‘केवढ्याला दिली तू मासोली गं?’ – लग्न समारंभांमध्ये पारंपरिकपणे गायलं जाणारं हे एक लोकगीत. हे गीत आपल्याला लोकसंगीताची टिकून असलेली परंपरा आणि बदलत्या काळाशी जुळवून घेण्याची ताकद दाखवतं. मुंद्रा तालुक्यात मासेमारी करणाऱ्या जुमा वाघेर यांनी गायलेलं हे गाणं परंपरेनं आनंदोत्सवासाठी असलं तरी आजच्या परिस्थितीत मात्र या समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांमुळे यात सामाजिक आणि राजकीय आशयाची एक नवीनच छटा उमटलेली दिसते.
कच्छच्या भूभागाशी शतकानुशतकं नातं जोपासलेला मासेमारी करणारा मुस्लिम अल्पसंख्याक समाज म्हणजे - वाघेर. या समाजातले पुरुष, महिला आणि मुले गावातून मुंद्रा तालुक्याजवळ समुद्रकिनारी मासेमारी करण्यासाठी स्थलांतर करतात आणि ८ ते ९ महिने तात्पुरत्या झोपड्यांत राहून आपली उपजीविका चालवतात. पुरुष मासे पकडतात, दिवसाचा आपला वाटा आणतात, तर स्त्रिया ते पकडून आणलेले मासे निवडतात, वाळवतात आणि त्याची विक्री करतात.
पण सन २००० नंतर परिस्थिती बदलू लागली. राज्य सरकारने औद्योगिकीकरण आणि किनाऱ्याच्या खासगीकरणाला प्रोत्साहन दिलं. तेलशुद्धीकरण प्रकल्प, सिमेंट आणि खतांचे कारखाने, मिठागरं, बॉक्साईट आणि चुनखडीचं उत्खनन, त्याचबरोबर जहाज वाहतुकीशी संबंधित उद्योग या सगळ्यामुळे या समाजाच्या एकूण वातावरणावर, जगण्यावरच मोठा परिणाम झाला.
बांधकामं आणि प्रदूषणामुळे त्यांची मासेमारीची ठिकाणं नष्ट होऊ लागली; समुद्रकिनारची परिसंस्था आणि नैसर्गिक भरती-ओहोटीचा प्रवाह बिघडला. वाघेर समाजाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झाली कारण पकडल्या जाणाऱ्या माशांची संख्या आणि त्यांचे विविध प्रकार कमी होऊ लागले. त्यामुळे वाघेरे बांधवांना मासेमारीसाठी अधिक खोल समुद्रात जावं लागलं. आणि त्या बदलासोबत ‘पगडिया मासेमारी’ सारखं पारंपरिक ज्ञान देखील हळूहळू हरवू लागलं.
दहा वर्षांपूर्वी या भागातील मासेमारांनी जागतिक बँकेच्या खासगी गुंतवणूक संस्थेविरुद्ध म्हणजेच इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (IFC) विरद्ध अमेरिकन फेडरल न्यायालयात खटला दाखल करण्याचा प्रयत्नही केला होता. कारण आयएफसीने निधी दिलेल्या कोळशाच्या एका प्रचंड मोठ्या प्रकल्पानं त्यांच्या उपजीविकेचं प्रचंड नुकसान केलं होतं. ‘विकास’ या नावाखाली झालेल्या अनिष्ट बदलांमुळे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या आधीच मागास वर्गात (SEBC) गणल्या जाणाऱ्या या समुदायाची असुरक्षितता आता आणखी वाढली आहे.



