“आज टीव्ही आलेत, मोबाइन फोन आलेत. लोक त्यावरच आपली करमणूक करून घेतात,” हातातल्या ढोलकच्या दोऱ्या कसत मुस्लिम खलीफा म्हणतात.
बाराव्या शतकातले वीरयोद्धे आल्हा आणि ऊदल (रुदलही लिहिलं जातं) यांचं महाकाव्य मुस्लिम खलीफा गातात. बिहारच्या समस्तीपूरच्या या लोकगायकाने गेली पन्नास वर्षं ही कला जपली आहे. त्यांचा आवाज जोरकस आहे, त्याला जवार आहे. अनेक वर्षं गाणाऱ्याचा गळा आहे त्यांचा.
एप्रिल-मे महिन्यामध्ये भात, गहू आणि मक्याची काढणी सुरू असते तेव्हा ते आपला ढोलक घेऊन शेतकऱ्यांसाठी शेता-शेतात जाऊन हे काव्य सादर करतात. दोन तासांच्या त्यांच्या कलेसाठी त्यांना नवं धान्य मिळतं. साधारण १० किलोपर्यंत. ते म्हणतात, “तिन्ही पिकं काढायला महिनाभर लागतो. त्यामुळे तेवढा एक महिना मी शेतातच फिरत असतो.” लगीनसराईच्या तीन महिन्यात देखील त्यांना भरपूर मागणी असते. तिथे त्यांना अगदी १० रुपयांपासून ते १५,००० रुपयांपर्यंत बिदागी मिळते.
आल्हा-ऊदलची वीरगाथा इतकी मोठी आहे की पूर्ण कथा ऐकायची तर किती तरी दिवस लागतात. त्यासाठी तसा श्रोता पण पाहिजे. खलीफा म्हणतात, “आजच्या काळात एवढं मोठं काव्य कोण ऐकणार?” खालिसपूर गावाचे रहिवासी असणारे ६० वर्षीय खलीफा यांच्या मते आजकाल या वीरगाथेमध्ये फारसा कुणाला रस राहिलेला नाही. आणि त्याचा थेट परिणाम त्यांच्या कमाईवर झाला आहे. इतरांचं सोडा, त्यांच्या मुलांना देखील या वीरगाथेचं काहीही अप्रूप नाही.
खलीफा इस्लाम धर्माचं पालन करतात पण नट या जातीत गणले जातात. बिहारमध्ये ही अनुसूचित जातींपैकी एक आहे. बिहारमध्ये या जातीची लोकसंख्या ५८,८१९ असली तरी पारीशी बोलताना खलीफा म्हणतात की “१०-२० गावांमध्ये मिळून एखादा असा [आल्हा-ऊदल] गायक मिळाला तरी पुष्कळ.”
खालिसपूर गावी त्यांच्या झोपडीवजा घरात खुंटीला ढोलक लटकवलेला आहे. झोपण्यासाठी एक खाट आणि बाकी काही सामान. त्यांच्या सहा पिढ्या याच झोपडीत राहिल्या आहेत. आता ते आणि त्यांच्या पत्नी मोमिना इथे वास्तव्याला आहेत. आम्ही त्यांना आल्हा-ऊदल ऐकवण्याची विनंती केली. तेव्हा संध्याकाळच्या वेळी गाणं चांगलं नसतं असं सांगून त्यांनी आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी यायला सांगितलं. त्यांचा शब्द पाळून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या घरी पोचलो. खाटेवर ढोलक काढून ठेवलेला होता आणि ते आपल्या कोरीव मिशीला कलप लावत होते.
पुढची पाच मिनिटं ढोलक सुरात लावण्याचं काम सुरू होतं. दोन्ही बाजूची पानं ताणून घेण्यासाठी वाद्या घट्ट ओढून घेतल्या. त्यातल्या पितळी कड्या सरकवून घेतल्या. बोटाने थाप देऊन ढोलक सुरात वाजतोय की नाही ते त्यांनी नीट पाहून घेतलं. मग पुढची पाच मिनिटं ते गात होते. आल्हा-ऊदल, बेतवा नदी, युद्ध, या वीरांचं शौर्य अशा सगळ्याचं सुंदर वर्णन या गाण्यामध्ये होतं. खलीफा सांगतात की कधी काळी ही गाणी ऐकवण्यासाठी त्यांनी अगदी १० कोस पायपीट केली आहे.
गाऊन झाल्यावर त्यांनी ढोलकची पानं परत सैल केली आणि तो खुंटीवर लटकवून टाकला. “चामडं सैल केलं नाही तर खराब होतं. पावसाळ्यात विजा चमकल्या तर ढोलक फुटतो,” ते सांगतात. “का फुटतो, काय माहित?”
त्यांच्या ढोलकचं खोड लाकडाचं आहे आणि किमान ४० वर्षं जुनं आहे. वाद्या आणि पानं अधूनमधून बदलावी लागत असली तरी खोड बदलत नाहीत. ते म्हणतात, “हे खोड अजून तरी टिकून आहे. मोहरीच्या तेलाची मालिश करतो त्याला. म्हणजे वाळवी लागत नाही.”
मुस्लिम खलीफा यांच्या मते २०-३० वर्षांपूर्वीचा काळ आल्हा-ऊदल गायकांसाठी सुवर्णकाळ होता. ‘बिदेसिया नाचा’च्या कार्यक्रमांमध्ये या गायकांना मोठी मागणी असायची. “मोठे जमीनदार त्यांच्या घरी ही वीरगाथा गाण्यासाठी कलाकारांना बोलावणं धाडायचे.”
आल्हा-ऊदलची संपूर्ण वीरगाथा ऐकायला किती तरी दिवस लागतात. खलीफा म्हणतात, ‘आजकाल इतकं मोठं काव्य ऐकायला वेळ कुणाला आहे?’
बिदेसिया हे विख्यात भोजपुरी नाटककार भिखारी ठाकूर यांचं एक सुप्रसिद्ध नाटक आहे. रोजगारासाठी गाव सोडून शहराकडे होणाऱ्या स्थलांतरावरचं हे नाटक नाच आणि गाण्याच्या माध्यमातून सादर केलं जातं.
कधी काळी आल्हा-ऊदल गायकांना मोठ्या जमीनदारांचा आश्रय होता. “वर्षभर आमच्या गाण्याला इतकी मागणी असायची की थोडी सुद्धा फुरसत मिळायची नाही. गाऊन गाऊन घसा बसायचा. कित्येक वेळा कार्यक्रम नाकारायला लागायचे.”
*****
आल्हा-ऊदल यांची वीरगाथा सांगणारं हे महाकाव्य उत्तरेकडच्या राज्यांमध्ये खास लोकप्रिय आहे. ‘द वर्ल्ड ऑफ म्यूझिक’ या वार्तापत्रात करीन शोमर आपल्या एका लेखात लिहितात, ’१२ व्या शतकात उत्तर प्रदेशच्या महोबा प्रांतामध्ये चंदेल राजा परमाल याचं राज्य होतं. आल्हा आणि ऊदल हे दोघं भाऊ त्याचे सैनिक. महोबाचं रक्षण करण्याची पूर्ण जबाबदारी या दोघांच्या खांद्यावर होती आणि ते त्यांच्या कामात अतिशय पटाईत होते. आल्हा-ऊदल यांची शौर्यगाथा महोबा आणि दिल्ली सल्तनतमध्ये झालेल्या युद्धासोबत संपते.’
मुस्लिम खलीफा सांगतात की त्यांचे पूर्वज महोबाचेच रहिवासी होते. मुघल बादशहा अकबराच्या काळात त्यांनी तिथून पळ काढला आणि बिहारमध्ये आले. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे पूर्वज राजपूत होते. बिहारमध्ये आल्यावर त्यांच्यापाशी आल्हा-ऊदलच्या शौर्याची गाणी होती आणि त्यांनी तीच गाऊन दाखवायला सुरुवात केली. ही गाणीच त्यांच्या कमाईचं साधन झाली. तेव्हापासून त्यांच्या घराण्यात या कलेचा वारसा पुढच्या पिढीकडे गेला आहे.
मुस्लिम खलीफा फक्त दोन वर्षांचे असताना त्यांचे वडील सिराजुल खलीफा मरण पावले. त्यांच्या आईने एकटीने त्यांना लहानाचं मोठं केलं. ते सांगतात, “कळायला लागलं तेव्हापासून कुणीही आल्हा-ऊदल गायला सुरुवात केली की मी तिथे ऐकायला जायचो. सरस्वतीचा आशीर्वाद होता त्यामुळे एकदा कानावर पडलेलं लगेच लक्षात रहायचं. वेडच लागलं होतं या गाण्याचं. इतर कशात म्हणून मन रमायचं नाही.”
त्या काळात ते रहमान खलीफा नावाच्या एका गायकाच्या संपर्कात आले. ते त्यांना ‘उस्ताद’ म्हणतात. “मी त्यांच्यासोबत कार्यक्रमांना जायचो. त्यांची सेवा करायचो. त्यांचं काही सामानसुमान असलं तर ते न्यायचो.” कधी कधी रहमान खलीफा त्यांच्या हातात ढोलक द्यायचे आणि म्हणायचे, ‘गा’. “त्यांच्यासोबत असताना माझे आल्हा-ऊदलचे १०-२० खंड पाठ झाले होते.”
खलीफा शाळेत शिकले नाहीत. त्यांना शिकायचं नव्हतं असं काही नाही. ते सरकारी शाळेत जायचे. एक दिवस तिथल्या एका शिक्षकाने त्यांना मारलं. त्या दिवसापासून त्यांनी शाळा सोडली ती कायमची.
ते म्हणतात, “७-८ वर्षांचा असेन तेव्हा. माझा आवाज लहानपणापासूनच चांगला होता. त्यामुळे शिक्षक मला नेहमी गायला सांगायचे. एक दिवस प्रार्थना म्हणत असताना माझं काही तरी चुकलं. एका शिक्षकाने जोरात थोबाडीत मारली. मला इतका राग आला की शाळेत जाणंच बंद केलं.”
मुस्लिम खलीफांचं स्वतःचं आयुष्य देखील एखाद्या काव्यासारखंच आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आल्हा-ऊदल गाऊन आपल्याला आवडणारं काम आपण आयुष्यभर केलं याचा आनंद तर नक्कीच आहे पण काही गोष्टींची खंतही आहे. खरं तर या गाण्याने, ढोलक वाजवत सांगितलेल्या काव्याच्या जोरावर त्यांनी आपली चार मुलं मोठी केली, त्यांची लग्नं लावून दिली. पण आता तो जमाना गेला. या कामातून मिळणाऱ्या पैशावर घर चालवणं अशक्य झालं आहे. आजकाल त्यांना एखाद्या घरगुती कार्यक्रमात कुणी बोलावलं तर ३०० ते ५०० रुपये मिळतात. बस्स.
एक दिवस त्यांच्या एकुलत्या एक मुलाने त्यांना सवाल केला की आयुष्यभरात त्यांनी काय कमावलंय? काही संपत्ती आहे का त्यांच्या नावावर? हा प्रश्न ऐकला आणि त्यांच्या काळजाला फार वेदना झाल्या. खंतावून ते म्हणतात, “काय बोलणार? निमूट गप्प बसावं लागलं. मीच विचार करू लागलो की खरंय, या गाण्यातून कसलीही संपत्ती कमावू शकलो नाहीये मी. घर बांधायला जमीनसुद्धा घेऊ शकलो नाही. जिथे जिथे गेलो तिथे भरपूर सन्मान झाला, पण पोटापाण्यापुरती कमाई काही झाली नाही.”
ते म्हणतात, “आमच्या सहा पिढ्या इथेच खपल्या. माझी झोपडी ज्या जागेवर आहे ती तळ्याकाठची जागाही सरकारच्या मालकीची आहे.”
त्यांच्या पत्नी मोमिना, वय ५५ गोंदण करण्यात अगदी तरबेज आहेत. आजकाल त्यांचा दमा बळावला आहे आणि कानाला ऐकूही कमी येतं. त्या सांगतात, “पूर्वी आम्ही गावोगाव फिरून हाताने गोंदून द्यायचो. आता काही काम करावं तर कसलीच शक्ती राहिलेली नाही. माझे पती आहेत, म्हणून मी जिवंत आहे.”
खलीफा यांच्या वैयक्तिक आयुष्यात काही गोष्टी राहून गेल्या. पण त्या पलिकडे जाऊन त्यांना एक गोष्ट फार खाते. आल्हा-ऊदलच्या काव्यात, गाण्यात नव्या पिढीला कसलाही रस राहिलेला नाही हे त्यांना कळून चुकलंय. त्यांच्यानंतर त्यांची ही कला पुढे नेणारं त्यांच्या कुटुंबात कुणी नाही हेही त्यांना माहितीये.
“माझा बाप, आजा, त्यांचे पूर्वज आल्हा-ऊदलच गायचे. आता मी गातोय. पण माझा मुलगा काही हे शिकला नाही. त्याला यात कसलाच रस नाही. आम्ही फार गोडीने हे गाणं-बजावणं करू लागलो. पण या मुलांचा जीव काही या कलेत रमत नाही.”
खलीफा सांगतात की “पूर्वी लग्नांमध्ये खुर्दक म्हणजेच वाजंत्री असायचे. नंतर त्यांची जागा बँडबाजाने घेतली. अंग्रेजी बाजानंतर आली ट्रॉली ज्याच्यात बँडच्या संगीतावर स्थानिक कलाकार गाणी गायचे. आणि आता डीजे आलाय. इतर सगळी वाद्यं आता बाद झालीयेत.”
“दुःख याच गोष्टीचं वाटतं की मी मरून गेल्यावर माझ्या या कलेचं कसलीही निशाणी राहणार नाही,” खलीफा म्हणतात.
बिहारमधल्या शोषितांच्या मुद्द्यांवर संघर्षरत असलेल्या एका दिवंगत कामगार नेत्याच्या स्मृतीत सुरू केलेल्या फेलोशिपमधून हा वृत्तांत तयार झाला आहे.