झारखंडच्या चेचरिया गावातल्या सविता देवीच्या घरच्या मातीच्या भिंतीवर बाबासाहेबांची तसबीर घरावर लक्ष ठेवत असल्यासारखी भासते. “बाबासाहेबांनी आम्हाला [मतदानाचा हक्क] दिलाय, आणि म्हणून आम्ही मत देतोय,” सविता देवी म्हणते.
आपल्या एक बिघा (पाऊण एकर) जमिनीत ती
खरिपात भात आणि मका घेतात आणि रब्बीला गहू, हरभरा आणि तेलबिया. आपल्या परसात काही
भाजीपाला करावा असाही तिचा विचार होता. “पण गेल्या दोन वर्षांपासून, पाणीच
नाहीये,” ती म्हणते. सलग दोन वर्षं दुष्काळ पडल्यामुळे त्यांच्या डोक्यावर आता
कर्ज झालं आहे.
बत्तीस वर्षीय सविता देवी पलामू
जिल्ह्यातल्या या गावी आपल्या चार मुलांसोबत राहते. तिचा नवरा, प्रमोद राम इथून २,००० किलोमीटर दूर बंगळुरूमध्ये कामाला
गेला आहे. “सरकार काही आम्हाला नोकऱ्या देत नाहीये,” रोजंदारीवर काम करणारी सविता
देवी म्हणते. “मुलांचं कसंबसं पोट भरतंय.”
प्रमोद बांधकामावर काम करतो आणि
महिन्याला त्याला १०,००० ते १२,००० रुपये मिळतात. कधी कधी तो ट्रकवर चालक म्हणून
काम करतो. पण हे काम वर्षभर मिळत नाही. “घरची माणसं चार चार महिने घरी बसून राहिली
तर आमच्यावर मागून खायची वेळ येईल. [स्थलांतर सोडून] दुसरा काय पर्याय आहे?” सविता
विचारते.
चेचरिया गावाची लोकसंख्या ९६० (जनगणना, २०११). इथले बहुतेक सगळे जण कामाच्या
शोधात गाव सोडून जातात कारण “इथे कामच नाहीये. इथेच नोकऱ्या मिळाल्या असत्या तर
आम्ही बाहेर का बरं जाऊ?” सविता देवीच्या ६० वर्षीय सासूबाई सुरपाती देवी
विचारतात.
झारखंडमधून कामाच्या शोधात आठ लाख लोक स्थलांतर करून जातात अशी नोंद २०११ साली झालेल्या जनगणनेत केलेली दिसते. “या गावात २० ते ५२ या वयोगटातला एकही काम करणारा माणूस तुम्हाला सापडायचा नाही,” हरिशंकर दुबे सांगतात. “फक्त पाच टक्के उरले असतील, बाकीचे सगळे स्थलांतर करून गेलेत,” ते सांगतात. चेचरिया बासना पंचायत समितीत येतं तिचे ते सदस्य आहेत.
“या वेळी जेव्हा ते मतं मागायला
येतील तेव्हा आम्ही विचारूच की आमच्या गावासाठी तुम्ही काय केलंय?” सविता विचारते.
आवाजात राग आणि निर्धार, दोन्ही. घरच्यांसोबत ती आपल्या घराबाहेर बसली होती. अंगात
गुलाबी रंगाचा गाउन आणि डोक्यावरून एक पिवळी ओढणी घेतली होती. दुपार झालीये, तिचा
चार वर्षांचा मुलगा नुकताच शाळेतून आलाय. शाळेत पोषण आहार म्हणून त्याने खिचडी
खाल्लेली दिसते.
सविता चमार या दलित समाजाची आहे.
गावात अलिकडेच आंबेडकर जयंती साजरी होऊ लागली आहे त्यामुळे सविताला डॉ.
आंबेडकरांबद्दल समजलं. या गावातले ७० टक्के लोक अनुसूचित जातीचे आहेत. तिच्या
घरातल्या भिंतींवरच्या आंबेडकरांच्या तसबिरी काही वर्षांपूर्वी खरेदी केल्या होत्या.
इथून २५ किलोमीटरवर असलेल्या गढवा गावातल्या बाजारातून.
२०२२ साली पंचायतीच्या निवडणुका
झाल्या तेव्हा सविताने गावाच्या मुखियाच्या पत्नीच्या विनंतीवरून एका प्रचार
मोर्चामध्ये भाग घेतला होता. खरं तर अंगात ताप होता. “निवडून आले तर हापसा बसवून
देईन असा शब्द तिने दिला होता,” सविता सांगते. ती जिंकून आली, पण तिने आपलं वचन
काही पूर्ण केलं नाही. मग सविता तिच्या घरी गेली. “भेटणं सोडा, तिने माझ्याकडे
पाहिलंसुद्धा नाही. ती स्वतः एक बाई आहे पण तिला दुसऱ्या बाईचं दुःख कसं काय कळलं
नाही?”
चेचरिया गावामध्ये गेल्या १० वर्षांपासून पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. इथे
एकच विहीर आहे आणि इथली १७९ घरं त्या एका विहिरीवरच पाण्यासाठी विसंबून आहेत. २००
मीटरची चढण चढून गेल्यावर एक हातपंप आहे, त्याच्यावरून सविता दिवसातून दोनदा पाणी
भरून आणते. पाण्याचं सगळं काम करण्यात तिचे दिवसातले पाच-सहा तास जातात. आणि
सुरुवात होते पहाटे चार-पाच वाजता. “आम्हाला एक हातपंप देणं ही सरकारची जबाबदारी
नाहीये का?”
झारखंडमध्ये सातत्याने दुष्काळ पडतोय. २०२२ साली जवळपास अख्खं राज्य – २२६ तालुके – दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले होते. पुढच्या वर्षी, २०२३ साली १५८ तालुके कोरडे होते.
“रोज पिण्यासाठी आणि कपडे वगैरे
धुण्यासाठी किती पाणी वापरायचं त्याचा विचार करावा लागतो,” घराच्या अंगणातल्या
विहिरीकडे बोट दाखवत सविता सांगते. २०२४ चा उन्हाळा सुरू होण्याआधीच ती कोरडी
पडलीये.
चेचरियामध्ये १३ मे रोजी मतदान होणार
आहे. लोकसभा निवडणुकीचा हा चौथा टप्पा असेल. प्रमोद आणि त्याचा धाकटा भाऊ दोघंही
कामासाठी परगावी असतात. ते मत द्यायला गावी परततील. “ते फक्त मत द्यायला येणारेत,”
सविता सांगते. गावी परत यायचं तर ७०० रुपये खर्च येईल. हातातलं कामही जाईल. आणि मग
पुन्हा एकदा त्यांना कामाच्या शोधात भटकत बसावं लागेल.
*****
चेचरियापासून काही किलोमीटरवर एका सहापदरी महामार्गाचं बांधकाम सुरू आहे. पण या गावाला यायला मात्र आजही रस्ता नाही. २५ वर्षांच्या रेणुदेवीला प्रसूतीच्या वेणा सुरू झाल्या तेव्हा रस्ताच नसल्याने सरकारी गाडी (रुग्णवाहिकी) काही तिच्या दारापर्यंत येऊ शकली नाही. “तशा स्थितीत मला मुख्य रस्त्यापर्यंत [३०० मीटर] चालत जावं लागलं,” ती म्हणते. रात्री ११ वाजताच्या किर्र अंधारात केलेला तो पायी प्रवास आजही तिच्या मनावर कोरला गेलेला आहे.
आणि रुग्णवाहिकेचं काय घेऊन बसलात?
सरकारी योजना देखील इथे पोचत नाहीत.
चेचरियातल्या बहुतेक घरात आजही चूलच पेटते. प्रधान मंत्री उज्ज्वला योजनेखाली
त्यांना गॅस सिलिंडरच मिळालेला नाही किंवा पहिली संपल्यानंतर दुसरी टाकी
घेण्याइतके पैसेच त्यांच्यापाशी नाहीत.
चेचरियाच्या सगळ्या रहिवाशांकडे मनरेगाचं कार्ड आहे. वर्षातून प्रत्येक कुटुंबाला १०० दिवस रोजगार मिळण्याची हमी या कायद्याने दिली आहे. ही कार्डं पाच-सहा वर्षांपूर्वी देण्यात आली होती. मात्र त्यावर काहीच लिहिलेलं नाही. पानांचा वास अजूनही कोरा करकरीत आहे.
फी परवडत नाही म्हणून रेणूची बहीण
प्रियांका हिने बारावीनंतर शिक्षण सोडून दिलं. २० वर्षांच्या प्रियांकाने नुकतंच
आपल्या काकूकडून एक शिलाई मशीन वापरासाठी आणलं आहे. शिवणकाम करून पोट भरावं असा
तिचा विचार आहे. “तिचं लवकरच लग्न होणारे,” रेणु सांगते. बाळंतपणानंतर ती सध्या
माहेरी आहे. “नवऱ्या मुलाकडे पक्की नोकरी नाही, पक्कं घर नाही. पण २ लाख रुपयांची
मागणी केलीये,” ती सांगते. लग्नासाठी या कुटुंबाने कर्जही काढलंय.
काहीच कमाई झाली नाही की चेचरियाचे
रहिवासी सावकारांकडून चढ्या व्याजाने कर्जं घेतात. “गावात एकही असं घर नसेल ज्यांच्या
डोक्यावर कर्जाचा बोजा नाही,” सुनीता देवी सांगतात. त्यांची जुळी मुलं, लव आणि कुश
महाराष्ट्रात कोल्हापूरला कामासाठी गेली आहेत. ते घरी पाठवतात त्या पैशावरच इथलं
घर चालतंय. “कधी ५,००० पाठवतात तर कधी १०,०००,” ४९ वर्षीय सुनीता देवी सांगतात.
आपल्या मुलीच्या लग्नासाठी गेल्याच
वर्षी सुनीता देवी आणि त्यांचे पती राजकुमार राम यांनी गावातल्याच एका सावकाराकडून
पाच टक्के व्याजाने एक लाख रुपये कर्ज घेतलं. त्यातले २०,००० त्यांनी फेडले मात्र
अजून दीड लाखांचं कर्ज त्यांच्या डोक्यावर आहे.
“गरीब के छाव दव ला कोई नइके. अगर एक
दिन हमन झूरी नही लानब, ता अगला दिन हमन के चुल्हा नही जली [गरिबावर छत्र धरणारं
कुणी नसतं बाबा. एखादा दिवस जरी आम्ही जळण आणलं नाही ना, दुसऱ्या दिवशी आमच्या घरच्या
चुली पेटायच्या नाहीत],” सुनीता देवी म्हणतात.
त्या आणि त्यांच्यासोबत गावातल्या इतर काही बाया दररोज आसपासच्या टेकड्या आणि
डोंगरांवरून १०-१५ किलोमीटर अंतर पायी तुडवत सरपण गोळा करतात. वनरक्षकांचा त्रास
त्यांच्यासाठी रोजचाच झालाय.
२०१९ साली लोकसभा निवडणुकांआधी सुनीता देवींनी गावातल्या इतर बायांसोबत प्रधान मंत्री आवास योजनेखाली घरासाठी अर्ज केला होता. “कुणालाही घर मिळालेलं नाही. आम्हाला फक्त रेशन इतकाच काय तो लाभ मिळतोय. तेही आधी पाच किलो मिळायचं, ते आता साडेचार झालंय,” त्या सांगतात.
पाच वर्षांपूर्वी या मतदारसंघातून
भाजपच्या विष्णू दयाल राम यांनी एकूण मतांच्या ६२ टक्के मतं मिळवून विजय मिळवला
होता. त्यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या घुरन राम य़ांचा पराभव केला होता. त्या वर्षीदेखील
इथून तेच निवडणुकीला उभे आहेत.
२०२३ सालापर्यंत सुनीता देवींना
त्यांच्याबद्दल काहीही माहीत नव्हतं. मात्र गावातल्या एका मेळ्यात त्यांनी
त्यांच्या नावाच्या काही घोषणा ऐकल्या. “
हमारा
नेता कैसा हो? व्ही. डी. राम जैसा हो!
”
सुनीता देवी म्हणतात, “आज तक उनको
हमलोग देखा नही है.”