ही नोव्हेंबरमधील अमावस्या. रात्री नऊचा सुमार. तमिळनाडूचा समुद्रकिनारा चिडिचूप भासतोय. या किनारपट्टीला दोन नावानं संबोधतात – पुलिकत नि पळवेरकाड्. खाडीकडे एक निळी नौका प्रस्थान करत्येय. किनारा सोडत ही नाव हळूहळू डौलत, तरंगत खोल पाण्याकडं सरसावतेय...
बोटीवर तिघंजण पाय रोवून उभीयेत. — सरथ कुमार, अरुण कुमार नि सेविथ कुमार. त्यांच्या पायाशी सात बांबू नि गुंडाळून ठेवलेली नायलॉनची जाळी पडलीत. सागरपट्टीवरील 'थोनिरेवू' हे या मच्छीमारांचं गाव. बालपणापासून ते हेच करत आलेत – मासेमारी.
मी लहानाची मोठी झाले, ते गावही समुद्रकिनाऱ्यापासून जवळच होतं. नि मला हमेशाच समुद्र सफरीची स्वप्नं पडत. पण आईनं समुद्रावर जायची सक्त मनाई केलेली. ती मला व माझ्या बहिणीला एकटीनं वाढवत होती. काळजीपोटी ती आम्हाला खोल पाण्यापासून वाचवत होती.
पळवेरकाड्ला यापूर्वी आलेले, तेव्हा माझं वय होतं सोळा. कळण्यासमजण्यापेक्षा मनात आकर्षणाचे अंकुर उमलण्याचं ते वय. चेन्नई क्लायमेट ॲक्शन ग्रुपने फोटोग्राफीची कार्यशाळा आयोजित केलेली. त्यात सहभागासाठी पळवेरकाड्ला आलेले. त्या कार्यशाळेत फोटो जर्नलिस्ट पलनी कुमार यांनी आम्हा होतकरू पत्रकारांना मार्गदर्शन केलेलं. तेव्हाच माझ्या मनात समुद्रकिनाऱ्यालाच घर मानून जगणाऱ्यांबद्दल आकर्षण जागं झालेलं. ते कुतूहल आजही ताजं आहे.



























