आवं राया, आम्ही पोरी ऱ्हातो शहरात,
आरं, निघाला कुठं आसं नखऱ्यात?
आम्ही बिगरलगणाचं भाऊ सात,
आरं, निघाला कुठं आसं नखऱ्यात?
आवं राया, सांगा तुम्हास्नी आवडे कशी नार?
आरं, निघाला कुठं आसं नखऱ्यात?
काळीसावळी नार आवडे आम्हा फार
आरं, निघाला कुठं आसं नखऱ्यात?
एका गुजराती लोकगीताचा हा मराठी स्वैरानुवाद. हे गाणं लग्नात गायलं जातं. ते १९७० मध्ये 'सोन कसंरी' या गुजराती सिनेमात प्रदर्शित झालं, नि मग अधिकच लोकप्रिय झालं. सोन कसंरी व रख्यात बाबरिया यांची शोकांत प्रेमकहाणी हे त्या सिनेमाचं कथानक. या सिनेमात वरील गाणं, मुलंमुली नाचत एकमेकांना सवाल-जवाब करत गातात. लग्नसंबंधातली उत्कटता व सौंदर्य या गीतातून व्यक्त होते.
लोकगीतं जनमनाचा आरसा असतात, तसंच हे गीत. गुजराती लोकगीतांतील मुली आता पारंपरिक भुमिकेत नाहीत, या खेडूत मुली गाण्यांतून आपल्या नवसंवेदना मांडतात. आब राखून वारस सपंत्तीवर हक्क सांगतात. वडिलोपार्जित मालमत्ता व जमिनीवरील हक्क मागतात. या गाण्यांमधून व्यक्त होणाऱ्या नवनायिका सांस्कृतिक वारसा खांद्यावर घेताना भौतिक अधिकारांबाबतही सजग दिसतात.
जगभरचा इतिहास साक्षी आहे, शोषितांच्या स्वातंत्र्यात प्रतिरोध गीतांनी कळीची भूमिका निभावलीय. कच्छ महिला विकास संघटनेनं रचलेली गाणीही याला अपवाद नाहीत. २०१७ च्या सुमारास या संघटनेनं महिलांमध्ये नवविचारांची जागृती केली.


