळतो.
आपल्या पुन्हा तुकाराम या पुस्तकात कवी आणि समीक्षक दिलीप चित्रे (१९३८-२००९) लिहितात की तुकारामांच्या रचनांवर ज्ञानेश्वर आणि नामदेवांचा प्रभाव होता. तुकारामांच्या रचनांचा संग्रह असणाऱ्या तुकाराम गाथेमध्ये महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातलं जीवन, लोकांच्या मौखिक परंपरा आणि शेतीशी संबंधित असणाऱ्या शेतकरी आणि इतर समुदायांचं जीवन यावर मोठ्या प्रमाणात भाष्य केलेलं आहे.
ज्ञानेश्वरांचे दोन महत्त्वाचे ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी, जी भगवद् गीतेवरील मराठी निरुपण आहे आणि अनुभवामृत. याचा दिलीप चित्रे यांनी इंग्रजीत अनुवाद केला आहे – अनुभवामृतः द इममॉर्टल एक्स्पिरियन्स ऑफ बीइंग.
दर वर्षी आषाढामध्ये (जून/जुलै) २१ दिवसांची पायी वारी निघते. पुणे जिल्ह्याच्या आळंदी आणि देहूहून या दोन्ही संतांना वंदन करण्यासाठी आणि विठ्ठलाला भेटण्यासाठी वारकरी निघतात. सोलापूरमधल्या पंढरपुरात वारी पोचते. (वारी आणि भक्ती मार्गाबद्दल अधिक माहितीसाठी मागील आठवड्यातील वारकऱ्यांची वारी हा लेख पहा.)
या मालिकेत सादर केलेल्या ओव्या या दोन संतकवींबद्दल आणि त्यांनी इंद्रायणी नदीच्या काठी वसवलेल्या दोन गावांबद्दल आहेत. ज्ञानेश्वरांनी (ज्यांना ज्ञानदेव किंवा ज्ञानोबा म्हटलं जातं) आळंदीत समाधी घेतली. तुकाराम देहूचे रहिवासी. ते वैकुंठाला गेले अशी त्यांच्या भक्तांची श्रद्धा आहे.
पुढे दिलेल्या दहा ओव्या सिंधू उभे, राधाबाई सकपाळ, कुसुम उभे आणि राधा उभे यांनी गायल्या आहेत. पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातल्या कोळवडे गावच्या खडकवाडीच्या या रहिवासी.
आळंदी गाव मोठं माळ पाहून वसवली आणि तिथे चारी चौघड्यांच्या घोषात ज्ञानोबा राज्य करतात अशी ओवीची सुरुवात होते. इथूनच ज्ञानोबांची कीर्ती सर्वदूर पसरली असं सूचित करायचं आहे.
आळंदीत आधी फक्त एरंडी आणि धोतरा काय तो वाढत होता पण ज्ञानोबांच्या समाधीने ही नगरी पावन झाली. आळंदी आणि देहू शेजारी शेजारी आहेत आणि ज्ञानोबा आणि तुकोबा दोघंही एकाच बाजूला राहतात म्हणजे इंद्रायणी नदीच्या एकाच बाजूला राहतात असा मथितार्थ असावा.
पुढच्या ओवीत त्या सवाल करतात, आळंदीचा मासा प्रवाहाच्या विरुद्ध देहूला कसा गेला? या दोन्ही संतांचा नेम आणि भक्ती तशीच आहे असं त्या गातात. आळंदीहून पुढे त्यांना देहूला जायचंय कारण त्यांना ज्ञानोबा आणि तुकोबांचं कीर्तन ऐकायचंय. सिंधू उभे गातात की आळंदीहून त्यांना देहूचा दिवा दिसतोय. बिजेच्या दिवशी तुकाराम वैकुंठाला गेले असं मानतात. त्याच बिजेच्या दिवशी ते अंघोळीला बसलेले त्यांच्या डोळ्यासमोर येतायत. आपल्या ओच्यात तुळशीच्या माळा घेऊन तुकारामाला पाहण्यासाठी आळंदीहून धावत देहूला जाण्याचा मानस त्या बोलून दाखवतात.
शेवटच्या तीन ओव्या तुकाराम आणि त्यांची पत्नी जिजाबाईबद्दल आहेत. तुकाराम जेव्हा वैकुंठी जायला निघतात तेव्हा त्यांच्यामध्ये जो संवाद होतो त्यावरच्या या ओव्या आहेत. जेव्हा तुकाराम सांगतात की ते वैकुंठाला जायला निघालेले आहेत आणि त्यांच्या भक्तांनाही ते त्यांच्या मागोमाग यायला सांगतात तेव्हा जिजाबाई म्हणतात की तुकोबाला वेड लागलंय. तुकोबा जिजाबाईला म्हणतात, तू इतरांचं ऐकू नकोस आणि माझ्याबरोबर वैकुंठी चल.
शेवटच्या ओवीत जेव्हा तुकोबा जिजाबाईला विमानात बसायला सांगतात तेव्हा जिजाबाई त्यांना सांगतात, (मला जमायचं नाही) घरी दुभती म्हैस आहे. नवऱ्याला अध्यात्माची ओढ लागलेली आहे पण त्याची बायको मात्र घर-संसारात रमली आहे.
गाव आळंदी वसवली, माळ मैदान पाहूनी
ज्ञानुबा करी राज, चारी चौघड लावूनी
आळंदी गं बसवली, ही गं येरंड्या धोतऱ्यांनी
समांधी गं घेतयील, देव ज्ञानुबा खेतऱ्यानी
आळंदीपासूनी देहू, जवळ सांगत्यात
ज्ञानुबा, तुकाराम, एका तर्फाला नांदतात
आळंदीचा मासा देहूला गेला कसा
ज्ञानुबा गं तुकाराम, या गं साधुसंताचा नेम तसा
आळंदी पासूनी मला देहूला जायायाचं
ज्ञानुबा गं तुकाराम, यांचं कीर्तन पाह्यायाचं
आळंदी पासूयानी, मला देहूचा दिवा दिसं
बीजनायाच्या दिवशी, तुका आंघोळीला बसं
आळंदी पासूयानी जाऊ देहूच्या धावयनी
वट्यात तुळशीमाळा, जाते तुकाला पाहुयनी
जीजाबाई बोलं, याड लागलं तुकाला
वैकुंठी जायाला चला, म्हणतो लोकाला
तुकाराम बोल जिजा, माझ्या तु बायकु
वैकुंठी जायाला, नको लोकाचं आयकु
तुकाराम बोल जिजा, इमानी बईस
जिजाबाई बोलं, घरी दुभती म्हईस
gāva āḷandī vasavalī māḷa maidāna pāhūnī
ñānubā karī rāja cārī caughaḍa lāvūnī
āḷandī ga basavalī hī ga yēraṇḍyā dhōtaryānī
samāndhī ga ghētayīla dēva jñānubā khētaryānī
āḷandīpāsūnī dēhū javaḷa sāṅgatyāta
jñānubā tukārāma ēkā tarphālā nāndatāta
āḷandīcā māsā dēhūlā gēlā kasā
jñānubā ga tukārāma yā ga sādhusantācā nēma tasā
āḷandī pāsūnī malā dēhūlā jāyāyāca
jñānubā ga tukārāma yāñca kīrtana pāhyāyāca
āḷandī pāsūyānī malā dēhūcā divā disa
bījanāyācyā divaśī tukā āṅghōḷīlā basa
āḷandī pāsūyānī jāū dēhūcyā dhāvayanī
vaṭyāta tuḷaśīmāḷā jātē tukālā pāvhayaṇī
jījābāī bōla yêḍa lāgala tukālā
vaikuṇṭhī jāyālā calā mhaṇatō lōkālā
tukārāma bōla jijā mājhyā tu bāyaku
vaikuṇṭhī jāyālā nakō lōkāca āyaku
tukārāma bōla jijā imānī bīsa
jijābāī bōla garī dubhatī mhīsa
Alandi village was constructed after choosing the site
Dnyanoba reigns here to the sound of drums
Alandi was constructed where there were castor oil trees and datura plants
The holy personage of God Dnyanoba took
samadhi*
there
They say, from Alandi, Dehu is quite near
Dnyanoba and Tukaram reside in these places on one side
How did the fish from Alandi go to Dehu [against the current]
Just as Dnyanoba, Tukaram are streadfastly attracted to Vitthal
From Alandi, I want to go to Dehu
I want to see Dnyanoba’s and Tukaram’s
kirtan*
From Alandi, I can see the lamp in Dehu
It’s Tukaram
beej,*
Tuka is sitting for a bath
From Alandi, I shall go running to Dehu
A string of
tulsi
beads in the folds of my saree, I will be a guest at Tuka’s house
Jijabai* says, Tuka has become mad
He is going to Vaikunth,* asking people to come along
Tuka says, Jijai, you are my wife
To go to Vaikunth don’t listen to anyone
Tukaram says, Jija come, sit in the [celestial] plane
Jijabai says there is a milching buffalo at home
Notes: Samadhi: final resting through permanent meditation
Kirtan: spiritual discourse
Tukaram’s beej : the anniversary of Tukaram’s ascent to heaven
Jijabai: Tukaram’s wife
Vaikunth: In Hindu mythology, Lord Vishnu resides in this celestial abode
कलावंतः सिंधू उभे, राधाबाई सकपाळ, कुसुम उभे, राधा उभे
गावः कोळवडे
वाडीः खडकवाडी
तालुकाः मुळशी
जिल्हाः पुणे
जातः मराठा
दिनांकः या ओव्या आणि काही माहिती ६ जानेवारी १९९६ रोजी गोळा करण्यात आली. राधाबाई आणि सिंधू उभेंचे फोटो ३० एप्रिल २०१७ रोजी घेण्यात आले. त्या वेळी कुसुम उभे आणि राधा उभेंचा मात्र आम्हाला काही पत्ता लागला नाही.
पोस्टरः सिंचिता माजी
फोटोः नमिता वाईकर आणि संयुक्ता शास्त्री
अनुवादः मेधा काळे