“शेतात कामं चालू असतात त्या दिवसात आम्ही सहसा दुपारच्या जेवणासाठी गॅबी बनवतो,” असिनोम्हिएसिसिएनो मेयासे सांगत असतात. या छत्तीस वर्षांच्या आहेत. नागालँडमधल्या खोनोमात असिनो शेती करतात. गॅबी म्हणजे स्थानिक आणि सौम्य मसाले वापरुन केलेली एक प्रकारची करी. गॅबी बनवण्यासाठी मोजकेच जिन्नस लागतात. प्रत्यक्ष शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या तर ते अगदी हाताशीच असतात.
“गाल्हो पण बनवतो आम्ही कधीकधी! गाल्हो ही अंगामी खासियत!” असिनो म्हणतात. गाल्हो म्हणजे एक प्रकारची भाताची घट्ट पेज. ताज्या पालेभाज्या, कोळशावर शिजवलेलं डुकराचं मांस किंवा गोमांस तसंच रानभाज्या व स्थानिक मसाले असं सगळं भातात एकत्र शिजवून ही घट्टसर पेज बनवली जाते.
हिवाळ्यातली ही सौम्यशी सकाळ. खोनोमातल्या झूम शेताकडे असिनो चालल्यात. शेताकडे जाणारी वाट अरुंद म्हणावी अशी. सोबतीला आहेत उत्सोनो मेरू. वय वर्षं ४२. ही असिनोंची जिवलग मैत्रीण. नागालँडमध्ये सामान्यत: डोंगर उतारांवर झूम शेती केली जाते. ही इथली पारंपरिक पद्धतीची स्थलांतरित शेती. चालता चालता दोघी अचानक खाली वाकतात आणि पालेभाज्यांचे, वनस्पतींचे काही भाग खुडतात. “आम्ही जिवलग मैत्रिणी! एकमेकींच्या सोबत असतो तेव्हा आम्ही सगळ्यात आनंदी असतो,” असिनो म्हणतात. या जिवलग बालमैत्रिणी अगदी झूम शेतात काम करण्याच्या वेळासुद्धा अशा काही जुळवतात की एकमेकींची सोबत मिळेल.
आपल्या हातातल्या नुकत्याच गोळा ताज्या वनौषधी दाखवत तेन्यिदी भाषेतली त्यांची नावं उत्सोनो सांगू लागतात : गाथा (फिश मिंट, Houttuynia cordata), गागेई (हिमालयीन नॉटविड, Koenigia polystachya), खामह्यू (वाइल्ड पेरिला, Perilla frutescens) आणि गाक्रा (जावा वॉटर ड्रॉपवॉर्ट, Oenanthe javanica).
“किंग मिरचीच्या चटणीत ही गाथा घालायची. गॅबीसोबत ही चटणी लावून लावून खायची. इतर पालेभाज्या आम्ही गॅबीत घालतो. उरलंसुरलं सगळं घरी घेऊन जातो आणि नंतर लागेल तेव्हा लागेल तसं शिजवून खातो,” त्या सांगतात.






