कलाकारांच्या सरावाचे सूर पुरीसईच्या गल्लीबोळांतून अक्षरशः घुमत असतात. ऑक्टोबरमध्ये तर हे गाव जणू झोपतच नाही. उत्सुक प्रेक्षकांचे जत्थेच्या जत्थे चौकाचौकात जमलेले असतात, वातावरण संगीताने भरलेलं आणि भारलेलं असतं आणि रस्त्यालगतची सगळी घरं कलाकारांच्या सरावाच्या खोल्या झालेली असतात, ग्रीनरूममध्ये रूपांतरित झालेली दिसतात. स्थानिक छोटे व्यवसाय करणारे जसे की कुपुसामी आणि चंद्रा चालवत असलेली चहाची टपरी जी रात्रभर चालू असते. देशभरातून कलाकार इथे येतात. उदाहरणार्थ, झारखंडचे लोकनाट्य कलाकार, स्थानिक थेरुकुथू कलाकार, तमिळनाडूतील इतर भागांमधून आलेली परई पथके, केरळ व पुद्दूचेरीचे कलाकार, याचबरोबर चेन्नई आणि इतर ठिकाणांहून आलेले आधुनिक नाट्यकलाकार. यंदाच्या वेळेस ६ ऑक्टोबर २०२४ रोजी हा प्रसिद्ध 'कलैमामणी कन्नप्पा थांबिरन स्मृती रंगभूमी महोत्सव', ज्याला सर्वजण पुरीसई महोत्सव म्हणून ओळखतात तो पुन्हा एकदा रंगला आहे.
पूर्वी हा सोहळा, खरं तर महोत्सवच तीन दिवस चालणारा असे. मात्र कोविड-१९ च्या महामारीनंतर, ज्यामुळे अनेक परंपरा विस्कळीत झाल्या त्यात ह्या उत्सवालाही फटका बसला आणि आता हा उत्सव दर दोन वर्षांनी, तेही जास्तीत जास्त दीड दिवसांसाठीच आयोजित केला जातो. या महोत्सवाची मुळं १९८९ पर्यंत पोहोचतात. तेव्हा याला 'कोडई विझा (उन्हाळी उत्सव)' असे म्हटले जायचे. आधुनिक नाट्यलेखक एन. मुथुसामी यांनी पुरीसईतील कन्नप्पा थांबिरन व त्यांचा मोठा मुलगा कासी यांच्यासोबत हा महोत्सव सुरू केला होता. या लोककलेतील अफाट ऊर्जा पाहून मुथुसामी भारावले आणि त्यांनी थांबिरन यांना बरोबर घेऊन थेरुकुथू आणि गोष्टी सांगण्याच्या आधुनिक तंत्रांचा मेळ घालून याला एक वेगळं स्वरूप दिलं.
हे गाव थेरुकुथू कलेचं आणि त्या कलाकारांचे केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. “इथे प्रत्येकजण कलाकारच आहे, मग तो शेतकरी असो वा दैनंदिन मोलमजुरी करणारा,” असे गावातील एक रहिवासी आणि स्वतः थेरुकुथू कलाकार व महोत्सवाचे एक आयोजक असणारे पाळनी मुरुगन (वय ४९) सांगतात. अनेक वर्षे शहरांतील आधुनिक नाटकं व समकालीन नृत्य केल्यानंतर मुरुगन पुन्हा थेरुकुथूकडे वळले. ते अगदी प्रामाणिकपणे कबूल केल्यासारखं सांगतात की, “बर्याच वर्षांच्या आखीव-रेखीव सादरीकरणांनंतर या कलेच्या सहजतेशी जुळवून घेणं मला अवघड गेलं. पण हा माझ्यासाठी पुन्हा घरी परतल्याचा आनंद होता.”
































