साल होतं २०२५. फेब्रुवारी महिना. एके दिवशी रोशन सदाशिव कुळे यांना त्यांच्या एका मित्राचा फोन येतो. मित्र विचारतो- लाओमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करायला जाणार का? पगारही भरपूर- महिन्याला ९० हजार ते १ लाख रुपये. शिवाय प्रवासाचा आणि राहण्याचा सगळा खर्चही कंपनीच उचलणार!
हा मित्र जम्मू-काश्मीरचा. त्यानेही रोशन यांच्याच गटासोबत मागल्या वर्षी कंबोडियात जाऊन स्वत:ची किडनी विकलेली असते. आणि अलीकडेच तो लाओत कामाला लागलेला असतो.
कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचा एक पदव्युत्तर अभ्यासक्रम रोशन यांनी पूर्ण केला होता. ऑफिसमधल्या कामाच्या कल्पनेने त्यांना भुरळ घातली. “काम शारीरिकदृष्ट्या फारसं जिकिरीचं नाहीये, असं मित्राच्या बोलण्यात आलं, म्हणून या नोकरीचा विचार करावा असं वाटून गेलं,” रोशन सांगू लागतात.
कर्जफेडीसाठी किडनी विकून झालेली असते. शस्त्रक्रियेतून शरीर-मन अजून सावरत असतं. ब्रह्मपुरीतल्या त्या सहा आरोपी सावकारांनी त्याही काळात रोशनना छळणं काही सोडलेलं नसतं.
रोशन यांचं राहातं घर आधीच चार वित्तसंस्थांकडे गहाण पडलं होतं. वडिलांच्या आयुष्यभराच्या बचतीतून विकत घेतलेली शेतजमीन त्या सहा सावकारांपैकी एकाने बळकावली होती. इतर मालमत्तांचंही एव्हाना रोखीत रूपांतर झालं होतं. एवढं सारं होऊनही १० लाख रुपयांहून जास्त रक्कमेचं देणं डोक्यावर होतं.
वडिलांचं निवृत्तीवेतन, बायकोचा अंगणवाडीतला पगार आणि भावाला रोजंदारीतून किंवा शेतमजुरीतून मिळणारे पैसे पुरे पडत नव्हते. रोशन यांनी काही काळ बँकिंग करस्पॉन्डंट म्हणून काम केलं होतं. करोनाकाळात ती नोकरी सुटली. मग मात्र नोकरी मिळाली नाही ती नाहीच.
नोकरीची ही ऑफर रोशन यांनी स्वीकारली.














