आमच्या कार्यप्रणालीच्या केंद्रस्थानी आमचे स्वयंसेवक आहेत, जे आम्ही प्रकाशित करत असलेल्या प्रत्येक रिपोर्टसाठी सारांशित 'मुख्य मुद्दे आणि तथ्यांवर काम करतात. आमच्यासोबत महाविद्यालयीन विद्यार्थी, कार्यरत तसेच निवृत्त व्यावसायिक स्वयंसेवक म्हणून काम करतात, जे कठीण आणि विस्तृत विषयांना सुलभ वाचनाचे रुप देतात. ते आम्हाला त्यांचा वेळ आणि कौशल्य देतात, ज्यामुळे आमचे संग्रहणीय साहित्य सुलभ आणि विविध प्रकारच्या ज्ञानाने परिपूर्ण राहते.
सध्या, पारी वाचनालयामध्ये जवळपास ४५० स्वयंसेवक आहेत, जे आमच्या स्थापनेपासून आमच्यासोबत काम करत आहेत.
२०२५ वर्ष संपत असताना, आमच्या काही नियमित स्वयंसेवकांचे अनुभव आणि महत्त्वाचे निष्कर्ष मांडताना आम्हाला आनंद होतोय.
याळिनी साथियामूर्ती
आयआयटी बॉम्बेमधून पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये एमटेक करत आहे
मी ज्या प्रत्येक रिपोर्टसाठी ‘मुख्य मुद्दे आणि तथ्ये’ संकलित केली आहेत, त्यातून मला एक नवीन दृष्टिकोन मिळाला आहे, जो माझ्यासोबत कायम राहतो. उदाहरणार्थ, ‘टेंटेड कार्पेट्स: भारतातील हाताने बनवलेल्या गालिचा क्षेत्रातील गुलामगिरी आणि बालमजुरी’ किंवा ‘क्लायमेट इंडिया २०२४: तीव्र हवामान घटनांचे मूल्यांकन’यांसारख्या काही अहवालांमुळे मी अस्वस्थ झाले, आणि ते वाचायला मला अनेक दिवस लागले. पण मी जो अभ्यास करत आहे, तो पाहता, या रिपोर्टवर काम केल्यामुळे मला संबंधित विषयांची अधिक चांगली माहिती मिळवण्याची संधी मिळाली.
मग ते एक पानाचा पोस्टर असो किंवा ५०० पानांचा सांख्यिकीय रिपोर्ट असो, पारी वाचनालयाच्या ‘मुख्य मुद्दे आणि तथ्ये’ या मुद्देसूद मांडणीमुळे तुम्हाला समस्येच्या मुळाशी पोहोचता येते. दुर्दैवाने, यापैकी अनेक रिपोर्ट अजूनही मुख्य प्रवाहात आलेले नाहीत.
अबिझार शेख
३० वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले कम्युनिकेशन आणि वित्तीय सेवा विशेषज्ञ
माझ्याकडे मोकळा वेळ होता आणि मला काहीतरी उपयुक्त काम करायचं होचं. पारी वाचनालयासोबत काम करणे ही एक उत्तम संधी होती. पारी करत असलेले काम माझ्यासाठी अगदी योग्य होते, कारण ग्रामीण जीवन हा नेहमीच माझ्या आवडीच्या विषयांपैकी एक राहिला आहे.
वाचक म्हणून, मला वाचनालयातील विषयांचे सुधारित वर्गीकरण आणि शोधक्षमता पहायला आवडेल.
जेरी जोस
कोट्टायम, केरळ येथील हवामान शास्त्रज्ञ
वेबसाइटच्या प्रकाशनावेळी पी. साईनाथ यांच्या व्याख्यानातून माझी पारीशी ओळख झाली. ग्रामीण भारताचे, जे ‘एका उपखंडातील एक खंड’ आहे,ते संग्रहित करण्याचा हा प्रयत्न प्रेरणादायी आणि अद्वितीय होता. पारीसाठी काम करणे हा पारीच्या सतत विस्तारणाऱ्या वाचनालयामध्ये दूर राहून योगदान देण्याचा माझा मार्ग होता.
हे कौतुकास्पद आहे की वाचनालयामध्ये निवडक रिपोर्ट उपलब्ध आहेत, ज्यात सहज उपलब्ध होणारे 'मुख्य मुद्दे आणि तथ्ये' आहेत. मला याची विस्तृत व्याप्ती पारीच्या पत्रकारितेला खूप पूरक वाटते. मला माझ्या कौशल्याच्या क्षेत्रातील आणि त्याबाहेरील अहवालांवर काम करायला खूप आनंद आला, जिथे संशोधन स्वतःच एक शिकण्याची प्रक्रिया होती.