"मी वेगवेगळ्या साडेचारशे आवाजांवरून ओळखू शकतो, हा आवाज कोणत्या पक्षाचा!"
मिका रायनं हे विलक्षण कौशल्य कमावलंय. वाइल्ड लाइफ फोटोग्राफर म्हणून पक्षी नि प्राण्यांना कॅमेऱ्यात टिपणं, हे अतिशय संयमानं करायचं काम. रानावनांत अवचित एखादा दुर्मिळ नजारा क्षणभर प्रगटून नाहीसा होतो. त्यामुळंच केवळ आवाजांचा कानोसा घेत, जो फोटोग्राफर तो दुर्लभ क्षण टिपू शकतो तोच खरा कसबी. हे कसब मिकाकडं आहे.
त्याच्या कॅमेऱ्यानं गेल्या काही वर्षात विविध पक्ष्यांपासून सस्तन प्राण्यांपर्यंत, अंदाजे ३०० प्रजातींना टिपलंय. अशाच एका दुर्मिळ पक्ष्याची 'ब्लाइथ ट्रॅगोपॅन'च्या छायाचित्रणाची आठवण तो सांगतो. या पक्ष्याचं दर्शन अत्यंत विरळा.
२०२० सालचा ऑक्टोबर. मिकानं सिग्माची १५०-६०० मिमी टेलीफोटो झूम लेन्स विकत घेतलेली. या शक्तिशाली लेन्सनं ट्रॅगोपॅनचा फोटो काढायचाच, असा त्याचा निश्चय. "काफी दिन से सिर्फ उसकी आवाजही सुनायी दे रही थी।" मिका या मोहिमेतील तपश्चर्येबद्दल सांगतो. आवाजाचा माग काढत मिका अक्षरश: रानोमाळ भटकत होता. पण ट्रॅगोपॅननं हुलकावणी दिली! तो हंगाम वाया गेला.
मे २०२१ मध्ये पुन्हा आशेचा किरण दिसला. यावेळी मिका अरूणाचल प्रदेशातील 'इगलनेस्ट वाइल्ड लाइफ सँच्युरी'त भटकत होता. मोहीम तीच : ब्लाइथ ट्रॅगोपॅनला कॅमेरात कैद करणं. नि अचानक 'तो' दिसला. मिकानं Nikon D7200 कॅमेऱ्याची 'सिग्मा १५० मिमी-६०० मिमी' ही टेलिफोटो लेन्स जोडली. वेध घेत क्लिक केलं. पण, प्रयत्न फसला. मिका या क्षणासाठी इतका अधीर होता, की त्या हुरहुरीतच आला क्षण हातचा गेला. "मी फोटो घेतला, पण तो ब्लर आला, सारी मेहनत वाया गेली," मिका सांगतो.
त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी, ब्लाइथ ट्रॅगोपॅननं दर्शन दिलं. या संधीचं मात्र मिकानं सोनं केलं. यावेळी मिका पश्चिम कमेंग जिल्ह्यातील बोम्पू कॅम्पमध्ये होता. झाडांच्या पानांआड गडद करड्या रंगाचा, पाठीवर पांढरे ठिपके असलेला पक्षी दिसताच, मिकानं खचाखच फोटो घेतले. सलग ३०-४० छायाचित्रं मिळाली. त्यातली एक दोनच मिकाला उत्तम वाटली. हे फोटो 'पारी'नं सर्वप्रथम प्रकाशित केले. Arunachal’s birds: canary in the coalmine या लेखासोबत.




















