उत्तर कोलकात्यातील कुमारतुलीच्या अरुंद बोळांमध्ये, जिथे एखादी हातरिक्षा कशीबशी जाऊ शकते, तुम्हाला सहसा केवळ शहरातील मूर्तिकार, म्हणजेच कुमार भेटतील. दरवर्षी याच ठिकाणाहून दुर्गा देवी व इतर देवतांच्या मूर्ती कोलकात्यात प्रस्थान करतात.
इथे कार्तिक पाल यांची (वडलांच्या नावावरून) ‘ब्रजेश्वर अँड सन्स’ नावाची बांबू व प्लास्टिकच्या पत्र्यांची कार्यशाळा आहे. त्यांनी मूर्ती घडवण्याच्या मोठ्या व किचकट प्रक्रियेबद्दल आम्हाला सांगितलं. मूर्ती घडवण्याच्या प्रक्रियेत विविध टप्प्यांत गंगामाटी (गंगा नदीच्या किनाऱ्यावरची माती) आणि पाथ माटी (तागाचे कण व गंगा माटी यांचं मिश्रण) वापरली जाते.
आम्ही बोलत असताना पाल भगवान कार्तिक यांच्या मुखवट्याला चिकण मातीने आकार देत आहेत आणि आपल्या तरबेज हातांनी तिच्यावर सुबक काम करत आहेत. त्यासाठी ते एक कुंचला आणि बांबू पासून तयार केलेलं तासायचं अवजार, चियारी वापरतात.
जवळच्या एका कार्यशाळेत गोपाळ पाल यांनी मातीच्या ढाच्यावर तलम वस्त्र चिकटवण्यासाठी एक गोंद तयार केलाय, जेणेकरून त्याला त्वचेचं रूप येईल. गोपाल मूळचे उत्तर कोलकात्याहून १२० किलोमीटर दूर नाडिया जिल्ह्यातील कृष्णानगरचे आहेत. इथले पुष्कळ कारागीर – सगळे पुरुष – याच जिल्ह्यातून आले आहेत; त्यांच्यातील बहुतांश लोक याच भागात कार्यशाळेच्या मालकांनी दिलेल्या खोलीत राहतात. कामाच्या हंगामाच्या काही महिने आधीच कारागिरांना कामावर घेतलं जातं. ते आठ तासांच्या पाळींमध्ये काम करतात, पण शारदीय नवरात्राच्या काही दिवस आधी मात्र ते रात्रभर काम करतात. तेव्हा जास्त वेळ काम केल्याचा त्यांना मोबदलाही मिळतो.
कुमारतुलीतील कुंभारांची पहिली पिढी सुमारे ३०० वर्षांपूर्वी कृष्णानगर येथून स्थलांतरित झाली. ते बागबाझार घाटानजीक नव्यानेच वसलेल्या कुमारतुलीत राहू लागले, जेणेकरून नदीच्या किनाऱ्यावरील माती सहजपणे आणता यावी. मग ते जमीनदारांच्या घरी काम करू लागले, ठाकूरदालनांमध्ये (जमीनदारांच्या राहत्या घरी सणासुदीकरिता राखून ठेवण्यात आलेला भाग) दुर्गा पूजेच्या काही आठवडे आधी ते मूर्ती घडवत असत.
कुमारतुलीतील आपल्या कार्यशाळेत एका मूर्तीवर शेवटचा हात फिरवता फिरवता कार्तिक आम्हाला सांगतात की ते आणि त्यांचे कामगार स्वतः रंग तयार करतात. ते खोडी माटी (समुद्रातील फेसापासून तयार करण्यात येणारी विशेष प्रकारची माती) रासायनिक रंग आणि खाई-बिची म्हणजेच चिंचोक्यापासून तयार केलेल्या गोंदात मिसळतात. चिंचोक्याच्या पुडीमुळे मूर्तीवर रंग जास्त काळ टिकतो.
कालांतराने तयार झालेल्या मूर्ती शहराकडे प्रवास सुरू करण्यास सज्ज होतील. कुमारतुलीतील कार्यशाळा मिणमिणत्या उजेडात आपल्या कलाकृतींना निरोप देतील. आता त्या कोलकत्यातील झगमगाटात मंडपांमध्ये राहायला जातील.
पहाः 'Journey through Kumartuli' फोटो अल्बम
हा व्हिडिओ आणि कहाणी सिंचिता माजी हिच्या २०१५-१६ मधील पारी फेलोशिप अंतर्गत करण्यात आले आहेत.
अनुवादः कौशल काळू