“तसा तर नशीबवानच म्हणायचा मी!” हे रोशन सदाशिव कुळे. हे नशीबवान अशासाठी की हे जिवंत आहेत आणि सुखरूप घरी परतलेत.
सारं सुरू झालं साधारण पाच वर्षांपूर्वी मिंथूर गावात! रोशन यांचं वय ३४ वर्षं. मिंथूरमधले हे एक छोटे शेतकरी. ते दिवस होते २०२१ सालच्या मार्च महिन्यातले. रोशन यांच्या १२ जर्सी गायींना लम्पी नावाच्या त्वचा रोगाने ग्रासलं होतं. एकीकडे, कोविड-१९ ची दुसरी लाट देशभर पसरत चालली होती. दुसरीकडे, महाराष्ट्रभरातली जनावरं लम्पीने दगावत होती.
सहा गाई दगावल्या. दुधाचं उत्पादन कधी नाही इतकं रोडावलं. डेअरीतून मिळणारं उत्पन्न थांबलं. पण खर्च काही थांबायला तयार नव्हता. चंद्रपूरमधल्या नागभीड या जंगलसमृद्ध तालुक्यातल्या या शेतकऱ्याकडे आपल्या उरलेल्या सहा गायींसाठी रोखीने औषधं नि लसी विकत घेण्यापुरतेही पैसे नव्हते.
करोना काळात रोखीच्या टंचाईमुळे बँकांकडून कर्ज मिळणं जवळपास अशक्य झालेलं असतं. बँकिंग करस्पॉन्डंट म्हणून काम करणाऱ्या मित्राच्या आग्रहावरून रोशन मग जवळच्या ब्रम्हपुरी शहरातल्या खासगी सावकाराशी संपर्क साधतात- लाखभराच्या अनौपचारिक कर्जासाठी!
वाटतं, चला, सध्यातरी सुटलो...!
“अडकायला तिथूनच सुरुवात झाली खरंतर!” रोशन म्हणतात.
गायींचा जीव वाचवण्यासाठी जीवरक्षक औषधं विकत घेण्यावाचून पर्याय नसतो. त्यासाठी २०२१ सालच्या मार्च महिन्यात रोशन एक लाख रुपयांचं कर्ज उचलतात. अनधिकृत सावकारांच्या तावडीत सापडत जातात. कर्जाची रक्कम पार ५० लाखापर्यंत फुगत जाते. कर्जफेडीच्या प्रयत्नात हा दुग्धव्यावसायिक शेतकरी बेकायदेशीर अवयव-प्रत्यारोपणाच्या जाळ्यात सापडतो आणि आपली किडनी गमावून बसतो. विषय एवढ्यावरच संपत नाही. पुढे तो एका आंतरराष्ट्रीय सायबर-गुन्हेगार टोळीच्या गळाला लागतो आणि फरफटत अडकून पडतो थेट लाओत!















