“अगदी सगळ्या प्रकारची वादळं बघितलीयेत मी, पण हे मात्र काही वेगळंच होतं. जवळजवळ बारा तास थैमान सुरू होतं त्याचं. दुपारी बघता बघता माझ्या शेतात पाणी घुसलं... एखाद्या उधळलेल्या बैलासारखं, आमचा पाठलाग करत. माझ्या भावाच्या पांगळ्या मुलाला उचलून मी धावत सुटलो,” स्वपन नायक सांगत होते. पश्चिम बंगालमध्ये सुंदरबन भागातल्या दक्षिण काशियाबाद गावातल्या शाळेत ते शिक्षक आहेत.
दक्षिण काशियाबाद हे साउथ २४ परगणा जिल्ह्यातल्या काकद्वीप तालुक्यातलं, रामगोपालपूर पंचायतमधलं गाव. या गावाच्या जवळच अम्फान चक्रीवादळ धडकलं, तेव्हा त्याचा वेग होता ताशी १८५ किलोमीटर.
हे असं वादळ गावकऱ्यांनी कधीच पाहिलं नव्हतं. २००९ मध्ये आलेलं आयला आणि २०१९ मधलं बुलबुल वादळांनीही सुंदरबनमध्ये नुकसान केलं होतं, पण अम्फानने केलं, तेवढं नाही, असं गावकरी सांगतात.
“आमची शाळा पार उद्ध्वस्त झालीये. तिचं छप्पर उडालं आणि चार वर्गखोल्या ढासळल्या. आता इथल्या जवळपास १०० विद्यार्थ्यांचं भवितव्य अधांतरी आहे,” नायक सांगतात. दक्षिण काशियाबादमधल्या मानब तीर्थ या खाजगी प्राथमिक शाळेत ते शिकवतात.
भारतीय हवामान विभागाने २० मे रोजी इशारा दिला होता की सुंदरबनच्या दिशेने एक अतितीव्र चक्रीवादळ येत आहे. काकद्वीपच्या दक्षिणेकडे सागर बेटाजवळ दुपारी साडेचारच्या सुमाराला ‘अम्फान’ धडकलं. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात काकद्वीप, कुलतली, नामखाना, पाथारप्रतिमा आणि सागर हे तालुके या ठिकाणाच्या जवळचे... आणि इथेच ‘अम्फान’ने सगळ्यात जास्त नुकसान केलंय.
२९ मे ला आम्ही काकद्वीप बस स्टॅंडहून दक्षिण काशियाबादला निघालो. ४० किलोमीटरचा हा पट्टा पार करायला दोन तास लागले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पडझड दिसत होती. झाडं उन्मळून पडली होती. घरं आणि दुकानं उद्ध्वस्त झाली होती.
दक्षिण काशियाबादला जाताना रस्त्यावरच नेताजी पंचायतमध्ये माधब नगर आहे. तिथे रंजन गायेन आणि त्यांचं कुटुंब त्यांच्या घराजवळच्या तळ्यात मासेमारी करत होतं. वादळाने आणलेल्या खाऱ्या पाण्यामुळे खरं तर तळं पार कामातून गेलंय. “या वर्षी गोड्या पाण्यातल्या माशांची शेती करण्यासाठी ७० हजार रुपये खर्च केले होते. सगळे मासे मेलेत आता. बाजारात नेऊन विकण्यासाठी थोडे तरी वाचलेत का ते पाहतोय... माझी नागवेलीची पानंही गेली. कर्जात बुडालोय आम्ही,” गायेन म्हणाला. त्याच्या एकूण नुकसानीचा आकडा आहे एक लाख रुपये. “आता सुखाचे दिवस आम्हाला कधीच दिसणार नाहीत, कधीच नाही.”
![](/media/images/02-04-_AMI3196-RM-RM.width-1440.jpg)
काकद्वीप तालुक्यामधल्या माधब नगरमध्ये राहाणारे रंजन गायेन आणि त्यांच्या कुटुंबाचं गोड्या पाण्यातल्या माशांचं तळं पार कामातून गेलं. त्यात खारं पाणी शिरलं. मातीखाली मासे असले तर ते बाजारात विकता येतील, म्हणून आता ते तळ्यातला चिखलच चिवडून बघतायत...
माधब नगरमध्येच प्रीतीलता रॉयही भेटली. काकद्वीपमधल्या बहुसंख्य स्त्रियांसारखी ती घरून ८० किलोमीटरवरच्या कोलकात्यातल्या जादवपूर भागात घरकामं करते. घरकामं हेच तिच्या उत्पन्नाचं मुख्य साधन. पण कोविड १९ च्या टाळेबंदीमुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तिचं काम बंद झालं. नंतर आलेल्या अम्फानच्या थैमानाने तिचं नागवेलीच्या पानांचा मळाही उद्ध्वस्त झाला. आपलं ३० हजारांचं नुकसान झाल्याचा तिचा अंदाज आहे.
दक्षिण काशियाबाद गावात पोहोचलो आणि ते उद्ध्वस्त गाव पाहून थिजूनच गेलो. नागवेलीचे पानमळे हेच तिथल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचं मुख्य साधन; पण गावातली सगळे मळे अक्षरशः वाहून गेलेत. इथले लोक गावात आणि आसपासच्या बाजारांत मासे, धान्य आणि विड्याची पानं विकतात. टाळेबंदीमध्ये बाजार बंद असल्यामुळे आधीच त्यांचं नुकसान होत होतं, अम्फानने त्यात आणखीच भर घातली.
“पिढ्यानपिढ्या आम्ही नागवेलीच्या पानांचे मळे जोपासतोय,” नाव सांगायला तयार नसलेला एक गावकरी म्हणाला. “महिन्याला आम्हाला २० ते २५ हजार रुपये मिळायचे त्यातून. टाळेबंदीने आमचा व्यवसाय मारला, अम्फानने तर आम्हालाच मारलं!” दक्षिण २४ परगणा जिल्ह्याच्या फलोत्पादन विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यातल्या नागवेलीच्या शेतकऱ्यांचं या चक्रीवादळाने २,७७५ कोटींचं नुकसान केलंय.
दक्षिण काशियाबादमधल्या शेतजमिनींमध्ये मे मधल्या चक्रीवादळानंतर खारं पाणी शिरलंय. “आधीही असं पाणी येत होतं; पण इतकं आतपर्यंत नाही यायचं ते. या वादळाने नुसतंच पिकांचं नुकसान नाही केलेलं; यापुढे ही जमीन कसण्यायोग्य राहाणारच नाही,” दुसरा एक शेतकरी म्हणाला. रबीमधला त्याचा बोरो तांदळाचा हंगाम टाळेबंदीमुळे मजूरच नसल्याने हातचा गेला. नंतर उन्हाळ्यात अवकाळी पाऊस आला आणि त्यानंतर अम्फान!
याच गावात नियोगी कुटुंब राहातं. ऑस्ट्रेलियन हिरव्या पोपटांची पैदास करणाऱ्या या भागातल्या काही मोजक्या कुटुंबांपैकी हे एक. विशेषतः कोलकात्यात हे छोटेसे पक्षी पाळले जातात. गावापासून आठ किलोमीटरवर असलेल्या नारायणगंज मार्केटमध्ये नियोगी हे पक्षी विकतात. अम्फानच्या त्या रात्री बरेच पिंजरे मोडले आणि त्यातले पक्षी उडून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातल्या लोकांनी काही पक्षी पकडले, पण बरेचसे उडूनच गेले... त्यांच्याबरोबर गेली ती त्यांच्या पैदाशीसाठी, त्यांना वाढवण्यासाठी केलेली २० हजार रुपयांची गुंतवणूक!
काहीचं नुकसान मात्र लाखांत आहे. मानब तीर्थ प्राथमिक शाळा या वादळाने पार उद्ध्वस्त केली आहे. शाळेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य माधब दास म्हणतात, “शाळा पुन्हा उभी करण्यासाठी आम्हाला अडीच लाख रुपयांची गरज आहे. आमच्याकडे एवढा निधी नाही आणि पावसाळा तर तोंडावर आलाय. पण मुलांच्या शिक्षणाचं नुकसान कसं करणार? आता इतर सगळ्या समस्या बाजूला ठेवून आम्हाला शाळा बांधायला हवी.”
कधी वादळ, कधी खारं पाणी, तर कधी आणखी काही... सुंदरबनमधल्या कित्येकांनी यापूर्वीही हेच केलंय... शून्यातून पुन्हा नव्याने सुरुवात!
![](/media/images/03-01-_AMI3183-RM.width-1440.jpg)
अम्फान चक्रीवादळाने २० मे रोजी सुंदरबनमध्ये जवळजवळ बारा तास धुमाकूळ घातला. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या या अतितीव्र चक्रीवादळाने गंगेच्या खोऱ्यात झाडं उखडून टाकली, घरं उद्ध्वस्त केली आणि शेतांचं अपरिमित नुकसान केलं.
![](/media/images/04-05-_AMI3273-RM.width-1440.jpg)
कोविड १९ टाळेबंदीमध्ये मासेमारीवर जे निर्बंध घातले गेले होते, त्यामुळे दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातल्या मच्छिमारांचं उत्पन्न जवळजवळ बंदच झालं होतं. वादळाने त्यांचे ट्रॉलर्स आणि बोटींची पार दशा झाली आणि त्यांची उपजीविकाच बंद झाली
![](/media/images/05-02-_AMI3364-RM.width-1440.jpg)
खाऱ्या पाण्यामुळे तळी काळी झाली. काकद्वीप तालुक्यातल्या दक्षिण काशियाबाद गावातला एक शेतकरी म्हणाला की चक्रीवादळामुळे समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे भले मोठे फवारे उडत होते आणि ते पाणी आत येत होतं. त्यामुळे झाडांमधलं पाणीच निघून गेलं, ती शुष्क झाली. “त्यांची पानं पिवळी झाली, ती तळ्यात पडली आणि पाणी विषारी झालं.”
![](/media/images/06-07-_AMI3282-RM.width-1440.jpg)
पाथारप्रतिमा तालुक्यामधल्या भजना गावातल्या साहेब मुल्लांच्या शेतातली भात आणि नागवेल, दोन्ही पिकं गेली. वादळाने त्याचं घरही पाडलं. “ते पुन्हा बांधायला माझ्याजवळ पैसेच नाहीत. मला काहीच बोलायचं नाहीये त्याबद्दल,” ते म्हणतात.
![](/media/images/07-06-_AMI3220-RM_copy-RM.width-1440.jpg)
काकद्वीप तालुक्यातल्या माधब नगरची प्रीतीलता रॉय कोलकात्यात घरकाम करत होती. लॉकडाऊनमध्ये ते काम सुटलं. तिच्या उत्पन्नाचं मुख्य साधनच गेलं. नागवेलीचा मळा होता, पानं विकून घर चालवायचं, असं तिने ठरवलं होतं. पण सोसाट्याच्या वादळाने नागवेलीचे नाजूक वेल वाहून नेले.
![](/media/images/08-08-_AMI3352-RM.width-1440.jpg)
दक्षिण काशियाबादमधल्या मानब तीर्थ प्राथमिक शाळेच्या कोसळलेल्या छताखालीच तिथले शिक्षक स्वपन नायक बसतात. या खाजगी शाळेतल्या सात शिक्षकांपैकी ते एक. जवळच्या गावांतली मिळून एकूण १०० मुलं शाळेत आहेत. छताबरोबरच अम्फानने तळमजल्यावरच्या वर्गखोल्यांचंही प्रचंड नुकसान केलं.
![](/media/images/09-09-_AMI3227-RM.width-1440.jpg)
काकद्वीप तालुक्यातल्या बापूजी ग्राम पंचायतीतला हा शेतकरी पानमळ्याचा आधार असणारा बांबूचा मांडव, बोरोज, कसा मोडलाय ते पाहातोय. “माझी सगळी गुंतवणूक वाया गेलीये. हे सगळं पुन्हा उभं करणं खूपच मोठं काम आहे. सात-आठ तरी मजूर लागतील हे सगळं बांधायला. टाळेबंदीमुळे आता माझ्याकडे पैसेही नाहीत आणि मजूरही...” तो म्हणतो.
![](/media/images/10-10-_AMI3387-RM.width-1440.jpg)
दक्षिण काशियाबादमध्ये समुद्राचं खारं पाणी शेतात घुसलं आणि शेतं तळ्यांसारखी दिसायला लागली. उभी पिकं नष्ट झालीच; पण जमिनीचीही धूप झाली. या जमिनीत आता शेती होऊच शकणार नाही, असं गावकऱ्यांना वाटतंय.
![](/media/images/11-_AMI3233-RM.width-1440.jpg)
अम्फानने घातलेल्या थैमानाच्या खुणा काकद्वीपमध्ये सर्वत्र दिसतात... हे न्हाव्याचं दुकानही त्यातून सुटलं नाही.
![](/media/images/12-_AMI3248-RM.width-1440.jpg)
काकद्वीप तालुक्यातल्या नेताजी पंचायतात पडझड झालेल्या एका घरासमोर खेळणारी मुलगी
![](/media/images/13-14-_AMI3449-RM.width-1440.jpg)
दक्षिण काशियाबादमधल्या काही कुटुंबांनी वादळात पडझड झालेली आपली घरं दुरुस्त करायला सुरुवात केली आहे. “सरकारी मदत येईपर्यंत कोण वाट पाहतंय? आपणच आपल्या कामाला सुरुवात केलेली बरी...” गावातला एक मजूर म्हणतो.
![](/media/images/14-_AMI3287-RM.width-1440.jpg)
“मी नुकतंच या घराचं छत बांधलं होतं. गेलं ते आता... मला ते पुन्हा बांधावं लागेल. आणि त्यासाठी वेळ लागेल खूप,” भजना गावातला मोहम्मद कासीम म्हणतात.
![](/media/images/15-11-_AMI3395-RM.width-1440.jpg)
दक्षिण काशियाबादमधली छोटी मुनिया आणि वादळाच्या रात्री उडून गेले त्यातला तिने पकडलेला एक ऑस्ट्रेलियन पोपट. तिचं कुटुंब हे पक्षी जोपासतं आणि जवळच्या बाजारात पाळीव पक्षी म्हणून विकतं. चक्रीवादळामुळे बरेच पिंजरे मोडले आणि पक्षी उडून गेले.
![](/media/images/16-13-_AMI3215-RM.width-1440.jpg)
वादळाने आणलेल्या मुसळधार पावसात माधब नगरमधल्या छोटू गायेनची पुस्तकं पार भिजून गेली. पण त्याचा उत्साह अजिबात कमी झालेला नाही. “अपघात तर होतातच. मला नाही फार काळजी वाटत त्याची...” तो म्हणतो.
![](/media/images/17-15-_AMI3293-RM.width-1440.jpg)
दक्षिण काशियाबादजवळ मातीच्या बांधावरून चालत असलेली एक महिला. शेजारचं अर्धं शेत पाण्याखाली आहे, उरलेलं अर्धं मात्र वाचलंय.
![](/media/images/18-cover1-RM.width-1440.jpg)
दक्षिण काशियाबाद गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरची ही झाडं... वादळाने त्यांची पानंच ओरबाडून नेलीत.
अनुवादः वैशाली रोडे