“बिनशर्त प्रेम आणि पूर्ण स्वीकार. शिक्षक म्हणून मी या मुलांकडून हे शिकलीये!”
मेधा टेंगशे अगदी हळुवार आवाजात पण ठामपणे आपलं म्हणणं मांडतात. साधना व्हिलेज या निवासी संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या मेधाताई विशेष मुलांच्या शिक्षक आहेत. साधना व्हिलेजमध्ये विविध वयाच्या आणि विविध बौद्धिक, मानसिक स्तरावर असलेल्या ३० व्यक्ती राहतात. जगण्यासाठी आवश्यक कौशल्यांसोबतच त्यांना हस्तकला, संगीत आणि नाचासारख्या कला शिकवल्या जातात.
पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यात साधना व्हिलेज गेली ३० वर्षं काम करत आहे. इथल्या सगळ्यांना ‘विशेष मित्र’ म्हटलं जातं. पत्रकार आणि प्राध्यापक असलेल्या मेधाताईंना आपल्या घरातल्या दहा जणांची गृहमातेची भूमिका सगळ्यात जास्त आवडते. “एक आई आणि एक बाई किंवा शिक्षिका.”
पुण्याच्या धायरी कर्णबधिर मुलांच्या शाळेत शिकवणाऱ्या सत्यभामा आल्हाट यांच्या मनातही काहीशी अशीच भावना दिसते. “आमच्यासारख्या निवासी शाळांमध्ये शिक्षक पालकाची भूमिकाही निभावत असतात. आमच्या मुलांना घराची कमी भासू नये असाच आमचा प्रयत्न असतो,” आमच्याशी बोलता बोलता त्या काही मुलींना फुगडी शिकवू लागतात. शाळेत आज नागपंचमी साजरी होतीये. या शाळेत ४० निवासी आणि १२ येऊन जाऊन शिकणारी मुलं आहेत. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांसोबत कर्नाटक, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि राजस्थानातलेही काही विद्यार्थी इथे शिक्षण घेतायत.
आल्हाट बाई सांगतात की पालक स्वतः चौकशी करून मुलांना वसतिगृहात पाठवतायत. इथून उत्तीर्ण होऊन गेलेल्या मुलांकडून त्यांनी शाळेतील सुविधा आणि शिक्षकांबद्दल चांगलं ऐकलेलं असतं आणि ते विश्वासाने त्यांच्या मुलांना इथे पाठवतात. शिवाय इथे शिक्षण मोफत आहे आणि राहण्याची सोय असल्याने अगदी साडेचार वर्षांची मुलंसुद्धा इथे शिकायला येत असल्याचं त्या सांगतात. आणि गंमत म्हणजे काही पालक आपल्या ऐकू-बोलू येणाऱ्या मुलांना इथे प्रवेश द्या म्हणून मागे लागतात. “मग आम्हाला त्यांना समजावून सांगावं लागतं की तुम्ही दुसऱ्या शाळेत जा म्हणून,” बाई सांगतात.
विविध प्रकारचं अपंगत्व असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना ‘विशेष शिक्षक’ असं म्हटलं जातं. आपल्या विद्यार्थ्यांमधले फरक, त्यांच्या अक्षमता किंवा अपंगत्व आणि विशेष गरजांना सुसंगत अशा प्रकारे हे शिक्षक त्यांना शिकवत असतात. आपली कामं त्यांना स्वतःला करता यावीत यासाठीही ते प्रयत्नशील असतात. पण यातल्या बहुतेक शिक्षकांना असं ठामपणे वाटतं की विशेष शिक्षण केवळ विविध पद्धतींपुरतं मर्यादित नाहीये. शिक्षक आणि विद्यार्थ्यामधलं घट्ट नातं अशा शिक्षणाचा पाया आहे.
२०१८-१९ साली महाराष्ट्रात विशेष गरजा असणारी ३ लाखाहून जास्त मुलं इयत्ता पहिली ते बारावीमध्ये शिकत असल्याचं दिसतं. महाराष्ट्रात सुमारे १६०० विशेष शाळा आहेत. २०१८ साली वर्षी राज्याचं दिव्यांग धोरण जाहीर झालं, ज्यानुसार प्रत्येक शाळेत विशेष मुलांना शिक्षण सुलभ व्हावं यासाठी एक विशेष शिक्षक नेमण्यात येणार असल्याचं नमूद केलं होतं. धोरण जाहीर झालं असलं तरी २०१८ साली संपूर्ण मुळशी तालुक्यासाठी, इथल्या ९६ गावांसाठी केवळ नऊ विशेष शिक्षकांची नेमणूक झाली असल्याचं मेधाताई सांगतात.
आपल्या विद्यार्थ्यांमधलं वेगळेपण, वेगळ्या क्षमता आणि विशेष गरजा जाणून घेऊन त्यास सुसंगत शिक्षण देत त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न विशेष शिक्षक करत असतात
*****
विशेष मित्रांना शिकवायचं तर आपल्या अंगी खास गुण हवेत. आणि त्यात जर “ही मुलं तुमच्या आई-वडलांच्या वयाची असली” तर ते काही सोपं नसल्याचं राहुल वानखेडे सांगतो. सामाजिक कार्याचं प्रशिक्षण घेतलेला मूळचा वर्ध्याचा असणारा राहुल गेल्या एक वर्षापासून साधना व्हिलेजमध्ये राहत आहे. त्याची सहकारी वर्ध्याचीच कांचन येसनकर, गेल्या पाच वर्षांपासून साधना व्हिलेजसोबत आहे. इथल्या मुलांमुळे आपण अधिक आनंदी राहू लागल्याचं ती सांगते.
हडशीचा कुणाल गुजर आता २० वर्षांचा झालाय. पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या कुणालला सौम्य मतिमंदत्व आहे आणि त्याचा डावा हातही थोडा कमजोर आहे. त्याची आणि त्याच्यासोबत इतर सहा विशेष मुलांची आवडती जागा म्हणजे देवराई केंद्र. ३४ वर्षीय मयुरी गायकवाड आणि तिच्या सहकारी करोना येण्याआधी हडशीच्या कालेकर वाडीत हे केंद्र चालवत होत्या. “तिनं मला गाणी शिकवली, पाढे शिकवले. आणि व्यायाम. हात असे करायचे, मग असे, मग तसे,” असं म्हणत कुणाल व्यायाम करून दाखवतो.
या मुलांना शिकवायचं असेल तर त्यांच्याबद्दल मनात प्रेम आणि आपलेपणाची भावना असली पाहिजे असं मयुरी म्हणते. ती कातकरी मुलांबरोबर काम करते, वाचनालय चालवते. शेती करत करत संस्थेचं काम करणाऱ्या मयुरीला लहानपणापासून विशेष मुलं म्हणजे कुणी काही वेगळी आहेत असं वाटलंच नाही. त्यांच्याबद्दल ओढ होती म्हणूनच ती देवराई केंद्रात त्यांची शिक्षिका होई शकली.
संगीता कालेकरचा मुलगा सोहम १० वर्षांचा आहे. त्याला फिट येण्याचा आजार आहे. त्याला उठवून बसवणं, चालवणं आणि बोलायला शिकवणं असं सगळं संगीतानेच केलं आहे. तीच त्याची एकमेव शिक्षिका आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. “आता तो आई, आई म्हणायला लागलाय,” ती सांगते. सोहम आज किल्लीशी खेळत बसलाय. जमिनीवर किल्ली टाकायची, फेकायची आणि मग चिरकायचं असा त्याचा खेळ आहे.
हे असे वेगवेगळे आवाज पुण्याच्या धायरी कर्णबधिर मुलांच्या शाळेतल्या शिक्षकांच्या अगदीच परिचयाचे आहेत. या निवासी शाळेत शिकणारं मूल जेव्हा असे काही आवाज काढतं, तेव्हा ते बोलण्याच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल असतं. आणि हाताच्या खाणाखुणा सोडल्या तर “ही मुलं बाकी ‘नॉर्मल’ मुलांपेक्षा अजिबात वेगळी नाहीत,” सत्यभामा आल्हाट सांगतात. त्या गेली २४ वर्षं विशेष शिक्षिका म्हणून काम करत आहेत.
पुण्यातील सुहृद मंडळ या संस्थेने गेल्या ५० वर्षांत राज्यभरात कर्णबधिरांसाठी एकूण ३८ शाळा सुरू केल्या असून शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचं मोलाचं काम ही संस्था करत आहे. त्यातलीच ही धायरीची शाळा. इथल्या शिक्षकांनी बी एड (कर्णबधिर शिक्षण) किंवा डिप्लोमा पूर्ण केले आहेत. आणि अगदी स्वतःच्या इच्छेने ते या क्षेत्रात आले आहेत.
इयत्ता ४ थीच्या वर्गातला फळा सुंदर चित्रांनी भरून गेला आहे. इमारत, घोडा, कुत्रा, तळं अशा शब्दांची चित्रं काढली आहेत कारण मोहन कानेकर सरांना हे शब्द आज चौथीच्या मुलांना शिकवायचे आहेत. २१ वर्षांचा दांडगा अनुभव असणारे कानेकर सर, वय ५४ आणि या शाळेतले सगळेच शिक्षक ‘टोटल कम्युनिकेशन’ ही पद्धत वापरतात. यामध्ये मोठ्याने बोलणं, हातांच्या खुणा किंवा साइन आणि लिखित शब्द अशा सगळ्या पद्धती वापरल्या जातात. त्यांच्या सगळ्या साइन आणि ओठांच्या हालचालींना विद्यार्थी प्रतिसाद देतात आणि वेगवेगळ्या सुरात, पट्टीत उत्तरं देतात. त्यांच्यामागून तसंच बोलण्याचा प्रयत्न करतात. हे सगळे आवाज ऐकताना कानेकर सरांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नाही. मग प्रत्येक विद्यार्थ्याचे उच्चार दुरुस्त करण्याचं काम सुरू होतं.
खालच्या मजल्यावरच्या वर्गामध्ये अदिती साठे पायरी ३, म्हणजे बालवाडीचा वर्ग घेत आहेत. १९९९ पासून या शाळेत मदतनीस म्हणून काम करणाऱ्या अदितीताईंना स्पष्ट बोलता येत नसलं तरी या मुलांना शिकवताना त्याचा कुठेही अडसर येत नाही.
त्याच वर्गात सुनीता झिने शाळेतल्या सगळ्यात छोट्या वर्गाला पायरी १ ला रंग शिकवतायत. आणि मुलांचा नुसता धुमाकूळ सुरू आहे. त्या सगळ्या ‘गोंगाटा’चा अदितीताईच्या वर्गाला कणभरही त्रास होत नाही. ४७ वर्षीय सुनीता झिने वसतिगृहाच्या अधीक्षक आहेत आणि विशेष शिक्षिकाही. त्यांनी रंग सांगितला की वर्गातली मुलं वर्गभर तो रंग शोधत पळू लागतात. निळी पर्स, लाल साडी, काळे केस, पिवळी फुलं... रंग सापडला की मुलं आनंदाने कल्ला करतात. काहींचा आवाज घशातून येतो आणि काहींचा फक्त चेहऱ्यावर किंवा हातातून व्यक्त होतो. सुनीताताईंचा चेहरा फार बोलका आहे.
"आज समाजात, शाळांमध्ये इतकी आक्रमकता आणि हिंसा वाढली असताना बुद्धी आणि यशाच्या आपल्याच संकल्पना आपण तपासून पहायला पाहिजेत असं मला वाटतं. हो, आणि शिस्त आणि शिक्षेच्याही,” मेधाताई म्हणतात. आणि मग त्या सगळ्याच शिक्षकांना विशेष मुलांच्या एका तरी शाळेला किंवा संस्थेला भेट देण्याचं आवाहन करतात. “सौम्य शब्दांनी काय घडू शकतं, बघा तर” मेधाताई म्हणतात.
सुहृद मंडळाच्या डॉ. अनुराधा फातरफोड यांची या वार्तांकनासाठी मोलाची मदत झाली, त्यांचे मनापासून आभार.