रोशन कुळे यांचा स्मार्टफोन अगदी साधासा. त्यावर स्वत:चं फेसबुक उघडून मागची पानं चाळता चाळता एका मजकुरापाशी ते अवचित थांबतात. फेसबुकवर कधीतरी येऊन पडलेलं ते नोटिफिकेशन त्यांचं आयुष्यच बदलून टाकतं. कर्जबाजारी अवस्थेत द्याव्या लागलेल्या परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यावर नेमकं काय आणि कसं घडलं, याविषयी रोशन कुळे सांगत असतात.
मिंथूर गावातलं कुळेंचं घर. रोशन कुळे बसलेत. धक्क्यातून पुरतं न सावरलेलं त्यांचं कुटुंबही त्यांच्याभवती आहे. थकलंभागलं, खिन्न आणि शांत!
रोशन सांगू लागतात- साल २०२३. ऑक्टोबरचा महिना. पहाटे पाचची वेळ. घरातले सारेजण झोपलेले. तीन सावकार गाडीने आमच्या घरी येऊन धडकले. त्यांच्या हातात लाठ्या-काठ्या होत्या. त्यांनी दारावर थाप दिली. घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. बरेच पैसे तुझ्याकडे थकलेत, ताबडतोब ते चुकते कर, असं त्यांनी रोशनना सांगितल्याचा आरोप आहे.
वारंवार आले ते त्यानंतर! आणि अजून १६ लाखाचं देणं बाकी असल्याचं सांगत राहिले.
पण एव्हाना कर्ज मिळवण्याचे सगळे मार्ग आटले होते. कुळे कुटुंबापाशी असलेलं सारं काही एकतर गहाण पडलं होतं किंवा विकलं गेलं होतं. रोशनना नोकरी मिळेल अशीही काही चिन्हं दिसत नव्हती.
“किडनी विक आणि माझं कर्ज फेड. नाही, तर तुझ्या कुटुंबाचं काही खरं नाही,” एका कधीच्या तरी भेटीत सहा आरोपी सावकारांपैकी एकाच्या बोलण्यात हे आल्याचं रोशनना आठवतं.
तो सावकार बोलता बोलता किडनी दात्यांच्या एका फेसबुक ग्रुपबद्दल तर रोशनना सांगतोच; शिवाय त्या ग्रुपमध्ये सामील हो, असंही सुचवतो.
“आपली किडनी विकावी असं काही सुरुवाती सुरुवातीला मला अजिबात वाटत नव्हतं,” रोशन सांगत असतात, “पण वसुलीसाठी ते पुन्हा पुन्हा घरी यायला लागले, शस्त्रांनी-काठ्यांनी धाक दाखवायला लागले, तसं आम्हाला भेदरायला झालं. मग मात्र या पर्यायाचा विचार करायला मी सुरुवात केली.”
२०२३ सालचा नोव्हेंबर महिना. फेसबुकवरचा किडनी डोनर कम्युनिटी ग्रुप. रोशन यांनी एके दिवशी या ग्रुपच्या ‘जॉइन’ बटणावर क्लिक केलं. दिवसही सरला नाही तोवर रोशनना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील होण्याबाबतचा मेसेज आला. “शंका होती मनात, भीतीही होती… पण तरी जसं सुचवलं गेलं तसं मी करत गेलो,” रोशन म्हणतात.
तेव्हापासून तो फेसबुक ग्रुप हटवण्यात आला आहे.










