मी गेलो तो चौथा दिवस होता. आणि मी पोचेपर्यंत दुपार झाली होती.

चेन्नई ते वायनाडच्या प्रवासात अनेक भागात स्वयंसेवकांची गर्दी झालेली दिसत होती. बस वगैरे काहीच वाहनं नाहीत. अनोळखी लोकांना विनंती करून मला त्यांच्यासोबत प्रवास करावा लागला.

एका पाठोपाठ रुग्णवाहिकांची ये-जा सुरू असल्याने जणू काही युद्धभूमीवर आल्यासारखं वाटत होतं. लोक मृतदेहांचा शोध घेत होते. त्यासाठी मोठमोठाली अवजारं आणि यंत्रं कामाला लागली होती. चूरमाला, अट्टामला आणि मुंडक्कई ही नगरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. इथे वस्तीच्या, निवारा असेल अशी एकही खूण उरली नव्हती. इथल्या रहिवाशांचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. आपल्या जिवलगांचे मृतदेह त्यांना ओळखू देखील येत नव्हते.

नदीकिनारी शव आणि राडारोडा पसरलेला होता. त्यामुळे मृतदेह शोधणारे सगळेच काठीचा आधार घेत नदीच्या काठाने फिरत होते. त्या मलब्यात पाय रुतू नये यासाठी सगळी धडपड सुरू होती. माझा पाय मात्र रुतला. मृतदेहांची ओळख पटवणं अशक्यप्राय होतं. काही अवशेष इथे तिथे विखुरले होते. निसर्गाशी माझं फोर खोल असं नातं आहे. पण हा अनुभव माझ्यासाठी भयानक होता.

भाषेचा अडसर असल्याने मी झालेला विध्वंस केवळ पाहू शकत होतो. मी तिथल्या कुणालाही कसलीही तसदी दिली नाही. मी लवकर येणार होतो पण तब्येतीच्या कारणाने येऊ शकलो नाही.

पाण्याचा प्रवाह जात होतो त्याच्यासोबत मी देखील तीनेक किलोमीटर चालत गेलो. घरं जमिनीत गाडलेली दिसत होती. काहींची निशाणी देखील उरली नव्हती. सगळीकडे सेवाभावी कार्यकर्ते मृतदेहांचा शोध घेत होते. सैन्यदलही अथकपणे शोधकाम करत होतं. सगळे जण एकमेकांच्या साथीने काम करत होते. एकमेकांना खाणं-पाणी देत देत आशा न सोडता काम सुरू होतं. त्यांच्यातल्या एकजुटीचं मला खरंच आश्चर्य वाटत होतं.

PHOTO • M. Palani Kumar

चूरलमला आणि अट्टामला ही दोन्ही गावं पूर्णपणे वाहून गेली आहेत. सेवाभावी कार्यकर्त्यांना जेसीबी मशीन आणून काम करावं लागत होतं. काहींनी स्वतःची यंत्रसामुग्री आणली होती

८ ऑगस्ट २०१९ रोजी शेजारच्याच पुतुमलामध्ये अशीच घटना घडल्याचं लोक सांगत होते. त्यात ४० माणसं मेली. २०२१ साली झालेल्या अशाच आपत्तीत १७ लोकांचा जीव गेला. आता ही तिसरी वेळ आहे. ४३० लोक मरण पावल्याचा अंदाज आहे. १३० जणांचा पत्ता नाही.

मी निघालो त्या दिवशी मला समजलं की पुतुमलापाशी आठ मृतदेह मलब्यात पुरलेले मिळाले. सर्व धर्माचे (हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन व इतर) सेवाभावी कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्यांनी सगळ्या धर्मांच्या रिवाजानुसार अंत्यविधी केले. मृत पावलेले आठ जण कोण होते कुणालाच माहीत नव्हतं. त्यामुळे सगळ्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि त्यांना एकत्र दफन केलं.

रडण्याचा कणही आवाज नव्हता. पाऊस तसाच कोसळत होता.

इथे या अशा आपत्ती वारंवार का बरं येतात? सगळीकडे केवळ माती आण मोठमोठाल्या शिळा दिसत होत्या. कदाचित त्यामुळेच इथली माती सुटी झाली असेल. मी फोटो काढत असताना सगळीकडे मला केवळ हेच दृश्य दिसत होतं. एक डोंगर किंवा एखादी शिळा असं चित्रच नव्हतं.

या भागात पाऊस लागून राहत नाही. पण रात्री १ ते पहाटे ५ सलग पाऊस कोसळला आणि भुसभुशीत झालेला डोंगर कोसळला. त्यानंतर रात्रीतच तीन दरडी कोसळल्या. प्रत्येक शाळा किंवा इमारत पाहताना माझ्या मनात हाच विचार येत होता. सेवाभावी कार्यकर्त्यांशी बोलताना मला हेच जाणवत होतं, की सगळ्यांना अगदी हाच प्रश्न पडलाय. शोधमोहीम हाती घेतलेल्यांनाही काही उत्तर सापडत नव्हतं. आणि तिथल्या रहिवाशांचं तर काय सांगावं? ते या आघातातून कधी बाहेर येतील असं वाटत नाही.

PHOTO • M. Palani Kumar

वायनाडची दुर्घटना घडली त्या भागामध्ये चहाचे अनेक मळे आहेत. इथे दिसतायत ती मळ्यातल्या कामगारांची घरं आहेत

PHOTO • M. Palani Kumar

मुंडक्कई आणि चूरलमाला भागात झालेल्या अतिवृष्टीनंतर वाहून आलेल्या मातीमुळे लाल दिसणारी वेगाने वाहणारी नदी

PHOTO • M. Palani Kumar

इथली सगळा भूभाग माती आणि दगडाचा आहे. अतिवृष्टीमुळे माती सुटी होऊन दगडधोंडे सोबत घेत वाहत गेली. यातून आपत्तीची तीव्रता वाढली

PHOTO • M. Palani Kumar

अतिवृष्टी आणि पाण्याचा जोर यामुळे जमिनीची पूर्ण धूप झाली. चहाचे मळे अक्षरशः वाहून गेले. सेवाभावी कार्यकर्ते मळ्यांमध्ये मृतदेह आहेत का याचा शोध घेतायत

PHOTO • M. Palani Kumar

या आपत्तीतून बचावलेल्या लहानग्यांच्या मनावर प्रचंड मोठा आघात झाला आहे

PHOTO • M. Palani Kumar

दगडधोंडे आणि मातीत गाडली गेलेली घरं

PHOTO • M. Palani Kumar

चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या घरांचं अतोनात नुकसान झालं आहे

PHOTO • M. Palani Kumar

पाण्याबरोबर वाहत आलेल्या मोठमोठाल्या शिळांनी या दुमजली घराचं पूर्णच नुकसान केलंय

PHOTO • M. Palani Kumar

अनेक वाहनांचं प्रचंड नुकसान झालं आणि आता ती वापरण्याच्या स्थितीतही नाहीत

PHOTO • M. Palani Kumar

मदतकार्यातनं काही क्षण विश्रांती

PHOTO • M. Palani Kumar

घरं पडली, संसार वाहून गेला, जे उरलं ते सगळं गाळाने भरलंय

PHOTO • M. Palani Kumar

सेवाभावी कार्यकर्त्यांसोबत सैन्यदलही शोधकार्यासाठी मदत करत आहे

PHOTO • M. Palani Kumar

मशिदीच्या जवळ सुरू असलेलं शोधकार्य

PHOTO • M. Palani Kumar
PHOTO • M. Palani Kumar

डावीकडेः यंत्रांच्या सहाय्याने माती काढून खाली कुणी माणसं दबली आहेत का हे पाहिलं जातंय. उजवीकडेः नदीच्या काठावर कुठे मृतदेह आहेत का हे शोध घेणारा सेवाभावी कार्यकर्ता

PHOTO • M. Palani Kumar

मदतकार्यामध्ये हे सगळेच कार्यकर्ते फार मोलाची भूमिका बजावत आहेत

PHOTO • M. Palani Kumar

शाळा पूर्णच उद्ध्वस्त झालीये

PHOTO • M. Palani Kumar

गाळात पाय रुतू नये यासाठी काठीचा आधार घ्यावा लागतोय

PHOTO • M. Palani Kumar

दगड-माती हटवण्यासाठी क्रेन आणि जेसीबीचा वापर करावा लागतोय

PHOTO • M. Palani Kumar

मदतकार्यात सहभागी स्थानिक आणि कार्यकर्त्यांनी जेवणासाठी काही काळ काम थांबवलंय

PHOTO • M. Palani Kumar

सर्वात जास्त नुकसान झालेल्या पुथुमलामध्ये २०१९ आणि २०२१ साली अशीच आपत्ती आली होती

PHOTO • M. Palani Kumar

रात्रभर अथकपणे काम सुरूच आहे. मृतदेह येण्याची वाट पाहणारे कार्यकर्ते

PHOTO • M. Palani Kumar

तातडीच्या मदतीचे संच सोबत असलेले कार्यकर्ते रुग्णवाहिकांमधून मृतदेह ताब्यात घेण्यासाठी उभे आहेत

PHOTO • M. Palani Kumar

सर्व मृतदेह एका प्रार्थना मंडपात नेले जातात. सगळ्या धर्माचे लोक इथे गोळा झाले आहेत आणि मरण पावलेल्या सगळ्यांसाठी सगळ्या धर्मांना अनुसरून प्रार्थना केली जाते

PHOTO • M. Palani Kumar

पांढऱ्या वस्त्रात गुंडाळलेले मृतदेह दफनासाठी आणले जात आहेत

PHOTO • M. Palani Kumar

अनेक मृतदेहांची ओळख पटू शकलेली नाही

PHOTO • M. Palani Kumar

सर्वांसाठी प्रार्थना म्हटल्यानंतर दफन करायला सुरुवात होते

PHOTO • M. Palani Kumar

रात्रभर अविश्रांतपणे काम करणारे सेवाभावी कार्यकर्ते

M. Palani Kumar

ایم پلنی کمار پیپلز آرکائیو آف رورل انڈیا کے اسٹاف فوٹوگرافر ہیں۔ وہ کام کرنے والی خواتین اور محروم طبقوں کی زندگیوں کو دستاویزی شکل دینے میں دلچسپی رکھتے ہیں۔ پلنی نے ۲۰۲۱ میں ’ایمپلیفائی گرانٹ‘ اور ۲۰۲۰ میں ’سمیُکت درشٹی اور فوٹو ساؤتھ ایشیا گرانٹ‘ حاصل کیا تھا۔ سال ۲۰۲۲ میں انہیں پہلے ’دیانیتا سنگھ-پاری ڈاکیومینٹری فوٹوگرافی ایوارڈ‘ سے نوازا گیا تھا۔ پلنی تمل زبان میں فلم ساز دویہ بھارتی کی ہدایت کاری میں، تمل ناڈو کے ہاتھ سے میلا ڈھونے والوں پر بنائی گئی دستاویزی فلم ’ککوس‘ (بیت الخلاء) کے سنیماٹوگرافر بھی تھے۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز M. Palani Kumar
Editor : PARI Desk

پاری ڈیسک ہمارے ادارتی کام کا بنیادی مرکز ہے۔ یہ ٹیم پورے ملک میں پھیلے نامہ نگاروں، محققین، فوٹوگرافرز، فلم سازوں اور ترجمہ نگاروں کے ساتھ مل کر کام کرتی ہے۔ ڈیسک پر موجود ہماری یہ ٹیم پاری کے ذریعہ شائع کردہ متن، ویڈیو، آڈیو اور تحقیقی رپورٹوں کی اشاعت میں مدد کرتی ہے اور ان کا بندوبست کرتی ہے۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز PARI Desk
Translator : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے