“आज काल तुम्हाला दुकानामध्ये कुठलीही गोष्ट मिळू शकते. मात्र आमच्या आदिवासी जमातींच्या विधींमध्ये वापरली जाणारी मातीची भांडी फक्त आम्ही कोटा जमातीच्या स्त्रियाच घडवतो,” सुगी राधाकृष्णन सांगतात. वय ६३, थिरुचीगडी, त्यांच्या भाषेत थ्रिचकाड या आदिवासी पाड्यावरच्या कुंभार स्त्रियांच्या दीर्घ परंपरेतल्या त्या एक. कोटा लोकांची गाव पाड्यांची स्वतःची अशी वेगळी नावं आहेत. हा पाडा तमिळ नाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातल्या उदगमंडलम तालुक्यात येतो, कोटागिरी शहराच्या जवळ.

घरी असताना सुगी त्यांच्या कोटा जमातीच्या खास वेषात दिसतात – एक नेसूसारखा जाड पांधरा कपडा, याला कोटा भाषेत दुपिट्ट म्हणतात आणि वरती एक सफेद शाल – वराद . कोटागिरी किंवा जवळपासच्या इतर भागात काम करत असताना थिरुचीगडीचे स्त्री पुरुष त्यांच्या पारंपरिक वेषात दिसत नाहीत. सुगींनी तेल लावून केसांचा आडवा अंबाडा घातलाय, ही इथल्या कोटा स्त्रियांची खास केशभूषा. त्यांच्या घराजवळच असणाऱ्या कुंभारकामाच्या छोट्या खोलीत त्या आम्हाला घेऊन जातात.

“मातीची भांडी कशी बनवायची हे काही मला कुणी बसवून शिकवलेलं नाही. मी माझ्या आजीचे हात पहायची, ते कसे फिरतात तेही बघायची. एखाद्या लांबुळक्या घड्याला गोल आकार देण्यासाठी तास न् तास त्याला बाहेरून लाकडी फळीने गुळगुळीत करावं लागतं आणि त्याच वेळी आतून एखाद्या गोट्याने घासावं लागतं. त्यामुळे छिद्रंही कमी होतात. पण लाकडी फळी आणि आतला दगड एकाच वेळी फिरवावे लागतात. नाही तर मग त्याच्यावर चिरा पडू शकतात. अशा भांड्यातला भात अतिशय चविष्ट बनतो. थोड्या अरुंद तोंडाचं भांडं सांबारसाठी वापरतो आम्ही. त्याची चवही काही औरच. एकदा चाखून बघाच.”

PHOTO • Priti David
PHOTO • Priti David
PHOTO • Priti David

सुगी रामकृष्णन, वय ६३, थिरुचीगडीच्या कुंभार स्त्रियांच्या दीर्घ परंपरेतल्या एक, आपल्या आजीचं काम बघत ही कला शिकल्या

दक्षिण भारतातल्या नीलगिरी पर्वतांमध्ये फक्त कोटा जमातीच्या स्त्रियाच कुंभारकाम करतात. त्यांची संख्याही फार नाही – २०११ च्या जनगणनेनुसार नीलगिरी जिल्ह्यातल्या १०२ कुटुंबांमध्ये मिळून फक्त ३०२ कोटा लोक उरले आहेत. मात्र जमातीतल्या ज्येष्ठांनी हे आकडे खोडून काढले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांची संख्या ३००० च्या आसपास आहे (पुन्हा सर्वेक्षण व्हावे यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे).

पाड्याजवळच्या मैदानातनं विधीवत माती आणणं, गारा करणं, घड्याला आकार देणं, उतरवणं आणि भाजणं, हे सगळं स्त्रियाच करतात. चाकाला गती देण्यापलिकडे पुरुषांचं जवळपास कसलंच काम नसतं यात. पूर्वी स्त्रिया धार्मिक विधींसोबत रोजच्या स्वयंपाकासाठी, खाण्यासाठी, पाणी आणि धान्याची साठवण करण्यासाठी भांडी बनवत असत, अगदी तेलाचे दिवे आणि नळ्यादेखील मातीच्या असत. खालच्या पठारी प्रदेशांमधून इथे स्टील आणि प्लास्टिकचा प्रवेश होण्याअगोदर या पर्वतांमध्ये वापरलेली भांडी फक्त कोटा लोकांनी तयार केलेली मातीची भांडी असत.

ज्या देशात कुंभारकाम हे बहुतकरून पुरुषांचं काम मानलं जातं, तिथे हे फारच आगळं वेगळं आहे. अशा कुंभारकाम करणाऱ्या स्त्रियांच्या पिढ्या इतरत्र फार क्वचित पहायला मिळतात. १९०८ सालच्या मद्रास डिस्ट्रिक्ट गॅझेटमध्ये कोटांबद्दल नमूद केलंयः “...पर्वतांमधल्या इतरांसाठी ते आता कारागिरी आणि संगीतकारांचं काम करतायत, पुरुष सोनार, लोहार, सुतार, चांभार आणि इतर कामं करतात आणि स्त्रिया एका प्रकारच्या कुंभाराच्या चाकांवरती मातीची भांडी बनवतात.”

“फक्त बायाच भांडी बनवू शकतात,” कोटा समुदायाच्या ज्येष्ठ सदस्य, ६५ वर्षीय मंगली षण्मुगम पुष्टी देतात. बॅंक ऑफ इंडियामधून व्यवस्थापक म्हणून निवृत्त झालेल्या मंगली पुड्डू कोटागिरी या पाड्यावर परतल्या आहेत. “आमच्या पाड्यावर कुणी कुंभारकाम करणारं नसेल तर आम्हाला दुसऱ्या गावातल्या बाईला बोलावून तिची मदत घ्यावी लागते.”

कोटा संस्कृतीमध्ये कुंभारकाम आणि धर्माची आगळी गुंफण आढळते. त्यांचं दैवत असणारा कामत्राया आणि त्याचा जोडीदार इयनूर यांच्या ५० दिवसांच्या वार्षिक उत्सवाला सुरुवात होते तेव्हाच मैदानातनं माती आणली जाते. सुगींनी गेल्या वर्षीच्या उत्सवात १०० भांडी बनवली होती. “डिसेंबर/जानेवारीतल्या अमावास्येनंतरच्या पहिल्या सोमवारी उत्सवाला सुरुवात होते,” त्या सांगतात. “मुख्य पुजारी आणि त्यांच्या पत्नी सगळ्यांच्या पुढे असतात, त्यांच्यामागोमाग यात्रा माती मिळते ते त्या जागी जाते. ही जागा आम्ही पवित्र मानतो. मग संगीतकार कोल्ले [बासरी], तप्पिट आणि डोब्बर [ढोल] आणि कोब्ब [बिगूल]वरती एक खास धून वाजवतात, मन्न एत कोड [‘माती उचला’]. सर्वात आधी कर्पमन्न [काळी माती] घेतली जाते आणि त्यानंतर आवरमन्न [करडी माती]. इथे बाहेरच्यांना अजिबात प्रवेश नसतो. पुढचे चार महिने मातीची भांडी घडवली जातात. थंडीतली सूर्यकिरणं आणि हवा यामुळे ही भांडी लवकर सुकतात.”

PHOTO • Priti David
PHOTO • Priti David

हिवाळ्यामध्ये स्त्रिया शेकड्याने मातीची भांडी घडवतात – माती आणणं, ती मळणं, तिला आकार देणं आणि भांडी भाजणं – पुरुषांचं काम फक्त चाक फिरवणं

कुंभारकामाच्या या अध्यात्मिक दुव्यांमुळे ही कला आजही कोटा पाड्यांवर जिवंत आहे, काळ कितीही बदलत असला तरी. “आज, आमच्या समाजाची मुलं इंग्रजी माध्यमांच्या शाळेत जातात, त्यात त्यांचा इतका वेळ जातो की त्यांना हे असं सगळं शिकायला वेळ कुठे आहे? मात्र वर्षातून एकदा या उत्सवासाठी गावातल्या सगळ्या बायांनी जमलं पाहिजे आणि हे केलं पाहिजे,” सुगी म्हणतात. गावातल्या मुलींना ही कला शिकण्याची तेवढीच संधी मिळू शकेल.

कोटागिरीतल्या काही ना नफा तत्त्वावर काम करणाऱ्या संस्था कोटाच्या मातीकामाचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करत आहेत. २०१६-२०१७ मध्ये नीलगिरी आदिवासी कल्याण संस्थेने कोटा स्त्रियांनी बनवलेल्या मातीच्या वस्तूंची ४०,०००/- रुपयांची विक्री केली. जर शासनाने प्रत्येक पाड्यासाठी माती मळण्यासाठीचं एखादं यंत्र पुरवलं तर यात खूप भर पडू शकते असं त्यांचं म्हणणं आहे. सुगी म्हणतात, “इथली माती इतकी घट्ट आणि चिकट आहे की माती मळण्याच्या यंत्राचा खरंच खूप उपयोग होईल.” पण त्या पुढे म्हणतात, “आम्ही फक्त डिसेंबर ते मार्च इतकाच काळ काम करू शकतो. एरवी माती नीट सुकत नाही, यंत्राने त्यात फार काही फरक पडणार नाहीये.”

कोटाच्या मातीकामाचं पुनरुज्जीवन करणं फार सोपं नाहीये असं कोटागिरीच्या कीस्टोन फौंडेशनच्या संचालक स्नेहलता नाथ म्हणतात. ही संस्था आदिवासींच्या पर्यावरणस्नेही विकासासाठी काम करते. त्या म्हणतात, “आपल्या कलेचं जतन करावं, ती पुढे न्यावी अशी कोटा समाजाची इच्छा आहे असं आम्हाला वाटलं होतं. मात्र हे मातीकाम विधींपुरतं सीमित रहावं असं इथल्या बायांना वाटतं. माझ्या मते इथल्या तरुण मुलींच्या सहकार्याने ही कला पुनरुज्जीवित करणं जास्त बरं आहे. ग्लेझिंगसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून हीच भांडी आधुनिक स्वरुपात आणता येऊ शकतात.”

सुगींच्या घरी त्यांचे यजमान, मुलगा आणि त्याचं कुटुंब असे सगळे जण आहेत. त्या सांगतात की कीस्टोन किंवा ट्रायफेडसारख्या संस्थांना त्या एक भांडं १०० ते २०० रुपयाला विकू शकतात. मागे त्यांनी इतर तिघी स्त्रियांच्या सोबतीने विक्रीसाठी २०० भांडी बनवली आणि त्यातनं आलेला पैसा वाटून घेतला. पण त्यांच्या कुटुंबाचं आणि त्यांच्या पाड्यावरच्या बहुतेकांचं मुख्य उत्पन्न शेतीतून आणि कोटागिरी किंवा इतर शहरातल्या कामांमधून येतं.

अध्यात्मिक-धार्मिक अधिष्ठान असणाऱ्या कोटा भांड्यांची कला कोटा समुदायाच्या आर्थिक फायद्यासाठी व्यावसायिक रितीने वापरली जावी का किंवा तिला आधुनिक रुप दिलं जावं का हा गुंतागुंतीचा प्रश्न आहे. “तो व्यवसाय कधीच नव्हता,” मंगली षण्मुगम सांगतात. “जर कुणाला [दुसऱ्या जमातीतल्या] भांडं हवं असेल तर आम्ही ते त्यांच्यासाठी बनवायचो आणि त्या बदल्यात आम्हाला धान्य मिळायचं. खरीददार आणि विक्रेत्याच्या गरजेनुसार त्याची किंमत ठरायची.”

PHOTO • Priti David
PHOTO • Priti David

समुदायाच्या ज्येष्ठ सदस्या मंगली षण्मुगम (डावीकडे) आणि राजू लक्ष्मणा (उजवीकडे) मातीची भांडी बनवण्याच्या धार्मिक अधिष्ठानावर भर देतात पण त्यातनं मिळू शकणाऱ्या आर्थिक लाभांच्या शक्यताही नाकारत नाहीत.

सुगी यांच्यासाठी मात्र ही विधींची बाजू सर्वात मोलाची आहे. त्यातली वरकमाई तरीही उपयोगी ठरतेच. मंगली म्हणतात, “यातलं विधींचं स्थान वादातीत आहे. दुसरी बाजू सरळ सरळ आर्थिक आहे. जर दर महिन्याला मातीची भांडी आणि इतर वस्तूंमधून नियमित कमाई होणार असेल तर त्यासाठी आमच्या बाया निश्चितच तयार होतील. आजच्या परिस्थितीत कुठल्याही प्रकारची वरकमाई कुणाला नकोय?”

समाजातल्या इतरांचंही तेच म्हणणं आहे. पुजारी असणारे राजू लक्ष्मणा स्टेट बँकेत २८ वर्षं उपव्यवस्थापक पदी काम करत होते. मात्र अध्यात्मिक कारणांसाठी ते पुड्डू कोटागिरीला परतले. ते म्हणतात, “नफ्यासाठी, व्यवसाय म्हणून करावं का नाही, याने आम्हाला फरक पडत नाही. आजवर कोटा आदिवासींनी त्यांच्या गरजा स्वतःच्या हिकमतीवर, कुणाच्याही मदतीशिवाय पुऱ्या केल्या आहेत. आम्हाला आमच्या विधींसाठी मातीची भांडी लागतात आणि आम्ही ती बनवत राहू. बाकीच्या बाबी फार महत्त्वाच्या नाहीयेत.”

कीस्टोन फौंड्शनचे एन सेल्वी आणि परमनाथन अरविंद यांचे आभार तसंच एनएडब्लूएचे बी के पुष्पकुमार यांनी अनुवादासाठी मदत केल्याने त्यांचेही आभार.

अनुवादः मेधा काळे

Priti David

Priti David is the Executive Editor of PARI. She writes on forests, Adivasis and livelihoods. Priti also leads the Education section of PARI and works with schools and colleges to bring rural issues into the classroom and curriculum.

Other stories by Priti David
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Marathi Translations Editor at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale