मनोज चौधरी यांचं जग अवघ्या काही क्षणात उद्ध्वस्त झालं.
“माझं जग म्हणजे माझी आई आणि माझी पत्नी. पण आता माझी दोन लेकरं तेवढी माझ्यापाशी राहिली. चंद्रपूरच्या ग्रामीण भागातील रहिवासी असलेला ३५ वर्षीय मनोज सांगत होता.
“दोघी जंगलात गेल्या तेव्हा मी आणि लेकरं घरीच झोपलेलो होतो,” तो सांगतो. १० मे २०२५ चा दिवस. काही तासांतच गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात त्या मृत्युमुखी पडल्या. कांता बुधाजी चौधरी, वय ६० वर्षे आणि शुभांगी, ३० वर्षे. सोबच त्यांच्या शेजारी राहणाऱ्या सारिका शालिक शेंडे, वय अंदाजे ५० वर्षे याही वाघाच्या हल्ल्यात बळी ठरल्या.
या तिघी महिला इतर महिलांबरोबर तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या होत्या.
महाराष्ट्रातल्या चंद्रपूर जिल्ह्यातील एक हजाराहून जास्त लोकसंख्या असलेलं मेंढा (माळ) हे गाव दुःखात बुडालंय. गावातील बहुतांश लोक छोटे शेतकरी किंवा भूमीहिन कामगार आहेत. मनोजसुद्धा राज्यातल्या किंवा देशभरातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये कामाच्या शोधात दर वर्षी काही काळ स्थलांतर करतो. मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये उत्पन्नाला हातभार मिळावा म्हणून गावातले सगळेच जंगलातून तेंदूपत्ता आणि मोहाची फुलं गोळा करतात.
सिंदेवाही तालुक्यातल्या ह्या गावाची अधिकृत नोंद मेंढामाळ गुजरी म्हणून केली गेली आहे, परंतु गावाबाहेरच्या एका फलकावर त्याचं नाव मेंढा (माळ) असं लिहिलेलं आहे. हे गाव ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जवळ आहे ६२५ चौरस किलोमीटर कोअर क्षेत्र आणि मानवी लोकवस्ती असलेल्या अभयारण्याभोवती सुमारे १,१०२ चौरस किलोमीटरचं बफर क्षेत्र आहे.
वन विभागाच्या ताज्या आकडेवाडीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यात २२३ वाघ आहेत आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये १०२-१२५ वाघ आहेत. अनेक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, मेंढा (माळ) इथे वाघाने माणूस मारण्याची ही पहिलीच घटना होती.
पोलिस आणि वन अधिकाऱ्यांचा हवाला देत गावकऱ्यांनी सांगितलं की, या तीन महिलांवर वाघिणीने आपल्या तीन बछड्यांसह हल्ला केला होता.
या मृत्युंमुळे जनक्षोभ उसळला, थोडे दिवस निदर्शनं झाली. स्थानिक आमदार आणि जिल्ह्यातले इतर राजकारणी शोकाकुल कुटुंबातले सदस्य आणि ग्रामस्थांना शांत करण्यासाठी गावात आले.
























