"आम्ही तंबूत बसलो होतो, त्यांनी येऊन तंबूच फाडून टाकला. आम्ही काही हललो नाही," म्हातारे बाजी, स्वातंत्र्य सैनिक बाजी आम्हाला सांगत होते. "मग त्यांनी जमिनीवर आणि आमच्यावर पाणी फेकायला सुरुवात केली. जेणेकरून जमीन ओली होईल आणि आम्ही तिथे बसू शकणार नाही. पण आम्ही तिथेच बसून राहिलो. नंतर जेव्हा मी पाणी प्यायला उठलो आणि खाली वाकलो, तितक्यात त्यांनी माझं डोकं जोरात आपटलं. माझं डोकं फुटलं. मला लगेच दवाखान्यात न्यायला लागलं."
बाजी मोहम्मद – आज हयात असणाऱ्या भारताच्या स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक. ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यातल्या देशभरात नावाजलेल्या चार-पाच स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक. त्यांनी सांगितलेली कहाणी १९४२ मध्ये इंग्रजांनी केलेल्या अत्याचारांची नाहीये. (अर्थात त्याबद्दल सांगण्यासारखंही त्यांच्याकडे पुष्कळ काही आहे) ते सांगतायत तो हल्ला पन्नास वर्षांनंतर १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतरचा आहे. मी १०० जणांच्या शांतता गटाचा सदस्य म्हणून तिथे गेलो होतो. पण त्या गटाला कसलीच शांती लाभली नाही. तेव्हा जवळ जवळ सत्तरीत असणाऱ्या गांधीवादी बाजींना त्यानंतर १० दिवस हॉस्पिटलमध्ये आणि नंतरचा एक महिना डोक्याची जखम बरी होईपर्यंत वाराणसीच्या एका आश्रमात रहावं लागलं.
हा सगळा प्रसंग सांगताना त्यांच्या आवाजात संतापाचा लवलेशही नव्हता. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा बजरंग दलाविषयी आवाजात कसलाही द्वेष नव्हता. बाजी म्हणजे गोड हसणारे एक म्हातारबाबा आहेत. आणि हाडाचे गांधी भक्त. नबरंगपूरमध्ये गो हत्या बंदीची चळवळ पुढे नेणारे मुस्लिम नेते. "त्या हल्ल्यानंतर बिजू पटनायक माझ्या घरी आले आणि त्यांनी मला झापलंच. मी त्या वयातही शांततापूर्ण आंदोलनांमध्ये सहभाग घेत होतो याची त्यांना काळजी वाटत होती. तब्बल १२ वर्षं मी त्यांचं स्वातंत्र्य सैनिकांचं पेन्शन नाकारलं होतं. तेव्हाही ते येऊन मला रागावले होते."
अस्तंगत होऊ घातलेल्या एका पिढीची झगमगती झालर म्हणजे बाजी मोहम्मद. खेड्यापाड्यातल्या असंख्य भारतीयांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व त्यागलं होतं. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे हे शिलेदार आता काळाच्या पडद्याआड जाऊ लागले आहेत. जे हयात आहेत ते ८०-९० च्या उंबरठ्यावर आहेत. बाजी स्वतः नव्वदीला टेकले आहेत.
"मी तीस साली शाळेत होतो. पण मॅट्रिकच्या पलिकडे काही जमलं नाही. सदाशिव त्रिपाठी माझे गुरू. ते पुढे जाऊन ओडिशाचे मुख्यमंत्री झाले. मी काँग्रेसमध्ये गेलो आणि नबरंगपूर शाखेचा अध्यक्ष झालो. (तेव्हा नबरंगपूर कोरापुटमध्ये होतं) मी २०,००० जणांना काँग्रेसचं सदस्य करून घेतलं. या सगळ्या भागात इतक्या घडामोडी घडत होत्या. तो सगळा जोश अखेर सत्याग्रहादरम्यान बाहेर पडला."
कोरापुटच्या दिशेने शेकडो सत्याग्रहींचा मोर्चा निघाला असताना बाजी मात्र वेगळ्याच दिशेने वाटचाल करत होते. "मी गांधीजींकडे गेलो. मला त्यांना पाहायचंच होतं. मग काय एक सायकल घेतली. मी आणि माझा मित्र लक्ष्मण साहू, जवळ छदाम नाही, इथनं रायपूरला गेलो. अंतर तब्बल ३५० किलोमीटर. सगळा डोंगरदऱ्यांचा रस्ता. तिथून आम्ही रेल्वेने वर्ध्याला गेलो आणि मग तिथनं सेवाग्रामला. तिथे आश्रमात खूप दिग्गज मंडळी होती. आम्ही बावरून गेलो आणि जरा काळजीतच पडलो. आम्ही त्यांना भेटू तरी शकणार का? लोक आम्हाला म्हणायचे, 'महादेव देसाई त्यांचे सेक्रेटरी आहेत, त्यांना विचारा'."
"देसाईंनी आम्हाला सल्ला दिला. 'गांधीजी संध्याकाळी ५ वाजता पायी फेरी मारतात. तेव्हा त्यांच्याशी बोला'. 'हे बरं झालं, जरा आरामात भेटता येईल!' मी मनात विचार करत होतो. पण काय भरभर चालायचे ते, विचारू नका. त्यांना गाठणं काही आम्हाला जमेना. अखेर मी त्यांना म्हणालो, 'कृपा करून जरा थांबा. मी पार ओडिशाहून केवळ तुमचं दर्शन घेण्याकरता आलो आहे'."
"त्यांनी खोचकपणे मला विचारलं, 'मग काय पाहिलं तुम्ही? मी पण एक मनुष्य प्राणीच आहे, दोन हात, दोन पाय, दोन डोळे... तुम्ही ओडिशामधले सत्याग्रही आहात का?' 'माझा तसा निश्चय आहे.' मी उत्तरलो."
"'मग जा,' गांधी म्हणाले. 'जा. लाठ्या खा. देशासाठी बलिदान द्या.' सात दिवसांनी आम्ही जेव्हा परत आलो, त्यांच्या शब्दाला जागत आम्ही तेच केलं." बाजींनी नबरंगपूर मशिदीबाहेर युद्धविरोधी आंदोलनाचा भाग म्हणून सत्याग्रह सुरू केला. "मला सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि ५० रु. दंड ठोठावला गेला. त्या काळात ही काही मामुली रक्कम नव्हती."
"आणि मग हे नित्याचंच झालं. एकदा, तुरुंगामध्ये लोक पोलिसांवर हल्ला करायला आले. मी मध्ये पडलो आणि त्यांना थांबवलं. मरेंगे लेकिन मारेंगे नहीं . मी म्हणालो."


