समिताच्या चाळीतून जवळपासच्या अपार्टमेंटमध्ये आता कपड्यांच्या बोचक्यांची ने-आण थांबली आहे. अगदी दोन महिन्यांपूर्वीपर्यंत ती दररोज सकाळी वाडा शहराच्या अशोकवन कॉम्प्लेक्समधून कपड्यांचे गठ्ठे घेऊन यायची. हातात आणि डोक्यावर कपड्याची बोचकी घेऊन दोन किलोमीटर चालत ती वाड्यातल्याच भानुशाली चाळीत आपल्या घरी परत यायची. तिथे कपड्यांना इस्त्री करून नीट घड्या घालून ती त्याच दिवशी संध्याकाळी ती त्या त्या घरी कपडे पोचवून यायची.
“टाळेबंदी लागली आणि माझ्या ऑर्डरच थांबल्या,” ३२ वर्षांची समिता मोरे सांगते. ऑर्डर म्हणजे इस्त्रीसाठीचे कपडे. २४ मार्च रोजी टाळेबंदी लागण्याआधी समिताला रोज किमान चार ऑर्डर मिळायच्या आणि आता मात्र आठवड्याला कशाबशा दोन मिळतायत. समिता एका शर्ट किंवा पँटचे पाच आणि साडीचे ३० रुपये घेते. दिवसाला १५०-२०० रुपयांची तिची कमाई एप्रिल महिन्यात आठवड्याला १०० रुपये इतकी घसरली होती. “एवढ्या पैशात कसं भागायचं?” ती विचारते.
समिताचे पती संतोष, वय ४८ रिक्षा चालवायचे. पण २००५ साली वाड्याजवळ ते टेम्पो चालवत असताना कुणी तरी दगड भिरकावला आणि त्यांचा एक डोळा गेला. “मी माझ्या बायकोला इस्त्री करायला मदत करतो, कारण माझ्याजोगतं दुसरं कोणतंच काम नाही,” ते म्हणतात. “रोज चार तास उभ्याने इस्त्री करून पायाला रग लागते.”
गेली १५ वर्षं समिता आणि संतोष इस्त्रीचं काम करतायत. “त्यांचा अपघात झाला त्यानंतर पोरांचा शाळेचा खर्च होता, रोजचं खाणं-पिणं सगळ्यालाच पैसा लागणार. म्हणून मी हे काम सुरू केलं,” समिता सांगते. “पण ही टाळेबंदी आमच्या जिवावरच उठलीये.” या कुटुंबाकडे जी काही थोडी फार बचत होती ती गेल्या काही आठवड्यात संपत आलीये. त्यामुळे त्यांनी किराणा आणण्यासाठी आणि ९०० रुपये वीजबिल भरण्यासाठी म्हणून नातेवाइकांकडून ४,००० रुपये उसने घेतले आहेत.






