स्वयंपाकघरात चूल पेटलीय. वाया घालवायला थियामंलाकडे वेळच नाही. स्वयंपाकघरात त्यांची धावपळ चालू आहे, आज सकाळी बागेतून काढलेली रताळ्याची पानं, लसणाची पात, आज गोळा केलेली थोटोची (वनस्पती) पानं, खेकड्याची पेस्ट आणि अशा बऱ्याच गोष्टींची उचलाउचल चालू आहे.
चांकीतल्या ५५ वर्षीय शेतकरी महिला ‘मिपांगमिंग’ (mipangming) हा पदार्थ तयार करणार आहेत. ‘आओ नागा’ जमातीची ही खासियत आहे. थियामंला लोंगचारी चांकी भाषेत सांगतात, “हा पदार्थ ‘रोसूप’ पेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. रोसूप हा आमच्या जमातीत सर्रास बनवला जाणारा, अनेक भाज्यांची सरमिसळ असणारा लोकप्रिय पदार्थ आहे.” त्यांच्याच शेतात पिकलेल्या तांदळाच्या भातासोबत त्या ‘मिपांगमिंग’ वाढतील आणि जोडीला स्थानिक चिकन फ्राय असेल.
मीठ, हिरव्या मिरच्या, टोमॅटो, ‘मिशिगन’ (सिचुआन मिरी) ची पानं, ‘तेजांग लहसून’ (स्थानिक लसणाची पात), आल्याची पानं आणि ‘जांगपांगनात्सू’ (आंबवलेल्या खेकड्याची पेस्ट) हे ‘मिपांगमिंग’ला वैशिष्ट्यपूर्ण चव देणारे इतर घटक. हंगामात उपलब्ध होणाऱ्या ताज्या भाज्याही त्यात वापरतात.
२०११ च्या जनगणनेनुसार चांकी गावात २,४८६ लोकवस्ती आहे. यात ‘आओ नागा’ समुदाय बहुसंख्यांक आहे (ज्यांचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश होतो). ‘चांकी’ ही भाषा केवळ या गावातली माणसंच बोलतात.
स्थानिक खाद्यपदार्थ बनवताना लागणारे ‘मिपांग’, ‘थोटो’ आणि इतर घटक गोळा करायला थियामंलाही ‘चांकी’तल्या इतर स्त्रियांसारख्या भातशेतीची खाचरं, जंगलातल्या वाटा आणि पाण्याचे साठे असणारे परिसर तब्बल दोन तास तुडवत राहतात.
त्या ‘पारी’शी बोलताना सांगतात, “पूर्वीच्या काळी अन्नघटक शोधणं, गोळा करणं याला अत्यंतिक महत्त्व होतं. कारण बाहेरून उत्पादनं मिळवणं तेव्हा सोपं नव्हतं. आम्ही आमच्या स्थलांतरित शेतांमध्ये, भाताच्या खाचरांमध्ये आणि परसबागेत जे काही पिकवत असू तेच खात असू. आताच्या काळी आम्ही जवळच्या बाजारांतूनही उत्पादनं विकत घेतो." स्थानिक घटकांचा वापर ही गोष्ट त्यांच्या पिढीतल्या स्त्रियांकडे अगदी सहजतेनं आली होती.
अन्नासाठी लागणारे घटक गोळा करण्याचं काम प्रामुख्याने स्त्रिया करतात, पुरुष जंगलात किंवा शेतात असतात, तेव्हा तेही घरी येताना माळवं घेऊन येतात. त्या सांगतात, "माळवं कसं गोळा करायचं याचं कौशल्य आणि 'काय खाण्यायोग्य आहे व काय नाही' हे ज्ञान आम्ही आमच्या आई-वडिलांचं किंवा अनुभवी माणसांचं अनुकरण करता करता शिकलो. हे सांगत असतानाच, त्या त्यांच्या शेजाऱ्याने दिमापूरच्या बाजारातून आणलेले 'ऑयस्टर मशरूम्स' आणि त्यासोबतच अत्यंत किंमती असे 'थोटो' साफ करत असतात. "थोटोची जोडी ‘मिपांग’ [रताळ्याची पानं] सोबत अतिशय छान जमते."
‘आओ नागा’ पाककलेत मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा मुख्य घटक म्हणजे ‘खेकड्याची पेस्ट’. “चांकीमध्ये बनवली जाणारी खेकड्याची पेस्ट सर्वोत्तम मानली जाते आणि तिला प्रचंड मागणी असते,” असं थियामंला अभिमानाने सांगतात.
त्यांनी बरणी उघडताच गोड, माशांचा आंबवलेला वास खोलीभर पसरतो. जांगपांगनात्सु हा आओ नागा लोकांचा एक खास पदार्थ आहे, जो भातशेतांलगतच्या उथळ पाण्यात आढळणाऱ्या खेकड्यांपासून बनवला जातो. भाजून आणि कवच काढून हे खेकडे कुटले जातात आणि काळ्या तिळासोबत चांगले मिसळले जातात. त्यानंतर केळीच्या पानांमध्ये गुंडाळून, चुलीजवळ काही दिवस आंबवण्यासाठी ठेवले जातात. आओ नागा पाककृतींमधल्या विविध प्रकारच्या चटण्या, रस्सा आणि कालवणांना स्वाद आणणारा हा एक महत्त्वाचा घटक आहे.
अनेक गुणांनी संपन्न असलेल्या थियामंला या एक निष्णात कुंभार आणि पूर्णवेळ शेतकरी आहेत. वाचा: चांकीच्या कुंभार महिला
त्या म्हणतात की, या वर्षीचं (२०२५) हवामान अत्यंत लहरी आहे आणि अनेकदा घडलेल्या भूस्खलनामुळे भातशेतांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. “एका भूस्खलनामध्ये माझ्या शेताचा काही भाग नष्ट झाला, ज्यात रोपवाटिकाही होती. म्हणूनच, माझ्या झूम शेतांमध्ये मी प्रामुख्याने आल्याची लागवड करते, कारण त्याला जास्त चांगला भाव मिळतो.”
त्या स्वयंपाक करताना त्यांनी घडवलेली चांकी भांडी वापरतात. त्या म्हणतात की अशा स्थानिक भांड्यांतून शिजवलेल्या पदार्थाची चव भारी लागते. मोहरीच्या तेलाचा तडतडणारा आवाज, त्याचा तिखट सुवास आणि जोडीला आंबवलेल्या खेकड्यांचा घमघमाट यांची सरमिसळ होऊन स्वयंपाकघर वासानं भरून जातं. आम्हाला आता आस्वाद घेतल्याशिवाय राहवत नाही.


