लुकोर कोथा नुहुनिबा
बातोत नांगोल नाचाचिबा

[लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका
रस्त्याच्या कडेला नांगर कधीच तासू नका]

ही आसामी भाषेतली म्हण सांगते की कामावरचं लक्ष ढळू देऊ नका.

हनीफ अली निष्णात सुतार आहेत. ते शेतकऱ्यांसाठी नांगर बनवतात. आणि त्यांच्या कामाला ही म्हण अगदी तंतोतंत लागू पडते. अली शेतीसाठी लागणारी लाकडी अवजारं बनवतात. आसामच्या मध्यभागी असलेल्या दरांग जिल्ह्यातली बरीचशी जमीन आजही शेतीखाली आहे. आणि याच शेतीच्या कामासाठी लागणारी अनेक अवजारं अली बनवतात.

“मी किती तरी प्रकारची अवजारं बनवतो. नांगोल [नांगर], चोंगो [बाबूची शिडी], जुवाल [जू], हाथ नाइंगले [बागकामाचा पंजा], नाइंगले [पंजा], ढेकी [पायाने चालवायचं उखळ], इटमगौर [मोगरा], हारपात [भातं सुकल्यानंतर गोळा करण्यासाठी वापरण्यात येणारं बांबूला लावायचं अर्धगोलाकार लाकडी अवजार] आणि इतरही बरीच आहेत,” अली म्हणतात.

त्यांची पहिली पसंती म्हणजे फणसाचं लाकूड. इथे बंगालीमध्ये त्याला काठोल म्हणतात आणि आसामी भाषेत कोथाल. दरवाजे, खिडक्या आणि पलंग बनवण्यासाठी या लाकडाचा वापर केला जातो. अली सांगतात की लाकडाचा एक तुकडाही ते वाया जाऊ देत नाहीत. त्यामुळे समोरच्या लाकडातून जितकी जास्त शक्य तितकी अवजारं बनवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

नांगर तयार करणं फार कौशल्याचं काम आहे. “लाकडावरच्या खुणा इंचभराने जरी चुकल्या तर अख्खं लाकूड वाया जाण्याची भीती असते,” अली सांगतात. एक लाकूड वाया गेलं तर २५०-३०० रुपयांचं नुकसान होतं.

PHOTO • Mahibul Hoque
PHOTO • Mahibul Hoque

डावीकडेः नांगर बनवणाऱ्या हनीफ अलींच्या हातातलं लाकडी जू. हे जू नांगरट करत असताना बैलांच्या मानेवर ठेवलं जातं. नांगराचं चित्र आणि त्याच्या विविध भागाची नावं

त्यांचं गिऱ्हाईक म्हणजे प्रामुख्याने बैलाने नांगरट आणि शेती करणारे सीमांत शेतकरी. त्यांची शेतात अजूनही मिश्र पिकं घेतली जातात. फ्लॉवर, कोबी, वांगं, नोल-खोल, वाटाणा, मिरची, दुधी, लाल भोपळा, गाजर, कारली, टोमॅटो आणि काकडी असा सगळा भाजीपाला ते करतात. मोहरी आणि भात ही त्यांची मुख्य पिकं.

“कुणालाही नांगर हवा असेल तर तो माझ्याकडेच येणार,” साठीचे अली सांगतात. “१०-१५ वर्षांपूर्वी या भागात केवळ २ ट्रॅक्टर होते. जमिनीची सगळी मशागत आणि काम पूर्वी नांगरावरच केलं जायचं,” ते मला सांगतात.

मुकद्दस अली अजूनही त्यांच्या शेतात अधून मधून लाकडी नांगराचा वापर करतात. साठीचे मुकद्दस सांगतात, “आजही नांगराची काही दुरुस्ती असली तर मी हनीफकडेच जातो. काही जरी खराब झालं असलं तरी फक्त तोच ते नीट करू शकतो. त्याच्या वडलांप्रमाणे तोही फार चांगले नांगर बनवतो.”

मात्र आता नवीन एखाद्या नांगरावर पैसे खर्च करणार का याची मात्र मुकद्दस यांनी खात्री नाही. “बैलं घ्यायची नांगरटीला तर त्यांचे पैसे वाढलेत. मजूर सहज मिळत नाहीत. ट्रॅक्टरपेक्षा नांगराने शेती करायला फार जास्त वेळ लागतो,” ते सांगतात. लोक आता ट्रॅक्टर किंवा बॅटरीवर चालणाऱ्या नांगरांचा वापर का करू लागलेत हेच त्यांच्या बोलण्यातून समजून येतं.

PHOTO • Mahibul Hoque
PHOTO • Mahibul Hoque

डावीकडेः आपल्या बांबूच्या घराबाहेर बसलेले हनीफ अली. सोबत नांगराचे काही भाग आणि अवजार तयार करण्यासाठी आणलेला लाकडी ओंडका. उजवीकडेः हनीफ अलींच्या हातातली कुठी, किंवा नांगराची मूठ. नांगराचं खोड जर फार लांब नसेल तर मग ही मूठ त्याला जोडली जाते

*****

हनीफ अगदी लहान असतानाच ही कला शिकले. आता ते त्यांच्या घरातले दुसऱ्या पिढीचे कारागीर आहेत. “मी फक्त काही दिवस शाळेत गेलो. माझी आई किंवा बाबा दोघांनाही शिक्षणात फारसा काही रस नव्हता. आणि मलाही जायचं नसायचंच,” ते सांगतात.

ते अगदी छोटे असतानाच त्यांनी आपल्या वडलांना, होलू शेख यांच्या हाताखाली काम करायला सुरुवात केली. होलू चाचा अगदी निष्णात कारागीर होते. “बाबाये शारा बोस्तीर जोन्ने नांगोल बनाइतो. नांगोल बनाबार बा ठीक कोरबार जोन्ने अंगोर बोरीत आइतो शोब खेतिओक [माझे वडील गावातल्या सगळ्यांसाठी नांगर बनवायचे. सगळे जण आपापले नांगर दुरुस्त करून घेण्यासाठी आमच्या घरी यायचे].”

हनीफ काम करू लागले तेव्हा होलू त्यांना सगळ्या मापं घेऊन खुणा करून द्यायचे. त्यामुळे नांगर बनवण्याचं काम अगदी सुलभ होऊन जायचं. “लाकडाला कुठे भोकं पाडायची, ते तुम्हाला अगदी पक्कं माहीत हवं. मुरीकाथला [फाळ] अगदी योग्य कोनातच खोडाला जोडला गेला की नाही हे नीट पहावं लागतं,” हातातल्या लाकडावरून हात फिरवत फिरवत हनीफ सांगतात.

नांगराचा फाळ फारच कमी कोनात जोडला गेला तर तो कुणीच विकत घेत नाही. कारण मग मधल्या फटीत माती शिऱते आणि कामाचा वेग मंदावतो.

अगदी उत्तम नांगर तयार करण्याचा आत्मविश्वास यायला हनीफ यांना वर्षभर काम करावं लागलं. आणि मग त्यांनी आपल्या वडलांना सांगितलं, “आता तुम्ही मापाच्या खुणा करण्याची गरज नाही. आता काही काळजी करू नका.”

PHOTO • Mahibul Hoque
PHOTO • Mahibul Hoque

डावीकडेः हनीफ अली नांगर, दरवाजे, खिडक्या आणि पलंगाच्या कामासाठी फणसाचं लाकूड वापरणं पसंत करतात. विकत आणलेल्या लाकडाचा कुठलाही भाग वाया जाऊ द्यायचा नसतो त्यामुळे ते आणलेल्या लाकडातून जितकी जास्त शक्य तितकी अवजारं बनवतात. उजवीकडेः लाकडावरती कुठे कापायचं त्या जागा दाखवताना

मग ते आपल्या बाबांसोबत कामाला जाऊ लागले. त्यांना सगळे जण होलू मिस्त्री असं म्हणायचे. त्यांचे वडील दोन कामं करायचे. दुकानदार आणि हुइतेर म्हणजेच सुतार. त्यातही नांगर बनवण्यात कुशल असलेले सुतार. आजही त्यांना जुने दिवस आठवतात जेव्हा ते खांद्यावरच्या काठीला लाकडी वस्तू लटकवून घरोघरी जात असत.

वडील हळूहळू म्हातारे होऊ लागले होते आणि हनीफ त्यांच्यासोबत काम करतच होते. हनीफ यांना तिघी बहिणी. त्यांच्या लग्नाची जबाबदारी आता त्यांच्यावर येऊन पडली. “लोकांना आमचं घर माहीतच होतं. माझ्या वडलांना काही आलेलं सगळं काम करणं होत नव्हतं, त्यामुळे मग नांगर बनवण्याचं काम मी हातात घेतलं.”

चाळीस वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. आजघडीला हनीफ एकटेच राहतात. नंबर ३ बहुआझार गाव या पत्त्यावर त्यांचं घर आहे. तीच त्यांची कार्यशाळा सुद्धा आहे. या गावात त्यांच्यासारखे इतर अनेक बंगाली मुस्लिम राहतात. हे गाव दालगांव विधानसभा मतदारसंघात येतं. बांबूचा वापर करून बांधलेल्या त्यांच्या या एका खोलीमध्ये एक छोटा पलंग, काही भांडी-कुंडी इतक्याच गोष्टी आहेत – भात शिजवायचं भगुलं, एक कढई, एक दोन स्टीलच्या ताटल्या, वाट्या आणि एक पेला.

“माझ्या वडलांचं किंवा माझं काम आमच्या भागातल्या लोकांसाठी गरजेचं काम आहे,” ते म्हणतात. त्यांचे शेजारी पाजारी शेतकरीच आहेत. चार पाच घरांचं मिळून एक अंगण आहे, तिथे ते बसले होते. बाकी खोल्या त्यांच्या बहिणी, सर्वात धाकटा मुलगा आणि भाच्यांच्या आहेत. त्यांची बहीण इतरांच्या शेतात किंवा घरी कामाला जाते. आणि भाचे मंडळी बहुतेक वेळा दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये स्थलांतर करून जातात.

हनीफ यांना नऊ मुलं आहेत पण त्यांचं काम यांच्यापैकी कुणीही शिकून घेतलेलं नाही. आता त्यांच्या कामाची मागणी सुद्धा कमी व्हायला लागली आहे. “पारंपरिक पद्धतीने बनवलेला नांगर या मुलांना ओळखू पण यायचा नाही,” मुकद्दस अलींचा पुतण्या अफाजुद्दीन म्हणतो. ४८ वर्षीय अफाज आपल्या सहा बिघा कोरडवाहू जमिनीत शेती करतात. नांगर वापरणं त्यांनी १५ वर्षांपूर्वीच सोडून दिलंय.

PHOTO • Mahibul Hoque
PHOTO • Mahibul Hoque

दरांग जिल्ह्याच्या दालगाव विधानसभा मतदारसंघातल्या नंबर ३ बहुआझार या गावात एका छोट्याशा झोपडीत हनीफ राहतात. या गावात त्यांच्यासारखे अनेक मूळचे बंगाली मुसलमान राहतात

*****

“मी माझ्या सायकलवर जात असताना कुणाच्या घरात मोठी बेचकी असलेले वृक्ष दिसले तर घरमालकाला मी सांगून ठेवतो की झाड तोडायचं असेल तेव्हा मला सांग म्हणून. बेचके असलेल्या जाडजूड फांद्यांपासून उत्तम नांगर बनतात हे मी सांगतो त्यांना,” अली सांगतात. गावातल्या लोकांची त्यांची चांगली ओळख असल्याचंही ते म्हणतात.

मजा म्हणजे एखादं वळणदार, बेचकं असलेलं लाकूड आलं तर गावातले लाकडाचे व्यापारी सुद्धा त्यांना कळवतात. नांगर बनवण्यासाठी सात फुटी खोड आणि ३ बाय २ इंचाचा तळवा लागतो. त्यासाठी साल, शिसम, तिताचाप, शिरीष किंवा त्या भागातल्या स्थानिक वृक्षांच्या लाकडाचा वापर केला जातो.

“झाडाचं वय २५-३० वर्षं असलं तर त्याचे नांगर किंवा पंजे वगैरे जास्त काळ टिकतात. झाडाची खोडं आणि मोठ्या फांद्यांच्या ओंडक्यांपासून ही अवजारं तयार केली जातात,” ते सांगतात. आणि बोलता बोलता ते एका ओंडक्याचे दोन भाग करतात.

ऑगस्टच्या मध्यावर आमची भेट झाली तेव्हा ते लाकडाचा एक तुकडा नांगरामध्ये बसवत होते. “जर मी एक नांगर बनवण्याऐवजी दोन हातनाइंगले [बागकामातले पंजे] बनवले तर मला त्याच लाकडात ४००-५०० रुपये जास्त सुटतात,” ते सांगतात. त्यांनी नुकतंच एक वाकडं लाकूड २०० रुपयाला विकत घेतलं होतं.

“प्रत्येक लाकडापासून जितक्या जास्त वस्तू बनवता येतील तितक्या बनवायला पाहिजेत. आणि तितकंच नाही, शेतकऱ्यांना पाहिजे तशा आकारातच त्या बनल्या पाहिजेत,” अली सांगतात. गेल्या चाळीस वर्षांच्या अनुभवातून ते एक गोष्ट शिकले आहेत. ३३ इंची खोड आणि १८ इंची फाळ असलेला नांगर सगळ्यात जास्त वापरला जातो.

PHOTO • Mahibul Hoque
PHOTO • Mahibul Hoque

डावीकडेः हनीफ अली आसपासच्या गावांमध्ये बेचके असलेली लाकडांच्या शोधात असतात. कधी कधी तर गावातले लोक किंवा लाकडाचे व्यापारी देखील अशा फांद्या मिळाल्या तर त्यांना कळवतात. नांगरासाठी वापरण्यात येणारा ओंडका ते दाखवतात. उजवीकडेः त्यांच्याकडची सगळी अवजारं ते घरातल्या लाकडी माळ्यावर ठेवतात

PHOTO • Mahibul Hoque
PHOTO • Mahibul Hoque

डावीकडेः नांगर किंवा शेतीसाठी लागणारी इतर अवजारं अगदी अचूक बनवावी लागतात. नांगराचं खोड जिथे बसवलं जातं तिथे अगदी अचूक कोनात भोक करावं लागतं. ते जर चुकलं तर नांगराचा कोन कमी होतो. उजवीकडेः ओंडक्याचा वरचा आणि कडेचा भाग फोडण्यासाठी ते त्यांची २० वर्षं जुनी वाकस आणि ३० वर्षं जुनी कुऱ्हाड वापरतात

एकदा का लाकडाचा हवा तसा तुकडा हातात आला की त्यांचं काम सुरू होतं. सूर्योदयाआधीच ते त्यांची सगळी अवजारं तयार ठेवतात. त्यांच्याकडे काही छिन्न्या, वाकस, एक दोन करवती, एक कुऱ्हाड, रंधा आणि इतर काही अवजारं त्यांच्या घरीच लाकडी माळ्यावर ठेवलेली असतात.

करवतीच्या बिन दातेरी बाजूने ते लाकडावर खुणा करून घेतात. सगळी मापं हातानेच घेतली जातात. सगळ्या खुणा करून झाल्या की ते त्यांच्या ३० वर्षं जुन्या कुऱ्हाडीने लाकडाच्या बाजूच्या ढलप्या काढून टाकतात. “त्यानंतर मी तेशा [वाकस] वापरतो आणि लाकूड गुळगुळीत करून घेतो,” अली सांगतात. फाळ मात्र एकदम व्यवस्थित कोरून घ्यावा लागतो. जेणेकरून मातीत घुसल्यावर ती दोन बाजूंला फेकली जावी.

“नांगराचा तळभाग अंदाजे ६ इंच असतो. टोकाकडे तो १.५ ते २ इंचाने निमुळता होत जातो,” ते सांगतात. हा भाग ८ ते ९ इंच जाडीचा असून टोकाकडे त्याची जाडी २ इंच इतकी असते. तिथेच तो लाकडाला खिळ्याने जोडला जातो.

नांगराचा फाळ लोखंडाचा असतो. ९-१२ इंच लांब आणि १.५-२ इंच जाडीच्या लोखंडी कांबीचा फाळ तयार करतात. त्याची दोन्ही टोकं अणकुचीदार असतात. “दोन्ही टोकं धारदार असतात. एक जरा बोथट झालं किंवा झिजलं तर शेतकऱ्याला दुसरं वापरता येतं,” हनीफ सांगतात. हनीफ बेचिमारीच्या बाजारातून धातूचं सगळं साहित्य आणतात. हा बाजार त्यांच्या घरापासून तीन किलोमीटरवर आहे.

लाकडाच्या ओंडक्याला वाकस आणि कुऱ्हाडीच्या मदतीने आकार द्यायला पाच तास लागतात. त्यानंतर रंधा वापरून लाकूड गुळगुळीत करून घेतलं जातं.

एका नांगराचा आकार व्यवस्थित तयार झाला की हुइतेर म्हणजेच सुतार दांडी बसवण्यासाठी त्यावर भोक कुठे करायचं तिथे खूण करून घेतात. हनीफ सांगतात, “दांडी ज्या जाडीची असते भोकही अगदी तितकंच असतं. त्यामुळे दांडी घट्ट बसते आणि नांगरट करताना ती निसटत नाही. शक्यतो दांडी १.५ ते २ इंच जाड असते.”

PHOTO • Mahibul Hoque
PHOTO • Mahibul Hoque

डावीकडेः सहा महिने जुन्या ओंडक्याचा खडबडीत भाग काढून टाकला जातो. लाकडाच्या तुकड्याला नांगराचा आकार येण्यासाठी तो नीट तासून घ्यावा लागतो. या कामाला किमान एक दिवस लागतो. उजवीकडेः कामादरम्यान चार क्षण विश्रांती

PHOTO • Mahibul Hoque
PHOTO • Mahibul Hoque

डावीकडेः हनीफ अली त्यांच्या सायकलवर नांगर आणि त्याची दांडी घेऊन निघालेत. कधी कधी यासोबत पंजा आणि जू देखील असतं. ते पाच सहा किलोमीटर प्रवास करून बाजारात पोचतात. उजवीकडेः सोमवारच्या आठवडी बाजारात

नांगराची उंची कमी जास्त करता यावी यासाठी हनीफ दांडीच्या टोकावर पाच-सहा खाचा करतात. किती खोल नांगरट करायची त्याप्रमाणे नांगराची उंची कमी जास्त करणं यामुळे शेतकऱ्यांना शक्य होतं.

विजेवर चालणाऱ्या करवतीने लाकूड कापणं महाग पडतं आणि वेळही जास्त जातो. “२०० रुपयाचं लाकूड असेल तर ते कापायला १५० रुपये द्यावे लागतात.” एक नांगर बनवायला दोन दिवस लागतात. एका नांगराला १२०० रुपये मिळतात.

काही जण थेटच त्यांच्याकडे अवजारं घेण्यासाठी येतात. त्याशिवाय हनीफ दरांग जिल्ह्याच्या लालपूल बझार आणि बेचिमरी बझार या दोन आठवडी बाजारांमध्ये आपल्या वस्तू विकतात. “नांगर आणि त्याला लागणाऱ्या इतर वस्तू घ्यायच्या तर शेतकऱ्याला ३,५००-३,७०० रुपये खर्चावे लागतात,” अली सांगतात. किंमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे आता एखाद दुसरा शेतकरी किंवा जे इतरांना आपली अवजारं भाड्याने वापरायला देतात असेच मोजके लोक त्यांचे गिऱ्हाईक आहेत. “ट्रॅक्टरमुळे शेती आणि मशागतीची आमची पूर्वीची पद्धतच बदलून गेलीये.”

पण म्हणून हनीफ त्यांचं काम थांबवणार नाहीत. दुसऱ्याच दिवशी ते त्यांच्या सायकलवर एक नांगर आणि त्याची मूठ असा आपला माल लादतात. “ट्रॅक्टरनी मातीची पूर्ण वाट लागू द्या. लोक पुन्हा एकदा नांगर बनवणाऱ्यांकडेच येणार,” ते सांगतात.

या वार्तांकनासाठी मृणालिनी मुखर्जी फौंडेशन फेलोशिपअंतर्गत करण्यात आली आहे.

Mahibul Hoque

محب الحق آسام کے ایک ملٹی میڈیا صحافی اور محقق ہیں۔ وہ پاری-ایم ایم ایف فیلو ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Mahibul Hoque
Editor : Priti David

پریتی ڈیوڈ، پاری کی ایگزیکٹو ایڈیٹر ہیں۔ وہ جنگلات، آدیواسیوں اور معاش جیسے موضوعات پر لکھتی ہیں۔ پریتی، پاری کے ’ایجوکیشن‘ والے حصہ کی سربراہ بھی ہیں اور دیہی علاقوں کے مسائل کو کلاس روم اور نصاب تک پہنچانے کے لیے اسکولوں اور کالجوں کے ساتھ مل کر کام کرتی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Priti David
Translator : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے