चांकीच्या महिला कुंभारांनी बनवलेल्या मातीच्या भांड्यांनी एकेकाळी स्थानिक युद्धांमध्ये धोरणात्मक भूमिका बजावली होती. या प्रदेशात अन्न शिजवण्यासाठी आवश्यक असलेल्या, त्यांना खाऊ घालणाऱ्या मातीच्या भांड्याला हानी पोहोचवण्याचा धोका कुणीही पत्करू इच्छित नव्हतं! जेव्हा आग आणि इतर आपत्तींमुळे गाव जळून खाक झालं, तेव्हा अन्नासाठीची मदत म्हणून चांकीतून मातीच्या भांड्यांमधून धान्य जात असे. इतका चांकीच्या भांड्यांचा टिकाऊपणा आणि महत्त्व होतं, असं आओ जमातीच्या महिला मला अभिमानाने सांगतात.
शतकानुशतकांनंतरही, ही भांडी हाताने बनवली जात आहेत, अगदी पारंपरिक पद्धतीने. थियामंला लुंजारि म्हणतात, “आम्ही चाकं किंवा कोणत्याही यंत्रांचा वापर करत नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही हस्तकला आहे, हस्तनिर्मिती आहे.” मोकोकचुंग आणि आजूबाजूच्या शेतांतून, टेकड्यांवरून, जंगलातून आणि नदीकाठांवरुन ही माती मिळवली जाते कारण या उंचीवरील आणि या प्रदेशातील मातीचं मिश्रणच ही भांडी बनवण्यासाठी योग्य आहे.
थियामंला (५५ वर्षीय) म्हणतात की, “हे मातीकाम आमच्या आज्या आणि पणज्या ज्या पद्धतीने करायच्या त्याच परंपरेनं आम्ही करतोय.” नागालँडमधील गावात उरलेल्या कारागिरांपैकी त्या एक आहेत. त्या हे मातीकाम घरी करतात, जिथं त्या त्यांच्या वृद्ध आईसोबत राहतात. पूर्वी, प्रत्येक घरात वापरण्यासाठी आणि विक्रीसाठी महिलांनी स्वतःच्या हाताने बनवलेली भांडी असायची, पण आज नागालँडच्या चांकी गावात फक्त १५ महिला उरल्या आहेत ज्या अजूनही त्यांच्या घरात भांडी बनवतात.
या वार्तांकनाचं चित्रीकरण करत असताना ‘पारी’ने ज्या ज्या महिलांशी संवाद साधला, त्या म्हणाल्या की एकत्र येताना, मातीकाम करताना आणि नागालँडमधील त्यांच्या जमातीत महिलाकेंद्री असलेली ही प्राचीन परंपरा हस्तांतरित करताना त्यांना आनंद वाटतो. आणि यातून त्यांना मिळणारं अतिरिक्त उत्पन्न त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि इतर गोष्टींसाठी उपयोगी पडतं.








