“आता वादळ शमलंय ना, आम्हाला इथनं जायला सांगितलंय,” कालिदासपूर गावच्या रहिवासी असणाऱ्या अमीना बीबींनी मे महिन्याच्या अखेरीस मला सांगितलं होतं. “पण आम्ही जावं तरी कुठे?”
पश्चिम बंगालच्या साउथ २४ परगणा जिल्ह्यातल्या अमीना बीबींच्या गावापासून १५० किलोमीटर दूर अम्फान चक्रीवादळ धडकलं त्याच्या आदल्याच दिवशी स्थानिक अधिकाऱ्यांनी अनेक गावातल्या कुटुंबांना निवारा शिबिरांमध्ये हलवलं होतं. या वर्षी १९ मे रोजी अमीना आणि त्यांच्या कुटुंबियांना शेजारच्या गावातल्या तात्पुरता निवारा असलेल्या खोल्यांमध्ये हलवण्यात आलं होतं.
अमीना बीबींचं मातीचं घर वादळात पार धुऊन गेलं. सुंदरबनमधल्या गोसाबा तालुक्यातल्या त्यांच्या गावाची लोकसंख्या ५,८०० इतकी आहे. अमीना, वय ४८, त्यांचे शौहर मोहम्मद रमझान मोल्ला, वय ५६ आणि वय वर्ष २ ते १६ वयाची त्यांची सहा मुलं कसं तरी करून सुरक्षित राहिले.
मोहम्मद मोल्ला वादळ धडकण्याच्या दोनच आठवडे आधी घरी परतले होते. त्या आधी ते पुण्यातल्या एका मॉलमध्ये सफाईचं काम करून महिन्याला १०,००० रुपये कमावत होते. या वेळी त्यांनी घरीच थांबून जवळच्याच मोल्ला खाली बाझारात एक चहाचं दुकान थाटायचं ठरवलं होतं.
घरचं सगळं काम उरकलं की अमीना जवळच्याच गोमोर नदीत खेकडे आणि इतर मासे धरायचं काम करून घरच्या कमाईत भर घालत होत्या. त्या त्यांच्याकडे असलेली मोजकी मासळी बाझारात विकायच्या. “त्याचे मला दिवसाला १०० रुपये देखील मिळायचे नाहीत,” त्यांनी मला सांगितलं होतं.
२०१८ साली त्यांच्या सर्वात थोरल्या मुलाने, राकिब अलीने वयाच्या १४ व्या वर्षी शाळा सोडली. “अब्बा घरी पाठवतात तेवढ्या पैशात आमचं काय भागणार?” तो म्हणतो. “त्यामुळे मग मी कामासाठी बाहेर पडलो.” राकिबला कोलकात्यात एका शिंप्याच्या दुकानात काम करून महिन्याला ५,००० रुपये मिळत होते. कोविड-१९ च्या टाळेबंदी दरम्यान अम्फान येऊन धडकलं आणि तो घरी परतला.
मातीचं, गवताने शाकारलेलं त्यांचं घर गोमोर नदीच्या तीरावर होतं. या आधी आलेल्या प्रत्येक वादळानंतर नदी इंच इंच करत आत सरकत गेली – सिद्र (२००७), आयला (२००९) आणि बुलबुल (२०१९). हळू हळू त्यांची अख्खी तीन बिगा (एक एकर) जमीन नदीने गिळंकृत केली. त्या आधी ते वर्षातून एकदा भाताचं पीक घ्यायचे, काही भाज्या पिकवायचे. अम्फान धडकलं तोपर्यंत त्यांच्याकडे काहीही राहिलं नव्हतं.
या वर्षी २० मे रोजी अम्फान आलं आणि गावातली घरं आणि शेतं खाऱ्या पाण्याने भरून गेली, त्या आधी अमीना आणि इतरही अनेक जणांना छोटा मोल्ला खाली गावात तात्पुरतं हलवण्यात आलं होतं. बिद्याधारी आणि गोमोर नद्यांच्या मोडक्या बांधांवर हे गाव वसलं आहे. राज्य शासन आणि स्थानिक सामाजिक संस्थांनी या कुटुंबांना तयार जेवण आणि पाण्याची पाकिटं पुरवली.
“ते किती काळ इथे राहतील? एक महिना, दोन महिने – आणि त्यानंतर [ते कुठे जातील]?” चंदन मैती विचारतात. निवारा केंद्रात अन्न पुरवणाऱ्या सुंदरबन नागरिक मंच या स्थानिक संस्थेचे ते सचिव आहेत. “पुरुषांना, तरुण मुलांनाही पोटापाण्यासाठी बाहेर पडावंच लागेल. आणि जे स्थलांतर करून जाऊ शकणार नाहीत त्यांना इथे मासे, खेकडे आणि मधावर किंवा नद्या आणि जंगलाच्या भरवशावर रहावं लागेल.”
गेल्या वीस वर्षांपासून सुंदरबनच्या रहिवाशांच्या किती तरी एकर सुपीक जमिनी भरती, पूर आणि चक्रीवादळांमुळे वाहून येणाऱ्या खाऱ्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर पडक झाल्या आहेत. २०२० साली वर्ल्ड वाइड फंडने केलेल्या एका अभ्यासात असं नोंदवण्यात आलं आहे की या प्रदेशातले ८५% रहिवासी वर्षातून फक्त एकदा भाताचं पीक घेतात. पण खाऱ्या पाण्यामुळे मातीची उत्पादकता कमी होते, गोड्या पाण्याची तळी आटतात आणि अशा पाण्यातली मासळीही कमी होते. अशी जमीन परत लागवडयोग्य होण्यासाठी अनेक वर्षांचा काळ जावा लागतो.
“पाणी शेतात १०-१५ दिवस तसंच भरून राहतं,” नामखाना तालुक्याच्या मौसुनी बेटावरच्या बलियारा गावचे ५२ वर्षीय अबू जबाय्येर अली शाह सांगतात. “मिठामुळे जमिनीत काहीच पिकं येणार नाहीत आणि तळ्यांमध्ये मासेही जगू शकणार नाहीत.” अली शाह झिंग्याचा व्यापार करतात. गावाजवळच्या नद्यांमध्ये इथले रहिवासी झिंगे धरतात. शाह लोकांकडून झिंगा विकत घेतात आणि स्थानिक विक्रेत्यांना विकतात.
त्यांच्या घरी, त्यांची बायको, ४५ वर्षीय रोकेया बीबी आणि दोघं मुलं आहेत. रोकेया बीबी भरतकाम करून कधी कधी थोडी कमाई करतात. पण हे कुटुंब थोरला मुलगा २४ वर्षीय साहेब असी शाह केरळमध्ये गवंडी काम करून जो पैसा घरी पाठवतो त्यावर अवलंबून आहे. “तो तिथे दुसऱ्या लोकांची घरं बांधतोय आणि इथे त्याचं स्वतःचं घर मात्र वाहून चाललंय,” अबू जबाय्येर म्हणतात.
२०१४ ते २०१८ या काळात सुंदरबनमधून झालेल्या स्थलांतरांपैकी ६४ टक्के स्थलांतरं आर्थिक संकटामुळे आणि शेती करत राहणं अशक्य झाल्यामुळे होत आहेत असं डेल्टा व्हल्नरेबिलिटी अँड क्लायमेट चेंजः मायग्रेशन अँड अडाप्टेशन या संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न व कृषी संघटनेच्या सध्या सुरू असलेल्या संशोधन प्रकल्पामध्ये नोंदवलं आहे. तसंच अविजित मिस्त्री (पश्चिम बंगालच्या पुरुलियामधल्या निस्तारिनी महिला विद्यालयात सहयोगी प्राध्यापक) यांनी केलेल्या २०० कुटुंबांच्या सर्वेक्षणातही असं आढळून आलं की सर्वेक्षणातील ३/४ घरांमधला किमान एक सदस्य कामाच्या शोधात दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात गेला आहे.
स्थलांतरामुळे किती तरी मुलांना त्यांचा अभ्यास सोडून द्यावा लागलाय, गोसाबा तालुक्याच्या कुमीरमारी गावातले प्राथमिक शाळेतल्या शिक्षिका, पोबित्रा गायेन सांगतात. “नदी जशी हळू हळू आमची घरं आणि जमिनी गिळून टाकतीये तसंच शिक्षणाच्या प्रवाहातून मुलंच हळू हळू नाहिशी व्हायला लागलीयेत,” त्या म्हणतात.
“गेल्या ३-४ वर्षांत [२००९ साली आयला वादळानंतर] परिस्थिती जरा सुधारलीये,” घोरमारा पंचायतीचे प्रधान संजीब सागर म्हणाले. “स्थलांतर करून गेलेले अनेक जण [सुंदरबनला] परतले आणि शेती, तळ्यात मासेमारी करू लागले किंवा काहींनी छोटे मोठे धंदे सुरू केले. पण आधी बुलबुल आणि नंतर अम्फाननी सगळं संपवून टाकलं.”
शेजारच्या नॉर्थ २४ परगणा जिल्ह्यामध्ये नझरुल मोल्ला, वय ५६ आणि त्याचं सहा जणांचं कुटुंब अम्फान वादळातून कसंबसं बचावलंय. त्यांचं मातीचं आणि गवताने शाकारलेलं घर मात्र यात वाहून गेलं. मोल्ला देखील केरळमध्ये गवंडीकाम करायचे. कोविड-१९ च्या टाळेबंदी दरम्यान, अम्फान येण्याच्या एक महिना आधी ते मीनाखान तालुक्यातल्या उचिलदाहा या आपल्या गावी परत आले.
२१ मे रोजी. वादळाच्या दुसऱ्या दिवशी नझरुल स्थानिक अधिकारी वाटप करत असलेले प्लास्टिकचे कागद आणायला गेले, घरावर छप्पर म्हणून ते टाकता आले असते. नझरुल यांची बारी येईपर्यंत कागद संपले. “भिकाऱ्यापेक्षा बेकार वेळ आलीये आमच्यावर,” ते मला म्हणाले होते. “यंदाची ईद उघड्या आभाळाखाली साजरी करावी लागते आता.”
पाथारप्रतिमा तालुक्याच्या गोपालनगर उत्तर गावामध्ये ४६ वर्षीय छबी भुनिया तिच्या वडलांची, शंकर सरदार यांच्या फोटोची तसबीर हातात घट्ट पकडून आहे. २००९ साली आयला वादळात त्यांची झोपडी पडली आणि त्यात ते मरण पावले. “या [अम्फान] वादळाने आमचं घर तर नेलंच पण माझी आणि माझ्या नवऱ्याची ताटातूट देखील केली [मोबाइल नेटवर्क मिळत नसल्यामुळे],” त्या सांगतात.
छबी यांचे पती श्रीदम भुनिया आयला वादळ आल्यानंतर कामासाठी लगेचच तमिळ नाडूला गेले. तिथे ते एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करत होते. अचानक टाळेबंदी लागली आणि त्यांना काही घरी परतून येता आलं नाही. “आमचं शेवटचं बोलणं दोन दिवसांपूर्वी झालंय,” मे महिन्यात छबी मला म्हणाल्या होत्या. “त्यांचे फार हाल सुरू होते असं ते म्हणाले – पैसापाणी सगळं संपलं होतं.”
गोपाळगर उत्तर गावात मृदंगभांगा (स्थानिक भाषेत गोबोडिया) या नदीलगतच्या बांधावर उभे राहिलेले जुने जाणते ८८ वर्षीय सनातन सरदार म्हणतात, “किती तरी वर्षं झाली, स्थलांतिरत पक्ष्यांचे थवेच्या थवे इथे [सुंदरबनमध्ये] यायचे. आताशा ते येईनासे झालेत. आता आम्हीच झालोय स्थलांतरित.”
ता.क.: २३ जुलै रोजी लेखकाने गावाला भेट दिली तेव्हा अमीना बीबी आणि त्यांचं कुटुंब त्यांच्या गावी परतलं होतं. पाणी ओसरलं होतं आणि त्यांनी बांबू आणि प्लास्टिकचे कागद वापरून तात्पुरती झोपडी उभारली होती. रमझान अजूनही घरीच होते आणि टाळेबंदीच्या निर्बंधामुळे कामाला जाऊ शकत नव्हते. आपला स्वतःचं चहाचं दुकान सुरू करण्यापुरते पैसे आता त्यांच्यापाशी नाहीत.
नझरुल मोल्ला आणि त्यांच्या आणि इतरांच्याही कुटुंबांनी आपली पडझड झालेली घरं नव्याने उभारायचा प्रयत्न केलाय, सोबत आपली आयुष्यंही.
अनुवादः मेधा काळे