प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला आणि त्यानंतर राज भवनमध्ये राज्यपाल आणि त्यांच्या पत्नीसोबत चहापानाला येण्याचं निमंत्रण लक्ष्मी ‘इंदिरा’ पांडांनी नाकारलं. निमंत्रणामध्ये त्यांच्या गाडीसाठी विशेष पार्किंग पासही समाविष्ट होता. लक्ष्मींनी उत्तर पाठवण्याचीही तसदी घेतली नाही आणि स्वातंत्र्य दिनाच्या समारंभालाही त्या गेल्या नाहीत.

लक्ष्मी पांडांकडे कुठलीही गाडी नाही. कोरापुट जिल्ह्याच्या जयपोर शहरातल्या एका चाळीतली छोटी खोली म्हणजे त्यांचं घर. वीसेक वर्षं ज्या झोपडपट्टीत राहून काढली त्याचीच ही सुधारित आवृत्ती म्हणायची. गेल्या वर्षी काही हितचिंतकांनी त्यांचं गाडीचं तिकिट काढलं म्हणून स्वातंत्र्यदिनाच्या समारंभाला जाऊ शकल्या. या वर्षी काही त्यांना ते परवडणारं नव्हतं. राज्यपालांचं निमंत्रण आणि ‘पार्किंग पास’ दाखवताना त्यांना हसू येत होतं. ‘चाळीस वर्षांपूर्वी माझा नवरा ड्रायवर होता’, गाडीशी आजवर आलेला संबंध काय तो इतकाच. आझाद हिंद सेनेच्या या लढवय्या सेनानीने आजही रायफल हाती घेतलेला आपला फोटो अभिमानाने जपून ठेवलाय.

Laxmi Panda outside her home
PHOTO • P. Sainath

कोरापुट, ओडिशामधल्या एका नगण्य चाळीत राहणाऱ्या, देशाला विसर पडलेल्या एक स्वातंत्र्य सेनानी

खेड्यापाड्यातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या अगणित भारतीयांपैकी लक्ष्मी एक आहेत. असे अगणित सामान्य लोक जे पुढे जाऊन पुढारी, नेते, म्हणून फार प्रसिद्ध झाले नाहीत किंवा कधीच मंत्री किंवा राज्यपालपदी विराजमान झाले नाहीत. प्रचंड मोठा त्याग करूनही स्वातंत्र्यानंतर परत आपलं रोजचं आयुष्य निमूटपणे जगत राहिलेली ही साधी माणसं. स्वातंत्र्याला ६० वर्षं होत असताना त्यांच्यापैकी किती तरी सेनानी आज हयात नाहीत. जे थोडे आहेत ते ८०-९० वर्षांचे आहेत. आजारपणामुळे किंवा इतरही कारणांनी गांजलेले आहेत. (लक्ष्मी मात्र याला अपवाद आहेत. त्या अगदी कुमारवयात सेनेत सामील झाल्यामुळे आता कुठे त्या ८० ला पोचल्या आहेत.) अगदी बोटावर मोजण्याइतके स्वातंत्र्यसैनिक जिवंत आहेत.

ओडिशा सरकारने लक्ष्मी पांडा यांना स्वातंत्र्य सैनिक घोषित केलं आहे. त्यांना महिना सातशे रुपये इतकं तुटपुंजं पेन्शन मिळतं. गेल्या वर्षी यात ३०० रुपयाची ‘भरघोस’ वाढ झाली. खरं तर अनेक वर्षं त्यांच्या नावचं पेन्शन कुठे पाठवायचं हेच कुणाला माहित नव्हतं. आझाद हिंद सेनेच्या अनेक दिग्गजांनी लक्ष्मी पांडांच्या दाव्याला पुष्टी दिली असली तरी केंद्र सरकारने मात्र त्यांना स्वातंत्र्य सैनिक मानण्यास नकार दिला आहे. “दिल्लीच्या लोकांचं म्हणणं आहे की मला तुरुंगवास झाला नाही,” लक्ष्मी सांगतात. “खरंय. मी कधीच तुरुंगात गेले नाहीये. पण आझाद हिंद सेनेचे असे बरेच जण आहेत ज्यांना तुरुंगवास भोगावा लागलेला नाही. पण म्हणून आम्ही स्वातंत्र्यासाठी लढलो नाही असा याचा अर्थ होतो का? माझ्या पेन्शनसाठी मी खोटं का बोलावं?”

नेताजी बोसांच्या आझाद हिंद सेनेच्या लक्ष्मी अगदी तरुण सेनानींपैकी एक. कदाचित सेनेसाठी नोंदणी करणाऱ्या आणि तेव्हाच्या बर्मामध्ये भरलेल्या शिबिरात भाग घेणाऱ्या ओडिशाच्या त्या एकमेव स्त्री सदस्य असाव्यात. आज हयात असणाऱ्यांपैकी तर नक्कीच. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नेताजींनी स्वतः त्यांना ‘इंदिरा’ हे नाव दिलं. सुपरिचित कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्याबरोबर त्यांची गल्लत होऊ नये हा त्यामागचा उद्देश. “ते मला म्हणाले, या शिबिरात तू इंदिरा आहेस. काही कळण्याइतकी मी मोठी नव्हते. पण तेव्हापासून मी इंदिरा झाले.”

Laxmi Panda
PHOTO • P. Sainath

आझाद हिंद सेनेतले आम्ही बरेच जण कधी तुरुंगात गेलो नाही. आम्ही स्वातंत्र्यासाठी लढलो नाही असा याचा अर्थ होतो का?

बर्मामध्ये रेल्वेमध्ये काम करणारे लक्ष्मीचे आई-वडील इंग्रजांच्या बाँब हल्ल्यात मरण पावले. “तेव्हापासूनच मला इंग्रजांशी लढायचं होतं. आझाद हिंद सेनेतले माझे मोठे सहकारी मला कशातही सहभागी करून घ्यायला तयार नव्हते. त्यांच्या मते मी फार लहान होते. कसलंही काम द्या, पण मला सेनेत घ्या. मी तगादा लावला होता. माझा भाऊ नकुल रथसुद्धा सेनेत होता. पण तो युद्धामध्ये परागंदा झाला. खूप वर्षांनी मला कुणी तरी सांगितलं की तो नंतर परत आला आणि सैन्यात भरती झाला. तो काश्मीरमध्ये होता बहुतेक. पण मी त्याचा शोध कुठे आणि कसा घेणार होते? पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही.”

“शिबिरात मी कॅप्टन जानकींना भेटले. लक्ष्मी सहगल, गौरी आणि आझाद हिंद सेनेच्या इतर नावाजलेल्या सेनानींना मी जवळून पाहिलं,” लक्ष्मी सांगतात. “युद्धाच्या उत्तरार्धात आम्ही सिंगापूरला गेलो, माझ्या मते बहादुर गटासोबत,” लक्ष्मी आठवून सांगतात. तिथे त्या आझाद हिंद सेनेच्या तमिळ समर्थकांसोबत राहिल्या. तमिळ भाषेतले काही शब्द आजही त्यांच्या लक्षात आहेत.

आणि जणू हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी त्यांचं नाव ‘इंदिरा’ आम्हाला तमिळमध्ये लिहूनही दाखवलं. आझाद हिंद सेनेचं गीत गाताना त्यांच्या आवाजातला अभिमान लपत नव्हता. कदम कदम बढाये जा , खुशी के गीत गाये जा। यह जिंदगी है कौम की , तू कौम पे लुटाये जा।

आझाद हिंद सेनेचा गणवेश घातलेला आणि हातात रायफल घेतलेला त्यांचा एक फोटो आहे. “युद्धानंतर एकदा आम्ही सगळे परत भेटलो होतो. तेव्हा तिथनं निघतानाचा हा फोटो आहे. त्यानंतर लगेचच, म्हणजे १९५१ मध्ये माझं कागेश्वर पांडांशी लग्न झालं. आझाद हिंद सेनेचे बरेच ओडिया सेनानी आमच्या लग्नाला आले होते.” लक्ष्मी आठवणींमध्ये रमतात.

आझाद हिंद सेनेच्या सहकाऱ्यांच्या आठवणींनी लक्ष्मी हळव्या होतात. “मला त्यांची फार आठवण येते. काहींशी माझी फारशी ओळख नव्हती पण तरी त्या सगळ्यांना परत एकदा पहायला मिळावं असं सतत वाटत राहतं. मागे कधी तरी लक्ष्मी सेहगलांचं कटकमध्ये भाषण होतं. पण माझ्याकडे गाडीभाड्याइतकेही पैसे नव्हते. मला एकदा तरी त्यांनी पहायला मिळायलं असतं तर... कानपूरला जाण्याची एकमेव संधी चालून आली होती. पण तेव्हा नेमकी मी आजारी पडले. आणि आता काय उपयोग?”

१९५० मध्ये त्यांच्या नवऱ्याला ड्रायवरचा परवाना मिळाला. “आम्ही काही वर्षं हिराकुडमध्ये काम केलं. तेव्हा मला कामासाठी फार काही कष्ट करावे लागत नसत. त्यामुळे मी सुखात होते. पण १९७६ मध्ये ते वारले आणि माझ्या अपेष्टा सुरू झाल्या.”

लक्ष्मींनी हरतऱ्हेची कामं केली. दुकानात मदतनीस, मजूर, मोलकरीण... एक ना अनेक. पगार मात्र नेहमीच फुटकळ. त्यात व्यसनी मुलाची आणि अनेक नातवंडांची जबाबदारी. सगळ्यांचीच परिस्थिती भयानक.

Laxmi Panda showing her old photos
PHOTO • P. Sainath

आझाद हिंद सेनेचा गणवेश आणि हातात रायफल असलेला फोटो दाखवताना लक्ष्मी पांडा

“मी कशाचीच अपेक्षा केली नाही. मी देशासाठी लढले, कोणत्या सन्मानासाठी नाही. माझ्या कुटुंबासाठीदेखील मी कधी काही मागितलं नाही. पण आता, आयुष्याच्या संध्याकाळी किमान माझ्या कामाची दखल घेतली जावी एवढी अपेक्षा मात्र आहे.”

काही वर्षांपूर्वी दारिद्र्य आणि आजारपण त्यांच्या घास घ्यायला उठलं होतं. तेव्हा जयपोरच्या परेश रथ या उमद्या पत्रकाराने त्यांची कहाणी जगापुढे आणली. त्यानेच स्वतःच्या पैशातून त्यांना झोपडपट्टीतून त्यांच्या चाळीतल्या एका खोलीच्या घरात हलवलं, त्यांच्या औषधपाण्याची व्यवस्था केली. आतादेखील त्या एका आजारपणातून सावरतायत, मुलाकडे रहातायत, त्याच्या वाइट सवयी डोळ्या आड करतायत. अधून मधून त्यांच्याबद्दल लेख, बातम्या येत राहिल्या. एका राष्ट्रीय मासिकाच्या मुखपृष्ठावरही त्या एकदा झळकल्या आहेत.

“आम्ही पहिल्यांदा त्यांच्याबद्दल लिहिलं तेव्हा त्यांना थोडी फार मदत नक्की मिळाली,” रथ सांगतात. “कोरापुटच्या तत्कालीन जिल्हाधिकारी उषा पाधींना आस्था वाटली. त्यांनी रेड क्रॉस निधीतून १०,००० रुपयाची वैद्कीय मदत मिळवून दिली. तसंच सरकारी भूखंड देण्याचंही कबूल केलं. मग पाधींची बदली झाली आणि त्या दुसरीकडे गेल्या. बंगालमधूनही काही जणांनी देणग्या पाठवल्या. पण त्या किती काळ पुरणार? परत पहिले पाढे पंचावन्न. आणि खरं तर प्रश्न फक्त पैशाचा नाहीये.” रथ त्यांचा मुद्दा मांडतात. “अगदी केंद्र सरकारचं पेन्शन मिळालं तरी त्याचा लाभ त्यांना अजून किती वर्षं मिळणार आहे? पैशापेक्षा त्यांच्यासाठी तो सन्मानाचा मुद्दा आहे. अजून तरी केंद्र सरकारकडून काही कळलेलं नाही.”

खूप खेटा मारल्यावर गेल्या वर्षाच्या अखेरीस लक्ष्मी पांडांना पाणजियागुडा गावात एक सरकारी भूखंड देण्यात आला. त्यावर सरकारी घरकुल योजनेखाली घर बांधून मिळण्याची त्या वाट पाहतायत. सध्या तरी रथ याने त्यांच्या जुन्या खोलीजवळच एक जरा बरी खोली बांधून घेतली आहे आणि कदाचित लवकरच त्या तिथे रहायला जातील.

आसपासच्या भागात त्या बऱ्यापैकी प्रसिद्ध आहेत. काही स्थानिक संस्थांनी त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी पाठिंबा दिला आहे. १४ ऑगस्ट रोजी लक्ष्मी मला सांगत होत्या, “दीप्ती शाळेत उद्या माझ्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. त्यांनी मला विनंती केली तशी!” या गोष्टीचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. पण उद्या कार्यक्रमाला नेसण्यासारखी एकही चांगल्यातली साडी नाही याची चिंताही लपत नव्हती.

आझाद हिंद सेनेची ही वयोवृद्ध सेनानी तिच्या पुढच्या लढाईची तयारी करते आहे. “नेताजींची हाक होती, ‘दिल्ली चलो’. केंद्र सरकारने स्वातंत्र्य सैनिक म्हणून माझी दखल घेतली नाही १५ ऑगस्टनंतर मी पुन्हा तेच करणार आहे. मी संसदेसमोर धरणं धरणार आहे. दिल्ली चलो... तेच करणारे मी परत.” म्हाताऱ्या लक्ष्मी पांडा सांगत राहतात.

लक्ष्मी पांडा ‘दिल्ली चलो’ म्हणत दिल्ली गाठतील. साठ वर्षं उशीरा! मनातल्या आशेच्या जोरावर आणि कदम कदम बढाये जा च्या तालावर...

छायाचित्रं - पी. साईनाथ

पूर्वप्रसिद्धी – द हिंदू, १५ ऑगस्ट २००७

इंग्रज सरकारला अंगावर घेणारी ‘सलिहान’

पाणिमाराचं पायदळ – भाग १

पाणिमाराचं पायदळ – भाग २

अहिंसेची नव्वद वर्षं

शेरपूरः कहाणी त्यागाची आणि विस्मृतीत गेलेल्या गावाची

गोदावरीः पोलिस अजूनही हल्ला होण्याची वाट पाहताहेत

सोनाखानः वीर नारायण सिंग दोनदा मेला

कल्लियसेरीः सुमुखनच्या शोधात

कल्लियसेरीः ५० वर्षांनंतरही लढा चालूच

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought' and 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom'.

Other stories by P. Sainath
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Marathi Translations Editor at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale