गोल करून बसलेल्या त्या पाच जणी नाराज होऊन एकसुरात ओरडल्या.. “आह्ह्ह....!” आणि त्यानंतरच्या त्यांच्या हसण्याने शांत गल्लीत खळबळ माजवली. आम्ही अगदी उघडपणे पुन्हा एकदा स्वतःलाच मुर्खात काढत होतो. चिंचेचे दुभागलेले चार चिंचुके सपाट पडले आणि ते चारही चार दिशांना विखुरले होते. आपण लुडोच्या खेळात फासे फेकतो, त्याप्रकारे चिंचुके फेकायचे नव्हते. हलम्मांनी पटकन पुढे येऊन या खेळाचं तंत्र शिकवलं. त्यांनी आम्हाला लक्ष देऊन बघायला सांगितलं आणि मनगटाला झटकन एक हलकासा हिसका देऊन चिंचुके फेकले, अगदी लेग स्पिन गोलंदाजाच्या गुगलीसारखे.
यावेळी ते अपेक्षेप्रमाणे भिन्न/विषम स्थितीत पडले. काहींची सपाट, हस्तिदंती रंगाची पोटं वर दिसत होती. किती चिंचुके उताणे – पोटावर पडलेत त्यावरून हलम्मा त्यांचं प्यादं म्हणजे तुटक्या बांगडीचा गडद हिरव्या काचेचा एक तुकडा पुढं सरकवतात. “एक गिरता है तो एक, दो गिरता है तो दो, तीन गिरता है तो तीन, चार गिरता है तो चार (जर एक चिंचुका उताणा (हस्तिदंती रंगाचं पोट वर) पडला तर एक चौकोन म्हणजे एक घर पुढं जायचं, दोन चिंचुके उताणे पडले तर दोन घरं पुढं जायचं, तीन पडले तर तीन घरं, अशाच रितीनं पुढं जायचं),” असं त्या समजावून सांगतात. कन्नड भाषा फारशी न येणाऱ्या या दोन परक्या नवशिक्यांना खेळ समजावून सांगण्याच्या आणखी एका प्रयत्नात तोडक्या-मोडक्या हिंदीत त्या सांगत होत्या. आता त्यांची पाळी होती. त्या रंगवलेल्या चौकटी पटावर ‘आपली’ काच पुढं सरकवतात आणि सहजतेनं चिंचुके पुन्हा एकदा भिरकावतात.





