लिंबडी महामार्गाचा एक फाटा मोटा टिंबला गावी जातो. १०-१२ किलोमीटर आत. आणि गावाच्या वेशीवरच वणकरवास नजरेला पडतं. गावातले दलित समाजाच्या विणकरांची घरं आहेत इथे. खट खट, खट खट मागाचा आवाज हवेत भरून राहिलाय. अरुंद गल्लीमध्ये जुन्या धाटणीची कौलाची घरं, काही नुसतीच गवताने शाकारलेली. मागाच्या आवाजात मधूनच एखाद्या माणसाच्या बोलण्याचा आवाज येतो. जरा कान देऊन ऐकलंत ना तर कष्टाचे हुंकारही ऐकू येतील. आणि नीट कानोसा घेतलात तर मागाच्या त्या खटखटीत अवघड नक्षी विणणारा एक सुस्काराही कानावर पडेल. रेखा बेन वाघेलांच्या गोष्टीची नांदी असल्यासारखा.

“आठवीत होते. तीनच महिने झाले होते. लिंबडीच्या एका वसतिगृहात रहायचे मी. चाचणी परीक्षा झाल्यावर घरी आले होते. तेव्हाच आईने सांगितलं की आता मला पुढे शाळेत जाता यायचं नाही. माझ्या मोठ्या भावाला गोपाल भाईला मदतीची गरज होती. पोटासाठी काम करणं गरजेचं होतं म्हणून पदवीचं शिक्षण त्याने मध्येच सोडलं होतं. माझ्या दोन भावांसाठी आमच्या घरच्यांकडे कधीच पुरेसा पैसा नसायचा. मी पटोळाचं काम सुरू करण्यामागचं हे कारण.” रेखा बेन अगदी सरळ बोलतात. टोकदार. गरिबीचा स्पर्श झालेल्या सगळ्याच गोष्टी होतात तसं टोकदार. आज चाळिशीत असलेल्या रेखा बेन गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातल्या मोटा टिंबला गावातल्या निष्णात विणकर आहेत. पटोळा म्हणजेच सुप्रसिद्ध पटोला साडी. (इथून पुढे वाचकांच्या सोयीसाठी पटोला असाच उल्लेख केला आहे.)

“माझ्या नवऱ्याला दारू, सट्टा, पान-मसाला आणि तंबाखूची लत होती,” त्या सांगतात. लग्नानंतरच्या आपल्या आयुष्याचा आणखी एक धागा. हा फारसा सुखावह नाहीच. किती तरी वेळा त्या माहेरी परत यायच्या. पण काही तरी समजूत घालून त्यांना नांदायला सासरी धाडून दिलं जायचं. त्यांच्या दैन्याला पारावार नव्हता. तरीही त्यांनी ते सगळं सहन केलं. “तो चांगला माणूस नव्हताच,” त्या आता सांगतात.

“तो कधी कधी मला मारहाण करायचा, अगदी पोटात मूल असतानाही,” त्या सांगतात. त्यांच्या आवाजात आजही त्या वेदना ताज्या आहेत. “त्याचं एक प्रकरण सुरू होतं ते मला माझ्या मुलीच्या जन्मानंतर समजलं. तरीही मी वर्षभर तशीच त्याच्या बरोबर राहिले. तेव्हाच [२०१० साली] गोपाल भाई अपघातात मरण पावले. आणि त्यांचं पटोलाचं सगळं काम बाकी होतं. गोपाल भाईंनी व्यापाऱ्याकडून माल घेतला होता आणि त्याचं देणं होतं. मग मी पाच महिने माघारीच राहिले [माहेरी] आणि त्यांचं सगळं काम पूर्ण केलं. त्यानंतर माझा नवरा मला घेऊन जायला आमच्या घरी आला,” त्या सांगतात.

पुढची काही वर्षं अशीच गेली. आपण खूश आहोत या समजुतीत. मुलीची काळजी घेण्यात आणि खोल पोटातली वेदना सहन करत. “माझी मुलगी साडेचार वर्षांची झाली तेव्हा मात्र मला तो सगळा छळ सहन करण्यापलिकडे गेला होता,” रेखा बेन सांगतात. शाळा सुटल्यानंतर पटोला विणकामाचं कौशल्य त्या शिकल्या होत्या. घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा हेच कौशल्य त्यांच्या मदतीला आलं. गरिबीचे ओरखडे जरासे मिटू शकले आणि त्यांनी नव्या दमाने आयुष्य पुन्हा एकदा सुरू केलं. आणि ही सुरुवात चांगलीच दमदार होती.

PHOTO • Umesh Solanki
PHOTO • Umesh Solanki

अगदी किशोरवयात असलेल्या रेखा बेन पटोला विणताना. आज पुरुषांचं वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात त्यांनी स्वतःची अशी खास जागा निर्माण केली आहे. एकेरी आणि दुहेरी इकत विणू शकणाऱ्या लिंबडी तालुक्यातल्या त्या एकमेव महिला विणकर आहेत

आणि मग काही काळातच रेखा बेन लिंबडीच्या एकमेव महिला पटोला विणकर म्हणून नावारुपाला आल्या. मागाचा ताणा-बाणा अगदी सराईतपणे विणणाऱ्या कारागीर.

“सुरुवातीला मी आमच्या घरासमोर राहणाऱ्या आमच्या शेजाऱ्यांकडे दांडी काम शिकायला जायचे. ते शिकून घ्यायला मला एक महिनाभर तरी लागला असेल,” रेखा बेन सांगतात. मागावर कोपरं टेकून बोलता बोलता त्या धोटा नीट करतात. काळाबरोबर रापलेले आपले गाल चोळतात. आडव्या-उभ्या धाग्यांवरची नक्षी अगदी बारकाईने त्या जुळवतात.

शटल म्हणजेच धोट्यातलं रिकामं रीळ बदलून त्या जागी रेखा बेन दोरा भरलेलं नवं रीळ टाकतात. त्यानंतर दोन पायपट्ट्या चालवत त्या उभ्या धाग्यांमधले हवे ते धागे वर घेतात आणि त्यातून धोटा इकडून तिकडे टाकतात. एका हाताने आडव्या धाग्याची हालचाल नियंत्रित करणारा खटका ओढणं सुरूच असतं. दुसऱ्या हाताने आडवे धागे घट्ट बसतायत ना ते रुळाच्या मदतीने निश्चित करतात. रेखा बेन एकटीनेच पटोलु विणतात. नजर मागावर, मनातली नक्षी पुढे साकारत जाते. आणि मग अगदी एकाच श्वासात त्या स्वतःचं आयुष्य आणि कलेबद्दल बोलू लागतात.

पटोलु विणण्याचं काम शक्यतो दोघा जणांचं असतं. “दांडीचं काम करणारा मदतनीस डाव्या बाजूला बसतो आणि विणकर उजव्या,” त्या सांगतात. दांडी काम म्हणजे रंगवलेले ताण्याचे आणि बाण्याचे धागे एका रेषेत जुळवण्याचं काम. पटोलुची नक्षी कशी आहे त्यानुसार ही जुळणी ठरते

विणकामाची प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ आणि मेहनतीची असते. रेखा बेन यांचा हात इतक्या वर्षांच्या कामानंतर असा साफ बसलाय की सगळंच सोपं सहज वाटू लागतं. जणू काही त्यांच्या डोळ्यापुढचं एखादं जादुई स्वप्न बोटातून झरझर धाग्यांमधून विणलं जावं. हेच तर विणकाम आहे. त्यात काय इतकं क्लिष्ट किंवा अवघड?

“एकेरी इकतमध्ये नक्षी फक्त बाण्याच्या म्हणजे आडव्या धाग्यांवर असते. दुहेरी इकतमध्ये ताणे आणि बाणे दोन्हींमध्ये नक्षी येते.” दोन प्रकारच्या पटोलांमधला फरक त्या समजावून सांगतात.

या नक्षीमुळेच हे दोन प्रकार वेगवेगळे ओळखले जातात. झालावाडच्या पटोलामध्ये एकेरी इकत असते आणि त्यासाठी बंगळुरूतलं एकदम बारीक रेशीम वापरलं जातं. पण पाटण भागातल्या पटोलामध्ये दुहेरी इकतची नक्षी असते आणि त्यासाठी आसाम, ढाका किंवा काही विणकरांच्या म्हणण्याप्रमाणे अगदी लंडनहून जरासं जाड रेशीम मागवलं जातं.

PHOTO • Umesh Solanki
PHOTO • Umesh Solanki

वेळ आणि कष्ट या दोन्हींचा विचार करता पटोलु विणकामात भरपूर मेहनत लागते. पण रेखा बेन यांचा हात इतक्या वर्षांच्या कामानंतर असा साफ बसलाय की सगळंच सोपं सहज वाटू लागतं. जणू काही त्यांच्या डोळ्यापुढचं एखादं जादुई स्वप्न बोटातून झरझर धाग्यांमधून विणलं जात असावं

PHOTO • Umesh Solanki
PHOTO • Umesh Solanki

पटोलु विणण्याचं काम शक्यतो दोघा जणांचं असतं. दांडीचं काम करणारा मदतनीस डाव्या बाजूला बसतो आणि विणकर उजव्या. पायट्यावर पावलं, एका हातात खटका आणि दुसरा रुळावर. रेखा बेन एकटीने पटोलु विणतात

इकत म्हणून ओळखली जाणारी बांधणीची कला तेलंगण आणि ओडिशासारख्या अनेक भागात दिसून येते. पण गुजरातेतल्या या कलेचं अनोखेपण म्हणजे यातली अगदी नाजूक, बारकावे असलेली विशिष्ट नक्षी आणि उठावदार रंगाचं रेशीम. पटोला साडी महाग असतेच आणि पूर्वीच्या काळी तिला राजाश्रय असल्याचं सांगितलं जातं.

पाडी पटोले भाट, फाटे पण फिटे नही. गुजरातीतल्या या म्हणीत म्हटलंय की पटोला एक वेळ फाटेल पण विटणार नाही. पटोलाच्या नक्षीचं रहस्य तरी नक्की काय ते पुन्हा कधी तरी.

रेखा बेन नवऱ्याचं घर सोडून आल्या. आता पुढची वाट खडतर होती. विणकाम सोडून बराच काळ लोटला होता. पुन्हा सुरुवात करणं सोपं नक्कीच नव्हतं. “मी दोघा-तिघांशी बोलले. पण त्यांनी काही मला विश्वासाने काम दिलं नाही,” त्या सांगतात. “सोमासरच्या जयंती भाईंनी मला ठराविक मजुरीवर सहा साड्या विणायला दिल्या. पण मी चार वर्षांनी मागावर बसले होते त्यामुळे कामात एवढी सफाई नव्हती. त्यांना माझं काम एकदम कच्चं वाटलं आणि त्यांनी काही मला परत काम दिलं नाही. ते काही ना काही कारणं सांगायचे,” सुस्कारा टाकत रेखा बेन सांगतात. त्यांच्या या सुस्काऱ्यामुळे ताण्याची नक्षी बिघडेल की काय अशी शंका माझ्या मनात येऊन जाते.

मग किती तरी दिवस हाताला कामच नव्हतं. ‘विचारावं का नको’ असं द्वंद्व सुरू होतं. गरिबीचे व्रण गडद होऊ लागले. कामाचा सवाल असेल तर कुणापुढे हात पसरायला रेखा बेन मागे पुढे पाहत नसत. पण पैसे मागणं मात्र त्यांना अगदी जिवावर येई. “मी मुन्नाभाई राठोडशी बोलले. माझा आतेभाऊ. त्याने मला थोडं काम दिलं. थोडी थोडी सुधारणा होत होती. त्याला माझं काम आवडलं. मी दीडेक वर्षं मजुरीवर विणकाम केलंय. ती एकेरी इकत असायची. आणि एका पटोला साडीचे मला ७०० रुपये मिळायचे,” रेखा बेन सांगतात. “मी आणि माझी भावजय [गोपाल भाईंची बायको] एकत्र काम करायचो तेव्हा तीन दिवस लागायचे एका साडीला.” म्हणजे प्रत्येक दिवशी किमान दहा तास केवळ विणकाम. इतर कामांवर जाणाऱ्या वेळाची मोजदादच नाही.

जगणं म्हणजे सततचा संघर्ष सुरू होता. आणि त्यातूनच त्या धीट झाल्या. खोल श्वास घेत त्या म्हणतात, “मी एकटीने माझं मीच काम केलेलं बरं असा मी विचार केला. त्यातून आमची आर्थिक परिस्थिती जरा सुधारू शकली असती. मग मी कच्चा माल आणला आणि हातमाग दुरुस्त करून घेतला. एकदा का माग तयार झाला आणि मी ताणे घेऊन आले आणि विणायला सुरुवात केली.”

“आणि हे काम कुठल्या ऑर्डरसाठी नव्हतं,” हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलतं. “मी माझी स्वतःची पटोला विणायला सुरुवात केली. घरूनच त्यांची विक्री सुरू केली. हळू हळू मी साड्यांची संख्या वाढवली.” ही मोठी झेप होती. अगदी बिकट परिस्थितीतून स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेलं पाऊल होतं ते. तरीही एक खंत मनात घर करून राहिली होती. आपल्याला पुरेसं ज्ञान नाही आणि दुहेरी इकतची वीण आपल्याला चांगली जमत नाही याची खंत.

PHOTO • Umesh Solanki
PHOTO • Umesh Solanki

पटोलातला फरक नक्षीमुळे कळतो. आघीच रंगवलेल्या धाग्यांप्रमाणे नक्षी तयार केली जाते. एकेरी इकतमध्ये (डावीकडे रेखा बेन विणतायत तशी) नक्षी फक्त बाण्याच्या किंवा आडव्या धाग्यांवर असते. दुहेरी इकतमध्ये (उजवीकडे) ताणा आणि बाणा दोन्ही धाग्यांवर नक्षी असते

“शेवटी मी माझ्या थोरल्या चुलत्याकडून दीड महिना सगळं शिकून घेतलं,” त्या सांगतात. तेव्हा त्यांची मुलगी लहान होती. चौथीत शिकत होती. सासरच्यांशी कसलाच संबंध उरला नव्हता आणि आर्थिक ताण तर खूपच होता. पण रेखा बेननी जिद्द सोडली नाही. “मी माझ्याकडची सगळी बचत वापरून कच्चा माल आणला, रेशीम घेतलं. सोळा पटोलांच्या नक्षीसाठी मी स्वतः सूत तयार केलं,” त्या सांगतात.

हे सगळं काम करायला खरं तर तीन माणसं हवीत. पण मी सगळं काही एकटीने केलं. अगदी गोंधळून जायचे मी. “पसी विचारयु. जे करवानु छे, ए मारेज करवानु से. मन मक्कम करी लिधु पसी. [जे काही करायचंय, ते मलाच एकटीला करायचंय. मग मी मन घट्ट करून कामाला लागले.]” असं असलं तरी मदत तर लागायचीच. तेव्हा त्यांच्या समाजाचे लोक आले आणि त्यांनी हरतऱ्हेने त्यांना मदत केली. रंगवलेले ताण्याचे धागे दोन खांबांना बांधून ताणून बांधावे लागतात आणि मगच त्याला कांजी लावली जाते, ज्यामुळे ते मजबूत होतात. रंगवलेले, कांजी लावलेले धागे रुळावर गुंडाळावे लागतात. त्यानंतर तो रुळ मागावर बसवावा लागतो. मग फणीतून योग्य प्रकारे धागे काढून मागाला जोडायचे. ही सगळी कामं केली की विणकामासाठी माग तयार होतो. या सगळ्यात लोकांनी रेखा बेन यांना कायम मदत केली.

कांजी लावायचं काम साधंसुधं नाही. जरा जरी थर जास्त झाला तर त्या कांजीच्या वासाने उंदरं आणि पाली धाग्याकडे येणार म्हणजे येणार.

“दुहेरी इकत बिलकुल सोपी नव्हती. मी काही तरी चुकायचे. ताण्याच्या आणि बाण्याच्या धाग्यांची जुळणी चुकायची. अगदी बाहेरच्या लोकांना बोलावून मी त्यांना मला शिकवायला सांगितलंय. एकदा बोलावलं आणि आलं असं कधीच होत नाही. चार-पाच वेळा जाऊन त्यांना विनवण्या केल्यावर लोक येतात. पण नंतर सगळी घडी नीट बसली!” त्यांच्या हास्यात एक प्रकारचं समाधान होतं. पण त्याच सोबत थोडी अनिश्चिती, भीती, गोंधळ, धाडस आणि चिकाटी सगळं काही सामावलेलं होतं. ‘मग घडी बसली’ म्हणजे ताण्याचे आणि बाण्याचे धागे बरोबर जुळले. त्यानंतरच एकदम सफाईदारपणे पटोलाची नक्षी कापडावर उतरते. अन्यथा ग्राहकापेक्षा विणकरालाच ती पटोला महागात पडायची.

दुहेरी इकतचं काम असणारी पटोला पूर्वी फक्त पाटणमध्येच बनायची. “पाटणचे विणकर त्यांचं रेशीम पार इंग्लंडहून मागवतात. आम्ही बंगळुरूतून आणतो. किती तरी व्यापारी राजकोट किंवा सुरेंद्रनगरमधून पटोला खरेदी करतात आणि नंतर त्यावर पाटणचा छाप मारतात,” विक्रम परमार सांगतात. मोटा टिंबलामध्ये विणकर असलेले ५८ वर्षीय परमार आपल्या अनुभवांच्या आधारे ही माहिती देतात.

“आमच्याकडून पन्नास, साठ किंवा सत्तर हजारांना ते जो माल घेतात त्याच्या किती तरी पट किमतीला तो बाजारात विकतात. तेही साड्या विणतात पण हे जास्त स्वस्त पडतं,” परमार सांगतात. गावातले इतरही काही विणकर सांगतात की झालावाडच्या थोड्या स्वस्त पटोलावर पाटणचा छाप मारून मोठ्या शहरात अगदी लाखांमध्ये त्याची विक्री केली जाते. किती तरी काळापासून हा गोरखधंदा सुरू असल्याचं हे कारागीर सांगतात.

PHOTO • Umesh Solanki
PHOTO • Umesh Solanki

रेखा बेन आणि त्यांची भावजय जमना बेन, सोबत जयसुख वाघेला (रेखा बेन यांचे थोरले बंधू) पिवळ्या टसरवर हायड्रोक्लोरिक आम्लाची प्रक्रिया करून नंतर ते धागे पिवळ्या रंगात रंगवतायत. विणकाम सुरू करण्याआधी करण्याच्या अनेक प्रक्रियांपैकी ही अगदी सुरुवातीची प्रक्रिया

PHOTO • Umesh Solanki
PHOTO • Umesh Solanki

रेखा बेन रस्त्यातल्या दोन खांबांमध्ये ताणून बांधलेल्या धाग्यांना कांजीचा थर देऊन तो मजबून करून घेतात. अशा अनेक कामांमध्ये त्यांच्या समाजाचे लोक लागेल तशी मदत करतात

सुमारे चाळीस वर्षांपूर्वी रेखा बेनच्या मागच्या पिढीच्या ७० वर्षीय हमीर भाईंनी पटोलाचं विणकाम लिंबडी तालुक्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आणलं.

“अर्जन भाई भायवदारहून मला राजकोटला घेऊन आले,” हमीर भाई सांगतात. लिंबडीच्या कटारिया गावी आपण कसे पोचलो तो प्रवास त्यांना आजही आठवतो. “जवळपास एक महिना मी या कारखान्यातून त्या कारखान्यात नुसत्या खेटा घालत होतो. एका मालकाने विचारलं ‘चेवा सो?’ [तुझी जात कोणची?] मी म्हणालो, ‘वणकर.’ झालं. तो म्हणाला, ‘काल थी नो आवता. तमारा बेघु पाणी नथि पिवु’ [उद्यापासून येऊ नकोस. मी तुझ्या हातचं पाणी पण पीत नाही.] त्यानंतर मोहन भाई मकवानांनी मला एकदा विचारलं की पटोला विणकाम शिकणार का. मग मी पाच रुपये रोजाने काम सुरू केलं. सहा महिने मी नक्षी कशी तयार करायची ते शिकत होतो, त्यानंतरचे सहा महिने विणकाम,” ते सांगतात. त्यानंतर ते कटारियाला परत आले आणि विणकाम सुरूच ठेवलं. आपल्याकडचं हे कौशल्य त्यांनी इतर अनेक जणांना शिकवलं.

“मी गेली पन्नास वर्षं विणकाम करतोय,” पूंजा भाई वाघेला सांगतात. ते एक अनुभवी विणकर आहेत. “मी विणायला सुरुवात केली तेव्हा मी तिसरीत असेन. सुरुवातीला मी खादीचं काम करायचो. पटोलाला नंतर सुरुवात केली. माझ्या चुलत्याने मला पटोला विणायला शिकवलं. तेव्हापासून मी हेच काम करतोय. सगळ्या एकेरी इकत – सात-आठ हजार.” आपल्या पत्नीकडे जसु बेनकडे बोट दाखवत ते म्हणतात, “आम्ही नवरा-बायको सुरेंद्रनगरच्या प्रवीण भाईंकडे काम करायचो. सध्या आम्ही सहा ते सात महिने रेखा बेनकडे काम करतो.”

“त्यांच्याबरोबर मागावर बसलं [धागे जुळणीसाठी] की दिवसाचे २०० रुपये मिळतात. नक्षीची छोटी मोठी कामं केली तर ६०-७० रुपये मिळतात. माझी मुलगी रेखा बेनच्या घरी धागा रंगवायला जाते. तिला २०० रुपये रोज मिळतो. सगळं मिळून कसं तरी भागवून नेतो, झालं,” जसु बेन सांगतात.

“हे माग-बिग सगळं रेखा बेनचं आहे,” मागाच्या सागवानी चौकटीवर टिचक्या मारत मारत पुंजा भाई म्हणतात. मागाचीच किंमत ३५ ते ४० हजारांच्या घरात आहे. “आमच्याकडे फक्त श्रम. सगळ्यांची मिळून महिन्याला बारा हजारांची कमाई होते,” ते सांगतात. असं म्हणत आपल्या दारिद्र्य झाकायचा ते प्रयत्न करतात.

PHOTO • Umesh Solanki
PHOTO • Umesh Solanki

जसु बेन वाघेला आणि त्यांचे पती पुंजा भाई वाघेला रेखा बेन कडे काम करतात. मागाची सगळी जुळणी, नक्षी नीट यावी म्हणून धाग्यांची जुळणी आणि इतरही छोटी मोठी कामं ते करतात

PHOTO • Umesh Solanki
PHOTO • Umesh Solanki

हमीर भाई कर्शनभाई गोहिल, वय ७० आणि त्यांच्या पत्नी हंसा बेन गोहिल, वय ६५ लिंबडी तालुक्यात पहिल्यांदा पटोलाचं विणकाम घेऊन आले. आज इथली पाटणचा छाप पटोला साडी (उजवीकडे) काही लाखांना विकली जाते

धंदा वाढत गेला आणि मग रेखा बेननी विणकामाचं काही काम पुंजा भाईंकडे सोपवलं. “मी पहाटे पाच वाजता उठते,” त्या सांगतात. “रात्री निजायला ११ वाजतात. काम एके काम सुरू असतं. घरातलं सगळं काम माझीच वाट पाहत असतं. आणि बाहेरचंही. समाजातल्या लोकांकडे येणं-जाणं, ख्याल खुशाली ठेवावी लागते. आणि हा सगळा धंदा पण माझ्या एकटीच्याच डोक्यावर आहे.” बोलता बोलता त्या बॉबिनीत बाण्याचा धागा गुंडाळून ती धोट्यात सरकवतात आणि मग धोटा उजवीकडून डावीकडे फेकतात.

धोटा उजवीकडून डावीकडे, डावकडून उजवीकडे जात येत राहतो. रेखा बेनचे हात ताणा-बाणा जुळवत राहतात आणि सुंदरशी पटोला नक्षी कापडावर साकारत जाते. मनाच्या एका कोपऱ्यात कबीर गुणगुणत राहतो,

‘नाचे ताना नाचे बाना नाचे कूँच पुराना
करघै बैठा कबीर नाचे चूहा काट्या ताना'

कूँच – धागा साफ करण्यासाठी वापरण्यात येणारा मऊ कुंचला

या वार्तांकनासाठी जयसुख वाघेलांची मोलाची मदत झाली आहे. त्यांचे आभार.

Umesh Solanki

اُمیش سولنکی، احمد آباد میں مقیم فوٹوگرافر، دستاویزی فلم ساز اور مصنف ہیں۔ انہوں نے صحافت میں ماسٹرز کی ڈگری حاصل کی ہے، اور انہیں خانہ بدوش زندگی پسند ہے۔ ان کے تین شعری مجموعے، ایک منظوم ناول، ایک نثری ناول اور ایک تخلیقی غیرافسانوی مجموعہ منظرعام پر آ چکے ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Umesh Solanki
Editor : Pratishtha Pandya

پرتشٹھا پانڈیہ، پاری میں بطور سینئر ایڈیٹر کام کرتی ہیں، اور پاری کے تخلیقی تحریر والے شعبہ کی سربراہ ہیں۔ وہ پاری بھاشا ٹیم کی رکن ہیں اور گجراتی میں اسٹوریز کا ترجمہ اور ایڈیٹنگ کرتی ہیں۔ پرتشٹھا گجراتی اور انگریزی زبان کی شاعرہ بھی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Pratishtha Pandya
Translator : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے