मे महिना सुरू झालाय. प्रचंड उकाडा
पण हवा थोडी कुंद. मोहा गावातल्या हजरत सय्यद अलवी (रहमतुल्ला अलैहि) दर्ग्यात लोकांची
वर्दळ सुरू आहे. चाळीस एक कुटुंबांच्या कंदुऱ्या सुरू आहेत. त्यातही मुस्लिम कमी,
हिंदूच जास्त. तावरज खेड्याच्या ढोबळे परिवाराची दर वर्षी इथे कंदुरी असतेच. आज
आम्ही त्यांचे पाहुणे होतो. उस्मानाबादच्या कळंब तालुक्यातल्या या २०० वर्षांहून
जुन्या दर्ग्यात चांगलीच लगबग सुरू होती.
शेतीची कामं उन्हाळ्यात जराशी कमी
असल्याने, लोकांना थोडी उसंत असते. आणि तेव्हाच मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात,
खास करून उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यांमधले दर्गे लोकांनी फुलून गेलेले
असतात. गुरुवार आणि रविवार या दोन दिवशी लोक आपापल्या कुटुंबासोबत,
मित्रपरिवारासोबत मोठ्या संख्येने इथे येतात. बकरे चढवून मटणाचा ‘निवद’ दाखवायचा,
पीर पूजायचा, एकत्र जेवायचं आणि जेवू घालायचं. अशा कंदुऱ्या जागोजागी होत असतात.
“किती तरी पिढ्यांपासून आम्ही हे
करतोय,” साठीच्या भागीरथी कदम म्हणजे आमची भागा मावशी सांगते. ती उस्मानाबादच्या
येडशीत राहते. मराठवाड्यात ६०० हून अधिक वर्षं मुस्लिम राजवट होती. त्यातही २२४
वर्षं हा प्रांत हैद्राबाद संस्थानात निजामाच्या अंमलाखाली होता. इस्लाम इथे परका
नाही. धर्माच्या भिंतीपल्याड जात दर्गे आणि पीर लोकांच्या श्रद्धेत आणि उपासनेत
मिसळून गेले आहेत.
“आम्ही गडाला म्हणजे गड देवदरीला
जातो. खेड्याची लोकं इथे मोहाला येतात. आणि तुमच्या गावचे (बोरगाव बु., जि. लातूर)
तिथे शेऱ्याला जातात,” भागा मावशी सांगते. कधी काळी प्रत्येक दर्ग्याला काही गावं
वाटून दिली गेली आणि आजही ती परंपरा अखंड सुरू आहे.
इथे मोहाच्या दर्ग्यामध्ये प्रत्येक झाडाखाली, पत्र्याच्या किंवा ताडपत्रीच्या
सावलीत लोकांनी चुली मांडल्या आहेत. आणि त्यावर निवदाचा स्वयंपाक सुरू आहे. मटण
शिजेपर्यंत बाया भाकरी करतायत. कुठे गडी आणि बाया आपापसात गप्पा मारत बसले आहेत.
मुलांचा गोंधळ आणि दंगा सुरू आहे. हवेत गरमा असला तरी पश्चिमेकडे ढग येऊ
लागल्यामुळे जरासं झाकोळून आलंय आणि उन्हाचा चटका जरासा कमी झालाय. दर्ग्यात आत
आल्यावर दोन्ही बाजूला असणारी चिंचेची झाडंदेखील गार सावली देतायत. दर्ग्यात
आतमध्ये एक दगडात बांधलेली ९० फूट खोल बारव आहे. आता पाण्याने तळ गाठला असला तरी
“पावसाळ्यात वरपर्यंत पाणी भरतं,” तिथे आलेले एक काका मला सांगतात.
साठी पार केलेले एक काका आपल्या
वयस्क आईला पाठीवर घेऊन दर्ग्यात येतात. जवळपास नव्वदीला टेकलेल्या म्हाताऱ्या
आजींनी नेसलेली पोपटी नऊवार इरकल विटून फिकी झालीये. मराठवाड्यात हिंदू आणि मुस्लिम
दोन्ही समाजात अशाच साड्या नेसल्या जातात. आपल्या आईला पाठीवर घेऊन काका मझारीच्या
पाच पायऱ्या चढतात. पाणावल्या डोळ्यांनी आजी तिच्या देवासमोर मनोभावे हात जोडते.
दर्ग्यामध्ये भाविकांची रांग लागलेली
असते. चाळिशीची एक ताई आपल्या आईसोबत अगदी हळू पावलं टाकत येते. मुख्य
प्रवेशद्वारापासून मझार किमान ५०० मीटर अंतरावर आहे. दोघी माय-लेकी अगदी सावकाश
पावलं टाकत आत येतात. ताई आजारी आहे आणि तिची मानसिक स्थिती ठीक नाही हे तिच्या
चेहऱ्यावरून स्पष्टच दिसतंय. दोघी येतात. हातातला नारळ आणि फुलं वाहतात. उदबत्ती
लावतात. मुजावर नारळ फोडून अर्धा नारळ त्यांना परत देतो आणि आजारी ताईच्या मनगटावर
धागा बांधतो. आई तिथला चिमूटभर अंगारा लेकीच्या कपाळावर लावते. दोघी एका चिंचेखाली
चार क्षण टेकतात आणि परत जातात.
मझारीच्या मागच्या बाजूला असलेल्या
एका लोखंडी कुंपणाला हलक्या आणि गर्द हिरव्या रंगाच्या अनेक बांगड्या बांधलेल्या
दिसतात. लेकीचं लवकर लग्न व्हावं म्हणून या बांगड्या इथे बांधण्याची रीत आहे आणि
ती मुसलमान स्त्रियांप्रमाणे हिंदू स्त्रियाही पाळतात. तिथेच एका कोपऱ्यात एक
लाकडी घोडा उभा आहे आणि त्याच्या समोर मातीचे काही छोटे छोटे घोडे पण आहेत. “जे
मुसलमानाचे होते ना ते पूर्वी घोड्यावर फिरायचे. त्यांची आठवण म्हणून वहायचे
घोडे,” भागा मावशी मला सगळे तपशील सांगते.
माझ्या सासरी पूजल्या जाणाऱ्या दोन घोड्यांचा अर्थ मला आता कुठे कळायला लागतो.
एक घोडा सोनारीच्या भैरोबाचा आणि एक मुसलमानाच्या पिराचा.
*****
कंदुरी
करायची म्हणजे किती तरी बाया रात्रीपासून कामाला लागलेल्या असतात. पण गुरुवार
असल्याने त्यातल्या काही जणी मटण मात्र खाणार नाहीत. का बरं असं विचारल्यावर एक
मावशी म्हणतात. “नाही खाल्लं तर इतकं काय? हे देवाचं काम आहे, माय.”
असे कुठलेही सण, कार्यक्रम बायांच्या
कष्टाशिवाय होऊच शकत नाहीत. पण बऱ्याच बाया भाजी भाकरी किंवा उपासाची साबुदाणा
खिचडी खाणार आहेत. ज्या चुलीवर मटण शिजतंय त्यावरच उपासाचं शिजलं, त्याच
थाळ्यांमध्ये खाल्लं तरी त्यांची काही हरकत नसते. ना कुणाच्या भावना दुखावल्या
जातात, ना कुणाला राग येतो.
लक्ष्मी कदम पुण्यात राहते आणि
कंदुरीसाठी मोहाला आली आहे. भाकरी करून करून इतर बायांप्रमाणे ती पण थकून गेलीये.
मसाला वाटा, ताटं धुवा, भांडी घासा ही सगळी कामं बायांनाच करावी लागतात.
“त्यांच्या [मुस्लिम] बायांचं बरंय माय,” ती वैतागून म्हणते. “ही ढीगभर बिर्याणी
केली की झालं. हा असला राडा नको ना काही नको.”
“कसे गाजरासारखे गुलाबी गाल असतात, बघ!” त्यांच्याबद्दल वाटणाऱ्या असूयेला आता कल्पनेचे पंख फुटतात. काही खात्या-पित्या
घरातल्या, वरच्या जातीच्या बाया वगळता आमच्याभोवती दिसणाऱ्या बहुतेक मुस्लिम बाया वाळलेल्या,
कामाने गांजलेल्या दिसत होत्या. लक्ष्मीच्या मनात असलेल्या ‘गोबऱ्या गुलाबी
गालाच्या’ तर नक्कीच नव्हत्या.
कंदुऱ्यांमध्ये मटण शिजवायचं काम केवळ पुरुष करतात. दर्ग्यात आलेली मुस्लिम मंडळी बिर्याणी करतात. त्या बिर्याणीचा सुगंध हवेत दरवळत राहतो.
पाच भाकरी, तांब्याभर कालवण, मटणाचे
काही खास भाग तसंच गव्हाची पोळी कुस्कुरून त्यात भात, तूप, गूळ किंवा साखर घालून
केलेला गोड मलिदा निवद म्हणून दिला जातो. फक्त पुरुष मंडळी मझारीपाशी जातात आणि
तिथे असलेला मुजावर त्यांच्याकडून निवद घेतो. बाया खाली पायरीपाशी बसून सगळे विधी
पाहतात आणि तिथूनच हात जोडतात. मंदिरात गेल्यासारखं डोक्यावरून पदरही घेतात.
निवद दाखवून झाला की ज्याची कंदुरी असते त्यांना आहेर केला जातो. बहुतेक
ठिकाणी गडी आणि बाया वेगवेगळे बसून मटण आणि भाकरीचा निवद जेवतात. उपास
असणाऱ्यांसाठी उपासाचं काही केलं जातं. त्यानंतर पाच फकीर आणि दर्ग्यात काम
करणाऱ्या पाच बाया जेवू घालतात. आणि कंदुरी पूर्ण होते.
*****
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात माझ्या सासूबाईंची गयाबाई काळेंची कंदुरी ठरते. गेल्या वर्षभरापासून त्यांच्या मनात कार्यक्रम करायचं चालू होतंच. या वर्षी त्यांची धाकटी लेक, झुंबर देखील त्यांच्या सोबत कंदुरी करणार असल्याने आम्ही सगळे लातूरच्या रेणापूर तालुक्यात असलेल्या शेरा या छोट्याशा गावी येऊन पोचतो.
शेऱ्याचा दावल मलिक दर्गा मोहाच्या
दर्ग्यापेक्षा बराच लहान आहे. इथे वेगवेगळ्या जातीची १५ कुटुंबं आली आहेत. पाच-सहा
बाया मझारीसमोर बसून चक्क हिंदू देव-देवतांची भजनं गातायत. काही जणी तिथेच
कोपऱ्यात बसलेल्या एका म्हाताऱ्या फकिराकडून त्यांच्या अडचणींवर सल्ला घेतायत.
तिथेच हलगी वाजवणारी काही पोरं दिसतात. सगळीच दलित समाजातली. आजही मंदिरात फार
मोकळ्याने न जाणारी ही मुलं इथे दर्ग्यात आलेले लोक निवद दाखवतात तेव्हा हलगी वाजवून
चार पैसे कमावतात.
गयाबाईंचा थोरला मुलगा, बालासाहेब
काळे यांच्याकडे मटणाचं सगळं काम आहे. लातूर जिल्ह्यातलं बोरगाव हे माझं सासर.
तिथे थोडीफार शेती असलेले बालासाहेब म्हणजेच अण्णा बकऱ्याची कटई करून घेतात. आणि
त्यानंतर एकदम झणझणीत रस्सा तयार करतात. मायलेकी निवद दाखवून येतात आणि आम्ही सगळे
जेवण करतो. आलेल्यांना जेवायला वाढतो.
या दोन्ही दर्ग्यांमध्ये भेटलेल्या
सगळ्यांसाठी कंदुरी म्हणजे त्यांनी बोललेला शब्द आहे. “करावीच लागते. वझं असतं,
उतरावं लागतं.” कंदुरी केली नाही, बोललेला शब्द पाळला नाही तर काही तरी वाईट होणार
याची भीती त्यांच्या मनात घर करून आहे.
हे सगळे कार्यक्रम करत असताना,
दर्ग्यात जाताना, लोक जेवू घालत असताना किंवा तिथले विधी करताना देखील त्यांचा
स्वतःचा धर्म हिंदूच असतो. पण हे पीर किंवा दर्गेही त्यांचेच देव असतात.
“हा माझा देव आहे आणि माझ्या देवाची कंदुरी मी करणार. माझ्या बापाने केली,
त्याच्या बापाने केली. आता मी करतीये,” गयाबाई अगदी ठामपणे, ठासून आम्हाला
सांगतात.
*****
गयाबाई, भागा मावशी जेव्हा शेऱ्याच्या आणि मोहाच्या दर्ग्याला जाऊन आपला शब्द पाळत होत्या, कंदुऱ्या करत होत्या, तेव्हाच, त्याच मे महिन्यात, इथून ५०० किलोमीटर दूर नाशिकच्या त्रिंबकेश्वर गावात राहणारे सलीम सय्यद त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पायरीशी संदल-धूप वहायला गेले होते. गेल्या शंभर वर्षापासून सुरू असलेली ही प्रथा पाळण्यासाठी वयाची साठी पार केलेले सय्यद आणि त्यांच्यासोबत काही तरुण दर वर्षीप्रमाणे मंदिरापाशी आले.
त्यांचीही ‘त्यांच्या त्र्यंबक
राजावर’ मनापासून श्रद्धा. म्हणून दर वर्षी भरणाऱ्या उरुसाच्या वेळी ते पायरीपाशी
चादर आणि संदल-धूप वाहतात.
पण सय्यद आणि त्यांच्या साथीदारांना
या वर्षी मंदिराच्या पायरीशी जबरदस्ती थांबवण्यात आलं. मंदिरात घुसखोरीचा प्रयत्न
करण्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला. एका धर्मांध हिंदू पुढाऱ्याने तर त्यांना
‘तुमच्या मशिदी न् दर्ग्यात जा, इथे यायची गरज नाही’ असा दम त्यांना दिला.
इतक्यावर हे प्रकरण थांबलं नाही. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत
त्यांच्यावर केस दाखल झाली. त्यांचं वागणं ‘दहशतवादी कृत्य’ आहे का हे
तपासण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं.
या घटनेने हादरून गेलेल्या सलीम सय्यद यांनी चक्क कान धरून माफी मागितली.
सामाजिक सलोखा अबाधित रहावा म्हणून आपण ही प्रथा बंद करत असल्याचं त्यांनी जाहीर
केलं. यातला विरोधाभास कुणाला कळला नाही हेच यातलं सगळ्यात मोठं दुःख.