सूर्य उगवण्यापूर्वीच कट्टुपल्लीच्या किनाऱ्यांवर हालचाली सुरु होतात. इरुलर समाजातील लोकं गुडघ्यापर्यंतच्या पाण्यात उभी राहून बंगालच्या उपसागरातली भरती ओसरण्याची वाट पाहत असतात. भरतीच्या वेळी किनाऱ्यावर वाहून आलेले शंख-शिंपले (किलिंजल) पटकन गोळा करता यावेत म्हणून ते खास तयार केलेलं जाळं वापरतात.
रमेश (ते त्यांच्या पहिल्या नावानेच ओळखले जातात) सांगतात, “भरतीच्या वेळी आम्हाला शिंपले गोळा करता येत नाहीत, म्हणून आम्ही ओहोटी सुरू होण्याची वाट बघतो. त्या दरम्यान आम्ही जेवायला घरी जातो किंवा समुद्रकिनाऱ्यावर थांबून राहतो.” त्यांच्यासारख्या इरुलर समाजातील लोकांसाठी शिंपले गोळा करणं, हा फक्त एक व्यवसाय नाही, तामिळनाडूतल्या तिरूवल्लूर जिल्ह्यातल्या समुद्राच्या लयीशी घट्ट जोडली गेलेली ती त्यांची पारंपरिक उपजीविका आहे.
गोळा केलेले शिंपले वाळवले जातात आणि बैलगाड्यांमधून अशा ठिकाणी वाहून नेले जातात, जिथं त्यांचा चुनखड्यांसाठी चुरा केला जातो. एका बैलगाडीसाठी कामगारांना साधारण ५०० रु. दिले जातात, सरासरी एक व्यकी आठवड्याला सात खेपा करू शकते. या शिंपल्यांवर प्रक्रिया करून चुन्याची खडी आणि सुन्नांबू (बांधकामात वापरला जाणारा चुन्याचा प्रकार) तयार केले जाते.
























