छातीच्या पुनर्रचनेच्‍या शस्‍त्रक्रियेविषयी (Chest Reconstruction Surgery) चौकशी करण्‍यासाठी हरयाणामधल्‍या रोहतकच्‍या जिल्हा रुग्‍णालयात सुमित (नाव बदललंय) पहिल्‍यांदा गेला, तेव्‍हा तो नुकताच १८ वर्षांचा झाला होता. ‘ही शस्‍त्रक्रिया करून घ्यायची असेल तर तुला जळिताचा रुग्‍ण म्हणून रुग्‍णालयात दाखल व्‍हावं लागेल,’ तिथे त्‍याला सांगितलं गेलं.

असं खोटं सांगायचं? का? ज्‍या शरीरात आपण जन्‍माला आलो, ते बदलून आपल्‍याला ज्‍यात आरामदायी (कम्‍फर्टेबल) वाटेल असं शरीर करून घ्यायला हवं, असं पारलिंगी व्‍यक्‍तींना प्रकर्षाने वाटत असतं. मात्र भारतातल्‍या या समुदायाला इथल्‍या गुंतागुंतीच्‍या न्‍यायवैद्यकाच्‍या कचाट्यातून सुटण्‍यासाठी चक्‍क खोट्याचा आधार घ्यावा लागतो. आणि तरीही, प्रत्येक वेळी या खोट्याचा उपयोग होतो, असंही नाही.

सुमितला असं अजब उत्तर मिळाल्‍यानंतर तो कागदपत्रं गोळा करत राहिला, वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या डॉक्टरांचे सल्‍ले घेत राहिला, असंख्य वेळा मानसिक चाचण्‍या करत राहिला, कर्ज घेऊन लाखभर रुपयांचा खर्च करत राहिला, ताणलेले कौटुंबिक संबंध सहन करत राहिला, आपल्‍या शरीरावर असलेल्‍या स्‍तनांचा तिरस्‍कार करत राहिला… या सगळ्यात आठ वर्षं लोटली आणि मग सुमितने रोहतकपासून १०० किलोमीटरवर असलेल्‍या हिसारच्‍या एका खाजगी रुग्‍णालयात आपली ‘टॉप सर्जरी’ (बोली भाषेत ही शस्‍त्रक्रिया याच नावाने ओळखली जाते) करून घेतली.

त्‍यालाही आता दीड वर्ष उलटून गेलंय, पण २६ वर्षांचा सुमित आजही खांदे पाडून, पोक काढून चालतो. शस्‍त्रक्रिया होण्‍यापूर्वी आपल्‍या स्‍तनांमुळे तो अस्‍वस्‍थ असायचा, त्‍याला त्‍यांची लाज वाटायची. ते दिसू नयेत, म्‍हणून मग तो पोक काढून चालत असे. त्‍याची ती सवय अजूनही गेलेली नाही.

जन्‍मतः जे लिंग असतं, ते आपलं नाहीच, आपलं लिंग वेगळं आहे, आपलं शरीरही वेगळं असायला हवं, असं भारतात नेमकं किती जणांना वाटतं, त्‍याची ताजी आकडेवारी आज उपलब्‍ध नाही. राष्ट्रीय मानवी हक्‍क आयोगाच्‍या सहकार्याने केल्‍या गेलेल्‍या एका अभ्यासानुसार २०१७ मध्ये भारतातल्‍या पारलिंगी व्‍यक्‍तींची संख्या ४.८८ लाख होती.

२०१४ मध्ये ‘नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी’ विरुद्ध भारत सरकार या खटल्‍यात सर्वोच्‍च न्‍यायालयाने एक महत्त्वाचा निकाल दिला. या निकालाने ‘तृतीयपंथा’ला संविधानिक मान्‍यता दिली. पारलिंगी व्‍यक्‍तींनी स्‍वतः निवडलेल्‍या लिंगभावानुसार राहाण्‍याचा, वागण्‍याचा हक्‍क दिला आणि त्‍यांना सर्व आरोग्‍य सुविधा मिळतील, याची काळजी घेण्‍याचे सर्व सरकारांना निर्देश दिले. (‘नाल्‍सा जजमेंट’ म्हणून हा निकाल प्रसिद्ध आहे.) त्‍यानंतर पाच वर्षांनी ‘ट्रान्‍सजेंडर व्‍यक्‍ती (संरक्षण आणि अधिकार) कायदा, २०१९’ आला आणि त्‍याने पारलिंगी समुदायाला समग्र आरोग्‍यसुविधा देण्‍याच्‍या शासनाच्‍या कर्तव्‍यावर शिक्‍कामोर्तब केलं. या आरोग्‍य सुविधांमध्ये लिंगबदल शस्‍त्रक्रिया, हार्मोन थेरपी आणि मानसिक आरोग्‍यसेवा यांचा समावेश होता.

PHOTO • Ekta Sonawane

जन्‍माने मुलगी असलेल्‍या सुमितचा जन्‍म हरयाणामधल्‍या रोहतक जिल्‍ह्यात झाला. अगदी तीन वर्षांचा असतानाही फ्रॉक घातल्‍यावर आपल्‍याला किती अस्‍वस्‍थ वाटायचं, ते सुमितला आठवतंय

कायद्यांमध्ये हे बदल होण्‍यापूर्वी, बहुसंख्य पारलिंगी व्‍यक्‍तींना शस्‍त्रक्रियेने आपला लिंगबदल करून घेण्‍याची संधीच मिळत नसे. या लिंगबदल शस्‍त्रक्रियेत चेहर्‍याची शस्‍त्रक्रिया, छातीवरची ‘टॉप सर्जरी’ आणि गुप्‍तांगांवरची ‘बॉटम सर्जरी’ यांचा समावेश असतो.

सुमितलाही अशा प्रकारची शस्‍त्रक्रिया करण्‍याची संधी तब्‍बल आठ वर्षं मिळाली नव्‍हती… अगदी २०१९ नंतरही मिळाली नव्‍हती.

हरयाणामधल्‍या रोहतक जिल्ह्यात एका दलित कुटुंबात मुलगी म्हणून सुमितचा जन्‍म झाला. त्‍याच्‍या धाकट्या तीन भावंडांसाठी तोच जणू पालक बनला. त्‍याचे वडील सरकारी नोकरीत होते. त्‍यांच्‍या कुटुंबात सरकारी नोकरीत असलेले ते पहिलेच. पण सुमितच्‍या आई-वडिलांचे संबंध ताणलेले होते आणि त्‍यामुळे वडील घरापासून दूरच राहात असत. त्‍याचे आजी-आजोबा शेतमजूर होते. पण सुमित लहान असतानाच दोघांचाही मृत्‍यू झाला. आता सुमित घरातली ‘मोठी मुलगी’, साहजिकच संपूर्ण घराची आणि घरचं, भावंडांचं सगळं करण्‍याची जबाबदारी त्‍याच्‍यावर आली. खरं तर सुमितला स्‍वतःला आपण मुलगी आहोत हे मान्‍यच नव्‍हतं आणि त्‍यामुळे घरातल्‍या मोठ्या मुलीची जबाबदारी आपण उचलायला हवी, असंही वाटत नव्‍हतं. ‘‘मी पुरुष म्हणूनच घरच्‍या सर्व जबाबदार्‍या पूर्ण केल्‍या,’’ तो म्हणतो.

अगदी तीन वर्षांचा असतानासुद्धा फ्रॉक घातला की किती अस्‍वस्‍थ वाटायचं, ते सुमितला आजही आठवतंय. पण हरयाणाची क्रीडा संस्‍कृती सुमितच्‍या मदतीला धावून आली. तिथे मुलींनी ‘मुलींचे’ कपडे घातले नाहीत, अगदी  ‘मुलांचे’, खेळाचे कपडे घातले तरी कोणाच्‍या भुवया वर होत नाहीत. ‘‘मी मोठा होत असताना नेहमी मला जे हवे ते आणि तसेच कपडे घालत असे. माझ्‍या (टॉप) शस्‍त्रक्रियेआधीही मी मुलगा म्हणूनच राहात होतो,’’ सुमित म्हणतो. मात्र अजूनही, काहीतरी चुकीचं घडलंय असंच मला वाटतंय, हेही आवर्जून सांगतो.

मुलगी म्हणून जन्‍माला आलो असलो तरी आपण मुलगा आहोत, असं सुमितला प्रकर्षाने वाटत होतं. आणि मुलगा आहोत तर आपलं शरीरही मुलासारखंच असायला हवं, असं त्‍याला ठामपणे वाटायला लागलं. साधारण तेरा वर्षांचा होता तो त्‍या वेळी. ‘‘मी बारीक होतो, सडपातळ शरीराचा. स्‍तनांचे उभार फार नव्‍हतेच. पण तरीही जे काही होते, ते मला डाचत होते,’’ तो सांगतो. आपण मुलगा असल्‍याची ठाम भावना, जवळजवळ खात्री, यापलीकडे मात्र आपल्‍या अस्‍वस्‍थतेचं कारण सुमितला कळत नव्‍हतं. आपलं जन्‍मजात लिंग आणि लैंगिक ओळख वेगवेगळे आहेत आणि त्‍यामुळे आपल्‍याला ही अस्‍वस्‍थता येते आहे, याची त्‍याला कल्‍पनाच नव्‍हती.

त्‍याच वेळी एक मैत्रीण त्‍याच्‍या मदतीला धावून आली.

सुमित त्‍या वेळी आपल्‍या कुटुंबासह भाड्याच्‍या घरात राहात होता. घरमालकाच्‍या मुलीशी त्‍याची मैत्री झाली. तिच्‍याकडे इंटरनेट होतं आणि त्‍याच्‍या मदतीने तिने सुमितला हव्‍या असलेल्‍या छातीच्‍या शस्‍त्रक्रियेची माहिती मिळवली. हळूहळू सुमितला शाळेत पारलिंगी मुलं कोण आहेत ते कळायला लागलं आणि त्‍यांचा एक गट बनला. कोणाला कमी, कोणाला अधिक, पण या मुलांनाही अस्‍वस्‍थता जाणवत होती. सुमितने पुढची काही वर्षं ऑनलाइन, तसंच मित्रांकडून अनेक प्रकारची माहिती मिळवली आणि शस्‍त्रक्रियेची चौकशी करण्‍यासाठी थेट रुग्‍णालयात जाण्‍याची हिंमत तो गोळा करत राहिला.

घराजवळच्‍या मुलींच्‍या शाळेतून सुमित बारावी झाला ते वर्ष होतं २०१४. तो नुकताच १८ वर्षांचा झाला होता. वडील कामावर गेले होते, आईही घरी नव्‍हती. सुमितला थांबवायला, प्रश्‍न विचारायला आणि आधार द्यायलाही कोणीच नव्‍हतं. तो एकटाच मग रोहतकच्‍या जिल्हा रुग्‍णालयात गेला आणि घाबरतघाबरतच त्‍याने स्‍तन काढून टाकण्‍याच्‍या शस्‍त्रक्रियेबद्दल चौकशी केली.

PHOTO • Ekta Sonawane

ट्रान्‍समेन’साठी  अगदी मर्यादित पर्याय असतात. त्‍यांच्‍या लिंगबदल शस्‍त्रक्रियेसाठी अतिशय कुशल स्‍त्रीरोगतज्‍ज्ञ, मूत्ररोगतज्‍ज्ञ आणि प्‍लास्टिक सर्जन यांची गरज असते

त्‍याला तिथे जी उत्तरं मिळाली, ती ऐकून सुमित चक्रावला.

‘‘तुझी ब्रेस्‍ट रिकन्‍स्‍ट्रक्‍शन सर्जरी होईल, पण ती जळित रुग्‍ण म्हणून,’’ त्‍याला तिथे सांगण्‍यात आलं. जळित विभाग आणि अपघाताच्‍या केसेस यात अधूनमधून प्‍लास्टिक सर्जरीची गरज भासत असे. पण सुमितला मात्र कागदावर सपशेल खोटं लिहायला सांगण्‍यात आलं… जळिताचा रुग्‍ण म्हणून त्‍याची नोंद होणार होती. जी शस्‍त्रक्रिया त्‍याला हवी आहे, तिचा उल्‍लेखच करायचा नव्‍हता! या शस्‍त्रक्रियेचं  शुल्‍कही द्यायचं नव्‍हतं. खरं तर अगदी सरकारी रुग्‍णालयांमध्येही ब्रेस्‍ट रिकन्‍स्‍ट्रक्‍शन सर्जरी किंवा जळिताशी संबंधित शस्‍त्रक्रिया मोफत होत नव्‍हत्‍या.

काही असो, पैसे द्यायचे नव्‍हते आणि त्‍यामुळे सुमितला या वाटेवर पुढे जावंसं वाटलं. आता आपल्‍याला जसं हवं तसं होईल, अशी आशाही वाटली त्‍याला. आणि म्हणूनच पुढचं दीड वर्ष तो रुग्‍णालयात चकरा मारत राहिला. याच कळात त्‍याला जाणवलं, या शस्‍त्रक्रियेची किंमत एका वेगळ्याच स्‍वरूपात चुकवावी लागते आहे. ती होती मानसिक किंमत.

‘‘तिथले डॉक्‍टर्स खूपच ‘जजमेंटल’ होते. मला ते भ्रमिष्ट म्हणत आणि विचारत, ‘का करतोयस ही शस्‍त्रक्रिया? असाही तुला हव्‍या त्‍या मुलीबरोबर राहू शकतोस की!’ ते सहा-सात जण माझ्‍यावर प्रश्‍नांचा भडिमार करत. मी घाबरून जात असे,’’ ते दिवस सुमितला जसेच्‍या तसे आठवतात.

‘‘दोन-तीन वेळा मी तिथे अर्ज भरले. ५००-७०० प्रश्‍न असत एकेका फॉर्ममध्ये.’’ काय होते असे हे प्रश्‍न? त्‍यात होती रुग्‍णाची वैद्यकीय पार्श्वभूमी, कौटुंबिक पार्श्वभूमी, त्‍याची मानसिक स्थिती, व्‍यसन असेल तर त्‍याविषयी. पण सुमितसारख्या तरुणाला वाटे, का भंडावून सोडतायत हे प्रश्‍न विचारून? त्‍यांना आपला अर्ज धुडकावूनच लावायचाय आणि म्हणून हे सगळं सुरू आहे, अशी भावना मनात यायची. ‘‘मी माझ्‍या शरीरात खुश नव्‍हतो आणि म्हणून मला ‘टॉप सर्जरी’ करून घ्यायची होती, हे त्‍यांना समजतच नव्‍हतं,’’ तो सांगतो.

सहानुभूती नव्‍हती ही एक गोष्ट, दुसरीकडे, लिंगबदल शस्‍त्रक्रिया करून आपलं लिंग बदलावं की नाही, याबद्दल भारतातल्‍या पारलिंगी समुदायाला वैद्यकीय आणि वैज्ञानिक सल्‍ला देण्‍यासाठी आवश्‍यक ते ज्ञान आणि कौशल्‍य वैद्यकीय समुदायाकडे नव्‍हतं.

पुरुष ते स्‍त्री या लिंगबदल शस्‍त्रक्रियेत दोन मोठ्या शस्‍त्रक्रियांचा समावेश असतो, ‘ब्रेस्‍ट इम्‍प्‍लान्‍ट’ आणि ‘व्‍हजायनोप्‍लास्‍टी’. स्‍त्री ते पुरुष या लिंगबदल शस्‍त्रक्रियेत मात्र गुंतागुंतीच्‍या सात मोठ्या शस्‍त्रक्रिया असतात. त्‍यातली पहिली असते ‘टॉप सर्जरी’, अर्थात स्‍तन काढून टाकण्‍याची शस्‍त्रक्रिया.

‘‘मी मेडिकलचा विद्यार्थी होतो तेव्‍हा, साधारण २०१२ च्‍या सुमाराला, वैद्यकीय अभ्यासक्रमात अशा शस्‍त्रक्रियांचा उल्‍लेखही नव्‍हता. आमच्‍या प्‍लास्टिक सर्जरीच्‍या अभ्यासक्रमात पुरुषाच्‍या जननेंद्रियाची पुनर्ररचना करण्‍याच्‍या काही प्रोसीजर्स होत्‍या, मात्र त्‍या अपघात आणि मोठ्या दुखापती या संदर्भात होत्‍या. आता मात्र गोष्टी खूपच बदलल्‍या आहेत,’’ दिल्‍लीच्‍या सर गंगा राम रुग्‍णालयाच्‍या प्‍लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. भीम सिंग नंदा सांगतात.

PHOTO • Ekta Sonawane

२०१९ चा कायदा पारलिंगी समुदायासाठी आवश्‍यक वैद्यकीय सेवा आणि ज्ञानाच्‍या दृष्‍टीने अभ्यासक्रमाचं परीक्षण आणि संशोधन करणं गरजेचं असल्‍याचं सांगतो. पण, कायदा होऊन पाच वर्षं झाल्‍यावरही, लिंगबदल शस्‍त्रक्रिया सहज आणि सामान्‍य माणसाला परवडण्याजोगी व्हावी यासाठी फार प्रयत्‍न झाल्‍याचं दिसत नाही

२०१९ चा ट्रान्‍सजेंडर व्‍यक्‍ती कायदा हा महत्त्वाचा आणि मैलाचा दगड ठरावा असा कायदा आहे. हा कायदा पारलिंगी समुदायासाठी आवश्‍यक असणार्‍या वैद्यकीय सेवा आणि ज्ञानाच्‍या दृष्‍टीने वैद्यकीय अभ्यासक्रमाचं परीक्षण आणि संशोधन करण्‍याची आवश्‍यकता असल्‍याचं सूचित करतो. पण आज, कायदा होऊन जवळपास पाच वर्षं झाल्‍यावरही त्‍या दिशेने, लिंगबदल शस्‍त्रक्रिया सहज उपलब्‍ध आणि सामान्‍य माणसाला परवडेल अशी करण्‍यासाठी सरकारी पातळीवरून मोठ्या प्रमाणावर प्रयत्‍न झाल्‍याचं दिसत नाही. सरकारी रुग्‍णालयंदेखील लिंगबदल शस्‍त्रक्रियांपासून दूरच राहिली आहेत.

‘ट्रान्‍समेन’(स्‍त्री ते पुरुष)साठी अगदी मर्यादित पर्याय असतात. त्‍यांच्‍या लिंगबदल शस्‍त्रक्रियेसाठी अतिशय कुशल स्‍त्रीरोगतज्‍ज्ञ, मूत्ररोगतज्‍ज्ञ आणि प्‍लास्टिक सर्जन यांची गरज असते. ‘‘या क्षेत्रात प्रशिक्षण घेतलेले आणि हे कौशल्‍य असलेले खूपच कमी वैद्यकीय व्‍यावसायिक आहेत. त्‍यातही सरकारी रुग्‍णालयांत अगदी मोजकेच,’’ ट्रान्‍समन कार्तिक बिट्टू कोंडिया सांगतात. ते ‘तेलंगणा हिजडा इंटरसेक्‍स ट्रान्‍सजेंडर समिती’चे कार्यकर्ते आहेत.

पारलिंगी समुदायासाठी सरकारी पातळीवरच्‍या मानसिक आरोग्‍य सेवेची स्थितीही तितकीच दयनीय आहे. रोजच्‍या जगण्‍यातल्‍या अडचणी सोडवण्‍यासाठी या समुदायाला समुपदेशनाची गरज असतेच; पण शिवाय लिंगबदल शस्‍त्रक्रिया करायची असेल तर त्‍यापूर्वी समुपदेशन करणं कायद्याने बंधनकारक आहे. एखादी पारलिंगी व्‍यक्‍ती लिंगबदल शस्‍त्रक्रियेसाठी पात्र आहे याची खात्री करून घेण्‍यासाठी तिला ‘जेंडर आयडेंटिटी डिसऑर्डर’ असल्‍याचं प्रमाणपत्र आणि तपासणीचा अहवाल मानसशास्‍त्रज्ञ किंवा मानसोपचार तज्‍ज्ञाकडून घ्यावा लागतो. त्‍याचे निकष ठरलेले असतात. लिंगबदल शस्‍त्रक्रियेची संपूर्ण प्रक्रिया, तिचे परिणाम याची तपशीलवार माहिती देऊन रुग्‍णाची संमती घ्यावी लागते. आपलं जे लिंग आहे असं रुग्‍णाला वाटतं आहे, त्‍यासह तो किती काळ जगतो आहे; त्‍याच्‍या ‘जेंडर डिस्‍फोरिया’ची, म्हणजे वेगळं लिंग असण्‍यामुळे येणार्‍या अस्‍वस्‍थतेची पातळी काय आहे; त्‍याचं वय आणि मानसिक आरोग्‍याची सखोल तपासणी या बाबी विचारात घेतल्‍या जातात. मानसशास्‍त्रज्ञ किंवा मानसोपचारतज्‍ज्ञ यांच्‍याबरोबर आठवड्यातून एक, असं कमीतकमी एक सत्र आणि जास्‍तीत जास्‍त चार सत्रं यासाठी लागू शकतात.

सर्वोच्‍च न्‍यायालयाने २०१४ मध्ये दिलेल्‍या ‘नाल्‍सा जजमेंट’ला आता जवळपास दहा वर्षं झाली आहेत. अद्यापही परिस्थिती सुधारलेली नाही.  रोजच्‍या जगण्यासाठी असो की लिंगबदलाचा प्रवास सुरू करण्‍यासाठी, पारलिंगी व्‍यक्‍तींसाठी समुपदेशन अतिशय महत्त्वाचं आहे. मात्र सर्वसमावेशक, सहानुभूतीपूर्वक दिलेली मानसिक आरोग्‍य सेवा, हे अद्यापही दूरचं स्‍वप्‍न आहे आणि यावर पारलिंगी समुदायाचं एकमत आहे.

‘‘जिल्‍हा रुग्‍णालयात ‘टॉप सर्जरी’साठी माझं समुपदेशन तब्‍बल दोन वर्षं सुरू होतं,’’ सुमित सांगतो. नंतर हळूहळू, २०१६ मध्ये त्‍याने तिथे जाणं थांबवलं. ‘‘एका टप्‍प्‍यानंतर तुम्‍ही थकून जाता.’’

प्रचंड थकवा असला, तरी आपलं लिंग ठरवण्‍याची आणि त्‍याला पुष्टी देण्‍याची सुमितची इच्‍छा त्‍याच्‍या वरचढ ठरली. शेवटी त्‍याने स्‍वतःच स्‍वतःला मदत करायचं ठरवलं. आपल्‍याला नेमकं काय वाटतं, आपल्‍या काय भावना आहेत, सगळ्यांनाच असं वाटत असतं का, आपल्‍याला हे नेहमी आणि सतत वाटतं का, याबद्दल त्‍याने स्‍वतःच संशोधन केलं. लिंगबदल शस्‍त्रक्रियेचे कोणते परिणाम होतात आणि भारतात ही शस्‍त्रक्रिया कुठे होते, याचा शोध घेतला.

हे सगळं करत असताना तो त्‍याच्‍या कुटुंबाबरोबरच राहात होता आणि त्‍यामुळे कुणालाही कळू न देता सारं करत होता. त्‍याने मेहंदी कलाकार आणि कपड्याचा शिंपी म्हणून काम करायला सुरुवात केली. त्‍यातून मिळणारे पैसे तो आपल्‍या ‘टॉप सर्जरी’साठी साठवायला लागला.

PHOTO • Ekta Sonawane
PHOTO • Ekta Sonawane

तीनतीन कामं करत असूनही सुमितला आपला सगळा खर्च भागवणं कठीण होतं आहे. त्‍याला नियमित काम मिळत नाही, त्‍यामुळे त्‍याच्‍यावर अजून ९०,००० रुपयांचं कर्ज आहे

२०२२ मध्ये सुमितने पुन्‍हा एक प्रयत्‍न केला. ट्रान्‍समन असलेल्‍या आपल्‍या एका मित्रासोबत १०० किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास करून तो रोहतकहून हिसारला गेला. तिथे एका खाजगी मानसशास्‍त्रज्ञांना भेटला. त्‍यांनी दोन वेळा त्‍याचं समुपदेशन केलं, त्‍याचे २३०० रुपये घेतले आणि त्‍याला सांगितलं की, पुढचे दोन आठवडे तू टॉप सर्जरी करायला पात्र आहेस.

त्‍यानंतर हिसारच्‍या एका खाजगी रुग्‍णालयात सुमितला चार दिवस दाखल करण्‍यात आलं. शस्‍त्रक्रिया आणि रुग्‍णालयातलं राहाणं मिळून एक लाख रुपयांच्‍या आसपास बिल झालं. ‘‘तिथले डॉक्‍टर्स आणि इतर कर्मचारी खूपच प्रेमळ होते. सरकारी रुग्‍णालयात मी जो अनुभव घेतला होता, त्‍यापेक्षा अगदी वेगळा आणि सुखद असा हा अनुभव होता,’’ सुमित सांगतो.

पण त्‍याचा हा आनंद फार काळ टिकला नाही.

रोहतकसारख्या छोट्या शहरात ‘टॉप सर्जरी’ करणं म्हणजे ‘बाहेर येणं’, आपण लैंगिक अल्‍पसंख्य, एलजीबीटीक्‍यूआयए+ या समुदायातले आहोत असं जाहीर करणं. सुमितचं गुपित आता उघड झालं होतं आणि त्‍याचं कुटुंब ते स्‍वीकारू शकत नव्‍हतं. शस्‍त्रक्रियेनंतर काही दिवसांनी सुमित रोहतकमध्ये आपल्‍या घरी आला तर त्‍याचं सामान घराच्‍या बाहेर फेकून दिलेलं होतं. ‘‘माझ्‍या कुटुंबाने मला निघून जायला सांगितलं. ना आर्थिक मदत, ना भावनिक आधार. माझी परिस्थिती काय असेल, याची त्‍यांनी पर्वाच केली नाही.’’ टॉप सर्जरीनंतरही कायद्याने सुमित अद्याप मुलगीच होता. पण तरीही तो मुलगा झालाय तर आता वाडवडिलांच्‍या मालमत्तेवर दावा करेल की काय, असं लोक बोलायला लागले. ‘‘काहीजण तर असंही सुचवायला लागले की मी आता कामाला लागावं आणि पुरुष म्हणून असणार्‍या जबाबदार्‍या पूर्ण कराव्‍यात.’’

लिंगबदल शस्‍त्रक्रियेनंतर काही महिने रुग्‍णांना सगळ्या गोष्टी हळूहळू, सावकाश करण्‍याचा सल्‍ला दिला जातो. काही गुंतागुंत होण्‍याची शक्यता लक्षात घेऊन शक्‍यतो रुग्‍णालयाच्‍या जवळपास राहायला सांगितलं जातं. पारलिंगी व्‍यक्‍तींवर, विशेषतः जे अल्‍प उत्‍पन्‍न गटातले असतात त्‍यांच्‍यावर आर्थिक बोजा असतो, काही प्रमाणात व्‍यवस्‍थांचाही बोजा असतो. सुमितला एकदा हिसारला जायला आणि मग तिथून यायला तीन तास आणि ७०० रुपये लागत. त्‍याने किमान दहा वेळा अशी ये-जा केली.

टॉप सर्जरीनंतर बाइंडर म्हणून रुग्‍णाला छातीभोवती घट्ट कपडा बांधावा लागतो. ‘‘भारतात उष्ण हवामान, बहुसंख्य रुग्‍णांकडे एअर कंडिशनर नाही. त्‍यामुळे रुग्‍ण ही शस्‍त्रक्रिया थंडीच्‍या दिवसांत करणं पसंत करतात,’’ डॉ. भीम सिंग नंदा सांगतात. शस्‍त्रक्रियेच्‍या भागात घाम आला तर त्‍यामुळे शस्‍त्रक्रियेच्‍या टाक्‍यांभोवती जंतुसंसर्ग होण्‍याची शक्‍यता वाढते, असंही ते सांगतात.

सुमितची शस्‍त्रक्रिया झाली आणि घरच्‍यांनी त्‍याला घराबाहेर काढलं, तो मे महिना होता. उत्तर भारतातला जीवघेणा कडक उन्‍हाळा. ‘‘नंतरचे काही आठवडे खूपच भयानक होते. कोणीतरी आपली हाडं खरवडून काढतंय असं वाटत होतं. बाइंडरमुळे हालचाल करणंही अवघड होऊन बसलं होतं,’’ सुमित सांगतो.  ‘‘खरं तर मला राहाण्‍यासाठी भाड्याने जागा घ्यायची होती, तेही माझी पारलिंगी ही ओळख न लपवता. पण सहा घरमालकांनी मला जागा द्यायला नकार दिला.  शस्‍त्रक्रियेनंतर महिनाभरही मी विश्रांती घेऊ शकलो नाही.’’ टॉप सर्जरीनंतर नऊ दिवसांनी आणि कुटुंबाने घराबाहेर काढल्‍यावर चार दिवसांनी सुमितला दोन खोल्‍यांचं एक घर मिळालं. आपली ओळख न लपवता त्‍याने हे घर मिळवलं होतं.

आज सुमित मेहंदी कलाकार आहे, टेलर आहे, चहाच्‍या टपरीवर काम करतो आणि रोहतकमध्ये मजूर म्हणून कष्टाची कामं करतो. या सगळ्यातून महिन्‍याला जेमतेम ५ ते ७ हजार रुपये मिळतात. त्‍यातले बरेच घरभाडं, खाण्‍यापिण्‍याचा खर्च, गॅस, वीज यांची बिलं, कर्जाचे हप्‍ते यात जातात. सुमितला घर चालवणं खूपच अवघड जातं.

शस्‍त्रक्रियेसाठी सुमितने जे एक लाख रुपये दिले, त्‍यापैकी ३०,००० रुपये त्‍याचे स्‍वतःचे होते. २०१६ ते २०२२ या काळात त्‍याने केलेली बचत होती ती. उरलेल्‍या ७०,००० रुपयांपैकी बरेचसे त्‍याने सावकाराकडून ५ टक्‍के व्‍याजावर उचलले होते आणि काही मित्रमंडळींकडून घेतले होते.

PHOTO • Ekta Sonawane
PHOTO • Ekta Sonawane

डावीकडे : आपल्‍या टॉप सर्जरीसाठी पैसे वाचवायला सुमितने मेहंदी कलाकार आणि शिंपी म्हणून काम केलं. उजवीकडे : घरी मेहंदीच्‍या डिझाइन्‍सचा सराव करताना सुमित

जानेवारी २०२४ मध्ये सुमितचं कर्ज होतं ९०,००० रुपये. त्‍यावर महिन्‍याला ४००० रुपये व्‍याज चढत होतं. ‘‘माझं जे काही तुटपुंजं उत्‍पन्‍न आहे, त्‍यात माझा स्‍वतःचा खर्च आणि कर्जाचं हे व्‍याज कसं बसवू, तेच कळेनासं झालंय मला,’’ हिशेब करत सुमित म्‍हणतो. जवळजवळ दशकभराच्‍या त्‍याच्‍या लिंगबदलाच्‍या प्रवासाने त्‍याच्‍याकडून फार मोठी किंमत वसूल केली आहे. आता त्‍याला भीती वाटते, रात्री झोप लागत नाही. ‘‘माझा जीव घुसमटतो आता. घरी एकटा असतो तेव्‍हा अगदी एकटं वाटतं, खूप भीती वाटते. आधी कधीच असं होत नव्‍हतं.’’

सुमितच्‍या कुटुंबाने त्‍याला घराबाहेर काढलं होतं, पण वर्षभरानंतर ते त्‍याच्‍याशी बोलायला लागले. त्‍याने मागितले कधी, तर आता ते पैसेही देतात त्‍याला.

सुमित ट्रान्‍समन आहे, पण आपली ओळख उघड केलेला आणि त्‍याबद्दल स्‍वतःचा अभिमान वाटणारा पुरुष मात्र नाही. भारतात बहुसंख्य पुरुषांना पुरुष असल्‍याचाच अभिमान असतो. सुमितला तो नाही. त्‍याला तो असूच शकत नाही. एकतर तो दलित मुलगा आहे. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, ‘हा खराखुरा पुरुष नाही,’ असं लेबल त्‍याच्‍यावर लागण्‍याची भीती त्‍याला सतत वाटत असते. स्‍तन नसल्‍यामुळे आता त्‍याला शारीरिक कष्टाची कामं सहज मिळतात, ती करताही येतात. पण चेहर्‍यावरचे केस, खोल आवाज या पुरुषत्‍वाच्‍या इतर खुणा मात्र तो वागवत नाही आणि त्‍यामुळे आपल्‍याकडे संशयाने पाहाणार्‍या नजरांशी त्‍याला सामना करावा लागतो. यात भर घालतं जन्‍मानंतर ठेवलेलं त्‍याचं नाव – ते अजून त्‍याने कायदेशीर पद्धतीने बदललेलं नाही.

हार्मोन रिप्‍लेसमेंट थेरपीसाठी सुमित अजून तयार नाही. त्‍याचे जे दुष्परिणाम होतात, त्‍याबद्दल अजूनही त्‍याला शंका वाटते. ‘‘आर्थिक दृष्‍ट्या स्थिरस्‍थावर झालो की मग मी हार्मोन रिप्‍लेसमेंट थेरपी घेईन,’’ सुमित म्‍हणतो.

सध्या तो एका वेळी एकच गोष्ट करतोय.

टॉप सर्जरीनंतर सहा महिन्‍यांनी सुमितने सामाजिक न्‍याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाकडे ‘ट्रान्‍समन’ म्हणून आपली नोंदणी केली. या विभागाने त्‍याला ‘सरकारमान्‍य पारलिंगी’ म्हणून प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिलं. आता त्‍याला काही सरकारी योजनांचा लाभ मिळू शकणार आहे. त्‍यापैकी एक आहे ‘ स्‍माइल ’ (SMILE – Support for Marginalised Individuals for Livelihood and Enterprise) योजना. या योजनेअंतर्गत पारलिंगी व्‍यक्‍तींना लिंगबदल करण्‍यासाठी लागणार्‍या सर्व आरोग्‍य सेवा भारताच्‍या महत्त्वाच्‍या ‘आयुष्मान भारत योजने’खाली आणल्‍या गेल्‍या आहेत.

‘‘माझ्‍यातला बदल पूर्ण होण्‍यासाठी मला आणखी कोणकोणत्‍या शस्‍त्रक्रिया कराव्‍या लागणार आहेत, ठाऊक नाही,’’ सुमित म्‍हणतो. ‘‘हळूहळू मी ते सगळं करणार आहे. सगळ्या कागदपत्रांमध्ये माझं नावही बदलून घेणार आहे. ही तर केवळ सुरुवात आहे.’’

Ekta Sonawane

একতা সোনাওয়ানে স্বাধীনভাবে কর্মরত সাংবাদিক। জাতি, শ্রেণি এবং লিঙ্গ মিলে পরিচিতির যে পরিসর, সেই বিষয়ে তিনি লেখালিখি করেন।

Other stories by Ekta Sonawane
Editor : Pallavi Prasad

পল্লবী প্রসাদ মুম্বই-ভিত্তিক একজন স্বতন্ত্র সাংবাদিক, ইয়ং ইন্ডিয়া ফেলো এবং লেডি শ্রী রাম কলেজ থেকে ইংরেজি সাহিত্যে স্নাতক। তিনি লিঙ্গ, সংস্কৃতি এবং স্বাস্থ্য ইত্যাদি বিষয়ের উপর লেখেন।

Other stories by Pallavi Prasad
Series Editor : Anubha Bhonsle

২০১৫ সালের পারি ফেলো এবং আইসিএফজে নাইট ফেলো অনুভা ভোসলে একজন স্বতন্ত্র সাংবাদিক। তাঁর লেখা “মাদার, হোয়্যারস মাই কান্ট্রি?” বইটি একাধারে মণিপুরের সামাজিক অস্থিরতা তথা আর্মড ফোর্সেস স্পেশাল পাওয়ারস অ্যাক্ট এর প্রভাব বিষয়ক এক গুরুত্বপূর্ণ দলিল।

Other stories by Anubha Bhonsle
Translator : Vaishali Rode

Vaishali Rode is an independent journalist and a writer with prior experience in Marathi print media. She has penned the autobiography of a transgender, MI HIJDA MI LAXMI, which has been translated in many languages.

Other stories by Vaishali Rode