किर्र काळोख होता. पण सूर्योदयाची वाट पाहणं त्यांना परवडण्यासारखं नव्हतं. मध्यरात्र होती, २ वाजले होते. तीन तासात त्यांना पकडण्यासाठी पोलिस तिथे पोचले असते. कसरापू धनराजू आणि त्यांचे दोन साथीदार पोलिसांचा पहारा सुरू होण्याच्या आतच निसटले. आणि अगदी थोड्याच वेळात ते मुक्त होते – दर्यावर.
“मी सुरुवातीला फार घाबरलो होतो,” १० एप्रिलला ते कसे निसटले त्याबद्दल ते सांगतात. “मला सगळा धीर गोळा करावा लागला होता. पैशाची निकड होती. भाडं थकलं होतं.” ४४ वर्षीय धनराजू आणि त्यांचे साथीदार – सगळेच हातघाईला आलेले मच्छीमार – मोटर लावलेल्या त्यांच्या छोट्या होडीतून समुद्रात पसार झाले. टाळेबंदीमुळे बंदरावरची मासेमारी आणि इतर कामं थांबवण्यात आली आहेत. रोज पहाटे ५ वाजता, विशाखापटणमच्या फिशिंग हार्बर (मासेमारीचा धक्का)च्या दोन्ही प्रवेशद्वारांवर पोलिस येतात. इथल्या बाजारात आता लोक आणि मच्छीमार, कुणीच येऊ शकत नाहीत.
सूर्योदयापूर्वी धनराजू ६-७ किलो बंगारू ठिगा (कॉमन कार्प) घेऊन परत आले पण “ते सगळं जरा धोक्याचंच होतं,” ते सांगतात. “मी परत आलो आणि काही मिनिटातच पोलिस आले. मी त्यांच्या हातात सापडलो असतो ना तर त्यांनी मला मारलं असतं. पण गळ्याशी आलं की जीव वाचवायला काहीही करावं लागतं. आज मी भाडं भरेन. पण उद्या आणखी काही तरी निघणार. मला काही कोविड-१९ झाला नाहीये, पण त्याच्या आर्थिक झळा मला बसतायतच.”
पोलिसांपासून लपून, स्वतःच्या जुन्या गंजलेल्या रोमा सायकलवर एक फळा आडवा टाकला आणि त्या स्टॉलवरून चेंगर लाव पेटामधल्या एनटीआर बीच रोडवर त्यांनी गुपचुप मासळी विकली. “मला मेन रोडवर सायकल नेता यायला पाहिजे होती, पण पोलिसांची भीती होती,” धनराजू सांगतात. एरवी २५० रुपये किलो भावाने विकला जाणारा मासा त्यांनी १०० रु. किलोने विकला.
एरवी धनराजूंना ६-७ किलो कार्पच्या विक्रीतून १५००-१७०० रुपये मिळाले असते. पण सायकलवरच्या त्यांच्या स्टॉलकडे फारसं कुणाचं लक्ष गेलं नाही. त्यामुळे त्यांना दोन दिवस ही मासळी विकावी लागली आणि अखेर ते केवळ रु. ७५० कमवू शकले. त्यांच्यासोबत पाप्पू देवी होत्या. ४६ वर्षीय देवी गिऱ्हाइकांना मासळी साफ करून, कापून देतात. प्रत्येक गिऱ्हाइकाकडून त्यांना या कामाचे १०-२० रुपये मिळतात. पैशासाठी त्याही धोका पत्करून काम करत होत्या.










