आमच्या भागात मुख्यतः विचार केला तर वेगवेगळ्या सात जमातीचे लोक राहतात. त्यामध्ये वारली जातीचे लोक जास्त प्रमाणात आहेत. आणि अशा भागामध्ये शिकवत असताना मला नक्कीच खूप आनंद होतो, कारण मी ही स्वतः याच भागातला आहे. म्हणजे माझं  प्राथमिक शिक्षण इथेच झालेलं आहे.

मी भालचंद्र रामजी धनगरे- प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कळमवाडी, तालुका मोखाडा.

माझे मित्रही मला म्हणतात, 'तू जी भाषा ऐकतोस ती पटकन शिकतोस, बोलू लागतोस'. एखादी भाषा लगेच शिकता येते. म्हणजे कुठल्याही जमातीत गेलो की त्या लोकांना वाटणारच नाही की हा आपल्या जमातीपेक्षा वेगळा आहे. 'हा तर आपलाच माणूस आहे', आपल्यासारखेच बोलतो असंच त्यांना वाटतं. आपल्या मातीतला आपल्यासारखं बोलणारा माणूस आहे.

व्हिडिओ पहाः वारली मुलांच्या शिक्षणासाठी झटणारा शिक्षक

आमच्या आदिवासी भागात जी मुलं आहेत त्यांच्याशी संवाद साधताना माझ्या हे लक्षात आलं की त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. महाराष्ट्र शासनाचा एक असा निकष आहे की आदिवासी क्षेत्रामध्ये काम करणारे जे शिक्षक आहेत त्यांना एक विशेष ग्रेड दिली जाते. हि ग्रेड तुम्ही विशेष क्षेत्रामध्ये काम करत आहात म्हणून तुम्हाला प्रदान करण्यात येते. आणि ग्रेड देत असताना शासनाने असा नियम ठरवून दिला आहे की तुम्ही ज्या भागात काम करत आहात त्या गावातील त्या परिसरातील लोकांची रोजच्या वापरातली भाषा तुम्हाला आत्मसात करता आली पाहिजे.

इथे मुख्यतः वारली भाषाच जास्त प्रमाणात बोलली जाते, त्यामुळे शाळेमध्ये वारली भाषा बोलणारी मुलेच संख्येने जास्त आहेत. इथे जर मुलांना एकदम इंग्रजी शब्द बोलायला शिकवायचे असतील तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला त्यांना मराठी  भाषेत सांगावं लागतं आणि मग त्या शब्दाला आपण वारली भाषेमध्ये काय म्हणतो हे सांगावं लागतं आणि मग त्या शब्दाला इंग्रजी मध्ये काय प्रतिशब्द आहे हे नीट समजावून देऊन सुरुवात करावी लागते.

हे जरी असले तरीही मुळात इथली मुलं खूप हुशार व काटक आहेत. खूप छान वाटतंय मुलांशी संवाद साधताना आणि विशेष म्हणजे इथली मुलं जरी आदिवासी क्षेत्रात जन्माला आलेली असली, तरी ती प्रमाण भाषेशी लवकर जुळवून घेतात. प्रमाणभाषा त्यांना लवकर येते. पण ज्या गतीने इथल्या भागात शिक्षण दिलं गेलं पाहिजे तेवढ्या गतीने इथे शिक्षण पोहोचलं नाहीये आणि खरं तर तीच काळाची गरज आहे.एकूण अशिक्षितांचे प्रमाण जवळपास ५० % आहे आणि होणारा विकास देखील त्यामानाने कमीच आहे.

इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसोबत पारंपरिक कातकरी गाणं गात फेर धरणारे भालचंद्र धनगरे आणि प्रकाश पाटील हे दोघं शिक्षक

या भागात अगदी नव्वदच्या दशकापर्यंत दहावीच्या पुढे शिक्षण घेतलेली माणसंच नव्हती. तिथून पुढे एक पिढी हळूहळू शिकू लागली. म्हणजे समजा पहिल्या इयत्तेत २५ वारली विद्यार्थी शिकत असतील, तर दहावीपर्यंत केवळ आठ (८) विद्यार्थीच पोचतात. एवढं गळतीच प्रमाण आहे. दहावीला समजा आठ विद्यार्थी बसले तर त्यातील पाच किंवा सहाच विद्यार्थी पास होतात. तिथे पण नापास झाल्यामुळे गळती झाली की अकरावी बारावीला जाईपर्यंत तीन किंवा चार विद्यार्थी राहतात. त्यानंतर बारावीत सुद्धा गुणवत्ता नसल्यामुळे काही विद्यार्थी तिथेही गळतात. तर तिथून पुढे डिग्रीपर्यंत जाणारे अगदी तीनच विद्यार्थी उरतात.

डिग्री शिक्षण तालुका पातळीपर्यंत आहे. इथून पुढे दहा किलोमीटर अंतरावर महाविद्यालय आहे. पण  डिग्रीनंतर शिकण्यासाठी इथे सोय नाही. त्यामुळे ठाणे, नाशिक किंवा पालघर मध्ये जाऊन पुढील शिक्षण घ्यावं लागतं. आज जर तालुक्याचा विचार केला तर डिग्रीपर्यंत शिक्षण घेतलेल्या व्यक्तींचे प्रमाण अगदी ३% पर्यंतच आहे.

वारली समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण अतिशय अल्प आहे. ते वाढण्यासाठी सगळ्यांचेच प्रयत्न चालू आहेत. आम्ही देखील खूप प्रयत्न करतो आहोत. गावोगावी लोकांच्या भेटी घेतो. भेटी घेत असताना त्यांच्याच भाषेमध्ये बोलतो. त्यांना आमची ओळख पटवून देतो. असे प्रयत्न चालू आहेत.

मुलाखत: मेधा काळे

या वार्तांकनासाठी आरोहन संस्थेच्या हेमंत शिंगाडे यांची मोलाची मदत झाली. त्यांचे मनापासून आभार.

भारतभरातल्या अनेक भाषा आज लोप पावत आहेत. या भाषा बोलणाऱ्या समुदायांचं जगणं टिपत आणि सामान्य माणसांच्या शब्दांत नोंदवून ठेवण्याचं काम पारीने हाती घेतलं आहे.

वारली इंडो-आर्यन भाषा असून ती गुजरात, दिव-दमण, दादरा नगर हवेली, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यामध्ये राहणाऱ्या वारली आदिवासींची भाषा आहे. युनेस्कोच्या ॲटलस ऑफ लँग्वेजेसनुसार (भाषांचा नकाशासंग्रह) भविष्यात धोक्यात येऊ शकणाऱ्या भारतीय भाषांमध्ये वारली भाषेचा समावेश होतो.

महाराष्ट्रामध्ये बोलली जाणारी वारली भाषा नोंदवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Bhalchandra Dhangare

بھال چندر دھنگرے، پالگھر ضلع کے موکھاڈا میں واقع ضلع پریشد اسکول میں ایک ٹیچر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Bhalchandra Dhangare
Editor : Siddhita Sonavane

سدھیتا سوناونے ایک صحافی ہیں اور پیپلز آرکائیو آف رورل انڈیا میں بطور کنٹینٹ ایڈیٹر کام کرتی ہیں۔ انہوں نے اپنی ماسٹرز ڈگری سال ۲۰۲۲ میں ممبئی کی ایس این ڈی ٹی یونیورسٹی سے مکمل کی تھی، اور اب وہاں شعبۂ انگریزی کی وزیٹنگ فیکلٹی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Siddhita Sonavane
Video : Siddhita Sonavane

سدھیتا سوناونے ایک صحافی ہیں اور پیپلز آرکائیو آف رورل انڈیا میں بطور کنٹینٹ ایڈیٹر کام کرتی ہیں۔ انہوں نے اپنی ماسٹرز ڈگری سال ۲۰۲۲ میں ممبئی کی ایس این ڈی ٹی یونیورسٹی سے مکمل کی تھی، اور اب وہاں شعبۂ انگریزی کی وزیٹنگ فیکلٹی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Siddhita Sonavane