हे पॅनेल दिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया या ऑनलाइन फोटो प्रदर्शनातील आहे. ग्रामीण बाया किती विविध तऱ्हेची कामं करतात ते या फोटोंमधून आपल्याला दिसतं. १९९३ ते २००२ या काळात पी. साईनाथ यांनी भारतातल्या १० राज्यांमध्ये हे फोटो काढले आहेत. अनेक वर्षं भारताच्या विविध भागांत सादर झालेलं हे मूळ प्रदर्शन पारीने कल्पकरित्या डिजिटाइझ केलं आहे.

साफसफाई

आंध्र प्रदेशातल्या विजयानगरममधली ही आजी तिचं घर आणि अंगण अगदी आरशासारखं लख्ख ठेवते. ते तर घरकाम आहे – बायांचं काम. घर असो किंवा सार्वजनिक जागा, साफसफाईचं – घाणीतलं काम बहुतेक वेळा बायांच्याच वाट्याला येतं. आणि त्यातनं पैशापेक्षा लोकांची दूषणं आणि शिव्याच जास्त मिळत असाव्यात. राजस्थानातल्या या ताईची परिस्थिती तर आणखीनच भयानक आहे. ती दलित आहे. लोकांच्या घरातल्या संडासातला मैला तिला हाताने गोळा करावा लागतो. राजस्थानातल्या सिकरमधल्या जवळ जवळ २५ घरांमध्ये ती हे काम करते.

या कामासाठी तिला प्रत्येक घरातून एक रोटी इतका मोबदला मिळतो. महिन्यातून एकदा त्यांना कळवळा आला तर ते काही पैसे देऊ करतात. कदाचित घरटी १० रुपये. कागदोपत्री तिची नोंद ‘भंगी’ अशी असली तरी ती स्वतःची ओळख ‘मेहतर’ अशी सांगते. अशी कामं करणारे अनेक समुदाय आता स्वतःला वाल्मिकी म्हणवून घेऊ लागले आहेत.

डोक्यावरच्या पाटीतून ती मानवी विष्ठा वाहून नेते आहे. भारतातल्या सर्वात जास्त शोषित आणि कसलाच आवाज नसणाऱ्या नागरिकांपैकी ती एक. राजस्थानच्या एकट्या सिकरमध्ये अशा शेकडो जणी आहेत.

भारतात हाताने मैला गोळा करणारे, वाहून नेणारे असे नक्की किती जण आहेत? नक्की काहीच माहिती नाही. १९७१ च्या जनगणनेपर्यंत त्यांचं काम स्वतंत्र व्यवसाय म्हणून नोंदवला पण गेला नव्हता. काही राज्य सरकारं तर अशा मैला वाहून नेणाऱ्यांचं अस्तित्वच नाकारतात. तरीही, जी काही अर्धवट आकडेवारी उपलब्ध आहे त्यातून असं दिसतं की सुमारे दहा लाख दलित हे मैला वाहून नेण्याचं काम करतात. प्रत्यक्षात हा आकडा जास्त असणार. आणि संडासातली विष्ठा वाहून नेण्याचं काम बहुतेक स्त्रियाच करतात.


व्हिडिओ पहाः '[हाताने मैला उचलणं] हे अवमानकारक, मानहानी करणारं, माणसाची प्रतिष्ठा धुळीला मिळवणारं काम आहे जे जातव्यवस्थेने आणि जातीवर आधारित आपल्या समाजव्यवस्थेने जित्याजागत्या माणसांवर लादलं आहे'

जाती व्यवस्थेने त्यांचं काम अपवित्रत – विटाळ ठरवल्यामुळे फार जाचक शिक्षा आणि भेद त्यांच्या वाट्याला आहे आहेत. फार मोठ्या प्रमाणावर आणि रचनात्मक स्तरावर पाळल्या जाणाऱ्या अस्पृश्यतेने त्यांचं अस्तित्वच झाकोळून टाकलं आहे. त्यांच्या वस्त्या सर्वांपेक्षा वेगळ्या काढलेल्या आहेत. अनेक वस्त्या ना धड शहर, ना धड गाव अशा गावांमध्ये आहेत. कसल्याही नियोजनाशिवाय ज्या गावांची शहरं झाली त्या गावांमध्ये. पण काही वस्त्या अगदी महानगरांमध्येदेखील आहेत.

१९९३ साली केंद्र सरकारने मैला वाहून नेण्यासाठी कामावर ठेवणे, कोरड्या संडासांचे बांधकाम (प्रतिबंध) कायदा पारित केला. यामुळे हाताने मैला वाहून नेण्यावर बंदी आली. बहुतेक राज्यांनी आपल्याकडे असं काही घडतं हेच नाकारलं किंवा चक्क तोंडावर बोट ठेवलं. अशी कामं करणाऱ्या व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी निधी उपलब्ध आहे आणि राज्य सरकारं तो वापरू शकतात. पण असं काही घडतच नाही असा दावा केल्यावर त्याचं निर्मूलन कसं करणार? काही राज्यांमध्ये तर हा कायदा लागू करायला चक्क मंत्रीमंडळाच्या स्तरावर विरोध झाला हे वास्तव आहे.

अनेक महानगरपालिकांमध्ये सफाई कामगार स्त्रियांना इतका कमी पगार दिला जातो की घरखर्च भागवण्यासाठी त्या मैला वाहून नेण्याचं काम करतात. कित्येकदा तर मनपा पगारच वेळच्या वेळी करत नाही. १९९६ साली हरयाणातल्या सफाई कर्मचाऱ्यांनी अशा वागणुकीच्या विरोधात मोठी निदर्शनं केली. याला प्रत्युत्तर म्हणून हरयाणा सरकारने अत्यावश्यक सेवा कायद्याचा आधार घेत तब्बल ७०० स्त्रियांना जवळ जवळ ७० दिवस तुरुंगात टाकलं. संपकऱ्याची एकच मागणी होती – आमचा पगार वेळेवर द्या!

मानवी विष्ठा वाहून नेण्याच्या कामाला समाजाची मान्यता असल्याचं दिसून येतं. ही प्रथा थांबवण्यासाठी समाजसुधारणेची गरज आहे. १९५० आणि ६० च्या दशकात केरळमध्ये कोणत्याही कायद्याशिवाय ही प्रथा मोडीत काढली गेली. अखेर सामूहिक कृतीच कळीची ठरली आणि अजूनही तीच महत्त्वाची आहे.

PHOTO • P. Sainath
PHOTO • P. Sainath
P. Sainath

পি. সাইনাথ পিপলস আর্কাইভ অফ রুরাল ইন্ডিয়ার প্রতিষ্ঠাতা সম্পাদক। বিগত কয়েক দশক ধরে তিনি গ্রামীণ ভারতবর্ষের অবস্থা নিয়ে সাংবাদিকতা করেছেন। তাঁর লেখা বিখ্যাত দুটি বই ‘এভরিবডি লাভস্ আ গুড ড্রাউট’ এবং 'দ্য লাস্ট হিরোজ: ফুট সোলজার্স অফ ইন্ডিয়ান ফ্রিডম'।

Other stories by পি. সাইনাথ
Translator : Medha Kale

পুণে নিবাসী মেধা কালে নারী এবং স্বাস্থ্য - এই বিষয়গুলির উপর কাজ করেন। তিনি পারির মারাঠি অনুবাদ সম্পাদক।

Other stories by মেধা কালে